पुतिन यांच्याबद्दल खूप कमी बोलतात त्या दोन मुली कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्या कुटुंबाबद्दल

फोटो स्रोत, Alamy/Reuters
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचा दौरा केला. त्यामुळं पुतिन यांच्याशी संबंधित बातम्या भारतीय माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. तर सोशल मीडियावर पुतिन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दलही चर्चा सुरू आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर, अमेरिकेनं रशियावर व्यापक निर्बंध लादले. त्यावेळीही पुतिन यांच्या कुटुंबाबद्दलच्या बातम्या चर्चेत येऊ लागल्या होत्या.
अमेरिकेने 2022 मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या जवळच्या अनेक सहकाऱ्यांवर आर्थिक निर्बंध लादले, त्यात त्यांच्या मुलींचाही समावेश होता.
या यादीत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांचं कुटुंब तसंच काही रशियन बँकांचाही समावेश होता.
पण पुतिन यांच्या कुटुंबाबद्दल फारच कमी माहिती समोर आलेली आहे. ते स्वतःही त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी बोलतात.
2015 मध्ये त्यांनी एका पत्रकार परिषदेत त्यांच्या एका मुलीबद्दल विचारलेला प्रश्न टाळला होता.
"माझ्या मुली रशियामध्ये राहतात आणि त्यांनी रशियातच शिक्षण घेतलं आहे. मला त्यांचा अभिमान आहे. त्या अस्खलितपणे तीन आंतरराष्ट्रीय भाषा बोलतात. मी कधीही कुटुंबाबद्दल बोलत नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं भविष्य ठरवण्याचा अधिकार आहे. त्या त्यांचं जीवन सन्मानानं जगत आहेत," असं पुतीन म्हणाले होते.

फोटो स्रोत, Alamy
अमेरिकेनं लावलेल्या निर्बंधांमध्ये पुतिन यांच्या दोन मुली म्हणजेच मारिया व्होरोंत्सोव्हा आणि कॅटरिना तिखोनोव्हा यांचा समावेश होता.
बीबीसी हिंदीवर 2022 मध्ये एक बातमी प्रकाशित झाली होती, त्यात पुतिन यांच्या कुटुंबाबद्दल सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीचा उल्लेख होता.
पुतिन यांचे कुटुंब
कॅटरिना आणि मारिया या पुतिन आणि त्यांची माजी पत्नी ल्युडमिला यांच्या मुली आहेत. त्यांचं लग्न 1983 मध्ये झालं होतं.
त्यावेळी त्या फ्लाइट अटेंडंट होत्या तर पुतिन केजीबी (सोव्हिएत युनियनची गुप्तचर संस्था) अधिकारी होते.

फोटो स्रोत, AFP
हे लग्न 30 वर्षे टिकलं, त्या काळात पुतिन यांनी रशियन राजकारणात झपाट्यानं यश मिळवलं आणि त्यांची पकड मजबूत होत गेली.
2013 मध्ये ते पत्नीपासून वेगळे झाले. "हा दोघांचा निर्णय होता. आम्ही एकमेकांना फारसं भेटत नाही. आमच्या दोघांचंही स्वतःचं वेगवेगळं आयुष्य आहे," असं पुतिन त्यावेळी म्हणाले होते.
तर ल्युडमिला या कायम कामात 'पूर्णपणे मग्न' राहत असल्याचं सांगितलं होतं.
पुतिन यांची मोठी मुलगी मारिया
पुतिन आणि ल्युडमिला यांची मोठी मुलगी मारिया हिचा जन्म 1985 मध्ये झाला होता. तिनं सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातून जीवशास्त्राचा अभ्यास केला आहे.
त्यानंतर तिने मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेटची पदवीही मिळवली.
मारिया आता अध्यापन आणि लेखनात व्यस्त असते. ती एंडोक्राइन सिस्टीममध्ये तज्ज्ञ आहे.
मारिया एक बिझनेसवूमनही आहे. बीबीसी रशियाच्या माहितीनुसार, तिच्याकडे एका कंपनीची मालकी देखील आहे. ती एक मोठं मेडिकल सेंटर निर्माण करण्याच्या योजनेवर काम करत आहेत.
मारिया वोरोंतसोव्हाचं लग्न नेदरलँड्समधील एक व्यापारी जोरिट जूस्ट फासेन याच्याशी झालं आहे. फासेननं यापूर्वी रशियन गॅस कंपनी गॅझप्रॉमसाठी काम केलं होतं. पण आता ते विभक्त झाले आहेत.

फोटो स्रोत, Alamy
पुतिन यांनी छोटी मुलगी कॅटरिना तिखोनोव्हा तिच्या बहिणीपेक्षा अधिक चर्चेत असते. विशेषतः रॉक अँड रोल डान्सर म्हणून मिळवलेल्या ओळखीमुळं तिची चर्चा होत असते.
ती एका सहकाऱ्यासह 2013 मध्ये एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाचव्या स्थानापर्यंत पोहोचली होती.
त्याच वर्षी, कॅटरिनाने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या जुन्या मित्राचा मुलगा किरिल शामालोव्हशी लग्न केलं.
रशियाच्या ऊर्जा क्षेत्रात त्यांच्या भूमिकेसाठी 2018 मध्ये अमेरिकेने शामालोव्हवर निर्बंध लादले होते. मात्र, नंतर कॅटरिना आणि शामालोव्ह वेगळे झाले.

फोटो स्रोत, Reuters
कॅटरिना शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्रात काम करते. तिने 2018 मध्ये रशियाच्या सरकारी माध्यमांमध्ये न्यूरो टेक्नॉलॉजीवरील चर्चेत सहभाग घेतला.
2021 मध्ये ती एका व्यावसायिक व्यासपीठावरही दिसली. पण दोन्ही वेळा राष्ट्राध्यक्षांशी असलेल्या तिच्या संबंधांचा उल्लेख करण्यात आला नाही.
दोन्ही मुलींपैकी कोणीही राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत जास्त वेळ घालवत नाही, असं सांगितलं जातं.
पुतिन यांना नातवंडंही आहेत. त्यांनी 2017 मध्ये एका फोन-इन कार्यक्रमात त्यांचा उल्लेख केला होता. पण नेमके किती नातवंडं आहेत किंवा इतर अधिक माहिती त्यांनी दिली नव्हती.
"माझ्या नातवंडांपैकी एक नर्सरी स्कूलमध्ये आहे. त्यांनी राजपुत्रांसारखं वाढावं असं मला वाटत नाही. त्यांनी सामान्य लोकांसारखं वाढावं असं मला वाटतं," असं तेव्हा पुतिन म्हणाले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











