'आमच्या हॉटेलपासून 150 मीटरवर क्षेपणास्त्र पडलं', आखाती देश आणि इस्रायलमधील भारतीयांचे थरारक अनुभव

आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्याबाबतचे अनुभव सांगितले. डावीकडून सौम्यजित, कश्मीरा दत्तानी आणि झारना
    • Author, इशाद्रिता लाहिरी, रुपसा सेनगुप्ता
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

इस्रायल आणि अमेरिकेनं शनिवारी (27 फेब्रुवारी) इराणमधील महत्त्वाचे नेते, अधिकारी आणि लष्करी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला.

इराणी सैन्याचे चीफ ऑफ स्टाफ अब्दुल रहीम मोसवी, संरक्षणमंत्री मेजर जनरल अझिज नासिरझादेह, रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख जनरल मोहम्मद पाकपोर यांच्यासह अनेक वरिष्ठ कमांडर ठार झाले.

याला प्रत्युत्तर देताना इराणने शनिवारी संपूर्ण प्रदेशातील अमेरिकन तळांवर आणि मित्र देशांवर क्षेपणास्त्रं आणि ड्रोन हल्ले केले.

इस्रायल, बहरिन, कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिरात आणि जॉर्डन हे देश या हल्ल्यांचे लक्ष्य ठरत आहेत.

आखाती देशांमध्ये पसरलेल्या या संघर्षामुळं तिथं राहणाऱ्या भारतीयांसह अनेक लोकांसाठी अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे.

बीबीसीच्या पत्रकारांनी या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांशी संवाद साधला आणि त्यांनी आतापर्यंत काय अनुभवले, हे जाणून घेतले.

दुबईत हवेतच पाडली क्षेपणास्त्रं

दुबईमध्ये गेल्या 16 वर्षांपासून राहणारे उद्योजक थॉमस जॉर्ज यांनी बीबीसीच्या प्रतिनिधी इशाद्रिता लाहिरी यांना सांगितलं की, "28 फेब्रुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आम्ही पहिल्यांदा मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकले. आकाशात दोन इंटरसेप्शन (क्षेपणास्त्ं हवेतच पाडणं) होताना पाहिले."

"त्यानंतर 4 वाजण्याच्या सुमारास पुन्हा जास्त तीव्र आवाज ऐकू आले. संध्याकाळी साडेसात वाजता आणि मग आठ वाजताही स्फोट झाले. त्यानंतर सुमारे पाच-सहा तास शांतता होती. मग रात्री 3 वाजून 40 मिनिटांनी आणखी एक स्फोट झाला. 1 मार्चला परिस्थिती अधिक गंभीर वाटत होती."

अबू धाबीतील झायेद बंदरावर इराणने हल्ला केल्यानंतरची परिस्थिती

फोटो स्रोत, Getty Images

थॉमस जॉर्ज यांनी सांगितलं की, "झोपेत असताना घर हलल्यासारखं झालं, त्यामुळे माझी आणि माझ्या मित्रांची झोप उडाली. बाहेर जाऊन पाहिलं तर आकाशात अनेक इंटरसेप्शन (क्षेपणास्त्रे हवेतच पाडणे) होत होते. हवाई क्षेत्र बंद झाल्यावर सुरुवातीला भीती वाटली. पण पहिल्या आणि दुसऱ्या इंटरसेप्शननंतर आम्हाला विश्वास निर्माण झाला की, आपण सुरक्षित हातात आहोत."

"त्यानंतर काही ढिगारे (क्षेपणास्त्रांचे अवशेष) असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. थोड्या वेळासाठी भीती पुन्हा वाढली, पण नंतर परिस्थिती सामान्य वाटू लागली. इथे सध्या आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू आहे."

त्यांनी सांगितलं की, उड्डाणं आणि कामकाज पुन्हा पूर्णपणे सुरळीत होण्याबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

थॉमस जॉर्ज यांनी सांगितले की, केरळमध्ये राहणारे त्यांचे कुटुंबीय खूप चिंतेत होते.

जॉर्ज यांनी सांगितलं की, "त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती नव्हती. आम्ही सुरक्षित आहोत, अन्न आणि किराणा सामानही मागवू शकतो, हे आम्ही त्यांना सांगितलं. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला."

दुबईमध्ये गेल्या सोळा वर्षांपासून राहणारे उद्योजक थॉमस जॉर्ज यांनी हल्ल्यादरम्यानची परिस्थिती बीबीसीला सांगितली.
फोटो कॅप्शन, दुबईमध्ये गेल्या सोळा वर्षांपासून राहणारे उद्योजक थॉमस जॉर्ज यांनी हल्ल्यादरम्यानची परिस्थिती बीबीसीला सांगितली.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

माधव श्रीमोहन हे सौदी अरेबियामध्ये इंजिनिअर आहेत आणि सध्या ते दोन मित्रांसोबत बहरिनला फिरायला आले आहेत.

दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ते रस्त्यावर होते. तेव्हा दुकानदारांना दुकानं बंद करताना त्यांनी पाहिले. सुरुवातीला त्यांना वाटलं की, नमाजची वेळ झाली आहे, पण नंतर हल्ल्याची बातमी समजली.

त्यांनी सांगितलं, "आमच्या हॉटेलपासून 5-6 किलोमीटर अंतरावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि सायरन वाजत होते. आमचं हॉटेल अमेरिकन लष्करी तळाच्या अगदी जवळ होतं. हल्ल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती."

श्रीमोहन यांनी सांगितलं, "आम्हाला बहरिनच्या गृह मंत्रालयाकडून आपत्कालीन वाहनांसाठी रस्ता मोकळा करा असा संदेश आला. ज्या ठिकाणी क्षेपणास्त्र पडली, तेथून आमचं हॉटेल फक्त 150 मीटर अंतरावर होचं. लोक घाबरून आपापलं सामान घेऊन रस्त्यावर येत होते. कुटुंब हॉटेलमधून बाहेर पडत होती."

"आम्ही खूप घाबरलो होतो. माझे मित्र खूपच चिंतेत होते. हॉटेलमध्ये जाऊन सामान घेऊन लगेचच निघू असं ते म्हणत होते. आम्ही हॉटेलच्या मागून काळा, दाट धूर निघताना पाहिला. सूर्य दिसत नव्हता. धुराने संपूर्ण परिसर झाकोळून गेला होता."

माधव श्रीमोहन बहरिनला फिरायला आले आहेत, पण या हल्ल्यांत ते अडकले आहेत.
फोटो कॅप्शन, माधव श्रीमोहन बहरिनला फिरायला आले आहेत, पण या हल्ल्यांत ते अडकले आहेत.

मात्र त्यांनी सांगितलं की, "इथे काहीही दहशत नाही. फक्त ज्या लोकांना भारतात परत यायचं आहे, त्यांना विमान उड्डाणांबाबत चिंता आहे."

दुबईमध्ये काम करणारे टेक प्रोफेशनल सौम्यजित चौधरी यांनी सांगितलं की, "काही अस्वस्थता आहे, पण परिस्थिती फार भीतीदायक नाही. कारण बाहेर सर्व काही सामान्य दिसत आहे. आम्हाला क्षेपणास्त्रे हवेतच रोखली जात असल्याचं ऐकू येतं. कधी कधी हलके धक्केही जाणवतात, विशेषतः ज्या घरांमध्ये जास्त खिडक्या किंवा काचेच्या बाल्कनी आहेत."

त्यांनी पुढे म्हटलं, "रात्री सुमारे अडीच वाजता आपत्कालीन इशारा मिळाला. सरकारने घरातच राहण्याची सूचना दिली आहे. भारतातील आमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना जी बातमी मिळत आहे, ती इथल्या परिस्थितीपेक्षा अधिक भीतीदायक आहे. इथे सर्व काही नियंत्रणात आहे. मात्र दररोज बाल्कनीतून क्षेपणास्त्रांचे इंटरसेप्शन पाहणे हे काही साधंसोपं नाही."

इस्रायलमध्ये काय आहे परिस्थिती?

तेल अवीवमध्ये राहणारे सोम रवी यांनी ते 20 वर्षांपूर्वी इस्रायलला आले होते, असं बीबीसी प्रतिनिधी रूपसा सेनगुप्ता यांच्यांशी बोलताना सांगितलं.

"रविवारी सात-आठ वेळा सायरन वाजले. प्रत्येक वेळी आम्ही लगेच बंकरमध्ये जातो. इथं शाळा, पार्क, घरं आणि बस स्टॉपमध्येही बंकर आहेत. तेल अवीवमध्ये सर्व सुरक्षित आहे," असं ते म्हणाले.

निस्सिन मोसेरी 1963 मध्ये इस्रायलला आले होते. सध्या त्यांचं वय 80 हून अधिक आहे.

ते म्हणाले, "गेले काही तास शांतता आहे. काल रात्री ठरावीक वेळेनंतर सायरन वाजायचे आणि आम्ही बंकरच्या दिशेने पळायचो. आमच्या घरात बंकर आहे, पण वय आणि आजारपणामुळं तिथं पोहोचणं कठीण आहे."

इस्रायलमध्ये सायरन वाजताच लोक सुरक्षित ठिकाणांकडे धावताना दिसले.

फोटो स्रोत, Ilia YEFIMOVICH / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायलमध्ये सायरन वाजताच लोक सुरक्षित ठिकाणांकडे धावताना दिसले.

व्यावसायिक बेनी नायडू हेही 90 च्या दशकात इस्रायलला गेले. ते तेल अवीवमध्ये शॉप चालवतात.

ते म्हणाले, "सकाळपासून परिस्थिती काहीशी सुधारली आहे. मी आणि कुटुंब सुरक्षित ठिकाणी आहोत. भारतीय समुदायातील लोक माझ्या शॉपवर येतात."

ते म्हणाले, "सायरन वाजताच लोक बंकरच्या दिशेने धावतात. काही घरांमध्ये खाजगी बंकरही आहेत. आता आम्हाला याची सवय झाली आहे."

नायडू लग्नानंतर इस्रायलमध्ये स्थायिक झाले होते आणि व्यवसाय करत आहेत. त्यांनी इथलं नागरिकत्व घेतलं आहे. त्यांना तीन मुलं आहेत. त्यापैकी दोघं इस्रायलच्या सैन्यातही होते. धाकट्या मुलानेही तेच करावे, अशी इच्छा असल्याचं ते सांगतात.

दुबईच्या आकाशात रॉकेटला लक्ष्य करून पाडण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुबईच्या आकाशात रॉकेटला लक्ष्य करून पाडण्यात आले.

दरम्यान, दुबईच्या जुमेराह लेक टॉवर्समध्ये राहणारे 33 वर्षीय पुश्किन म्हणाले की, "शनिवारी सकाळी मोठा आवाज ऐकला तेव्हा ढगांचा आवाज होतोय असं वाटलं. पण हवामान स्वच्छ होतं. नंतर बातम्यांतून क्षेपणास्त्र पाडल्यानं स्फोट झाला होता, असं समजलं. नंतर दिवसभर स्फोट आणि हादरे जाणवले."

"आम्ही सरकारच्या सूचनांचे पालन करत आहोत. लवतरच परिस्थिती सामान्य होईल, अशी आशा आहे."

दुबईतील रौनक कोटेचा यांनी बीबीसी हिंदीसाठी त्याठिकाणी राहणाऱ्या काही लोकांशी संवाद साधला.

त्यांच्याशी बोलताना जुमेराह व्हिलेज सर्कलमध्ये राहणाऱ्या कश्मीरा दत्ता म्हणाल्या की, "24 तासांपासून आम्ही हल्ल्याचे आवाज ऐकत आहोत. पण लोक फार घाबरलेले नाहीत. रेस्तरॉ सुरू आहेत. परिस्थिती सामान्य आहे. दुबई सरकार परिस्थिती हाताळेल, याची आम्हाला खात्री आहे."

तीन दशकांपासून दुबईत राहणाऱ्या झारना यांनी, "प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. देवाच्या कृपेनं इथं कोणीही जखमी नाही. आम्हाला यूएई सरकार आणि सुरक्षा दलांवर पूर्ण विश्वास आहे," अशी प्रतिक्रिया दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)