राजगुरू : सहनशक्ती तपासण्यासाठी छातीवर चटके घेणारा पुण्याचा तरुण, चंद्रशेखर आझादांनी काय 'कोड नेम' दिलं होतं?

फोटो स्रोत, NATIONAL BOOK TRUST
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 10 मिनिटे
शिवराम हरि राजगुरू यांना लहानपणापासूनच पोहणे, तिरंदाजी आणि कुस्तीची आवड होती. त्यांचा गोफणीचा नेमही अचूक होता. नंतर त्यांनी पिस्तूल चालवायला देखील शिकून घेतलं होतं.
असं म्हटलं जातं की, स्वातंत्र्यसैनिकांमध्ये चंद्रशेखर आझाद यांच्यानंतर राजगुरू यांचं नेमबाजीचं कौशल्य सर्वात चांगलं होतं.
पुण्याजवळच्या खेडमध्ये जन्मलेल्या राजगुरू यांची वाराणसीमध्ये योगायोगानं स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ वैशंपायन यांच्याशी भेट झाली. त्यांनी कानपूरमध्ये राजगुरू यांची भेट चंद्रशेखर आझाद यांच्याशी घालून दिली होती.
अनिल वर्मा राजगुरू 'द इनव्हिन्सिबल रेव्होल्यूशनरी' हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी या भेटीचं रंजक वर्णन करताना लिहिलं आहे, "आझादांनी राजगुरूंना विचारलं की 'तुला क्रांतिकारक व्हायचंय तर?'"
त्यावर राजगुरूंनी उत्तर दिलं, "हो. मी यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत."
आझाद म्हणाले, "याचा परिणाम गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेलं शरीर, देशातून हद्दपारी किंवा फाशीदेखील असू शकते?"
यावर राजगुरूंचं उत्तर होतं, "मला याचा अंदाज आहे. मात्र याची मला भीती वाटत नाही."
आझादांनी पुन्हा विचारलं, "तुझ्यात कोणकोणते गुण आहेत?"
राजगुरू म्हणाले, "मला वाटतं की मी शारीरिकदृष्ट्या भक्कम आहे. शस्त्राशिवाय करायच्या लढाईत मी सक्षम आहे. तसंच देण्यात आलेलं कोणतंही काम करू शकतो. मी न खातापिता 3-4 दिवस राहू शकतो."
यावर आझाद म्हणाले, "आता तुझ्या अवगुणांबद्दल सांग."
राजगुरूंचं उत्तर होतं, "माझ्यात एकच दोष आहे. मी खूप जास्त झोपतो. इतकंच काय मी चालताना किंवा उभ्या-उभ्यादेखील झोपू शकतो."

फोटो स्रोत, Rajkamal Prakashan
चंद्रशेखर आझाद, राजगुरूंमुळे खूप प्रभावित झाले. त्यांनी राजगुरूंचा समावेश स्वातंत्र्यसैनिकांच्या दलात करून घेतला. त्यांना 'रघुनाथ' हे गुप्तनाव (कोडनेम) देण्यात आलं.
चंद्रशेखर आझाद यांनी ओरछामधील खलियाधानाच्या जंगलांमध्ये राजगुरूंना पिस्तूल चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याची कहाणी प्रसिद्ध आहे.
झोपण्याची सवय
राजगुरूंचे झोपण्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. एकदा राजगुरू, भगतसिंग आणि शिव वर्मा सरकारी खजिना लुटण्यासाठी गोरखपूरला गेले होते.
त्यांनी एक दुकान भाड्यानं घेतलं होतं. तिथे ते सर्वजण रात्री झोपायचे.

फोटो स्रोत, Unistar
शिव वर्मा यांनी 'रेमिनिसेंसेज ऑफ फेलो रेव्होल्यूशनरीज' हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे, "पहिल्याच रात्री आम्ही जमिनीवर गादी टाकून झोपलो होतो. अचानक रात्री एक वाजता फुत्कारण्याच्या आवाजानं मला जाग आली. मी टॉर्च लावला आणि पाहिलं की राजगुरूच्या डोक्यापासून दोन फुटांवर एक साप फणा काढून बसला होता. मी भगतसिंगाला उठवलं."
"भगतसिंगानं राजगुरूचा पाय पकडून ओढलं आणि ओरडला, 'उठ, तुझ्या डोक्याजवळ साप बसलेला आहे.' सापानं प्रकाश पाहताच तो दुसऱ्या खोलीत निघून गेला. राजगुरूनं कुस बदलली आणि म्हणाला, 'मला त्रास देऊ नका' आणि तो पुन्हा झोपला."
स्कॉटला मारण्यासाठी टीम पोहोचली पोलीस मुख्यालयात
लाला लाजपत राय यांचा एका लाठीलार्जमध्ये मृत्यू झाला. तेव्हा आझाद यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसैनिकांनी या लाठीलार्जचा आदेश देणारा, लाहोरचा वरिष्ठ पोलीस अधीक्षक जे. सी. स्कॉट याची हत्या करण्याची योजना आखली.
सुखदेव यांना मोहिमेचा संयोजक करण्यात आलं. त्यानंतर सुखदेवनं त्याची टीम तयार केली. यात चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू आणि जय गोपाल यांचा समावेश होता. राजगुरूंची निवड त्यांच्या अचूक नेमबाजीमुळे करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Indian Post
आझाद यांनी पिस्तूल त्यांच्याजवळ ठेवली. राजगुरूंना रिव्हॉल्व्हर आणि भगतसिंगांना ऑटोमॅटिक पिस्तूल देण्यात आलं. राजगुरू पोलीस मुख्यालयापर्यंत पायी पोहोचले. तर भगतसिंग, सुखदेव आणि जय गोपाल सायकलनं तिथे आले.
जय गोपाल यांनी फेल्ट कॅप घातलेल्या एका इंग्रज पोलीस अधिकाऱ्याला लाल रंगाची मोटरसायकल सुरू करताना पाहिलं. गोपालला वाटलं की हा अधिकारी स्कॉट आहे. मात्र प्रत्यक्षात तो जॉन साउंडर्स होता. त्यांनी राजगुरूंना इशारा केला.
राजगुरूंनी झाडली साउंडर्सवर गोळी
अनिल वर्मा यांनी लिहिलं आहे, "साउंडर्स हळूहळू मोटरसायकल मुख्य प्रवेशद्वाराकडे नेऊ लागला. त्याचवेळेस राजगुरूंनी त्याच्यावर गोळी झाडली. त्यांचा नेम अचूक होता. साउंडर्स जमिनीवर पडला. त्याचा एक पाय चालू असलेल्या मोटरसायकलमध्ये अडकला.
भगतसिंग यांच्या तेव्हाच लक्षात आलं होतं की, चुकीच्या माणसावर गोळी झाडण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडे आता दुसरा पर्याय नव्हता. साउंडर्स मारला गेला पाहिजे यासाठी त्यांनी त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या."
यानंतर भगतसिंग आणि राजगुरू डीएव्ही कॉलेजच्या दिशेनं कोर्ट स्ट्रीटवर पळू लागले. त्याचवेळेस ट्रॅफिक इन्स्पेक्टर डब्ल्यूजे फीम आणि हेड कॉन्स्टेबल चानन सिंह यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.

फोटो स्रोत, National Book Trust
वर्मा यांनी लिहिलं आहे, "राजगुरूंनी त्यांच्यावर गोळी झाडली, मात्र त्यांचा नेम चुकला. फीम एका नाल्यात पडला. मात्र चानन सिंहनं त्यांचा पाठलाग करणं सुरू ठेवलं. दोघेही पळत डीएव्ही कॉलेजच्या आवारात पोहोचले. आझाद तिथे आधीच पोहोचलेले होते. त्यांनी चानन सिंहला पाठलाग न करण्यासाठी सावध केलं.
मात्र चानन सिंहनं त्यांचं ऐकलं नाही. आझाद यांनी त्याच्यावर गोळी झाडली. ती चानन सिंहाच्या मांडीला लागली. दुसरी गोळी लागताच चानन सिंह जमिनीवर पडला. एक तासानंतर हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला."
लाहोरच्या भिंतींवर लागले गुलाबी रंगांचे पोस्टर
भगतसिंग, राजगुरू आणि आझाद भिंत ओलांडून हॉस्टेलमध्ये शिरले. तिथे ते काही वेळ गच्चीवर थांबले. जेणेकरून कोणी त्यांचा पाठलाग तर करत नाही ना याची खातरजमा करून घेता येईल. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली होती.
दीपाकांत रक्षे यांनी 'हुतात्मा शिवराम राजगुरू' हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे, "हा एक विरोधाभासच होता की इंग्रज सरकारला हादवणारी ही घटना घडवून आणणाऱ्यांकडे त्या रात्री जेवायलासुद्धा पैसे नव्हते. जय गोपाल यांनी कुठूनतरी त्यांचा मित्र बंशीलालकडून 10 रुपये उसनवार आणले. तेव्हा कुठे त्यांच्या जेवणाची व्यवस्था झाली."

फोटो स्रोत, Chaman Lal
साउंडर्स (25 वर्षे) हा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी होता. तो पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरच्या स्वीय सहाय्यकांचा (पीए) जावई होता.
दुसऱ्या दिवशी शहराच्या अनेक भिंतींवर हातानं लिहिलेले गुलाबी रंगांचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यांचा मथळा होता, 'साउंडर्स मेला आहे. लालाजींच्या हत्येचा बदला घेण्यात आला आहे.'
त्यावर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे कमांडर इन चीफ बलराज यांची सही होती.
राजगुरूंनी घेतला भगतसिंगांच्या नोकराचा वेश
आता सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे, साउंडर्सची हत्या करणाऱ्यांना लाहोरमधून कशाप्रकारे सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यावं.
सुखदेव यांनी क्रांतिकारक भगवती चरण यांच्या पत्नीला विचारलं की त्या कोणाची तरी पत्नी बनून लाहोरच्या बाहेर जातील का? त्या याच्यासाठी तयार झाल्या. त्यांना सर्वजण दुर्गा भाभी म्हणायचे. राजगुरू नोकराचा वेश घेऊन त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाले.

फोटो स्रोत, National Book Trust
नंतर दुर्गा भाभींना सांगितलं, "राजगुरूंनी नोकराच्या वेशात घाणेरडे कपडे घातले होते. ते घराबाहेर चटई पसरवून झोपले. त्यावेळेस राजगुरूंशी दाखवलेल्या उद्धतपणाबद्दल मी स्वत:ला कधीच माफ करू शकणार नाही."
"भगतसिंग आणि सुखदेव यांनी तर मी तयार केलेलं अन्न खाल्लं. मात्र राजगुरूंना एका प्लेटमध्ये जेवण बाहेर पाठवण्यात आलं. जेणेकरून ते नोकर असल्याचं चित्र कायम राहावं. त्यावेळेस माझ्या मनात इतका गोंधळ होता की तेसुद्धा आपल्यापैकीच एक आहेत, हे माझ्या लक्षात राहिलं नाही. मात्र राजगुरूंनी त्याबद्दल वाईट मानलं नाही. ते मला एक शब्दही बोलले नाहीत."
राजगुरू बसले तिसऱ्या वर्गाच्या डब्यात
ओव्हरकोट घातलेले भगत सिंग आणि त्यांची पत्नी बनलेल्या दुर्गा भाभी 20 डिसेंबरच्या सकाळी एका टांग्यातून लाहोर स्टेशनला पोहोचले. कोणी आपल्याला ओळखू नये म्हणून भगतसिंगांनी त्यांच्या ओव्हरकोटची कॉलर वर करून ठेवली होती.
त्यांचा उजवा हात कोटाच्या खिशात होता. तर डाव्या हातानं त्यांनी दुर्गा भाभींचा मुलगा शचि याला पकडलेले होतं. दुर्गा भाभींनी उंच टाचेची सँडल आणि महागडी साडी घातलेली होती. त्या एका अधिकाऱ्याच्या पत्नी दिसत होत्या.

फोटो स्रोत, amritmahotsav.in
राजगुरू यांनी पायजम्यावर फाटका जुना कोट घातलेला होता. त्यांच्या डोक्यावर पगडी होती. कमरेला दुपट्टा बांधलेला होता. ते या दोघांच्या मागे नोकराप्रमाणे पेटी (बॅग) घेऊन चालत होते.
भगतसिंग यांनी 14 डाऊन देहरादून एक्सप्रेसचे 2 प्रथम वर्गाची आणि 1 तिसऱ्या वर्गाचा तिकिट विकत घेतलं.
ते सामान्य गतीनं चालत पहिल्या वर्गाच्या डब्यात बसले. तर राजगुरू तिसऱ्या वर्गाच्या डब्याकडे गेले.
लखनौ स्टेशनवर राजगुरू, भगतसिंग आणि दुर्गा भाभींपासून वेगळे झाले. ते कानपूर आणि आग्रा होत वाराणसीला पोहोचले. तिथे त्यांनी नागरी प्रचारणी सभेसमोरच्या एका व्यायामशाळेत तरुणांकडून व्यायाम करवून घ्यायला सुरुवात केली.
राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांच्यातील वाद
काही दिवसांनी आग्रा हे क्रांतिकारकांच्या कारवायांचं केंद्र झालं. तिथे त्यांनी हिंग मंडी आणि नाई मंडीमध्ये दोन घरं भाड्यानं घेतली. एक दिवस राजगुरूंनी एक कॅलेंडर आणलं. त्यावर एका सुंदर महिलेचं चित्र होतं. ते त्यांनी भिंतीवर टांगलं.
अनिल वर्मा यांनी लिहिलं आहे, "चंद्रशेखर आझाद खोलीत आल्यावर त्यांना ते कॅलेंडर दिसलं. त्यांनी ते काढून त्याचे तुकडे करून ते कचरापेटीत फेकून दिलं. राजगुरू परत आल्यावर त्यांना ते कॅलेंडर फाडलेलं दिसलं. ते ओरडून म्हणाले, 'हे कॅलेंडर कोणी फाडलं?' त्यावर आझाद तितक्याच मोठ्या आवाजात म्हणाले, 'मी' फाडलं."
"राजगुरूंनी त्यांना विचारलं की 'तुम्ही असं का केलं? ते मला अतिशय आवडलं होतं.' त्यावर आझाद रागावून म्हणाले, 'या फोटोशी तुझा काय संबंध?' राजगुरूंनी उत्तर दिलं, 'तो एक सुंदर फोटो होता.
तुम्ही प्रत्येक सुंदर फोटो नष्ट कराल का?' त्यावर आझाद म्हणाले, 'माझ्या हातात असेल तर हो तसंच करेल.' तेव्हा राजगुरू त्यांना म्हणाले, 'मग जा, ताजमहालदेखील नष्ट करून टाका'."

फोटो स्रोत, Unistar
नंतर चंद्रशेखर आझादांनी राजुगुरूंना समजावलं की, "आपण आपलं कुटुंब सोडून फक्त एका उद्देशानं इथं आलो आहोत. तो म्हणजे आपल्या देशाला स्वांतत्र्य मिळवून द्यायचं. मला वाटतं की आपण सर्वांनी त्यावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
सौंदर्याबद्दलचं तुझ्या प्रेमामुळे आपण आपल्या मार्गापासून भरकटू आणि तो आपला कमकुवतपणा बनायचा, अशी मला भीती वाटते. ते ऐकून राजगुरू शांत झाले."
तापलेल्या चिमट्यानं भाजून घेतलं स्वत:चंच पोट
चंद्रशेखर आझाद नेहमी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगायचे की पोलिसांच्या हाती पडू नये, यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न करावेत. मात्र जर तशीच परिस्थिती उद्भवली, तर त्यांनी लढून त्यांचा जीव द्यावा. आझाद यांचं हे म्हणणं ऐकून राजगुरू विचार करू लागले की जर त्यांच्या बाबतीत अशी वेळ आली तर ते काय करतील.
अनिल वर्मा यांनी लिहिलं आहे, "त्यांनी एक चिमटा घेतला आणि तो आगीत गरम केला. तो चिमटा लाल झाल्यानंतर त्यांनी तो त्यांच्या छातीला लावला. त्यांना प्रचंड वेदना झाल्या. त्यांची सर्व त्वचा भाजून निघाली. असं त्यांनी सात वेळा केलं. ते त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेत होते. रात्री झोपेत असताना या वेदनेमुळे ते विव्हळले."
"आझाद त्यांच्या शेजारीच झोपले होते. विव्हळण्याच्या आवाजानं ते जागे झाले. त्यांनी राजगुरूंना त्यामागचं कारण विचारलं. आधी राजगुरूंनी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आझाद यांनी आग्रहानं विचारल्यावर त्यांनी सर्व सांगितलं. आझाद यांनी राजगुरूंचा सदरा काढला. मेणबत्तीच्या प्रकाशात आझादांनी पाहिलं की राजगुरूंच्या छातीवर फोड आले होते. ते पाहून आझाद यांच्या डोळ्यात अश्रू आले."
वर्मा यांनी लिहिलं आहे की जेव्हा राजगुरू यांना फाशी दिली जाणार होती, तेव्हा स्वांतत्र्यसैनिक सुशीला दीदी त्यांना भेटायला लाहोरच्या तुरुंगात गेल्या. या घटनेची आठवण करून देत त्यांनी राजगुरूंना विनंती केली की भाजल्यामुळे छातीवर तयार झालेल्या खुणा ते त्यांना दाखवू शकतात का?
राजगुरूंनी हसत त्यांच्या सदऱ्याची बटणं उघडली. सुशीला दीदींनी एका खऱ्या देशभक्ताचा दृढनिश्चिय त्यांच्या डोळ्यांनी पाहिला.
राजगुरू आणि भगतसिंगातील विचित्र स्पर्धा
राजगुरू, भगतसिंगांना एकप्रकारे त्यांचे स्पर्धक मानत असत. देशासाठी कोण आधी जीव देणार, यावरून या दोघांमध्ये स्पर्धा होती. पार्टीकडे ते मागणी करत असत की त्यांना सर्वात आधी गोळी झाडण्याची संधी देण्यात यावी.

फोटो स्रोत, Harper Collins
शिव वर्मा यांनी लिहिलं आहे, "केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकण्याचा मुद्दा जेव्हा आला, तेव्हा राजगुरू या गोष्टीवर अडून बसले की भगतसिंगांबरोबर बटुकेश्वर दत्त किंवा इतर कोणालाही पाठवण्यात येऊ नये. हे काम ते स्वत: करतील."
"त्यावेळेस चंद्रशेखर आझाद यांनी युक्तिवाद केला की पकडलं गेल्यावर तुला न्यायालयात जबाब द्यावा लागेल. तुला इंग्रजी येत नाही. जर तू योग्य जबाब दिला नाही, तर या कामामागचा राजकीय उद्देश पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्व गोष्टीवर पाणी फिरेल. त्यावर राजुगरू म्हणाले, भगतसिंगांना सांगा की त्यांनी माझ्यासाठी इंग्रजीत वक्तव्य तयार करावं. मी ते पाठ करून घेईन. यावर देखील आझाद यांनी राजगुरू यांचं म्हणणं ऐकलं नाही. तेव्हा राजगुरू नाराज होऊन पुण्याला निघून गेले."
न्यायालयानं दिली मृत्यूदंडाची शिक्षा
साउंडर्सच्या हत्येनंतर अनेक दिवसांनी राजगुरूंना पुण्यात अटक करण्यात आली. त्यांच्याकडे टिनचा एक डबा सापडला. त्यात एक रिव्हॉल्व्हर आणि 14 गोळ्या ठेवलेल्या होत्या.
त्यांना ट्रेननं लाहोरला नेण्यात आलं. ट्रेन ज्या स्टेशनांवरून गेली, तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांना पाहण्यासाठी हजारो लोक जमले. ग्वाल्हेरजवळ अशोक नगर रेल्वे स्टेशनवर राजगुरूंनी जेव्हा त्यांचं डोक ट्रेनच्या खिडकीतून बाहेर काढलं, तेव्हा एका इंग्रज अधिकाऱ्यानं त्यांना काठीनं मारलं.

फोटो स्रोत, Getty Images
अनिल वर्मा यांनी लिहिलं आहे, "ते दृश्य पाहून तिथे असलेल्या एका 12 वर्षांच्या मुलाचं रक्त इतकं उसळलं की त्यानं एक दगड उचलून तो त्या अधिकाऱ्याला मारला. पोलिसांनी त्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या मुलाचं नाव कृष्ण सरल होतं. पुढे त्यानं भारतीय क्रांतिकारकांवर अनेक पुस्तकं लिहिली."
साउंडर्सच्या हत्येसाठी अटक करण्यात आलेल्या लोकांना भेटण्यासाठी 19 ऑक्टोबरला नेताजी सुभाष चंद्र बोस लाहोरच्या तुरुंगात गेले. खटला चालू असताना मोतीलाल नेहरू, रफी अहमद किडवई आणि मोहनलाल सक्सेना, न्यायालयात भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी गेले होते.
न्यायालयानं या तिघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. मदनमोहन मालवीय यांनी व्हॉईसरॉयला तार पाठवून, या तिघांच्या मृत्यूदंडाची शिक्षा कमी करून जन्मठेप करण्याचं आवाहन केलं. मात्र व्हॉईसरॉय यांनी त्यांची ही विनंती फेटाळली.
ठरलेल्या वेळेआधीच फाशी देण्याचा निर्णय
असं ठरलं होतं की 24 मार्च 1931 ला या तिघांना फाशी देण्यात येईल. त्यांचे वकील प्राणनाथ मेहता 23 मार्चला राजगुरूंना भेटण्यासाठी तुरुंगात गेले. राजगुरूंच्या चेहऱ्यावर एक साधी सुरकुतीदेखील नाही, हे पाहून ते थक्क झाले.
चार वाजता तुरुंगातील न्हावी बरकतनं कैद्यांना सर्वात आधी बातमी दिली की या तिघांना 11 तास आधीच फाशी दिली जाणार आहे.

फोटो स्रोत, Harper Collins
कुलदीप नैयर यांनी 'विदआऊट फियर' हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी लिहिलं आहे, "तुरुंगातील सर्व कैद्यांना चार वाजताच त्यांच्या बराकीत जाण्यास सांगण्यात आलं होतं. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी शेवटचं स्नान केलं. काळ्या रंगाचे कपडे घातले. डॉक्टरनं त्यांचं वजन मोजलं."
"त्यांनी मागणी केली की त्यांना हातकडी घालण्यात येऊ नये. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली. हे तिघेही वाघ, त्यांच्या कोठडीतून बाहेर पडले. त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. भगतसिंग मधोमध चालत होते. सुखदेव त्यांच्या डावीकडे होते आणि राजगुरू त्यांच्या उजव्या बाजूला होते. तिघेही एकमेकांचे हात हातात घेऊन चालत होते."
त्याचवेळेस भगतसिंग अचानक गीत गाऊ लागले - दिल से न निकलेगी न मरकर वतन की उल्फत/मेरी मिट्टी से भी खुशबू-ए-वतन आएगी'
इंग्रज डेप्युटी कमिश्नर हे दृश्य आश्चर्यानं पाहत होता. त्याचवेळेस भगतसिंग त्याच्याकडे वळून म्हणाले, "तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला पाहायला मिळतं आहे की भारतीय क्रांतिकारक कशाप्रकारे आनंदानं मृत्यूला कवटाळतात." तिघांनी पायऱ्या चढण्यास सुरुवात केली आणि फाशीच्या तख्ताजवळ पोहोचले.

फोटो स्रोत, The Tribune
अनिल वर्मा यांनी लिहिलं आहे, "तिथे सर्वांनी घोषणा दिल्या. 'इंकलाब झिंदाबाद.' जल्लादानं थरथरत्या हातांनी त्याचे पाय आणि हात बांधले. त्यांचे चेहरे काळ्या कापडानं झाकले. त्याआधी त्यांनी फाशीच्या दोराचं चुंबन घेतलं. बरोबर 7 वाजून 33 मिनिटांनी मॅजिस्ट्रेटनं त्याच्या घड्याळाकडे पाहून हात हलवला."
काही क्षणांमध्येच त्यांच्या शरीरानं प्राणत्याग केला. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषीत केलं. तुरुंगातील वातावरण असं होतं की एका भारतीय अधिकाऱ्यानं मृत लोकांच्या शरीराची ओळख पटवण्यास नकार दिला.
त्याला लगेचच नोकरीवरून काढून ताब्यात घेण्यात आलं. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरूंना ज्याला मारायचं होतं, तो जे सी स्कॉट, लाहोर रेंजचा डीआयजी होता.
त्यानं विनंती केली की त्याला भारतातील त्याची सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी. मात्र भारत सरकारनं त्याचं संपूर्ण रेकॉर्ड पाहून त्याची विनंती फेटाळली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























