'ट्रम्प यांची माघार', इराणशी संघर्ष थांबवण्याबाबतच्या ट्रम्प यांच्या विधानावर इराणच्या सैन्याशी संलग्नित वृत्तसंस्थेची प्रतिक्रिया

फोटो स्रोत, AFP via Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मध्य पूर्वेत सुरू असलेला संघर्ष पूर्णपणे थांबवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. ते म्हणाले की 'संपूर्ण तोडग्या'च्या मुद्द्यावर 'सकारात्मक चर्चा' झाली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प असंही म्हणाले की ते पुढील 5 दिवस इराणचे वीज प्रकल्प आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ला करणं टाळणार आहेत.
त्यांनी ट्रूथ सोशलवरील एका पोस्टमध्ये लिहिलं आहे, "मला हे सांगण्यास आनंद होतो आहे की अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये पश्चिम आशियातील संघर्षावर पूर्ण तोडगा काढण्याबाबत खूपच चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली आहे."
"या रचनात्मक चर्चेची दिशा आणि वातावरण लक्षात घेता, जी पूर्ण आठवडाभर सुरू राहील, मी युद्ध विभागाला सूचना केल्या आहेत की इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा केंद्रावरील सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी टाळण्यात यावेत. हा निर्णय बैठका आणि चर्चांच्या यशस्वीतेवर अवलंबून राहील."
परंतु, ट्रम्प हे मागे हटल्याची प्रतिक्रिया IRGC शी संलग्नित असलेल्या वृत्तसंस्थेनी दिली आहे.
'ट्रम्प यांची माघार' - इराणच्या आयआरजीसीशी संलग्न वृत्तसंस्था
बीबीसी फारसीच्या वरिष्ठ प्रतिनिधी घोंचेह हबीबीजाद यांच्यानुसार,
इराणच्या फार्स न्यूज एजन्सीनं एका अज्ञात इराणी सूत्राचा संदर्भ देत सांगितलं आहे की "ट्रम्प यांच्याशी कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क झालेला नाही."
ही एजन्सी इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स म्हणजे आयआरजीसीशी संलग्न आहे.
हबीबीजाद यांच्यानुसार या सूत्राचं म्हणणं आहे की "पश्चिम आशियातील सर्व पॉवर स्टेशन आमच्या लक्ष्यावर असतील हे त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी माघार घेतली."

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किंमतीत घसरण
डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्ष थांबवण्याबाबत जे वक्तव्य केलं त्यानंतर शेअर बाजारात तेजी येण्यास सुरुवात झाली आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर ब्रेंट क्रूडच्या किंमतीत 13 टक्के घसरण झाली आहे. ती आता जवळपास 96 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे.
लंडनच्या एफटीएसई निर्देशांकात आता 0.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. याआधी या निर्देशांकात 2 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली होती.
नैसर्गिक वायूची किंमत 159 पेंस प्रति थर्मवरून खाली येत जवळपास 139 पेंस प्रति थर्म झाली आहे.

फोटो स्रोत, EPA
अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत - बर्नड डेबसमॅन ज्युनियर, व्हाईट हाऊस रिपोर्टर
डोनाल्ड ट्रम्प यांनी थोड्या वेळापूर्वी दिलेला संदेश, हा ऑपरेशन एपिक फ्युरीची सुरुवात झाल्यानंतरचा कदाचित त्यांचा सर्वात सामंजस्यपूर्ण संदेश होता. मात्र यातून अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत.
त्यांनी इराणबरोबर 'अतिशय चांगली आणि उपयुक्त' चर्चा झाल्याचा उल्लेख केला. मात्र इराणनं याला दुजोरा दिलेला नाही. हे वक्तव्यं गेल्या दोन दिवसांमध्ये दोन्ही बाजूंनी घेण्यात आलेल्या आक्रमक भूमिकेच्या अगदी उलट आहे.
याव्यतिरिक्त, हे स्पष्ट झालेलं नाही की या चर्चेचा मुख्य विषय काय होता.
कदाचित, इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम किंवा अणु कार्यक्रम किंवा फक्त शस्त्रसंधी हा या चर्चेतील मुद्दा राहिला असेल.
ही एक अशी शक्यता आहे, जी ट्रम्प यांनी शुक्रवारी (20 मार्च) विशेषकरून नाकारली होती.
यामागे होर्मुझची सामुद्रधुनी हेदेखील कारण असू शकतं. अर्थात इराणनं अद्याप सार्वजनिकरित्या हा मार्ग सागरी वाहतुकीसाठी खुला करण्याचं आश्वासन दिलेलं नाही.
बहुतांश जाणकारांना हे अशक्य वाटतं. कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं मजबूत नियंत्रण असणं ही त्यांची या युद्धातील सर्वात मोठी ताकद आहे.
आता जगाचं लक्ष या चर्चेबद्दलच्या कोणत्याही अपडेट किंवा माहितीवर आहे. सर्वजण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करतील की भविष्यात याचा काय अर्थ असू शकतो.
ट्रम्प यांनी दिली होती 48 तासांची अंतिम मुदत
एक दिवस आधीच ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणला अंतिम मुदत देत म्हटलं होतं की होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्यासाठी 'इराणकडे 48 तास आहेत.'
ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट केलं, "जर इराणनं कोणत्याही धमकीशिवाय जर पुढील 48 तासांमध्ये होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर अमेरिका त्यांच्या अनेक वीज प्रकल्पांवर हल्ला करून ते नष्ट करेल. याची सुरुवात त्यांच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून होईल."
शनिवारी (21 मार्च) डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा अशावेळी आला, जेव्हा इराणच्या दोन क्षेपणास्त्रांनी दक्षिण इस्रायलला लक्ष्य केलं. त्यात इस्रायलच्या अघोषित अणुकेंद्राचाही समावेश आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक लोक जखमी झाले. युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जातो आहे.
मात्र इराणनं याला उत्तर देताना म्हटलं होतं की ते या प्रदेशातील अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या ऊर्जा केंद्र, डीसॅलिएशन पायाभूत सुविधांवर (पाण्याचं शुद्धीकरण करणारे प्रकल्प) हल्ले करेल.
रविवारी (22 मार्च) ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये दावा केला होता की "अमेरिकेनं इराणला नकाशावरून संपवून टाकलं आहे."
प्रत्यक्षात न्यूयॉर्क टाइम्सनं ट्रम्प यांच्या युद्ध रेकॉर्डचं विश्लेषण करणारं एक वृत्त प्रकाशित केलं होतं. त्याचा मथळा होता - ट्रम्प इस हायडिंग द ट्रूथ अबाउट वॉर इन इरान.
ट्रम्प यांनी हा आरोप फेटाळला की इराणमधील त्यांची उद्दिष्टं साध्य करण्यात त्यांना 'अपयश आलं आहे'. ते म्हणाले, "हो, मी साध्य केलं आहे आणि ठरलेल्या वेळेच्या अनेक आठवडे आधीच."
होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराणचं वक्तव्य
ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्याच्या काही तास आधी इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील सागरी सुरक्षेबाबत एक प्रदीर्घ वक्तव्य जारी केलं होतं.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यात म्हटलं होतं, इराणनं संयुक्त राष्ट्रसंघाची सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वांसाठी कटिबद्ध असलेला एक जबाबदार देश म्हणून सागरी मार्गाचं स्वातंत्र्य आणि सुरक्षेच्या तत्वांना सातत्यानं कायम ठेवलं आहे."
"अनेक वर्षांपासून इराणनं या प्रदेशातील पर्शियन आखात, होर्मुझची सामुद्रधुनी आणि ओमानच्या समुद्रात या तत्वांचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील देशांचं सार्वभौमत्व आणि अधिकारांचा सन्मान केल्याशिवाय व्यवहारात या तत्वांचा सन्मान करणं शक्य नाही, हे स्पष्ट आहे."
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं पुढे म्हटलं आहे, "28 फेब्रुवारी 2026 पासून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेच्या कलम 2(4) आणि बळाच्या वापराला प्रतिबंधित करणाऱ्या नियमांचं स्पष्टपणे उल्लंघन करत अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला. त्याचा परिणाम म्हणून पर्शियन आखाताचा प्रदेश आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नौकानयन (नॅव्हिगेशन) आणि मालवाहतूक (शिपिंग)च्या सुरक्षेवर थेटपणे परिणाम झाला आहे."
"इराणनं या हल्ल्यांमुळे स्वसंरक्षणासाठी या प्रदेशातील अमेरिकेतील लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे. हल्लेखोर आणि त्यांचे पाठिराखे इराणच्या विरोधातील त्यांच्या शत्रुत्वाचा उद्देश पुढे नेण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा गैरवापर करू शकणार नाही, याची खातरजमा करण्यासाठी इराणनं अनेक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत."
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे, "होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावरील देश म्हणून आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इराणनं हल्लेखोरांच्या मालकीच्या किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या किंवा त्यांच्या कारवायांमध्ये भाग घेत असलेल्या जहाजांची वाहतूक रोखली आहे."
"वारंवार भर देत सांगण्यात आलं आहे की होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात आलेली नाही. त्यातून होणारी सागरी वाहतूक निलंबित करण्यात आलेली नाही. या मार्गानं जहाजांची वाहतूक सुरू आहे. फक्त एवढीच अट आहे की यासाठी आवश्यक उपाययोजना आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या बाबींचं पालन करण्यात यावं."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.





























