'मेट्रोचा प्रवास वेगवान, पण पूर्णपणे संपर्क तुटतो' मुंबईत अंडरग्राउंड मेट्रोमध्ये मोबाईल नेटवर्कच नाही

- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
"मेट्रोच्या अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासात नेटवर्क नसल्यामुळे संपर्क पूर्णपणे तुटतो. ना फोन येतो, ना जातो, ना इंटरनेट चालतं. कार्यालयीन काम आणि कोणाशी संपर्क साधायचा असेल तर अडचणी येतात. मग हा प्रवास करायचा तरी कसा?"
अंधेरीहून चर्चगेटला जाणाऱ्या अकाउंट असलेल्या जय जाधव या प्रवाशाची ही उद्विग्न प्रतिक्रिया मुंबई मेट्रो 3 मधील सध्याच्या स्थितीवर नेमका प्रकाश टाकते.
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सुरू झालेली 33.5 किमीची ही 'अंडरग्राउंड' मेट्रो सध्या नेटवर्क अभावी वेगळ्याच तांत्रिक पेचात अडकली आहे.
ऑक्टोबर 2025 पासून पूर्ण क्षमतेने धावणाऱ्या या मेट्रोमध्ये प्रवाशांना मोबाईल नेटवर्कअभावी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मोबाईल नेटवर्क सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीचे कंत्राटदार त्यांच्या करारातील दायित्वे पूर्ण करण्यात असमर्थ ठरल्यामुळे, त्यांच्या सेवा संपुष्टात आणण्यात आल्या आहेत.
नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी आता नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, असे एमएमआरसीएल प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
प्रवाशांचे अनुभव: मेट्रो की 'नो नेटवर्क' झोन?
मेट्रो 3 मुळे उपनगरातून दक्षिण मुंबईत पोहोचणे सोपे झाले असले, तरी प्रवाशांच्या तक्रारींचा पाढा मोठा आहे. प्रवास करत लॅपटॉप किंवा मोबाईलवर काम करणाऱ्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी आणि सर्वच प्रवासी चाकरमान्यांसाठी हा प्रवास डोकेदुखी ठरत आहे.
"मेट्रोमध्ये पाऊल ठेवल्यापासून सिग्नल गायब होतात. महत्त्वाचे मेल्स किंवा क्लायंटचे कॉल्स घेता येत नाहीत. आरे ते आचार्य अत्रे चौक दरम्यान थोडंफार व्होडाफोनचं नेटवर्क मिळायचं, पण आता काहीच नेटवर्क मिळत नसल्यामुळे आमचं नुकसान होत आहे," असं आयटी प्रोफेशनल उत्कर्ष पाटील यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, MMRCL
मेट्रो 3 मधून प्रवास करणाऱ्या अस्मिता मेहतर सांगतात की, आम्हाला प्रवास करताना चिंता वाटते. प्रवासादरम्यान घरच्यांशी किंवा कोणाशीही संपर्क होऊ शकत नसल्याने एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
अनेक मेट्रोमध्ये नेटवर्क असते, मात्र मुंबईत का नाही, असा प्रश्न आम्हाला पडतो. प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवं.
नेमकी समस्या काय?
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या मार्गावर दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी एका परदेशी कंपनीची नियुक्ती केली होती. मात्र, हे कंत्राट मागील आठवड्यात रद्द करण्यात आले आहे.
संबंधित कंपनी करारातील अटी पूर्ण करण्यात अपयशी ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, या कंत्राटदार कंपनीचे आणि भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांचे व्यावसायिक वाद होते.

त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्या या कंत्राटदारासोबत काम करण्यास तयार नव्हत्या. यामुळेच 33 किमीच्या या भुयारी मार्गात जिओ आणि एअरटेलचे नेटवर्क केवळ काही ठिकाणीच मिळत होते.
"कंत्राटदार कंपनीकडून हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही पुढाकार घेतला जात नसल्याने अखेर एमएमआरसीने हे कंत्राट रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे," अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.
एमएमआरसीएलची अधिकृत बाजू
या गोंधळावर एमएमआरसीएलच्या जनसंपर्क विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
"आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे की, मेट्रो मार्ग 3 वरील स्थानके आणि बोगद्यांमध्ये प्रवाशांना सध्या मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. सर्व प्रवाशांना आम्ही हे आश्वासन देऊ इच्छितो की, आपत्कालीन संपर्क सुविधांसह सर्व महत्त्वपूर्ण सुरक्षा यंत्रणा 24 तास पूर्णपणे कार्यरत आहेत.

मोबाईल नेटवर्क सेवा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीचे कंत्राटदार त्यांच्या करारातील दायित्वे पूर्ण करण्यात असमर्थ ठरल्यामुळे, त्यांच्या सेवा संपुष्टात आणण्यात आल्या आहेत.
नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी आता नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, असे एमएमआरसीएलने स्पष्ट केले आहे.
आता पुढे काय? नेटवर्क कधी येणार?
नेटवर्कची समस्या तातडीने संपण्याची चिन्हे नाहीत. कारण नव्या निविदेनुसार इच्छुक कंपन्यांना 10 एप्रिलपर्यंत अर्ज करता येतील. त्यानंतर निविदांची पडताळणी, कंत्राट अंतिम करणे आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे यासाठी किमान काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
नवा कंत्राटदार आल्यानंतर तो मोबाईल कंपन्यांशी करार करेल आणि त्यानंतरच टप्प्याटप्प्याने नेटवर्क पूर्ववत होईल. तोपर्यंत प्रवाशांना या 'सायलेंट झोन'मधूनच प्रवास करावा लागणार आहे.
मेट्रोने वेग तर दिला, पण संवादाची गती मात्र तूर्तास 'अंडरग्राउंड'च राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जगातील अनेक मोठ्या शहरांमध्ये अंडरग्राउंड मेट्रो विकसित स्वरूपात कार्यरत असून त्यामध्ये मोबाईल नेटवर्कची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.
उदाहरणार्थ, लंडन, टोकियो येथे असणाऱ्या मेट्रोमध्ये 4G-5G नेटवर्क सहज मिळतं. मात्र भारतात परिस्थिती अजून विकसित होत आहे. दिल्ली,कलकत्ता मेट्रो मध्ये काही अंडरग्राउंड भागांमध्ये नेटवर्क उपलब्ध आहे.
यामागचं मुख्य कारण म्हणजे भुयारी मार्गांमध्ये सिग्नल पोहोचवण्यासाठी आवश्यक असणारी विशेष दूरसंचार यंत्रणा पूर्णपणे बसवलेली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.





























