ओडिशा: कटकमध्ये रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरला लागलेल्या आगीत ICU वार्डातील 10 रुणांचा मृत्यू

फोटो स्रोत, CMO Odisha
ओडिशाच्या कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी ही माहिती दिली आहे.
ही घटना सोमवारी पहाटे 3 वाजता घडली.
ड्यूटीवर असलेल्या 11 सुरक्षारक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांना सुखरूप बाहेर काढले. तसेच या बचावकार्यात धूर आणि आगीमुळे काही कर्मचारीही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
मुख्यमंत्री माझी यांनी माहिती दिली की, एससीबी मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये लागलेल्या या आगीचे कारण शॉर्ट सर्किट असावे असा अंदाज आहे. दुर्घटनेच्या वेळी शेजारच्या ICU मध्ये 23 रुग्ण उपचार घेत होते ज्यापैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर इतर रुग्णांना तातडीने दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले मात्र त्या दरम्यान आणखी तीन रुग्णांनी प्राण गमावला.
मुख्यमंत्री माझी यांनी या संपूर्ण या घटनेची कायदेशीर चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी त्यांनी प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

फोटो स्रोत, CMO Odisha
ओडिशातील कटक येथील एससीबी रुग्णालयातील आगीच्या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
राष्ट्रपती मुर्मु यांनी म्हटले आहे की, "रुग्णालयातील या भीषण आगीच्या दुर्घटनेमुळे मी अत्यंत व्यथित आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून जखमी रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करते."
पंतप्रधान मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करताना म्हटले, "कटकच्या रुग्णालयातील ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या आप्तस्वकीयांना गमावलेल्या कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो."
यासोबतच पंतप्रधानांनी 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी'मधून मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ट्रॉमा सेंटरमध्ये लागलेली ही आग शॉर्ट सर्किटमुळे असावी ज्याचा फटका शेजारच्या आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना बसला."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











