दुबईचा 'सोनेरी' फुगा फुटला? तज्ज्ञांचं उत्तर मात्र अनपेक्षित

फोटो स्रोत, Getty Images
- Author, समीर हाश्मी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
स्टेफनी बेकर तिचा वाढदिवस आपल्या मित्रांसोबत साजरा करत होती. ती दुबईतील सुप्रसिद्ध पाम जुमेराह या पामच्या आकाराच्या मानवनिर्मित कृत्रिम बेटावरील एका बारमध्ये होती. इथे आलिशान हॉटेल्स आणि बीच क्लब्स आहेत.
पण मित्रांचा हा ग्रुप जवळच्या दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जेव्हा बाहेर पडला, तेव्हा रात्रीच्या आकाशात त्यांना काहीतरी विलक्षण गोष्ट दिसली.
काही क्षणांत एका ड्रोनचे तुकडे तिथल्या पंचतारांकित फेअरमाँट हॉटेलवर पडले. त्यावेळी बेकर आणि तिचे मित्र या हॉटेलच्या समोर रस्त्यावर उभे होते.
ती म्हणते, "आम्ही सगळे प्रचंड घाबरलो होतो. असं काहीतरी पाहणं अनपेक्षित होतं."
बेकर ही एक ब्रिटनची रिअल इस्टेट सल्लागार असून, ती साधारण एक वर्षापूर्वी इथं आली आहे. तिने नेहमीच दुबईला या भागातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक म्हणून पाहिलं आहे.
परंतु, गेल्या दोन आठवड्यांत इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले झाले तरी, ती म्हणते की तिचा दुबई सोडण्याचा कोणताही विचार नाही.
"उलट, परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली गेली, त्यामुळे मला आणखी जास्त सुरक्षित वाटतं," असं ती सांगते.

फोटो स्रोत, Stephanie Baker
दुबईमध्ये बेकरसारखे वेगवेगळ्या देशांतून आलेले लाखो परदेशी लोक राहतात, त्यात सुमारे 2 लाख 40 हजार ब्रिटिश लोक आहेत. इथले स्थानिक अमिराती नागरिक फक्त 10 टक्के आहेत.
अनेक वर्षांपासून दुबईने अस्थिर प्रदेशातही आपली सुरक्षित आणि स्थिर शहर अशी प्रतिमा तयार केली आहे. उंच काचेच्या इमारती, करमुक्त पगार आणि सुरक्षिततेची हमी यामुळे ते मध्यपूर्वेतील मोठं व्यवसाय आणि पर्यटन केंद्र बनलं आहे. जगभरातून लोक चांगलं आयुष्य घडवण्याच्या आशेनं इथे येतात.
गेल्या काही वर्षांत संघर्षांमुळे या भागात बरेच बदल झाले, परंतु दुबई मात्र मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहिले. आता त्या प्रतिमेचीच परीक्षा सुरू आहे.
संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) अधिकाऱ्यांच्या मते, इराणचे हल्ले सुरू झाल्यापासून आतापर्यंत 285 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं, 15 क्रूझ क्षेपणास्त्रं आणि 1567 ड्रोनचा सामना करण्यात आला आहे. त्यापैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त हल्ले हवेतच रोखून नष्ट करण्यात आले.
पण काही अवशेष दुबईच्या वेगवेगळ्या भागांत, प्रमुख रहिवासी भागात आणि विमानतळाजवळही पडले आहेत. उंच इमारत, लक्झरी हॉटेल आणि विमानतळावर अवशेष पडल्याचे फोटो सोशल मीडियासारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत यूएईमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 141 जण जखमी झाले आहेत.
मुलं खिडक्यांजवळ झोपायला घाबरत...
बीबीसीने दुबईतील 20 पेक्षा जास्त रहिवाशांशी चर्चा केली, काही जण इथे अनेक वर्षांपासून राहतात, तर काही नुकतेच आले आहेत. अलीकडच्या घटनांमुळे बहुतांश जणांना धक्का बसला आहे. पण जवळजवळ सर्वांचं म्हणणं आहे की, ते दुबई सोडण्याचा कोणताही विचार करत नाहीत.
"आम्ही पहिल्यांदाच असं काही पाहत आहोत," असं पूर्वीपासून दुबईत राहत असलेल्या आणि कौटुंबिक व्यवसायात काम करणारी भारतीय प्रवासी इती भसीन सांगते.
"दुबई खूप वेगाने मोठं शहर बनलं आहे. आम्हाला प्रशासनावर विश्वास आहे. हे माझं घर आहे, आणि आम्ही त्याच्या पाठीशी आहोत."

फोटो स्रोत, Eti Bhasin
काही रहिवाशांसाठी गेल्या दोन आठवड्यांचा काळ चिंताजनक ठरला आहे. ॲडम कॅलो आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलांसह 2024 मध्ये यूकेमधून दुबईला आले. शहर सुरक्षित असल्याच्या प्रतिमेमुळे त्यांनी इथे येण्याचा निर्णय घेतला.
युद्धाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत शहरभर स्फोटांचे आवाज येत असल्याने हे कुटुंब एकाच खोलीत झोपत होतं. मुलं खिडक्यांजवळ झोपायला घाबरत होती.
"प्रशासन आमची पुरेशी काळजी घेत आहे, त्यामुळे आम्ही इथे राहू शकतो आणि आम्हाला सुरक्षितही वाटतं, पण तरीही मनात अस्वस्थता आहे. ही परिस्थिती आता नित्याचीच होईल का, हीच चिंता आहे," असं कॅलो म्हणतात.

मी जिथे कामासाठी राहतो त्या दुबईने एका छोट्या गल्फ बंदरापासून जागतिक शहरापर्यंत मोठी झेप घेतली आहे, आणि हे सगळं चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे शक्य झालं. जगातील आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सर्वाधिक व्यग्र असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षी सुमारे 9 कोटी प्रवाशांची वर्दळ दिसून आली.
ट्रॅव्हल हब झालं ठप्प
संघर्ष सुरू झाल्यापासून हजारो उड्डाणं रद्द झाली आहेत, त्यामुळे या भागातील सर्वात गजबजलेल्या प्रवास केंद्रांपैकी (ट्रॅव्हल हब) एक ठप्प झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून तात्पुरत्या स्वरूपात उड्डाणं पुन्हा सुरू झाली आहेत. एमिरेट्स सध्या कमी उड्डाणांसह सेवा देत आहे आणि पूर्ण सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नही करत आहे.
तीव्र उन्हाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच पर्यटकांची जास्त गर्दी असते तेव्हाच हा अडथळा आला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.
आता अनेक लोक फ्लाइट्स आणि हॉटेल बुकिंग रद्द करत आहेत. त्यामुळे काही आलिशान हॉटेल्समधील खोल्या त्यांच्या नेहमीपेक्षा खूपच कमी किमतीत मिळत आहेत.

फोटो स्रोत, Planet Labs PBC via REUTERS
"दुर्दैवाने, मे महिन्यापर्यंतचे बुकिंग रद्द होताना दिसत आहेत," असे गेट्स हॉस्पिटॅलिटीचे संस्थापक आणि सीईओ डॉ. नईम मादाद सांगतात. ते ऑस्ट्रेलियाचे असून गेल्या वीसपेक्षा जास्त वर्षांपासून दुबईचे रहिवासी आहेत.
"वर्षाची सुरुवातच खराब झाली, तर उरलेलं वर्ष भरपाई करण्यासाठी बरीच धडपड करावी लागते."

फोटो स्रोत, Dr Naim Maadad
अनेक लोक दुबईच्या आलिशान जीवनशैलीच्या प्रतिमेमुळे आकर्षित होतात. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्स छतावरील पूल, पंचतारांकित हॉटेल्ससमोर पार्क केलेल्या सुपरकार्स दाखवतात, तर पर्यटक खासगी बीचवर सनबाथ घेताना दिसतात.
परंतु, या चमकदार प्रतिमेमागे वेगळंच वास्तव लपलेलं आहे.
दुबईचं दुसरं रूप...
या शहरात संधी खूप आहेत, पण मोठा विरोधाभासही दिसून येतो. एकीकडे दुबईची चमकदार प्रतिमा दिसते, तर दुसरीकडे इथे काम करणारे अनेक स्थलांतरित कामगार कमी पगारात शहराच्या बाहेर सामायिक ठिकाणी राहतात.
यूएईमधील कामगारांमध्ये परदेशी लोकांची संख्या खूप जास्त आहे. त्यात दक्षिण आशियातील लोकांची संख्या अर्ध्याहून जास्त आहे. हे लोक बहुतेक बांधकाम, लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरीसारख्या सेवांमध्ये काम करतात.
या युद्धामुळे अनेकांच्या दैनंदिन जीवनात फारसा बदल झालेला नाही.
युद्धाच्या पहिल्या काही दिवसांत लोक घरातच राहू लागल्यामुळे ऑर्डर्स वाढल्या होत्या, असं पाकिस्तानचा डिलिव्हरी ड्रायव्हर हमजा सांगतो.
तो पुढे म्हणतो की, "स्फोटांचे आवाज ऐकले किंवा अवशेष पडताना दिसले की थोडी भीती वाटते. पण मी काम थांबवू शकत नाही."
"माझं कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे. भीतीमुळे घरी बसून राहण्याची सवलत मला नाही."
हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी अनेक वर्षांपासून आखाती देशातील काही कमी पगाराच्या कामगारांच्या वागणुकीबद्दल आणि राहणीमानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यात कामाची परिस्थिती आणि नोकरी देणाऱ्यांच्या नियमांबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातात.
हमजासह बहुतेक लोक इथेच राहणार असल्याचं सांगतात, पण ज्यांना फ्लाइट मिळाली, त्यापैकी काहींनी इथून जाण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एका विमान कंपनीतील कर्मचाऱ्याने, नाव न सांगण्याच्या अटीवर आपलं मत व्यक्त केलं. या आठवड्याच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियातील मेलबर्नला परतल्याचं तिने सांगितलं.
ती म्हणाली, "दररोज सतत स्फोट ऐकून मला खूप चिंता वाटत होती. सध्या दूर जाणं जास्त सुरक्षित वाटलं, आणि परिस्थिती स्थिर झाल्यावर परत येईन असं ठरवलं."
पण आपण अजूनही परत येण्याचा विचार करत आहोत, असंही ती पुढे म्हणाली.
ज्या काळात अनेक पाश्चिमात्य देश इमिग्रेशन नियम कडक करत आहेत आणि स्थलांतराच्या परिणामावर विचार करत आहेत, अशावेळी दुबई वेगळ्या मॉडेलचं प्रतिनिधित्व करतं.

फोटो स्रोत, AFP
अमिरातीने स्वतःला जगभरच्या कौशल्यवान आणि श्रीमंत लोकांसाठी आकर्षक ठिकाण बनवलं आहे, आणि महामारीनंतर येथे अनेक करोडपती आले आहेत.
तसेच, भारतातील अभियंता, इजिप्शियन डॉक्टर किंवा फिलिपिनो नर्ससारख्या महत्त्वाकांक्षी व्यावसायिकांसाठी दुबईमध्ये कामासाठी व्हिसा मिळवणं युरोप किंवा उत्तर अमेरिकेपेक्षा खूप सोपं असतं आणि काहीवेळा जास्त पगारही मिळतो.
आंतरराष्ट्रीय माध्यमं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था यापूर्वी काही संशयित संघटित गुन्हेगार दुबईत असतात, असं सांगत असत. अलीकडच्या काही वर्षांत यूएई आणि अनेक देशांमध्ये प्रत्यार्पणावरील सहकार्य वाढलं आहे.
दुबईची ब्रँड इमेज टिकेल का?
अस्थिर, अशांत प्रदेशातही स्थिरतेचं ठिकाण म्हणून या शहराचं आकर्षण राहिलं आहे. ही इमेज (प्रतिमा) आता कायमची धोक्यात आली आहे का?
मध्यपूर्वेतील राजकीय आणि आर्थिक विषयांचे तज्ज्ञ ख्रिस्तोफर डेव्हिडसन यांनी यूएईवर विस्तृत लेख लिहिले आहेत. त्यांना विश्वास आहे की, हल्ल्यांमुळे दुबईच्या आकर्षणावर थोड्या कालावधीसाठी परिणाम होऊ शकतो.
"परंतु, शहराची मुळं म्हणजे इमारती, नियम, हवामान आणि भौगोलिक स्थान- अजूनही तसेच आहेत, बदलेल्या नाहीत," असं ते म्हणतात.
"दीर्घकाळासाठी दुबईचं आकर्षण मात्र कायम राहील."

फोटो स्रोत, Getty Images
हल्ल्यांबद्दल दैनंदिन अपडेट्स जारी करणाऱ्या आणि संभाव्य स्ट्राइकबद्दल इशारे देणाऱ्या, नियमित मोबाइल अलर्ट पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांचे रहिवाशांकडून आणि व्यवसायांकडून कौतुक होत आहे.
अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांनी रहिवाशांना त्यांच्या सुरक्षेबद्दल आश्वस्त केलं आहे. त्याचबरोबर यूएईवर हल्ला करणे सोपं नाही, असंही म्हटलं आहे.
उच्चपदस्थ नेत्यांनी दुबईत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. यातून त्यांनी येथील जीवनमान सुरळीत सुरू असल्याचे दाखवून दिलं आहे.
परंतु, यूएईमध्ये सरकारच्या विरोधात सार्वजनिक टीका करणे क्वचितच होतं. कारण तेथील कायद्यानुसार राज्य किंवा त्यांच्या नेतृत्त्वावर टीका करणाऱ्यांवर निर्बंध घातले जातात.

फोटो स्रोत, NurPhoto/Getty Images
युद्धाशी संबंधित खात्री नसलेले (असत्यापित) व्हीडिओ ऑनलाइन शेअर केल्यास मोठा दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. गुरुवारी (12 मार्च), एका 60 वर्षीय ब्रिटिश व्यक्तीने शहरावर इराणच्या क्षेपणास्त्रांचे चित्रीकरण केल्याचा आरोप लावण्यात आला.
काही दिवस तिथल्या रस्त्यांवर विलक्षण शांतता होती. पण आता वाहतूक आणि गर्दी पुन्हा पूर्वपदावर आली आहे.
विश्लेषकांचं म्हणणं आहे की, दुबई आणि यूएईवर दीर्घकालीन परिणाम हा संघर्ष कसं वळण घेतो यावर अवलंबून असेल. डेव्हिडसन म्हणतात, "जर इराण कमकुवत झाला तर यूएईचे आकर्षण आणखी वाढवे."
पण जर राजवट टिकली तर आखाती देशांसोबतचा तणाव वाढू शकतो, असे एका इन्व्हेस्टमेंट बँकरने मला सांगितलं. "ही चिंतेची बाब आहे. जर कोणत्याही बँका किंवा वित्तीय संस्थांना फटका बसला तर त्याचा व्यवसायांच्या भावनेवर परिणाम होऊ शकतो," असं ते म्हणतात.
बुधवारी (11 मार्च), एका इराणी बँकेवर हल्ला झाल्यानंतर, इराणी सैन्याने या प्रदेशातील अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित आर्थिक आणि बँकिंग संस्थांवर हल्ला करण्याची धमकी दिली. त्यानंतर दुबईतील अनेक वित्तीय कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना कार्यालयं रिकामी करण्यास सांगितलं.
सध्या, दुबईतील बहुतेक रहिवासी सावध पण आशावादी आहेत. ते सांगतात की, या शहराने यापूर्वीही संकटं सहन केली आहेत- 2008 च्या जागतिक आर्थिक संकटापासून ते 2020 मधील महामारीपर्यंत... आणि त्या प्रतिकूल काळातून अधिक मजबूतपणे ते बाहेरही आले आहेत.
"दुबई नेहमीच झपाट्याने पुन्हा उभी राहते. लवचिकता हा यूएईचा स्वभावच आहे," असं मादाद सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











