बापूसाहेब गायकवाड : वडील पॅरालिसिस अटॅकमुळे घरी, आईने मेसमध्ये काम केलं; शेवटच्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण

बापूसाहेब गायकवाड
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"प्रत्येकाला आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार आहे. ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यात मोठी रिस्क घ्यावी लागते. पण मी माझ्या कुटुंबाला विश्वासात घेऊन ही रिस्क घेतली. कुटुंबावर कोणताही आर्थिक ताण येणार नाही, याची काळजी घेत मी UPSC परीक्षा पास केलीय."

नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC परीक्षेच्या निकालात अहिल्यानगर जिल्ह्यातील बापूसाहेब गायकवाड यांनी यश मिळवलं आहे.

यंदा संघ लोकसेवा आयोगाकडून एकूण 958 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यामध्ये बापूसाहेब यांनी 561वा रँक मिळवली आहे. ही त्यांची शेवटची संधी होती.

दरवर्षी देशभरातून 10 लाखांहून अधिक उमेदवार UPSC पूर्व परीक्षा देतात. त्यापैकी केवळ 0.5 टक्के किंवा त्याहून कमी उमेदवार अंतिम यादीत पोहोचतात.

IAS, IPS, IFS, IRS यांसारख्या पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

'या प्रवासात अपयश निश्चित असतं'

UPSC ची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि अंतिम निकाल हा जवळपास दीड वर्षांचा कालावधी असतो.

त्यामुळे भक्कम मानसिक तयारी, दीर्घकाळ अभ्यास आणि कुटुंबाची साथ असणं अपेक्षित असतं.

त्यासोबत सुरुवातीलाच यश मिळेल याची कोणतीही गॅरंटी नसते, किंबहुना सुरुवातीला अपयश येणं हेच निश्चित असतं, असं बापूसाहेबांना वाटतं.

स्पर्धा परीक्षांच्या जगात उतरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असल्याचं बापूसाहेब सांगतात.

बापूसाहेब गायकवाड
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"या प्रवासात एक गोष्ट निश्चित असते, ती म्हणजे अपयश. लाखो उमेदवार परीक्षा देतात, पण यशाचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे ही आयुष्यातील मोठी रिस्क असते. प्लॅन B असेल किंवा काहीतरी काम करत तयारी केली, तर हा प्रवास अधिक स्थिर होतो."

स्वतःच्या प्लॅन B विषयी बोलताना ते पुढे सांगतात, "मी UPSCची तयारी करत असताना दिल्लीत दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल उपक्रमासाठी काम करत होतो. तिथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचं विनामूल्य मार्गदर्शन केलं जातं. तसेच, गेले काही वर्षं या परीक्षेची तयारी करत असल्याने इतर उमेदवारांच्या सराव परीक्षांचे पेपर तपासत होतो. यातून माझं आर्थिक नियोजन होत होतं. यंदा माझी UPSCमध्ये निवड झाली नसती, तर मी दिव्यांग मुलांसाठी काम सुरू ठेवलं असतं."

बापूसाहेब ज्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून पुढे आले आहेत, त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतली.

त्यांच्या कुटुंबियांना 2004 साली कामाच्या शोधात गाव सोडावं लागलं. ते मुळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील चास गावचे आहेत.

वडील ड्रायव्हिंग करत होते. पण पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे त्यांचं काम बंद पडलं.

अहिल्यानगर येथे स्थलांतर केल्यानंतर त्यांच्या आईने इतरांच्या मेसमध्ये स्वयंपाक आणि भांडी धुवायचं काम केलं.

बापूसाहेब आणि त्यांचे भाऊ दोघेही आईला कामात मदत करायचे. मेसचे डबे कॉलेजात जाऊन विद्यार्थांना पुरवायचे.

यासोबत आपण केटरिंगचं काम केल्याचं बापू सांगतात.

बापूसाहेब गायकवाड आणि त्यांचे बंधू अनिरुद्ध लहानपणी अभ्यास करताना.

फोटो स्रोत, Bapusaheb Gaikwad

फोटो कॅप्शन, बापूसाहेब गायकवाड आणि त्यांचे बंधू अनिरुद्ध लहानपणी अभ्यास करताना.

या सगळ्या कठीण परिस्थितीतही मुलांच्या शिक्षणात मात्र आईबाबांनी खंड पडू दिला नाही.

दोन भावंडांविषयी बोलताना आई सरस्वती गायकवाड म्हणाल्या, "बापू पहिल्यापासून अभ्यासात हुशार होता. त्याला दहावीतही चांगली मार्क पडले होते. तो आणि त्याचा भाऊ दोघांनाही आम्हाला अभ्यासाच्या कारणावरून रागवण्याची वेळ येऊ दिली नाही. त्यामुळे आम्ही पण त्यांच्या शिक्षणाची हयगय केली नाही. पोरानं आमच्या कष्टाचं चीज करून दाखवलं, आम्हाला त्याचा अभिमान आहे."

आधी आर्थिक स्थैर्य महत्त्वाचं

बापूसाहेब यांनी बारावीनंतर मेकॅनिकल डिप्लोमा केला. काही वर्षं नोकरी केली आणि सोबत मुक्त विद्यापीठातून BA आणि MA पूर्ण केलं.

दरम्यान, त्यांचा धाकटा भाऊ केंद्रीय विद्यालयात शिक्षक झाला. कुटुंबाला आर्थिक स्थैर्य आल्यानंतर बापूसाहेबांनी स्पर्धा परीक्षेकडे लक्ष दिलं.

प्लॅन B म्हणून त्यांनी UGC नेटची परीक्षा पास केली. UPSC सोबत इतर परीक्षांची तयारीही सुरू ठेवली. 2019 साली त्यांची CAPF साठी निवड झाली होती.

बापूसाहेबांचे कुटुंबीय
फोटो कॅप्शन, बापूसाहेबांचे कुटुंबीय

"कुटुंबाप्रती आपली जबाबदारी असते. आपण कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या स्थिर केलं, तर आपण मानसिकदृष्ट्याही स्थिर राहतो. त्यामुळे तयारी शांतपणे करता येते," ते सांगतात.

आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर स्पर्धा परीक्षांचा दीर्घकाळ अभ्यास करणं आव्हानात्मक ठरू शकतं. त्यामुळे प्लॅन बी तयार ठेवूनच या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी यावं, असं बापूसाहेब ठामपणे सांगतात.

तयारी किती काळ करायची?

कॉलेज संपले की म्हणजे ऐन विशीच्या काळात लाखो तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.

हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सुवर्ण काळ असतो. लाथ मारेल तिथून पाणी काढण्याची धमक या तारुण्यात असते.

पण इकडे वळताना मुलं-मुली सुरुवातीला योग्य रणनीती न आखता, केवळ या क्षेत्राचं ग्लॅमर, सोशल स्टेटस, पालकांच्या अपेक्षा आणि कोचिंग क्लासवाल्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे इथे गर्दी वाढत असल्याचं सांगितलं जातं.

मात्र सरकारी नोकऱ्या मर्यादित असल्याने अपयशाची शक्यता जास्त असते.

या चक्रात काही मुले अडकतात आणि यातच त्यांची 7 - 8 वर्षं जातात. त्यामुळे अशा रिस्की क्षेत्रात किती दिवस थांबावं? कधी बाहेर पडावं?

"प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवं की किती काळ तयारी करायची आणि बॅकअप प्लॅन काय आहे. आपण ज्या क्षेत्रात आहोत, त्यात उत्तम काम करण्याची तयारी असावी. काहीजण दोन वर्षांत बाहेर पडून व्यवसायात यशस्वी होतात," असं बापूसाहेब सांगतात.

UPSC परीक्षेचे मार्गदर्शक प्रवीण चव्हाण पुण्यात 'मार्गी' नावाचे कोचिंग इन्स्टिट्यूट चालवतात.
फोटो कॅप्शन, UPSC परीक्षेचे मार्गदर्शक प्रवीण चव्हाण पुण्यात 'मार्गी' नावाचे कोचिंग इन्स्टिट्यूट चालवतात.

या परीक्षांच्या तयारीची सुरुवात होते कोचिंग क्लासपासून. पण गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षांच्या तयारीभोवती कोचिंग क्लासेसची मोठी व्यवस्था उभी राहिली आहे.

तुम्ही जाईन केलेल्या क्लासमध्ये योग्य मार्गदर्शन मिळेल की नाही याचा आता भरवसा राहिला नाही, असं पुण्यातील UPSC परीक्षेचे मार्गदर्शक प्रवीण चव्हाण सांगतात.

"काही क्लासेस मोठ्या जाहिराती करतात. यशस्वी विद्यार्थ्यांच्या नावांचा वापर केला जातो. पण नवीन विद्यार्थ्यांना संबंधित कोचिंग क्लासची योग्य माहिती नसते. त्यामुळे योग्य मार्गदर्शन निवडणं गरजेचं आहे," असं चव्हाण सांगतात.

मुलींसाठी आव्हान अधिक

एकीकडे बापूसाहेबांसारख्या तरुणांच्या यशोगाथा प्रेरणा देतात, तर दुसरीकडे या प्रवासातील वास्तवही तेवढंच कठीण आहे.

त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना प्लॅन B, आर्थिक स्थैर्य, कुटुंबाचा आधार आणि मानसिक तयारी या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

स्पर्धा परीक्षा
फोटो कॅप्शन, प्रातिनिधक फोटो

पण यापेक्षाही अधिक आव्हानं ही मुलींसाठी असतात.

प्रवीण चव्हाण यांच्या मते, मुलींसाठी ही तयारी तुलनेने अधिक आव्हानात्मक ठरते.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, "मुलींमध्ये क्षमता असते. पण 22-23 वयानंतर त्यांच्या लग्नाचा विचार केला जातो. समाजात अजूनही हीच मानसिकता आहे. त्यामुळे मुलींसाठी कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरतो. अन्यथा मानसिक ताण येणं, भीती वाटणं आणि डिप्रेशन या सारख्या गोष्टी भेडसावत असल्याचं मुली सांगतात."

स्पर्धा परीक्षा
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

बीबीसी मराठीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या काही मुलींशी चर्चा केली.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका विद्यार्थिनीने सांगितलं, "मी कॉलेजमध्ये असतानाच MPSC आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली होती. पण त्यावेळी मला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. घरून आर्थिक पाठबळ नसल्यामुळे कॉलेज संपल्यानंतर कोचिंग क्लास न लावताच अभ्यास सुरू केला. त्यात माझी दोन वर्षं गेली.

"नंतर शासकीय योजनेतून कोचिंग क्लास करता आला. आता माझा अभ्यास चांगला सुरू आहे. पण घरून लग्नासाठी खूप दबाव आहे. यावर्षी परीक्षेत यश मिळालं नाही तर मला गावी जाऊन आईवडील सांगतील त्या मुलासोबत लग्न करावं लागेल. या विचारानेच मला खूप भीती वाटतेय."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)