निवृत्तीनंतरची गुंतवणूक करताना 'या' 6 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर बचत गमावण्याची भीती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अजित गढवी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"मी आता नोकरीतून निवृत्त झालो आहे. माझ्याकडे एकरकमी मोठी रक्कम आहे आणि ती गुंतवायची आहे. मी सर्व पैसे शेअर बाजारात गुंतवावेत का? एखादी प्रॉपर्टी घ्यावी का? की सरकारच्या सुरक्षित योजनांमध्ये पैसे ठेवावेत? हा प्रश्न माझ्यासमोर आहे."
वृद्धापकाळात किंवा उतारवयात गुंतवणूक करताना अनेक लोक गोंधळतात. कारण निवृत्तीनंतरही पुढील 20 ते 30 वर्षे आपली बचत पुरेल, अशा पद्धतीने आर्थिक नियोजन करावं लागतं.
गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड, बँक एफडी, शेअर बाजार, सोनं आणि रिअल इस्टेट असे अनेक पर्याय असतात. पण गुंतवणूक करताना महागाईचा विचार करावा लागतो, कारण वय वाढल्यानंतर वैद्यकीय खर्चही वाढतो, हेही लक्षात घ्यावं लागतं.
अशा परिस्थितीत गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, याबाबत आर्थिक सल्लागारांचे मत जाणून घेतले आहे.
उतारवयात गुंतवणूक करताना विशेष लक्षात ठेवायला हव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या.
1. जास्त परताव्याच्या मोहात पडू नका
सोहम कॅपिटल सर्व्हिसेसचे भागीदार प्रियांक ठक्कर सांगतात की, "वय वाढत गेल्यावर गुंतवणुकीचा उद्देश बदलतो. वृद्धापकाळात जास्त नफ्याच्या मागे धावण्यापेक्षा भांडवल सुरक्षित राहणं, नियमित उत्पन्न मिळणं आणि मनःशांती मिळणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं."

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात की, "वयस्कर लोक गुंतवणूक करताना अनेकदा चुकीच्या सल्ल्याला किंवा कमिशनसाठी होणाऱ्या विक्रीला बळी पडतात. त्यामुळे 'जास्त नफ्याची खात्री' किंवा 'गुंतवणुकीची शेवटची संधी' अशा आमिषांना भुलू नये."
"कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा किंवा विश्वासार्ह आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा आणि योजना पूर्णपणे समजून घेतल्यानंतरच कागदपत्रांवर सही करावी."
शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे जास्त जोखमीचं असतं. मनीप्लांट फिनमार्टचे संचालक मेहुल शहा सांगतात की, "शेअर बाजाराचा पुरेसा अनुभव आणि समज असेल तरच त्यात गुंतवणूक करावी. पण कोणताही अनुभव नसताना, फक्त इतरांच्या सांगण्यावर किंवा केवळ पाहून शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करणं धोकादायक ठरू शकतं."
2. आरोग्य विमा असणं खूपच आवश्यक
वय कितीही असलं तरी आरोग्य विम्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
आर्थिक सल्लागार मेहुल शहा सांगतात की, "काही लोकांना वाटतं की आयुष्यभर विम्याची गरज पडली नाही, तर आता उतारवयात जास्त प्रीमियम भरण्याची गरज नाही. अशा विचाराने ते विम्याचा प्रीमियम भरायचं थांबवतात. परंतु, हा निर्णय पुढे जाऊन मोठं नुकसान करणारा ठरू शकतो."

फोटो स्रोत, Mehul Shah
प्रियांक ठक्कर सांगतात की, "वृद्धापकाळात आरोग्याशी संबंधित खर्च अचानक उद्भवू शकतो. त्यामुळे गुंतवणूक अशी असावी की गरज पडल्यास 24 ते 48 तासांत पैसे मिळू शकतील."
"सगळी रक्कम दीर्घकाळासाठी लॉक करुन ठेवू नये. वैद्यकीय उपचार आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी वेगळा, लगेच उपलब्ध होणारा निधी ठेवणं फार महत्त्वाचं आहे."
3. नवीन गुंतवणूक प्रकारांपासून सावध रहा
ज्येष्ठ नागरिक अनेकदा वर्तमानपत्रातील जाहिराती किंवा सोशल मीडियावरच्या मार्केटिंग संदेशांना भुलून गुंतवणुकीचे प्रयोग करतात. अशा प्रयोगांमध्ये त्यांचे पैसे बुडण्याचा धोका असतो.
आर्थिक सल्लागार मेहुल शाह म्हणतात की, "अनेक लोक तरुणपणी धोका घेत नाहीत आणि नंतर उतारवयात एखादा शेअर किंवा म्युच्युअल फंड पाहून जोखीम घेऊन गुंतवणूक करतात."

फोटो स्रोत, Priyank Thakkar
"पूर्वी त्या गुंतवणुकीने चांगला परतावा दिला म्हणून पुढेही तसाच नफा मिळेल, असा त्यांचा समज असतो. पण उतारवयात अशी जोखमीची रणनीती धोकादायक ठरू शकते. यात मूळ भांडवलही बुडू शकतं. जास्त परताव्याच्या आमिषाने भांडवल गमावणं योग्य नाही."
ते सांगतात की, "निवृत्तीतील पैशांवर प्रयोग करू नयेत. ज्या गुंतवणूक पर्यायांचा अनुभव आणि समज आहे, त्यातच पैसे गुंतवावेत."
4. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक
आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला आहे की, वयाच्या 60-65 वर्षांनंतर रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक टाळावी. कारण रिअल इस्टेटमधील गरज पडल्यावर पैसे लगेच काढता येत नाहीत, म्हणजेच हा सर्वात कमी लिक्विड (तरल) गुंतवणूक पर्याय आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सोहम कॅपिटल सर्व्हिसेसचे प्रियांक ठक्कर सांगतात की, "रिअल इस्टेट विकायला वेळ लागतो आणि आपल्याला गरज पडल्यावर लगेच पैसे मिळतीलच असे नाही. मात्र रिअल इस्टेटमधून भाड्याच्या रूपात उत्पन्न मिळू शकते."
मेहुल शाह यांनी म्हटलं की, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यावर पैसे सहज मिळत नाहीत. हे पैसे दीर्घकाळासाठी अडकू शकतात आणि गरज असताना स्वतःचीच रक्कम वापरता येणार नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये थेट मालमत्ता घेण्याऐवजी REIT सारख्या पर्यायात गुंतवणूक करता येऊ शकते.
5. पैसे सहज काढता येतील अशी गुंतवणूक ठेवा
वृद्धापकाळात अशी गुंतवणूक करायला सांगितली जाते, जिथून गरज पडल्यावर पैसे लगेच काढता येतील. म्हणजेच गुंतवणूक लिक्विड असावी. बँक एफडी, म्युच्युअल फंड, सोनं आणि ईटीएफ हे असे पर्याय मानले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
मेहुल शहा सांगतात की, "दीर्घकालीन सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करताना त्या योजनांमधून पैसे किती सहज काढता येतात, हे पाहणं गरजेचं आहे. अनेक योजनांमध्ये संपूर्ण रक्कम आयुष्यभर काढता येत नाही आणि फक्त व्याजाचं उत्पन्न मिळतं."
प्रियांक ठक्कर म्हणाले की, "ज्येष्ठांसाठी भांडवल सुरक्षित राहणं आणि नियमित उत्पन्न मिळणं दोन्ही महत्त्वाचं आहे. म्हणजेच गरज पडल्यावर पैसे पटकन मिळतील, अशी गुंतवणूक असावी."
6. सगळी गुंतवणूक एका ठिकाणीच नको
आर्थिक सल्लागार एका गोष्टीवर सहमत आहेत की, वय कोणतंही असो, गुंतवणूक करताना पैसे वेगवेगळ्या पर्यायांमध्ये (डायव्हर्सिफिकेशन) वाटून ठेवणं गरजेचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एकाच पर्यायामध्ये मोठी रक्कम गुंतवू नका. तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये शेअर, म्युच्युअल फंड, सोनं असे वेगवेगळे पर्याय असावेत.
मेहुल शाह सांगतात की, ज्येष्ठ नागरिक बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात. तसेच म्युच्युअल फंडांमधील कमी किंवा मध्यम जोखीम असलेल्या योजनांमध्ये एसडब्ल्यूपीमध्ये (सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन) गुंतवणूक करणंही योग्य ठरू शकतं.
(महत्त्वाचं- शेअर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक नुकसानीचा धोका असतो. या लेखात दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे, ती आर्थिक सल्ला म्हणून घेऊ नये.
वाचकांनी स्वतः अभ्यास करून आणि कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. या माहितीनुसार केलेल्या गुंतवणुकीमुळे झालेल्या कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी बीबीसी मराठी जबाबदार राहणार नाही.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











