भारताची स्वस्त औषधं लठ्ठपणाविरुद्धच्या जागतिक लढ्यात अशी ठरतील 'गेमचेंजर'

ओषधं

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

भारत लवकरच सडपातळ होण्याच्या दिशेने म्हणजेच वजन कमी करण्याचा मार्गावर जाऊ शकतो. किमान तशी शक्यता तर आहे.

शुक्रवारी (20 मार्च) सेमॅग्लुटाइड या घटकावरचं पेटंट भारतात संपणार आहे. हाच घटक डॅनिश औषध उत्पादक नोवो नॉर्डिस्क या कंपनीच्या वेगोव्ही आणि ओझेम्पिक या प्रसिद्ध औषधांमध्ये वापरला जातो.

यामुळे भारतातील औषध कंपन्यांना याच औषधाच्या स्वस्त जेनेरिक आवृत्त्या बनवता येतील. त्यामुळे स्पर्धा वाढेल, किमती निम्म्यापेक्षा जास्त कमी होऊ शकतात आणि भारतातील लोकांना ही औषधं सहज मिळू शकतील. सरतेशेवटी ही सुविधा इतर देशांमध्येही पोहोचू शकते.

जेफ्रीज या गुंतवणूक बँकेने याला भारतासाठी एक संभाव्य 'जादूच्या गोळीचा क्षण' म्हटलं आहे. त्यांच्या अंदाजानुसार, योग्य किंमत आणि लोकांचा वापर वाढला तर सेमॅग्लुटाइड औषधांचा बाजार भारतात भविष्यात सुमारे 1 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, काही महिन्यांतच सेमॅग्लुटाइडच्या सुमारे 50 वेगवेगळी ब्रँडेड जेनेरिक औषधं बाजारात येऊ शकतात, भारतातील औषध उद्योगात अशी जोरदार स्पर्धा सामान्य आहे.

गेमचेंजर सेमॅग्लुटाइड

यापूर्वीही असं घडलं होतं. 2022 मध्ये सिटाग्लिप्टिन या डायबेटीसच्या औषधाचं पेटंट संपल्यानंतर, अवघ्या एका महिन्यात सुमारे 30 वेगवेगळे ब्रँड बाजारात आले आणि वर्षभरात ही संख्या जवळपास 100 पर्यंत पोहोचली होती.

भारताचा औषध उद्योग सध्या सुमारे 60 अब्ज डॉलरचा आहे आणि 2030 पर्यंत तो दुप्पट होण्याची शक्यता आहे. या उद्योगाचा मोठा भाग स्वस्त जेनेरिक औषधांवर आधारित आहे आणि याच ताकदीमुळे आता सेमॅग्लुटाइडवर मोठी स्पर्धा सुरू होणार आहे.

आत्तापर्यंत हे इंजेक्शन खूप महाग असल्यामुळे ते प्रामुख्याने श्रीमंत लोकांपुरतंच मर्यादित होतं. पण आता ते अधिक स्वस्त होऊन सर्वसामान्य लोकांपर्यंतही सहज पोहोचू शकतं.

नव्या प्रकारची वजन कमी करणारी ही औषधं साधारणपणे वापरायला सोप्या अशा इंजेक्शन पेनच्या स्वरूपात दिली जातात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नव्या प्रकारची वजन कमी करणारी ही औषधं साधारणपणे वापरायला सोप्या अशा इंजेक्शन पेनच्या स्वरूपात दिली जातात.

सुरुवातीला ही औषधं मधुमेहासाठी तयार करण्यात आली होती. परंतु आता वजन कमी करण्यासाठीही ती खूप प्रभावी ठरत आहेत आणि आधीच्या अनेक उपचारांपेक्षा चांगले परिणाम देत आहेत, म्हणून त्यांना 'गेम चेंजर' म्हटलं जात आहे.

सेमॅग्लुटाइड हे जीएलपी-1 रिसेप्टर ॲगोनिस्ट्स या औषधांच्या गटात येतं. ही औषधं शरीरातील भूक आणि रक्तातील साखर नियंत्रित करणाऱ्या हार्मोनसारखं काम करतात.

ही औषधं शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवतात आणि पोट रिकामं होण्याची गती कमी करतात. त्यामुळे माणसाला लवकर पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त वेळ भूक लागत नाही.

सुरुवातीला मधुमेहासाठी तयार केलेल्या या औषधांना आता वजन कमी करण्यासाठी जगभरात खूप मागणी वाढली आहे.

...तर निम्म्या किमतीत मिळतील औषधं

भारतातील अनेक औषध कंपन्या आधीच या क्षेत्रात उतरण्याची तयारी करत आहेत. फार्मरॅक या रिसर्च फर्मच्या उपाध्यक्षा शीतल सापळे यांच्या मते, सिप्ला, सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, बायोकॉन, नॅटको, झायड्स आणि मॅनकाइंड यांसारख्या मोठ्या कंपन्या जेनेरिक औषधं तयार करण्याच्या तयारीत आहेत, आणि अजूनही अनेक कंपन्या त्यात सामील होण्याची शक्यता आहे. यामुळे या औषधांच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

सध्या या उपचारांचा मासिक खर्च खूप जास्त आहे. ओझेम्पिक साधारण 8,800 ते 11,000 रुपयांपर्यंत मिळतं, तर वेगोव्हीची किंमत 10 हजार ते 16 हजार रुपयांपर्यंत जाते.

परंतु, शीतल सापळे यांच्या मते, जेनेरिक औषधं बाजारात आल्यावर हा खर्च कमी होऊन दरमहा सुमारे 3 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो.

किंमती कमी झाल्या तर हा संपूर्ण बाजार बदलू शकतो.

औषधं

फोटो स्रोत, Getty Images

फार्मरॅकच्या मते, भारतातील लठ्ठपणाविरोधी औषधांचा बाजार (इंजेक्शन आणि गोळ्या दोन्ही) खूप वेगाने वाढला आहे. 2021 मध्ये सुमारे 16 मिलियन डॉलरवरून तो आता जवळपास 100 मिलियन डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

2022 मध्ये रायबल्सस हे सेमॅग्लुटाइडचं पहिले गोळी (ओरल) स्वरूपातील औषध बाजारात आल्यानंतर या औषधांची मागणी आणखी वेगाने वाढली.

यातून आरोग्याबाबत लोकांच्या विचारात मोठा बदल होत असल्याचं दिसून येतं.

भारतात आधीच 7.7 कोटींहून अधिक लोकांना टाइप-2 मधुमेह आहे आणि जगातील सर्वात जास्त वजन असलेल्या प्रौढ लोकांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे.

शहरी जीवनशैली, जास्त कार्बोहायड्रेट असलेला आहार आणि कमी हालचाल (बसून राहण्याची सवय) यामुळे या दोन्ही समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

डॉक्टरांसाठी, स्वस्त जीएलपी-1 औषधं लवकरच या आजारांवर उपचार करण्यासाठी एक प्रभावी नवीन साधन ठरू शकतात.

औषधं

फोटो स्रोत, Getty Images

वजन कमी करणारी ही औषधं आता फक्त एंडोक्राइनोलॉजी क्लिनिकपुरती मर्यादित राहिलेली नाहीत.

हृदयरोगतज्ज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) अँजिओप्लास्टीसारख्या प्रक्रियेपूर्वी रुग्णांचं वजन कमी करण्यासाठी त्यांचा वापर करतात. हाडांचे डॉक्टर (ऑर्थोपेडिक सर्जन) गुडघ्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी सांध्यांवरचा ताण कमी करण्यासाठी ही औषधं देतात. तसेच छातीचे डॉक्टर (चेस्ट फिजिशियन) 'ऑब्स्ट्रक्टिव स्लीप ॲपनिया'सारख्या आजारांवरही यांचा उपयोग करतात.

मुंबईतील बॅरियाट्रिक सर्जन मुफ्फझल लकडावाला यांच्या मते, ही औषधं भारतातील मधुमेह आणि लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या मोठ्या लोकसंख्येसाठी उपचारांची संधी मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात.

अगदी अलीकडेपर्यंत या औषधांचा वापर मर्यादितच होता, असं लकडावाला सांगतात. इंजेक्शन स्वरूपातील जीएलपी-1 औषधं खूप महाग होती आणि सहज मिळत नव्हती, तर रायबल्सस ही गोळीच एकमेव सहज उपलब्ध होणारा पर्याय होता.

तज्ज्ञ इशाराही देतात...

ते म्हणतात, "ही औषधं स्वस्त होणं ही खूप चांगली गोष्ट आहे, त्यामुळे भारतातील जास्तीत जास्त मधुमेह आणि लठ्ठपणाने त्रस्त लोकांना ती सहज मिळू शकतील."

"इथे तयार होणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेवर खूप कडक नियंत्रण असणं गरजेचं आहे," असा इशाराही ते देतात.

हा इशारा भारताच्या औषध उद्योगाबद्दलच्या एका मोठ्या वास्तवाकडे लक्ष वेधतो - स्वस्त जेनेरिक औषधं तयार करणाऱ्या जगातील महत्त्वाच्या केंद्रांपैकी (पॉवरहाऊस) भारत एक आहे.

जास्त वजन असलेल्या प्रौढ लोकांची जगातील सर्वात मोठी लोकसंख्या भारतात आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जास्त वजन असलेल्या प्रौढ लोकांची जगातील सर्वात मोठी लोकसंख्या भारतात आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा जेनेरिक औषधांचा पुरवठादार देश आहे. इथे 60 पेक्षा जास्त उपचार श्रेणींमध्ये सुमारे 60 हजार ब्रँडची औषधं तयार होतात आणि जगातील जेनेरिक औषधांच्या सुमारे 20 टक्के पुरवठा भारतातून होतो.

महागडी औषधं स्वस्त करून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या क्षमतेमुळेच भारताला 'जगाची फार्मसी' असं म्हटलं जातं.

सुमारे दोन दशकांपूर्वी याचं एक मोठं उदाहरण पाहायला मिळालं. भारतीय कंपन्यांनी एचआयव्हीवरील महागड्या औषधांच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या, त्यामुळे आफ्रिका आणि इतर विकसनशील देशांमध्ये अधिक लोकांना उपचार मिळू लागले.

भारताकडून जगाला औषधांचा पुरवठा

आज भारत 200 पेक्षा जास्त देशांना औषधं पुरवतो. आफ्रिकेतील निम्म्याहून अधिक जेनेरिक औषधांची गरज भारत पूर्ण करतो, अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या साधारण 40 टक्के जेनेरिक औषधं भारतातून जातात आणि यूकेमध्येही सुमारे एक चतुर्थांश औषधं भारताकडून पुरवली जातात.

"भारतीय जेनेरिक वजन कमी करणाऱ्या औषधांची निर्यात क्षमता खूप मोठी आहे. फक्त अमेरिकेच्या बाजारातही काही वर्षांत मागणी वाढल्यामुळे ती 10 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते," असं भारतीय फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष नमित जोशी सांगतात.

यामुळे भारताच्या फार्मास्युटिकल व्यापारात मोठी वाढ होईल. सध्या भारताची जेनेरिक औषध निर्यात एकूण 30.46 अब्ज डॉलर आहे आणि यामध्ये अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

तरीही डॉक्टरांमध्ये उत्साह असूनही सावधगिरी कायम आहे.

भारतामध्ये 7.7 कोटींहून अधिक लोकांना टाइप 2 चा मधुमेह आहे.

फोटो स्रोत, Prashanth Vishwanathan/Bloomberg via Getty Images

फोटो कॅप्शन, भारतामध्ये 7.7 कोटींहून अधिक लोकांना टाइप 2 चा मधुमेह आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जीएलपी-1 औषधं प्रभावी आहेत, पण पूर्णपणे सुरक्षित नाहीत. त्यांच्या दुष्परिणामांमध्ये (साइड इफेक्ट) मळमळ, उलटी आणि पचनाच्या समस्यांचा समावेश असू शकतो.

क्वचितप्रसंगी काही लोकांना पित्ताशयात खडे (गॅलस्टोन) किंवा स्वादुपिंडाचा दाह (पॅन्क्रियाटायटिस) होऊ शकते. योग्य प्रोटीन न घेता किंवा व्यायाम न केल्यास जलद वजन कमी झाल्यामुळे स्नायूंचे देखील नुकसान होऊ शकते.

डॉक्टरांच्या मते, अनेक रुग्ण या औषधांच्या उपयोगाबद्दल गैरसमज करून घेतात. काही लोकांना काही आठवड्यांत वेगानं वजन कमी होईल अशी अपेक्षा असते, कारण सोशल मीडियाचा प्रचार आणि सेलिब्रिटींच्या जाहिरातींचा त्यांच्यावर प्रभाव असतो.

यश केवळ औषधावर नाही, तर 'योग्य रुग्णाची निवड' करण्यावरही अवलंबून आहे, असं मुंबईतील डायबेटोलॉजिस्ट राहुल बक्षी यांना वाटतं.

डॉक्टर फक्त बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) - जो उंचीच्या तुलनेत वजन मोजतो - पाहत नाहीत, तर मधुमेह किंवा जास्त कोलेस्टेरॉलसारख्या संबंधित आजारांकडेही लक्ष देतात. जीवनशैलीही महत्त्वाची आहे: जर रुग्णाचा आहार अजूनही अपायकारक (अनहेल्दी) असेल, तर फक्त औषध घेऊन वजन कमी होणं पुरेसं ठरणार नाही.

रुग्ण बहुदा पटकन बदल मिळवण्याच्या अपेक्षेने येतात.

"तीन महिन्यांत 10 किलो वजन कमी करता येईल का? असं लोक विचारतात," असं राहुल बक्षी यांनी सांगितलं.

भारतामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट जास्त असलेले तळलेले अन्नपदार्थं मोठ्याप्रमाणात खाल्ले जाते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट जास्त असलेले तळलेले अन्नपदार्थं मोठ्याप्रमाणात खाल्ले जाते.

वेगाने वजन कमी होण्याचे काही तोटेही असू शकतात. जर फार झपाट्याने वजन कमी झालं, तर रुग्णाचं तोंड, मान, हात आणि पाय यांच्यातील चरबी कमी होऊन ते अशक्त दिसू लागतात.

"हळूहळू वजन कमी करणे, औषधाची मात्रा हळूहळू वाढवणे, आणि प्रोटीनचे सेवन, व्यायाम व स्नायू मजबूत करण्यावर लक्ष देणे हे निरोगी परिणामांसाठी महत्त्वाचे आहेत," असं बक्षी सांगतात.

आणखी एक आव्हान म्हणजे, औषधं बंद केल्यानंतर वजन परत वाढू शकतं. शरीर चरबी कमी होण्याला प्रतिकार करत असल्यामुळे भूक पुन्हा जोरात वाढू शकते.

"औषधं घेणं थांबवलं की भूक अचानक खूप वाढते," असं बक्षी यांनी सांगितलं. सांगतात.

किमती कमी झाल्यामुळे या औषधांचा गैरवापरही होऊ शकतो, अशीही चिंता आहे.

डॉक्टरांच्या मते, काही रुग्णांना जिम ट्रेनर, ब्युटी क्लिनिक किंवा डाएटिशियनद्वारे (आहारतज्ज्ञ) जास्त प्रमाणात औषधं दिली जात आहेत, ज्यांना त्याचा अधिकार नाही.

20 मार्चनंतर किमती होतील कमी?

काही ऑनलाईन फार्मसी फक्त थोडक्यात सल्ला घेऊन औषधं देतात. ब्युटिशियन आधीच लग्न किंवा सोशल इव्हेंटसाठी 'वेगानं वजन कमी होण्याचे पॅकेज' जाहिरात करतात.

जेव्हा स्वस्त जेनेरिक औषधं जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, तेव्हा अशा चुकीच्या वापराच्या पद्धतीही वाढू शकतात.

"स्वस्त औषधं जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यास चुकीच्या वापराची शक्यता वाढते," असं मुंबईतील चेस्ट डॉक्टर भौमिक कामदार म्हणतात.

"म्हणून या औषधांचा वापर जबाबदारीने व्हावा आणि नियम कडक असावेत. मी औषधांबद्दल आशावादी आहे."

हा इशारा डॉ. लकडावाला यांच्या औषध निर्मितीच्या गुणवत्तेबाबतच्या चिंतेशी जुळतो.

"ही औषधं खूप फायदेशीर आहेत. पण कमी दर्जाच्या औषधांमुळे दुष्परिणाम होऊ नयेत आणि या घटकाची (मॉलिक्यूलची) नावे खराब होऊ नयेत," असं ते म्हणतात.

सरकार देखील या प्रचाराला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात, भारतातील औषध नियामकांनी कंपन्यांना सावध केलं की जीएलपी-1 औषधांसारखी प्रिस्क्रिप्शन औषधं थेट ग्राहकांपर्यंत जाहिरात करू नयेत.

वेगोव्ही हे औषध 2025 मध्ये भारतात लाँच झाले. पण त्यातील मुख्य घटकावर असलेला पेटंट हक्क या आठवड्यात भारतात संपत आहे.

फोटो स्रोत, Bloomberg via Getty Images

फोटो कॅप्शन, वेगोव्ही हे औषध 2025 मध्ये भारतात लाँच झाले. पण त्यातील मुख्य घटकावर असलेला पेटंट हक्क या आठवड्यात भारतात संपत आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, ज्या जाहिरातींमध्ये जोरदार परिणामांची हमी किंवा आश्वासन दिले जाते किंवा आहार आणि व्यायामाची गरज कमी सांगितली जाते, त्या भ्रामक समजल्या जाऊ शकतात. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ही औषधं फक्त डॉक्टरांच्या देखरेखीखालीच घेतली जावीत.

म्हणून येणारे काही महिने नियामक आणि डॉक्टरांसाठी महत्त्वाचे असतील. भारत स्वस्त औषधं देऊ शकतो आणि त्यावर योग्य देखरेख ठेवू शकतो का हे पाहायचे आहे.

बक्षी म्हणतात की, ते रुग्णांना वजन कमी करणारी औषधं देण्याआधी आपली जीवनशैली आणि आहार सुधारण्यास सांगतात.

औषधं देण्याआधी रुग्णांना आधी डाएटिशियनच्या मदतीने प्रोटीन जास्त असलेला आहार दिला जातो. सध्याच्या संशोधनानुसार ही औषधं दीर्घ कालावधीपर्यंत घ्यावी लागू शकतात. परंतु, अनेक रुग्ण 'इन्स्टाग्राम रील्स पाहिल्यानंतर पटकन वजन कमी करायचं आहे' म्हणत येतात, ज्यामुळे डॉक्टरांवर दबाव येतो, असं बक्षी सांगतात.

तरीही, याचा फायदा खूप मोठा होऊ शकतो. जे औषध पूर्वी महिन्याला हजारो रुपयांचे होते, ते आता लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि कदाचित भविष्यात भारताबाहेरील रुग्णांपर्यंतही.

यावर बक्षी म्हणाले की, "मी खरं तर बऱ्याच रुग्णांना प्रिस्क्रिप्शनवर लिहित आहे: 20 मार्चनंतर किंमती कमी होतील, तेव्हा माझ्याकडे या."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.