शेतातल्या कचऱ्यावर तयार होतं 1500 विद्यार्थ्यांचं जेवण, गॅस सिलिंडरचा खर्च नसलेलं अकोल्यातलं 'फ्लेमलेस किचन'

फोटो स्रोत, Bhagyashree Raut
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
सध्या अमेरिका, इस्रायलच्या इराणसोबतच्या युद्धामुळे एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झालाय.
अनेक ठिकाणी एलपीजी सिलिंडरसाठी रांगा लागलेल्या दिसतात. अशातच अकोल्यातील प्रभात स्कूल या खासगी शाळेतील किचन चर्चेत आलं आहे. कारण, या शाळेला गॅस सिलिंडर टंचाईचा फटकाच बसला नाही.
प्रभात डे बोर्डिंग स्कूलमधील हे फ्लेमलेस किचन असून इथं तब्बल 1500 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक अवघ्या दोन तासांत केला जातो.
विशेष म्हणजे शेतातील कचऱ्याचा वापर करून हे 'फ्लेमलेस किचन' चालवलं जातं.
सध्या गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि तसेच वाढती किंमत या पार्श्वभूमीवर गॅससाठी विविध पर्यायांची चर्चा सध्या सुरू आहे.
हे फ्लेमलेस किचन नेमकं काय असतं? ते कसं काम करतं? हेच बघण्यासाठी आम्ही अकोल्यातील प्रभात स्कूलमध्ये पोहोचलो.
10 वर्षांपासून सुरू आहे फ्लेमलेस किचन?
पहिली ते दहावीपर्यंत हे डे बोर्डिंग स्कूल आहे. ही एक खासगी शाळा आहे आणि शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना फीज भरावी लागते.
या शाळेत विद्यार्थ्यांना सकाळी 10.20 मिनिटांनी जेवण दिलं जातं. त्यानंतर दुपारी मुलांना अल्पोपहार दिला जातो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
मुलांना वरण, भात, भाजी, पोळी, सॅलड असं पूर्ण जेवण दिलं जातं. कुठलीही भाजी असली तरी ती खायची सवय लागावी यासाठी मुलांना शाळेतच जेवण देणं सुरू केल्याचं शाळेचे संस्थापक संचालक डॉ. गजानन नारे सांगतात.
ते म्हणतात, मी शिकवत असताना आठवीपर्यंत लोणचं-पोळी खाणारी पोरं आम्ही बघितली. पण, मुलांना सगळे पदार्थ खायची सवय लागली पाहिजे.
शालेय शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी कुठल्याही राज्यात गेले तर त्यांना सर्व खाण्याची सवय असावी या उद्देशाने आम्ही आमच्या शाळेत जेवण द्यायचं ठरवलं.

फोटो स्रोत, Bhagyashree Raut
शाळा सुरू झाली तेव्हापासूनच या शाळेत मुलांना जेवण दिलं जातं. पण, सुरुवातीला एलपीजी सिलिंडरवर स्वयंपाक केला जात होता. दिवसाला 4 सिलिंडर लागायचे. त्यासाठी खर्चही व्हायचा.
पण, आता गेल्या 10 वर्षांपासून फ्लेमलेस किचन सुरू करण्यात आलं. त्यामुळे गॅस सिलिंडरचा खर्चही वाचला.

फोटो स्रोत, Bhagyashree Raut
फ्लेमलेस किचन कसं काम करतं?
या किचनमध्ये सगळं जेवण तयार करण्यासाठी शेतातल्या कचऱ्याचा वापर होऊ लागला. हे शक्य झालं ते थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टममुळे.
पण, हे थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टम नेमकं काय आहे?
किचनच्या बाहेर एका ऑईल कंटेनरमध्ये फूड ग्रेड ऑईल साठवलं असतं. ते ऑईल कॉम्प्रेसरच्या माध्यमातून बॉयलरमध्ये येतं आणि बॉयरलमध्ये गरम होऊन पाईपद्वारे भांड्यांपर्यंत पोहोचवलं जातं. बॉयलर किचनच्या बाहेर बसवण्यात आलं आहे.
शेतातील कचरा म्हणजे तुराट्या (तुरीच्या वाळलेल्या काड्या), सोयाबीनसह इतर पिकांचा कचरा शेतात जाळण्यापेक्षा त्याचे मशिनमधून पॅलेट्स तयार केले जातात.
हे पॅलेट्स बॉयलरमधील तेल गरम करण्यासाठी केला जातो. फूड ग्रेड ऑईल बॉयलरमध्ये गरम होतं आणि कॉम्प्रेसरच्या माध्यमातून किचनच्या कढईपर्यंत नेलं जातं.
किचनच्या प्रत्येक भांड्याला बाहेरून पाईपलाईन लावण्यात आलेली आहे. त्या पाईपमध्ये हे गरम तेल फिरत असतं. त्यामुळे भांडं गरम होतं आणि त्या भांड्यात स्वयंपाक करणं शक्य होतं.
बऱ्याच ठिकाणी चपात्या, पापड भाजण्यासाठी आगीचा वापर होतो. पण, इथं कुठलीही फ्लेम नसताना चपात्या आणि पापड भाजले जातात.

फोटो स्रोत, Bhagyashree Raut
सगळा स्वयंपाक झाला की हे तेल दुसऱ्या कॉम्प्रेसरच्या माध्यमातून परत सिस्टममध्ये परत जातं. वर्षभरात एखाद्या ठिकाणी गळती झाली तर तेवढंच तेल वाया जातं. तेवढं तेल पुन्हा भरलं जातं.
त्यामुळे या फ्लेमलेस किचनसाठी खूप कमी खर्च लागतो. 1500-2000 रुपयांचे शेतातल्या कचऱ्यापासून बनणारे पॅलेट्स एवढाच खर्च या फ्लेमलेस किचनमध्ये होतो, असं या शाळेतील किचनचे प्रमुख निरज आवंडेकर सांगतात.
पण, हे ऑईल भांड्याखालून फिरत असताना अन्नात मिसळलं तर याचा धोका असतो का? याबद्दल याच शाळेतील किचनचे प्रमुख निरज आवंडेकर सांगतात, हे ऑईल फूड ग्रेड आहे आणि तेलाचा थेट जेवणासोबत संबंध येत नाही.
तेल एका बंद पाईपलाईनमधून फिरत असतं आणि ते भांड्यांना खालून गरम करतं. त्यामुळे जेवणाशी तेलाचा संबंधच येत नाही आणि तेलात काही कार्बन जमा झालं तर आम्ही वेळच्या वेळी स्वच्छ करतो.
शाळेत फ्लेमलेस किचन कसं तयार झालं?
निरज आवंडेकर यांच्याच पुढाकारानं या शाळेत फ्लेमलेस किचनची सुरुवात झाली. आवंडेकरांनी एका हॉटेलमध्ये फ्लेमलेस किचन बघितलं होतं.
त्यांना ते आवडलं आणि शाळेच्या दृष्टीनं एलपीजी सिलिंडरपेक्षा त्यांना ते अधिक सुरक्षित वाटलं. त्यामुळे त्यांनी शाळेत फ्लेमलेस किचन तयार करायचं ठरवलं.
यासाठी त्यांनी इंडस्ट्रीयल बॉयलर सिस्टम तयार करणाऱ्या इंजिनिअरकडून हे सिस्टम तयार करून घेतली. ही सिस्टम बसवण्यासाठी 35 लाख रुपये खर्च करण्यात आला. त्यानंतर गॅस किंवा इंधनासाठी लागणारा खर्च लागला नाही. याआधी दिवसाला किमान चार सिलिंडर लागायचे तो खर्च कमी झाला. तसेच कोणत्याही मेन्टेनन्सचा खर्च लागत नाही, असं आवंडेकर सांगतात.
ते सांगतात, मी अकोल्यातील एका इंजिनिअरला संपर्क केला. किती सुरक्षित किचन हवं आहे हे मी त्याला सांगितलं. त्यानं आधी स्टीम बॉयलरमध्ये काम केलं होतं.
थर्मिक फ्लुईड हिटर हा त्याच्यासाठी देखील पहिलाच प्रयोग होता. पण, त्यानं हे सिस्टम तयार केलं आणि ते यशस्वी देखील झालं. गेल्या 10 वर्षांत आतापर्यंत कधीही बिघाड झालेला नाही.

फोटो स्रोत, Bhagyashree Raut
हे फ्लेमलेस किचन कसं काम करतं हे बघण्यासाठी पूर्ण स्वयंपाक तयार होईपर्यंत आम्ही या किचनमध्ये होतो. पण, या किचनमधलं तापमान अजिबात वाढलेलं नव्हतं.
इथं चपात्या बनवणाऱ्या शालू कदम सांगतात, आम्ही दोन तास इथं चपात्या बनवण्याचं काम करतो. पण, गॅस शेगडीवर चपात्या बनवताना जसा घाम येतो, गरम होतं असा प्रकार इथं होत नाही.
इतक्या चपात्या तयार करताना आम्हाला उन्हाळ्यातही त्रास होत नाही.
या फ्लेमलेस किचनचे बॉयलर गरम करण्यासाठी शेतातल्या कचऱ्यापासून बनवलेले 400 किलो पॅलेट्स दररोज जाळले जातात. त्यामधून तयार झालेला धूर हा वातावरणात दुरवर सोडला जातो.
पण, शेतात कचरा जाळताना जितका धूर होतो तेवढाच धूर इथेही होतो. त्यामुळे त्याला औद्योगिक प्रदूषणासारखं प्रदूषण होतं असं म्हणता येणार नाही, असं आवंडेकर म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























