भारताने गाठली सेमी-फायनल, वेस्ट इंडिज विरोधातील सामन्यात काय होता 'टर्निंग पॉईंट'?

संजू सॅमसनने शानदार 97 धावांची खेळी केली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संजू सॅमसनने शानदार 97 धावांची खेळी केली
वाचन वेळ: 5 मिनिटे

ट्वेन्टी20 विश्वचषकात सुपर एटमधल्या अखेरच्या लढतीत वेस्ट इंडीजवर विजय मिळवून भारतानं उपांत्य फेरी गाठली आहे.

कोलकात्यात झालेल्या या सामन्यात भारतासमोर विजयासाठी 196 धावांचं लक्ष्य होतं. त्याचा पाठलाग करताना संजू सॅमसननं आत्मविश्वासानं भरलेली 97 धावांची नाबाद खेळी केली.

या विजयाचा शिल्पकार संजू सॅमसनचं ठरला. कारण टीम इंडियानं पहिल्या पाच षटकांतच दोन विकेट्स गमावल्या होत्या, तेव्हा संजूनं सूर्यकुमार आणि तिलक वर्माच्या साथीनं झुंज सुरू ठेवली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्यामुळेच भारताने 196 धावांचा यशस्वी पाठलाग केला. ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या इतिहासात धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतातर्फे ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

टीम इंडियाच्या विजयासोबतच या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं चित्रही स्पष्ट झालं आहे. भारताशिवाय इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी आधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामना 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

त्याआधी 4 मार्चला उपांत्य फेरीचा पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार असून, त्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दक्षिण गोलार्धातील दोन संघांमधली लढत पाहायला मिळेल.

संजू सॅमसन भारताच्या विजयाचा शिल्पकार

संजू सॅमसन खरंतर गेली काही वर्ष भारतीय संघाच्या आत-बाहेर करतो आहे, संधीची वाट पाहतो आहे. ईडनवर त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं तिचं सोनं केलं.

संजूनं तब्बल 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने आणि 192 च्या स्ट्राइक रेटसह नाबाद 97 धावा काढल्या.

sanju samson

फोटो स्रोत, ANI

हा सामना जिंकल्यावर संजू सॅमसनला सामनावीर घोषित करण्यात आले, तेव्हा संजूनं मनमोकळी प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, "माझ्यासाठी ही खेळी खूप स्वप्नवत आहे. मी अनेक मॅचेस खेळल्या, स्वतःवर शंका घेत बसलो पण अखेर देवाने मला ही खेळी खेळण्याची संधी दिली.

"मी बऱ्याच काळापासून - मागच्या दहा वर्षांपासून टी 20 क्रिकेट खेळतो आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या महान खेळाडूंना बघून मी बॅटिंग शिकलो आहे.

"हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम दिवस आहे. मला कधीही असं वाटलं नव्हतं की मी एवढी मोठी खेळी करू शकेन."

तो क्षण, जेव्हा भारतानं सामना फिरवला

संजू सॅमसनची स्पेशल इनिंग हे भारताच्या विजयाचं प्रमुख कारण ठरलं. पण सोबतच संजूनं रचलेल्या भागीदारीही महत्त्वाच्या ठरल्या.

त्यानं सूर्यकुमार यादवसह 58, तिलक वर्मासह 42, हार्दिक पंड्यासह 38 आणि शिवम दुबेसह नाबाद 20 धावांची भागीदारी रचत भारताला विजयापर्यंत पोहोचवलं.

सॅमसन आणि तिलक वर्मा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सॅमसन आणि तिलक वर्मा

पण हा सामना खऱ्या अर्थानं फिरला, तो भारतीय डावातल्या 13 व्या षटकात, जेव्हा तिलक वर्मानं शमार जोसेफच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार ठोकले.

सॅमसन आणि वर्मानं या षटकाच 17 धावा ठोकत भारतावरचा दबाव थोडा कमी केला. ही ओव्हर भारतासाठी गेमचेंजर ठरली.

त्यानंतर संजूनं सामन्यावरची पकड मजबूत ठेवली. त्याशिवाय हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर महत्त्वाच्या क्षणी काही चेंडूवर भारत दबावात येऊ शकतो अशी शंकेची पाल चाहत्यांच्या मनात चुकचुकली.

पण शिवम दुबेनं 19 व्या ओव्हरमध्ये या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी दोन चौकार खेचले आणि सगळा दबाव पुन्हा विंडिजच्या खांद्यावर सरकवला.

त्याआधी वेस्ट इंडीजच्या डावातील बारावं षटकही महत्त्वाचं ठरलं. जसप्रीत बुमरानं त्या षटकात दोन विकेट्स काढल्या आणि वेस्ट इंडीजच्या घोडदौडीला लगाम लावला आणि त्यांचा संघ दोनशे धावांच्या आत आटोपला.

भारताच्या डावात काय घडलं?

ईडनवर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानं भारताला पहिला धक्का बसला. तो अवघ्या दहा धावांवर असताना अकील हुसेनच्या गोलंदाजीवर हेटमायरनं त्याचा झेल टिपला. तेव्हा भारताची धावसंख्या होती तीन षटकांत 1 बाद 29.

हेटमायरनंच मग जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर ईशान किशनचा झेल टिपला. ईशानलाही दहाच धावा करता आल्या, आणि भारताची अवस्था 2 बाद 41 अशी झाली.

त्यानंतर सलामीवीर संजू सॅमसननं कर्णधार सूर्यकुमार यादवच्या साथीनं खिंड लढवत ठेवली.

तिलक वर्मा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तिलक वर्मा

सॅमसननं ट्वेन्टी20 विश्वचषकातलं त्याचं पहिलं अर्धशतक साजरं केलं. त्यानं सूर्यासह तिसऱ्या विकेटसाठी 35 चेंडूंमध्ये 28 धावांची भागीदारी रचली.

सूर्यकुमार 18 धावांवर असताना शमार जोसेफच्या गोलंदाजीवर रुदरफोर्डनं त्याचा झेल टिपला आणि ही जोडी फुटली.

मग 13 व्या षटकात तिलक वर्मानं शमार जोसेफच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार ठोकले. सॅमसन आणि वर्मानं या षटकाच 17 धावा ठोकत भारतावरचा दबाव थोडा कमी केला.

तिलकनं 15 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि एका षटकारासह 27 धावा ठोकल्या. पण मग होल्डरनं टाकलेल्या पंधराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हेटमायरनं त्याचा झेल टिपला.

त्यानंतर हार्दिक पंड्यानं सतरा धावा जोडल्या, पण जोसेफच्या गोलंदाजीवर होल्डरनं त्याचा झेल टिपला.

भारताचं खराब क्षेत्ररक्षण वेस्ट इंडीजच्या पथ्यावर

हा सामना जणू स्पर्धेची उपांत्यपूर्व लढतच बनला होता. कारण उपांत्य फेरी गाठायची तर दोन्ही संघांना विजय आवश्यक होता.

त्यात वेस्ट इंडीजनं 20 षटकांत 4 बाद 195 धावांची मजल मारली.

टीम इंडियानं दिलेल्या जीवदानांचा वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी व्यवस्थित फायदा उठवला. भारताचं या सामन्यातलं क्षेत्ररक्षण काहीसं ढिसाळ आणि निराशाजनक ठरलं.

आधी रॉस्टन चेस आणि शाई होप आणि मग रोव्हमॅन पॉवेल आणि जेसन होल्डरनं फटकेबाजी करून वेस्ट इंडीजला चांगली धावसंख्या उभारून दिली.

भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला वेस्ट इंडीजला काहीसं रोखल्यासारखं वाटलं. पण रॉस्टन चेस आणि शाई होपनं सलामीला फटकेबाजी केली आणि आणि वेस्ट इंडीजच्या मधल्या फळीनंही धावांचा ओघ सुरू ठेवला.

वेस्ट इंडीजनं मिळालेल्या जीवदानांचा पुरेपूर फायदा उठवला.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, वेस्ट इंडीजनं मिळालेल्या जीवदानांचा पुरेपूर फायदा उठवला.

चेस आणि होपनं 68 धावांची भागीगदारी रचली. पण वरुण चक्रवर्तीनं नवव्या षटकात होपचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली आणि भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

मग बाराव्या षटकातल्या तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमरानं अचूक गोलंदाजी करत दोन विकेट काढल्या.

शिमरॉन हेटमायर 27 धावांवर असताना संजू सॅमसननं बुमराच्या गोलंदाजीवर त्याचा झेल टिपला. तर दोन चेंडूंनंतर सूर्यकुमारनं रॉस्टन चेसचा 40 धावांवर झेल टिपला.

त्यानंतर आलेल्या रुदरफोर्डला 14 धावाच करता आल्या, हार्दिक पंड्यानं त्याला सॅमसनकरवी झेलबाद केलं.

पण रोव्हमॅन पॉवेल आणि जेसन होल्डरनं फटकेबाजी करून वेस्ट इंडीजला भक्कम स्थितीत नेलं.

भारताकडून जसप्रीत बुमरानं 2 तर हार्दिक आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी एक विकेट काढली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)