'मी दररोज 1200 रुपये कमवत होतो'; एलपीजी तुटवड्यानं गीग वर्कर्सवर काय परिणाम होतोय?

फोटो स्रोत, Sudipta Das/NurPhoto via Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
"मी दररोज 1200 रुपये कमवत होतो. पण, कालपासून (11 मार्च) अचानक ऑर्डर कमी झाले. काल मला फक्त 9 ऑर्डर मिळाले. त्यापैकी 5 जणांनी म्हटलं की, गॅस सिलिंडर नाहीतर उद्यापासून ऑर्डर बंद होतील. आज पण 2 वाजले तरी एकही ऑर्डर आली नाही."
नागपुरातील मेडीकल चौकात फूड डिलिव्हरीचे ऑर्डर मिळतील याची वाट पाहत असलेला आकाश (बदलेलं नाव) आपली व्यथा सांगत होता.
तो आपला नागपुरातील खर्च भागवण्यासाठी पार्ट टाईम झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. पण, त्याच्या ओळखीच्या लोकांना माहिती नाही की, तो हे काम करतो. त्यामुळे त्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सध्या त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली.
सध्या व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा असल्यानं नागपुरातील रेस्टॉरंट, हॉटेल्स, छोटे फूड स्टॉल्सवर परिणाम झाला आहे. काही रेस्टॉरंटवाल्यांनी लाकडावर भट्टी सुरू केली आहे. पण, छोट्या व्यावसायिकांना पर्याय नाही. तसेच क्लाऊड किचनमधून ऑर्डर देणाऱ्यांसमोरही पर्याय उरला नाही.
गीग वर्कर्सला प्रत्येक ऑर्डरनुसार पैसे मिळतात. पण, ऑर्डर कमी झाल्यानं आता पैसेही कमी झाल्याचं आकाश सांगतो.
जवळपास 400-600 रुपये कमाईमध्ये घट झाल्याचं गीग वर्कर्सचं म्हणणं आहे.
सध्या पूर्णपणे ऑर्डर बंद झाले नाहीत. फक्त छोट्या फूड स्टॉल्स आणि क्लाऊड किचनमधून येणाऱ्या ऑर्डर कमी झाल्या आहेत. आता हे गीग वर्कर फक्त मोठ्या रेस्टॉरंटच्या ऑर्डर्सवर अवलंबून आहेत. पण, व्यावसायिक गॅसचा तुटवडा असाच राहिला, तर पुढे आणखी परिणाम होईल अशी भीती इथले गीग वर्कर बोलून दाखवत होते.
मुंबईवर काय झाला परिणाम?
वेगवेगळ्या शहरानुसार हा परिणाम जाणवतो आहे. सध्या मुंबईत 20 टक्के रेस्टॉरंट बंद झाले आहेत. मुंबईत गीग वर्कर्सची संख्या जास्त आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर भागात सुद्धा हे वर्कर्स फूड डिलिव्हरी करतात. पण, मुंबईत अजूनही गीग वर्कर्सच्या हाताला काम मिळतंय.
गीग वर्कर युनियन महाराष्ट्र अंतर्गत जवळपास 36 हजार गीग वर्कर कार्यरत आहेत. या संघटनेचे सचिव डॉ. लक्ष्मण माने यांनी पुढच्या काही दिवसांत समस्या उद्भवू शकते अशी चिंता व्यक्त केली.

फोटो स्रोत, Satish Bate/Hindustan Times via Getty Images
डॉ. लक्ष्मण माने बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "अजून गीग वर्कर्सबाबत तीव्र परिस्थिती नाही. कारण रेस्टॉरंट चालकांनी गॅस सिलेंडरसाठी पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे. काही ठिकाणी ऑर्डर तयार व्हायला उशिर होतोय. पण, ऑर्डर मिळत आहेत. यामुळे अजून काम थांबलेलं नाही. पण पुढच्या काही दिवसांमध्ये समस्या उद्भवू शकते."
ऑर्डर झपाट्यानं कमी होण्याची भीती
दिल्लीतील गीग वर्कर असोसिएशननेही पत्रक काढून गिग वर्करवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
इराणमधील संघर्ष सुरूच राहिला आणि पुरवठा सुधारला नाही, तर सरकारनं देशांतर्गत उत्पादन वाढवावं, अशी मागणी देखील त्यांनी केली.
त्यांनी पुढे म्हटलं की, आमच्या असोसिएशनचे सदस्य जिथं जिथं ऑर्डर घ्यायला जातात त्यांना सांगितलं जातं की, रेस्टॉरंट कोणत्याही वेळी बंद होऊ शकतं. अशा परिस्थितीत स्विगी आणि झोमॅटोनं गिग वर्करवर कुठलीही पेनॉल्टी आकारू नये.
कामगारांचे रेटिंग आणि उत्पन्न सुरक्षित राहील याची प्लॅटफॉर्मनी खात्री करावी, तर सरकारने गॅस पुरवठ्यातील अडथळा दूर करून संपूर्ण फूड डिलिव्हरी परिसंस्थेवर (इकोसिस्टम) विपरीत परिणाम होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात.
सोबतच ऑर्डर्स झपाट्यानं घटून गीग वर्करच्या उत्पन्नावर परिणाम होण्याचीही भीती त्यांनी व्यक्त केली.
या संकटकाळात ग्राहकांनी सुद्धा गीग वर्कर्सला पाठिंबा द्यावा. त्यांना उदारपणे टीप द्यावी जेणेकरून त्यांचं कमी झालेलं उत्पन्न भरून निघेल, असं आवाहन गीग वर्कर असोसिएशनचे सचिव नितेश कुमार दास यांनी केलं.
सध्या इतका परिणाम जाणवता नसला, तरी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर पुढील काळात अधिक तीव्र परिणाम जाणवायला लागतील, अशी भीती हे वर्कर्स बोलून दाखवतात.
सरकारचं म्हणणं काय?
अमेरिका-इस्रायलच्या इराणसोबतच्या युद्धामुळे होर्मूझ सामुद्रधुनीत नैसर्गिक वायूची वाहतूक करणारे अनेक जहाजं अडकले आहेत. त्यामुळे देशात एलपीजीचं संकट निर्माण झालं आहे.
सध्या घरगुती सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. पण, त्यासाठी देखील गॅस एजन्सीसमोर रांगा लागलेल्या दिसत आहेत.
तसेच भारतातील एलपीजीच्या संकटामुळे अनेक उद्योगांवर संकट आलं आहे. फक्त हॉटेल, रेस्टॉरंट नाही, तर फेब्रिकेशन, ग्लासवर्क, स्टील उद्योग अशा अनेक उद्योगांना संकटाचा सामना करावा लागतोय.

फोटो स्रोत, Getty Images
याबद्दल पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी लोकसभेत बोलताना म्हणाले, "सर्वात गंभीर जागतिक ऊर्जा संकटातून भारत सध्या मार्ग काढत आहे."
"इंधनाचा पुरवठा सुरू आहे. घरगुती वापर आणि शेतीसाठी गॅस पुरवठा करण्याला प्राधान्य दिलं जात आहे. एलपीजी उत्पादनात 28 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे."
"देशांतर्गत पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून वितरणाची साखळी देखील पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. सध्या सगळ्यांनी या संकटाचं व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांच्या पाठिशी उभं राहावं," असं हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











