मॉडेलबरोबर सेक्स करण्यासाठी एजंटनं एपस्टिनला केली होती विनवणी, एपस्टिन फाईल्समधून समोर आलं मॉडेलिंग विश्वाचं वास्तव

रॅमसे एलखोली आणि जेफ्री एपस्टिन यांनी जवळपास एक दशकभर मॉडेल्सच्या संदर्भात एकमेकांना ईमेल्स पाठवले होते

फोटो स्रोत, Facebook/Getty Images

फोटो कॅप्शन, रॅमसे एलखोली आणि जेफ्री एपस्टिन यांनी जवळपास एक दशकभर मॉडेल्सच्या संदर्भात एकमेकांना ईमेल्स पाठवले होते
    • Author, अब्दिरहीम सईद
    • Role, बीबीसी अरेबिक
    • Author, बेन किंग
    • Role, बिझनेस रिपोर्टर
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

(या बातमीतील काही तपशील विचलित करू शकतात.)

अमेरिकेतील मॉडलिंग एजंटने एका 18 वर्षांच्या तरुणीची ओळख जेफ्री एपस्टीनशी करून दिली होती. आणि त्या मुलीसोबत एपस्टीनने सेक्स करावा अशी विनंती त्याने केल्याचे इमेलमधून समोर आले आहे.

या एजंटचं नाव होतं रॅमसे एलखोली. त्यानं जवळपास एका दशकाच्या कालावधीत जेफ्री एपस्टिनला शेकडो ईमेल्स पाठवले होते. या ईमेल्समध्ये त्यानं महिलांच्या शरीराबद्दल आणि लैंगिक संबंधांबद्दलच्या त्यांच्या दृष्टीकोनाबद्दल चर्चा केली होती. त्यानं सुचवलं होतं की तो आणि एपस्टिन ब्राझीलमधील फॅशन आणि मॉडेलिंग व्यवसायात गुंतवणूक करून आणखी महिलांना भेटू शकतील.

रॅमसे एलखोली यानं 2011 मध्ये पाठवलेल्या एका ईमेलमध्ये एका 20 वर्षांच्या तरुणीचं वर्णन केलं होतं. तिला 'पैशांची अत्यंत गरज होती'. रॅमसेनं त्या म्हटलं होतं की, "Dear Jeffrey PLEASE just try her in bed."

एलखोलीनं बीबीसीला सांगितलं की काही ईमेल्समध्ये त्यानं वापरलेली भाषा आणि एपस्टिनबरोबरचे त्याचे संबंध, याबद्दल त्याला पश्चाताप वाटतो. त्यानं सांगितलं की एपस्टिन महिलांचं शोषण करत असल्याबद्दल त्याला माहित नव्हतं.

एलखोली आता स्वत:ची ओळख मानववंशशास्त्रज्ञ आणि संगीतकार, तसंच मोनोट्रॉनिक बँडचा संस्थापक म्हणून करून देतो. मात्र 2010 च्या दशकात तो मॉडलिंग एजंट होता.

अमेरिकेतील न्याय विभागानं अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या फाईल्समधून दिसून येतं की त्याची 2009 पासून ते 2019 मध्ये एपस्टिनचा मृत्यू होण्याच्या काही काळ आधीपर्यंत एपस्टिनबरोबर ईमेल्सची देवाणघेवाण झाली होती. यातील बराचसा भाग महिला मॉडेल्सपर्यंत पोहोचण्यासंदर्भात होता.

एपस्टिनचं मॉडेलिंग विश्वातील जाळं

एपस्टिननं आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग उद्योगात कसे व्यापक स्वरुपात संपर्क निर्माण केले होते, यावर या ईमेल्समधून प्रकाश पडतो. यातील काही संपर्कांचा वापर एपस्टिननं महिला आणि मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी केला होता. एपस्टिननं लैंगिक शोषण, छळ केलेल्या महिलांमध्ये मॉडेल्सचाही समावेश होता. एफबीआयच्या अंदाजानुसार, यात एकूण 1,000 महिला आणि मुली असू शकतात.

एपस्टिनबरोबर देवाणघेवाण झालेल्या संदेशांमध्ये एलखोलीनं फॅशन उद्योगातील एपस्टिनच्या संपर्कांबरोबर मॉडेल्सच्या गाठीभेटी आयोजित करण्याबद्दल चर्चा केल्याचं दिसून येतं. त्यात व्हिक्टोरिया सिक्रेटचा समावेश आहे. त्यावेळी हा ब्रँड एपस्टीनचे सर्वांत मोठे क्लाएंट लेक्स वेक्सनर यांच्याकडे होता तसेच व्हेरा वँग लेबलबाबतही चर्चा झाली होती.

जेफ्री एपस्टिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेफ्री एपस्टिन

अमेरिकेच्या न्याय विभागानं प्रसिद्ध केलेल्या फाईल्समधून असंही दिसून येतं की एलखोली हा जीन-ल्युक ब्रुनेल या फ्रेंच मॉडेल एजंटच्या संपर्कात होता. जीन ब्रुनेल हा एपस्टिनच्या संपर्कातील किंवा परिचयातील व्यक्ती होता. त्यानं एपस्टिनच्या या लैंगिक शोषणासाठी कृत्यांसाठी तरुणी, मुलींची भरती केल्याचा आरोप बीबीसीशी बोललेल्या ब्राझिलियन महिलांनी केला होता.

ब्रुनेल 2022 मध्ये पॅरिसमधील तुरुंगाच्या कोठडीत मृत अवस्थेत सापडला होता. त्यावेळेस ब्रुनेलची अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्यासंदर्भात आणि लैंगिक शोषणासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याच्या संशयावरून चौकशी सुरू होती.

'जेफ्री, तू एक विश्वासू, भरवशाचा माणूस आहेस'

एलखोली यानं बीबीसीला सांगितलं की तो जेफ्री एपस्टिनच्या जवळच्या वर्तुळात नव्हता. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या वेबसाईटवर एलखोलीच्या आडनावानं सर्च केल्यास 2,000 हून अधिक रिझल्ट्स समोर येतात. अर्थात त्यातील बरेचशा पुनरावृत्ती आहेत. एलखोली म्हणाला की या फाईल्समधून दिसतं की तो 10 वर्षांच्या कालावधीत एपस्टिनला फक्त 10 ते 12 वेळाच भेटला होता.

एलखोलीनं 2009 मध्ये एपस्टिनला एक ईमेला पाठवला होता. त्यावेळेस एका अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याच्या आरोपातून एपस्टिनची तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर काही महिन्यांनी एलखोलीनं हा ईमेल पाठवला होता.

त्यात म्हटलं होतं, "मीदेखील तुझ्या मैत्रीला महत्त्व देतो, हे मला तुला सांगण्याची गरज नाही. तुझी मॉडेल्सबरोबर भेट घालून देण्याच्या बदल्यात मी तुझ्याकडे कधीही काहीही मागत नाही, कारण मी त्याकडे तुझी मेहेरबानी किंवा मर्जी म्हणूनच पाहतो. मला माहित आहे की तू देखील मेहरबानीच्या बाबतीत चांगला आहेस."

एपस्टिनच्या घरातील एक क्रेडेंझा डेस्कचा एक ड्रॉवर उघडा असून त्यात इतर फोटो ठेवलेले दिसत आहेत, हा फोटो आधी हटवण्यात आला आणि पुन्हा पूर्ववत करण्यात आला.

फोटो स्रोत, US Department of Justice

फोटो कॅप्शन, एपस्टिनच्या घरातील एक क्रेडेंझा डेस्कचा एक ड्रॉवर उघडा असून त्यात इतर फोटो ठेवलेले दिसत आहेत, हा फोटो आधी हटवण्यात आला आणि पुन्हा पूर्ववत करण्यात आला.

एलखोलीनं पुढे लिहिलं होतं, "जेफ्री, तू एक विश्वासू, भरवशाचा माणूस आहेस आणि माझ्यासाठी हे सर्वस्व आहे."

एलखोलीनं एका 'पैशांची अत्यंत निकड असलेल्या' महिलेबद्दल एपस्टिनला सांगितल्यानंतर, दोन दिवसांनी एलखोली म्हणाला की, त्याला आशा होती की न्यूयॉर्कमध्ये 'अगदी एकटी' असलेल्या त्या महिलेच्या परिस्थितीचा एपस्टिन 'पुरेपूर फायदा घेत असेल.'

या ईमेलला एपस्टिननं फक्त एकाच शब्दात उत्तर दिलं होतं - 'झिरो'.

त्यानंतर काही दिवसांनी एलखोलीनं पुन्हा एपस्टिनला ईमेला पाठवला. "जेफ्री, कृपया तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवून बघ... मला याची खरोखर गरज आहे. जेणेकरून या सर्व प्रकरणाबाबत मला मनापासून समाधान वाटेल. कारण ती महिला खूपच त्रासदायक आणि डोकेदुखी आणणारी आहे. मला असंही वाटतं की तिला ही गोष्ट पुरेपूर कळणं, त्याला अनुभव देणं, योग्य ठरेल (रागाच्या उद्गारांसह)."

एलखोलीनं दावा केला की, त्यानं हा ईमेल त्या महिलेच्या परवानगीनं पाठवला होता.

'मला वाटतं की तुला ती आवडेल'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एलखोलीच्या संदर्भात 18 वर्षांखालील मुलींचा कोणताही उल्लेख बीबीसीला आढळलेला नाही.

एलखोलीनं 2010 मध्ये पाठवलेल्या एका संदेशात प्रस्ताव दिला होता की एपस्टिननं एका 18 वर्षांच्या 'अतिशय सुंदर' रशियन कॉलेज विद्यार्थिनीला भेटलं पाहिजे. ही मुलगी एलखोलीला एका दुकानात अचानक भेटली होती.

एलखोलीनं लिहिलं होतं, "मला वाटतं की तुला ती आवडेल."

याला एपस्टिनच्या सहायकाने उत्तर देत म्हटलं होतं की त्याला तिला भेटायचं आहे.

एलखोलीनं बीबीसीला सांगितलं की त्यानं एपस्टिनची त्या तरुणीशी भेट घालून दिली होती. त्याला आशा होती की, एपस्टिन त्या तरुणीला मॉडेलिंगच्या संधी मिळवून देण्यास मदत करेल.

एलखोलीनं ज्यांच्याबद्दल चर्चा केली होती, अशा अनेक तरुणी 19 वर्षांच्या होत्या.

असं दिसतं की एपस्टिनला तरुण मुलींबद्दल असलेल्या विशेष आकर्षणाची एलखोलीला कल्पना होती.

एलखोलीनं 2009 मध्ये पाठवलेल्या एका ईमेलमध्ये 'सोनेरी केसांच्या अतिशय आकर्षक मुलीचा' उल्लेख केला होता. त्यात त्यानं म्हटलं होतं, "मला माहीत आहे की 23 वर्षे हे तुझ्या दृष्टीनं जास्त वय आहे." एपस्टिन त्यावेळेस 56 वर्षांचा होता.

रुस्लाना कोर्शुनोव्हा तिच्या मृत्यूच्या दोन वर्षे आधी एपस्टिनच्या कॅरिबियन बेटावर गेली होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रुस्लाना कोर्शुनोव्हा तिच्या मृत्यूच्या दोन वर्षे आधी एपस्टिनच्या कॅरिबियन बेटावर गेली होती

एलखोलीनं एपस्टिनला महिलांबाबत जे अनेक संदेश पाठवले होते, त्यात त्यानं त्यांच्या शरीराबद्दल आणि सेक्सबद्दलच्या त्यांच्या दृष्टीकोनावर चर्चा केली होती. यातील एका संदेशात एक महिला "व्यवसायावर अतिशय लक्ष केंद्रित असलेली आणि लैंगिक संबंधांविषयी अतिशय बिनधास्त असल्याचं म्हटलं होतं."

एलखोलीनं 2010 मध्ये एका तरुणीबाबत लिहिलं होतं, ती "19 वर्षांची असली तरी कट्टर ख्रिश्चन आहे. त्यामुळे मला वाटत नाही की हे जुळून येईल. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ती 5 फूट 11 इंच उंचीची बार्बी डॉल आहे."

या ईमेल्समधून असंही दिसून येतं की एलखोलीनं रुस्लाना कोर्शुनोव्हा या कझाकस्तानच्या मॉडेलसाठी एजंट म्हणून काम केलं होतं. ती 2006 मध्ये एपस्टिनच्या कॅरिबियन बेटावर फक्त 18 वर्षांची असताना गेली होती, असं प्रसिद्ध झालेल्या फ्लाईट लॉग म्हणजे उड्डाणांविषयीच्या तपशीलातून समोर आलं आहे.

या मॉडेलचा 2008 मध्ये न्यूयॉर्कमध्ये नवव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी हा मृत्यू म्हणजे आत्महत्या असल्याचं ठरवलं होतं.

एलखोलीनं 2009 मध्ये एपस्टिनला सांगितलं होतं की तो लक्झेंबर्गमध्ये 'रुस्लानाच्या मालमत्ते'शी संबंधित कागदपत्रं हाताळत होता.

'या तरुणींना विमानानं कुठेही पाठवा'

एलखोली नियमितपणे प्रवास करत होता. तो थायलंड, लाटव्हिया, प्राग आणि मियामीमधून एपस्टिनला ईमेल पाठवत होता. एलखोली 2016 मध्ये ब्राझीलला गेला होता. तिथून त्यानं एपस्टिनसमोर गुंतवणुकीचे अनेक संभाव्य पर्याय ठेवले. यात मॉडेलिंग एजन्सी, मासिकं आणि एका स्पर्धेचा समावेश होता.

एलखोलीनं एका एजन्सीमध्ये गुंतवणूक करण्याविषयी सुचवताना, एका ईमेलमध्ये म्हटलं होतं की त्याच्या मते एपस्टिनला 'तरुणींपर्यंत पोहोचण्यात अधिक रस होता'. यासाठी त्यानं 'महिला' या शब्दाऐवजी इमोजीचा वापर केला.

मॉडेलिंगच्या एका स्पर्धेच्या कल्पनेबाबत तो म्हणाला की त्यात 9 महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या शहरांमधून '2 लाख तरुणी' सहभागी होतील.

तो म्हणाला की त्याला ही कल्पना एपस्टिनसाठी आवडली. कारण स्पर्धेची विजेती सहसा 'दुर्लक्षित राहिलेली इतर मुलगी' असायची आणि तो 'या मुलींना अमेरिका, पॅरिस किंवा कॅरिबियन बेटांवर कुठेही विमानानं नेऊ शकणार होता'.

त्याच वर्षी, एलखोलीनं एपस्टिनचं लक्ष वेधलं की ब्राझीलमधील एक फॅशन मासिक विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि सुचवलं की ते दोघे मिळून ते मासिक विकत घेऊ शकतील.

एलखोलीनं त्या ईमेलमध्ये पुढे लिहिलं, "दर महिन्याला या मासिकाच्या मुखपृष्ठावर येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या 20-30 मुली तुला सहज मिळू शकतील. ही फक्त एक कल्पना आहे."

एपस्टिनला त्यात फारसा रस नव्हता. त्यानं एलखोलीला देखील सल्ला दिला की एका फ्रेंच मासिकाच्या अमेरिकेतील प्रकाशनासाठी गुंतवणूक करू नये.

त्यावर खंत व्यक्त करत एलखोलीनं प्रतिसाद दिला की जर आपण यात पुढे गेलो असतो, तर त्याला 'सर्व तरुणींशी' लैंगिक संबंध ठेवता आले असते. त्यानं सुचवलं की तरुणींचा 'सतत पुरवठा' होत राहावा यासाठी त्याला 'काही लाखांना' त्या मासिकाची ब्राझीलमधील आवृत्ती विकत घेता येईल. यासाठी त्यानं महिलांच्या गुप्तांगांसाठी वापरला जाणारा एक आक्षेपार्ह अपशब्द वापरला होता.

एपस्टिनला अटक होईपर्यंत एलखोली करत होता तरुणींना आणण्याबाबत चर्चा

एलखोलीची एपस्टिनबरोबरची ईमेल्सची देवाणघेवाण 2019 पर्यंत सुरू राहिली. तोपर्यंत एपस्टिनभोवती कायद्याचा फास आवळला जाण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली होती.

एपस्टिन फाईल्समधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या दोघांमधील शेवटच्या संदेशांमध्ये, हे दोघेही एका रशियन महिलेला अमेरिकेत आणण्याबद्दल चर्चा करत होते.

"जर तुला तिला इथं आणायचं असेल तर ती लंडनमध्ये असेल," असं एलखोलीनं ईमेलमध्ये लिहिलं होतं. एपस्टिन म्हणाला होता की अमेरिकेचा व्हिसा मिळणं कठीण आहे.

एलखोली सुचवलं होतं, "तिला कदाचित विद्यार्थी व्हिसासाठी प्रयत्न करता येतील?" एपस्टिननं यासाठी दुबईमध्ये प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता.

तीन महिन्यांनी, एपस्टिनला दुसऱ्यांदा अटक झाली होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.