प्रफुल्ल पटेल : कोलकात्यात जन्म ते महाराष्ट्रातून 33 व्या वर्षी खासदार; राष्ट्रवादीत ते इतके महत्त्वाचे नेते कसे बनले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रविण सिंधू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेल्या नेत्यांपैकी एक प्रमुख नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल.
प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे खासदार आहेत. वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी प्रफुल्ल पटेल खासदार झाले होते. त्यांची सलग तीनवेळा लोकसभेवर निवड झाली होती. त्यानंतर 2009 मध्ये चौथ्यांदा त्यांची लोकसभेवर निवड झाली. दरम्यान, 2000 आणि 2006, 2014, 2016, 2022, 2024 अशा 6 वेळा त्यांची राज्यसभेवरही निवड झाली.
अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याआधी स्वतः शरद पवार यांनी त्यांना पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष केलं होतं. मात्र, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत केले. तेथेही त्यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपद मिळालं.
मात्र, एका उद्योजकाच्या घरातून येणारे प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतक्या उंचीवर कसे पोहचले? जाणून घेऊयात.
प्रफुल्ल पटेल यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय?
प्रफुल्ल पटेल यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1957 रोजी कोलकाता येथे झाला. सधन कुटुंबात जन्मलेले आणि वाढलेले प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल यांची सुरुवात अत्यंत साध्या परिस्थितीतून झाली होती.
अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या मनोहरभाई पटेल यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. रोजगाराच्या शोधात त्यांनी गुजरात सोडून मध्य भारतात स्थलांतर केले. ट्रकवर माल चढवणे-उतरण्यापासून ते घरगुती वस्तूंच्या विक्रीपर्यंत त्यांनी अनेक कामे केली.
पुढे गोंदियामध्ये सुरू केलेल्या बिडी व्यवसायाच्या जोरावर ते यशस्वी उद्योजक आणि उद्योगपती झाले. त्यांनी बिडी, तंबाखू, औषधनिर्माण, वित्त, रिअल इस्टेट, पॅकेजिंग अशा विविध क्षेत्रांत प्रवेश व्यवसाय केला. हा समूह 'सीजय ग्रुप' म्हणून ओळखला जातो.

फोटो स्रोत, praful-patel.com
केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या मनोहरभाई पटेल यांनी शिक्षण क्षेत्रातही काम केलं.
पटेल कुटुंब गोंदिया जिल्ह्यातील 'गोंदिया एज्युकेशन सोसायटी' चालवते. या संस्थेमार्फत कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, कायदा, फार्मसी, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान अशा विविध शाखांचे शिक्षण दिले जाते.
याशिवाय गुजरातमध्ये नडियाद एज्युकेशन सोसायटीचीही स्थापना करण्यात आली. तेथे विविध व्यावसायिक आणि पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते.
प्रफुल्ल पटेल 13 व्या वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने कौटुंबिक उद्योगाची जबाबदारी खूप लवकरच प्रफुल्ल पटेल यांच्यावर आली. त्यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांनी कुटुंबाच्या व्यवसायात प्रवेश केला. तसेच पुढे या समूहाचे नेतृत्व त्यांनी केले.
प्रफुल्ल पटेल यांचा राजकीय प्रवास कसा झाला?
प्रफुल्ल पटेल यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील मनोहरभाई पटेल महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते होते. नेत्याच्या कुटुंबात जन्म झाल्याने प्रफुल्ल पटेल यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला.
वयाच्या 28 व्या वर्षी ते गोंदिया नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले. 33 व्या वर्षी त्यांची पहिल्यांदा लोकसभेवर निवड झाली. सलग तीनवेळा लोकसभा जिंकल्यानंतर सहावेळा त्यांची राज्यसभेवर निवड झाली. 2009 मध्ये चौथ्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले.

फोटो स्रोत, praful-patel.com
राजकारण आणि व्यवसायाव्यतिरिक्त प्रफुल्ल पटेल यांनी 'ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन'चे अध्यक्ष म्हणूनही काम केले. तसेच, आशियाई फुटबॉल महासंघाच्या कार्यकारिणीचे सदस्यही झाले.
प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या संसदीय कारकिर्दीत अर्थ, नागरी विमान वाहतूक, पर्यावरण व वन, परराष्ट्र व्यवहार अशा विविध संसदीय समित्यांवर काम केले. ते इंडो-यूके पार्लमेंटरी फोरमचे अध्यक्ष होते. तसेच इंडो-यूएस पार्लमेंटरी फोरमचे संस्थापक सदस्य होते.
पटेल यांचे दिल्लीतील राजकारणातील स्थान कसे होते?
लोकसत्ताचे दिल्ली प्रतिनिधी आणि राजकीय विश्लेषक महेश सरलष्कर दिल्लीतील राजकारणात प्रफुल्ल पटेल यांचे स्थान आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्व यावर भाष्य करताना त्यांची तुलना समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग यांच्याशी करतात.
ते म्हणाले, "समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्यासाठी जसं अमरसिंग यांचं महत्त्व होतं, तसं प्रफुल्ल पटेल यांचं शरद पवारांसाठी महत्त्व होतं. अमरसिंग यांचं दिल्लीतील राजकीय वर्तुळात, उद्योग वर्तुळात मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग होतं. त्यातून दिल्लीच्या सत्तेच्या वर्तुळात, त्यांचं एक महत्त्व तयार झालं होतं. हेच प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतही दिसून येतं."

फोटो स्रोत, Getty Images
"प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे राहिले. या काळात प्रफुल्ल पटेल यांचे राजकीय वर्तुळ केवळ दिल्लीतील राजकारणापुरतं मर्यादित नव्हतं, तर उद्योग व्यापार यातही हे वर्तुळ होतं. अशा सत्तेच्या वेगवेगळ्या वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांची उठबस, नेटवर्किंग होतं."
"शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नेटवर्किंगचा वापर करून घेतला. त्याचा प्रफुल्ल पटेल यांनाही उपयोग झाला. उद्योगपतींचा राजकीय समीकरणांमध्ये उपयोग करून घेतला जातो. हेच समीकरण यामागे होतं," असं निरिक्षण महेश सरलष्कर नोंदवतात.

फोटो स्रोत, praful-patel.com
प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी बोलताना अनेक वर्षे दिल्लीत पत्रकारितेचा अनुभव असलेले राजकीय विश्लेषक प्रशांत कदम म्हणाले, "राजीव शुक्ला, प्रफुल्ल पटेल अशी माणसं प्रत्येक पक्षाला हवी असतात. दिल्लीच्या राजकारणात ज्या पद्धतीचं काम असतं, सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात त्या गोष्टी सांभाळण्याचं कौशल्य या लोकांना फार असतं. त्यामुळे राष्ट्रवादीत पहिल्यापासून ती जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होती."
"महाराष्ट्रात नसला, तर दिल्लीत आल्यावर प्रफुल्ल पटेल यांचा वावर आणि प्रभाव जाणवायचा. प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील बंगल्यावर दरवर्षी गेट टूगेदर होतं. त्यात 'क्रीम ऑफ लुटन्स' असलेले सगळे हजर असतात. त्यातून ते वर्तुळ जपण्याचं कौशल्य प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे," असं निरिक्षण प्रशांत कदम नोंदवतात.
"प्रफुल्ल पटेल स्वतः उद्योजक, व्यापारी कुटुंबातूनच आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात सुरुवातीपासून व्यापारीवृत्ती, उद्योजकवृत्ती होती. आधी सुरेश कलमाडी यांचं जसं महत्त्व होतं, तसं नंतर शरद पवारांसाठी प्रफुल्ल पटेल यांचं झालं. दिल्लीच्या सत्तेच्या वर्तुळात उठबस करणारा केंद्रीय स्तरावरील शरद पवारांचा उजवा हात म्हणून ते कित्येक वर्षे वावरले. राष्ट्रवादीत फूट पडली नाही तोपर्यंत हे सुरू होतं," असं महेश सरलष्कर नमूद करतात.

फोटो स्रोत, Praful Patel/Facebook
भ्रष्टाचाराचे आरोप आणि पुढील घटनाक्रम
प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. यावर बोलताना महेश सरलष्कर म्हणतात, "दुसऱ्या टप्प्यात प्रफुल्ल पटेल केंद्रात मंत्री होते. त्यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालय होतं. तिथे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांनी एअर इंडिया दिवाळखोरीत काढली असे आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर केंद्रात मोदी सरकार आलं. पुढे महाराष्ट्रात राष्ट्रवादी फुटली, अजित पवार महायुतीत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले हा इतिहास आहे."
"या काळात प्रफुल पटेल यांचे शरद पवारांशी चांगले संबंध होते आणि आजही आहेत. मात्र, राजकीय निर्णय घेत स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी, झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वेगळा राजकीय प्रवास झाला असं दिसतं. त्यानंतर आत्ता ते भाजपच्या अगदी जवळ गेलेले दिसत आहेत. आधी जशी त्यांची शरद पवार यांच्यासाठी उपयुक्तता होती, तशीच ती अजित पवार यांच्याशी झाली," असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Praful Patel/Facebook
प्रशांत कदमही भाजपने प्रफुल्ल पटेल यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा उपस्थित करतात.
ते म्हणाले, "सर्वात ढोंगीपणा प्रफुल्ल पटेल यांच्या प्रकरणांमध्ये झाला आहे. प्रफुल पटेल यांच्याबाबत ईडीने इतकी सारी चौकशी केली. वरळीतील टॉवरमध्ये इकबाल मिर्ची आणि त्याचे नातेवाईक पार्टनर असल्याचे आरोप झाले. त्याच प्रफुल्ल पटेल यांना सामावून घेतलं जातं आणि नंतर ते प्रकरण रद्दबातल केलं जातं."
"प्रफुल्ल पटेल जेव्हा हवाई वाहतूक मंत्री होते तेव्हाच्या बऱ्याच गोष्टींची चौकशी व्हायला हवी होती, मात्र ती झाली नाही. अहमदाबाद विमान अपघातातील विमान बोईंग कंपनीचं होतं. त्या बोईंग खरेदीची सुत्रे प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत जायला हवी होती, पण ती कधी गेली नाही. त्या सर्व चौकशा चुकवण्यासाठी ते तिकडे गेले असावे. त्याबद्दल भाजपही शब्द काढताना दिसत नाही," असाही मुद्दा ते उपस्थित करतात.
प्रफुल्ल पटेल आणि भाजपचे राजकीय संबंध
महेश सरलष्कर प्रफुल्ल पटेल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध यावर भाष्य करतात.
"प्रफुल पटेल यांचे मोदी-शाहांशी असलेले संबंध, थेट भेट आणि संवाद करू शकणं ही अजित पवारांसाठी उपयुक्तता होती. त्यामुळे ते महत्त्वाचे नेते बनले. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती तेव्हाही प्रफुल्ल पटेल सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष होते. फुटीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही ते राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झाले. इतकी पकड त्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवली. कारण त्यांचं थेट नेटवर्किंग नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी होतं," असं सरलष्कर सांगतात.

फोटो स्रोत, Praful Patel/Facebook
प्रशांत कदम अजित पवार यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या घडामोडींवरही लक्ष वेधतात.
ते म्हणतात, "ज्या दिवशी अजित पवार यांचं निधन झालं आणि हे नेते मुंबईत आले तेव्हाची त्यांची पहिलीच प्रतिक्रिया वेगळी वाटली. कारण त्यावेळी ते म्हणाले होते की, सुनेत्रा पवार यांच्या नावावर अद्याप चर्चा झालेली नाही. त्यानंतर पुढील काही तासात छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर केलं."
"म्हणजे महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठकीनंतरही प्रफुल्ल पटेल माध्यमांना सांगत होते की, अजून सुनेत्रा पवार यांच्या नावावर चर्चा झालेली नाही आणि जनभावनेचा आदर होईल अशा एका नावावर आम्ही एकमत करू. सुनेत्रा पवार यांचं नाव पहिल्यांदा त्यांच्याकडून आलं नव्हतं. ते आता कार्यकारी अध्यक्षपदावर आहेत. सध्या राष्ट्रवादीत हे पद घटनात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा अध्यक्ष नसतात तेव्हा सगळी सुत्रं कार्याध्यक्षाला पार पाडावी लागतात," असंही ते नमूद करतात.
"प्रफुल्ल पटेल यांचे भाजपशी घनिष्ठ संबंध झाले. आत्ताच्या घडामोडींमागेही त्यांचे हेच संबंध असावेत अशा चर्चा आहे. त्यामुळेच ते अजित पवार गटातील प्रभावी नेते आहेत. त्यातूनच धडाधड निर्णय घेतले जात आहेत," असं मत महेश सरलष्कर व्यक्त करतात.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर काय काय आरोप झाले होते?
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार हे प्रकरण एअर इंडिया-इंडियन एअरलाइन्सचं विलिनीकरण करून नॅशनल एव्हिएशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या निर्मितीशी संबंधित आहे. या कंपनीनं मोठ्या संख्येनं विमानं भाड्यानं दिली आणि एअरबस, बोइंगकडून 111 विमानं खरेदी केली.
त्याशिवाय विदेशी एअरलाईन्सना अधिक नफा कमावता येतील असे हवाई मार्ग उपलब्ध करून दिले आणि विदेशी गुंतवणूक असलेल्या प्रशिक्षण संस्था सुरू करण्यातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता.
प्रफुल्ल पटेल यांचे मित्र म्हटले जाणारे दीपक तलवार यांना जानेवारी 2019 मध्ये दुबईतून प्रत्यार्पण करून आणत ईडीनं अटक केली होती, असंही इंडियन एक्सप्रेसनं म्हटलंय.

फोटो स्रोत, Praful Patel/Facebook
या सर्वच प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं त्याचवेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मे 2017 मध्ये चार एफआयआर दाखल केले होते.
त्यापैकी पहिल्या एफआयआरमध्ये पटेल यांनी मंत्री असताना पदाचा दुरुपयोग करत मोठ्या संख्येनं विमानं भाडे तत्वावर दिली होती, असा ठपका ठेवला होता. याच एफआयआरप्रकरणी आता सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. तर इतर प्रकरणी चौकशी सुरू आहे.
पटेलांनी त्यांच्यावर या प्रकरणी झालेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. सर्व निर्णय सर्वानुमतानं घेतले होते, असा दावा त्यांनी केला होता. तसंच एअरलाइन्सला तोटा होत होता त्यावेळी हा निर्णय घेतला होता, असा उल्लेख एफआयआरमध्येच असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं होतं.
याचबरोबर अंडरवर्ल्डमधील इकबाल मिर्चीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणीही ईडी प्रफुल्ल पटेलांची चौकशी करत आहे. 2019 आणि 2021 मध्ये याप्रकरणी त्यांची चौकशी झाली होती.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधातील एअर इंडिया-इंडियन एअरलाईन्स विलिनीकरण प्रकरणात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये सहभागी झाल्यानंतर 8 महिन्यांनी पटेलांना हा दिलासा मिळाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











