नरेश अरोरा कोण आहेत, जे महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक चर्चेत आले?

नरेश अरोरा आणि अजित पवार

फोटो स्रोत, Facebook/@Nishu Arora

    • Author, दिग्विजय जिरगे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अकाली निधन झालं. 29 जानेवारीला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला.

सुनेत्रा पवार यांनी आज (31 जानेवारी) राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याआधी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमुखाने निवडही झाली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी 'अजितदादा अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या.

अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू होती. यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं घेतली जात असतानाच शुक्रवारी (30 जानेवारी) दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं.

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

दरम्यान, 30 जानेवारीला दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडल्या. पक्षातील नेत्यांच्या बैठका झाल्या. उपमुख्यमंत्रिपदी कोणाची नेमणूक करायची याबाबत चर्चा झाली. त्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील, असं सांगण्यात येऊ लागलं.

याचदरम्यान निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा हेही बारामती येथे पोहोचले. त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचे काही माध्यमांनी सांगितलं.

या भेटीनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील अशा बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. हा निर्णय घेण्यात अरोरा यांची भूमिका काय होती हे कालांतराने स्पष्ट होईल. परंतु, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय घडामोडीत ते चर्चेचा विषय ठरले आहेत.

कोण आहेत नरेश अरोरा?

साधारण 2024 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात नरेश अरोरा यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधी नरेश अरोरा यांची 'डिझाइनबॉक्स' ही कंपनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडली गेली.

अरोरा यांच्या या कंपनीने राबवलेल्या प्रचार मोहिमेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं. त्याचवेळी अजित पवार या काळात परिधान करत असलेल्या गुलाबी जॅकेटचीही चर्चा सुरू झाली होती. यामागची कल्पना नरेश अरोरा यांचीच असल्याचे बोलले जाते.

नरेश अरोरा

फोटो स्रोत, Facebook/@Nishu Arora

नरेश अरोरा हे डिझाइनबॉक्स्ड या कंपनीचे सहसंस्थापक आणि संचालक आहेत. ही कंपनी राजकीय प्रचार मोहीम-व्यवस्थापन, डिजिटल मीडिया स्ट्रेटॅजिस्ट, सोशल मीडिया कॅम्पेन आणि ब्रँडिंग यावर काम करते.

अरोरा यांनी 2011 मध्ये आपल्या एका भागीदारासोबत डिझाइनबॉक्स्ड डिजिटल मीडिया मार्केटिंग कंपनी सुरू केली. नंतर ही कंपनी निवडणूक सल्लागार म्हणून झपाट्याने पुढे आली.

अरोरा आणि त्यांच्या टीमने 2016 मध्ये निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी 4 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघांची डिजिटल आणि प्रचार मोहीम सांभाळली.

नरेश अरोरा

फोटो स्रोत, Facebook/@Nishu Arora

या कंपनीने पंजाब, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक यांसारख्या अनेक महत्त्वाच्या डिजिटल प्रचार मोहिमा हाताळल्या आहेत.

त्याचबरोबर छत्तीसगड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांतील राजकीय प्रचार मोहिमांचे नेतृत्व केले आहे. अरोरा यांनी काँग्रेसबरोबर मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे.

नरेश अरोरा हे मुळचे अमृतसरचे आहेत. त्यांच्या कुटुंबाचा कापड व्यवसाय होता. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. नरेश अरोरा यांनी आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय पातळीवर क्रिकेटही खेळलं आहे.

'पिंक जॅकेट अन् महाराष्ट्राचे 'दादा''

नेहमी पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसणारे अजित पवार 2024 पासून अचानक गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसू लागले.

2024 मध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं. त्यावेळी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती.

तेव्हापासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुलाबी कॅम्पेनच राबवण्यात आलं होतं.

त्यावेळी याबाबत माध्यमांशी बोलताना नरेश अरोरा यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. महाराष्ट्रात 6 पक्ष आहेत. आपला नेता लक्षात राहावा, यासाठी हा रंग निवडला आणि अजित पवार यांना तो आवडला, असं त्यांनी म्हटलं होतं.

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

अरोरा यांनी अजित पवार यांची इमेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असं बोललं जाऊ लागलं.

परंतु, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी मात्र याबाबत वेगळं मत नोंदवलं आहे. अजित पवार यांची इमेज एखाद्या एजन्सीने तयार केली यात तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं.

"अजित पवार हे मागील 4 दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यांनी संघर्षातून स्वतःची इमेज तयार केली," असं ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या आधी डिझाइनबॉक्सकडे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार मोहिमेचं काम दिलं होतं. अजित पवार यांनी महिला केंद्रीत बजेट सादर केलं होतं. त्यामुळे तो पिंक म्हणजेच गुलाबी रंग निवडला होता. परंतु, अजित पवार मात्र तो गुलाबी रंग नसून जांभळाच्या बियांचा रंग असल्याचे सांगत अशी आठवण चोरमारे यांनी सांगितली.

...आणि विधानसभेला मिळालं घवघवीत यश

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली कामगिरी नोंदवता आली नव्हती. त्यांचा एकच खासदार निवडून आला होता. एकंदर महायुतीची कामगिरीच निराशाजनक ठरली होती.

हे अपयश पुसून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली होती. त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचं काम नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्स्डकडे देण्यात आलं.

या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने साधारण 50 जागा लढवल्या आणि त्यांनी 41 जागांवर विजय मिळवला. या यशाचं श्रेय महायुतीच्या कामगिरीबरोबरच नरेश अरोरा यांच्या राजकीय मोहिमेलाही दिलं गेलं.

त्यांनी राबवलेल्या प्रचार मोहिमांमुळे पक्षाला चांगलं यश मिळाल्याचं बोललं जाऊ लागलं. नरेश अरोरा यांच्या कंपनीने निवडणूक रणनीती, डिजिटल कॅम्पेन राबवलं होतं.

अजित पवार

फोटो स्रोत, facebook/ajitpawar

याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार चोरमारे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महायुतीला फटका बसला होता. त्यामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचंच नुकसान झालं असं म्हणता येणार नाही. विधानसभा निवडणुकीत मात्र उलट निकाल लागले. या निवडणुकीत केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचीच कामगिरी चांगली राहिली असं नव्हे, तर संपूर्ण महायुतीला घवघवीत यश मिळालं."

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या. हे महायुतीला मिळालेलं यश होतं. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही 50-52 इतकी होतीच. याही निवडणुकीत विचार केल्यास दोघांना साधारण तितक्याच जागा मिळाल्या. ते महायुतीचं यश होतं आणि अजित पवार यांना त्यात वाटा मिळाला, असं चोरमारे यांनी सांगितलं.

'तर महापालिकेतही यश मिळायला हवं होतं'

नुकताच झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही.

पक्षाचं वर्चस्व असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रचार मोहिमेचं कामही डिझाइनबॉक्स्ड कंपनीनेच केलं होतं. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बालेकिल्ल्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.

व्हीडिओ कॅप्शन, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री कशा झाल्या? अजित पवार यांच्या पत्नी यांचा राजकीय प्रवास

दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाच्या नावाबाबत चर्चा सुरू असताना नरेश अरोरा यांच्या भूमिकेविषयीही माध्यमांमधून बोललं जाऊ लागलं, त्यावर चोरमारे यांनी चर्चेसाठी नरेश अरोरा यांना बारामतीला बोलावलं असेल, अशी शक्यता बोलून दाखवली.

नरेश अरोरा यांनी शुक्रवारी (30 जानेवारी) बारामतीला दिलेल्या भेटीचा उद्देश हा पवार कुटुंबीयांचं सांत्वन करणे हा होता, असं स्पष्ट केलं. पक्षांतर्गत विषय असल्याचं सांगून त्यांनी राजकीय विषयावर भाष्य करणं टाळलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)