45 वर्षांपूर्वीच्या 100 रुपयांच्या गहू चोरीचा गुन्हा, आता अटक; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सलीम यांना 45 वर्षांपूर्वी 100 रुपये किमतीचा गहू चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Saleem's family

फोटो कॅप्शन, सलीम यांना 45 वर्षांपूर्वी 100 रुपये किमतीचा गहू चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
    • Author, विष्णुकांत तिवारी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"साहेब, लहानपणी मी काय खोडकरपणा केला होता, हे मला आठवतही नाही. माझ्यावर 45 वर्षांपूर्वी 100 रुपयांचा गहू चोरीचा गुन्हा दाखल आहे, हे जर मला माहीत असतं, तर मी स्वतःच पोलिसांकडे गेलो असतो."

फोनवर बोलताना सलीम मेवाती म्हणाले की, शनिवारी, 7 फेब्रुवारीला मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील पोलीस त्यांना अटक करण्यासाठी आले होते. 45 वर्षांपूर्वी खरगोन जिल्ह्यातील बलकवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बलसमुंद कांकड गावात 100 रुपये किमतीचा गहू चोरीला गेल्याचे हे प्रकरण होते.

65 वर्षीय सलीम यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी आपल्या 6 मित्रांसोबत डिसेंबर 1980 मध्ये दोन वेगवेगळ्या शेतातून गव्हाची चोरी केली होती. या प्रकरणात माणिकचंद पटेल आणि लालचंद पटेल यांनी 1980 मध्ये तक्रार नोंदवली होती.

सलीम यांच्यावर 100 रुपये किमतीचा गहू चोरल्याचा गुन्हा दाखल आहे, याला खरगोन जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी (मंडलेश्वर) श्वेता शुक्ला यांनी दुजोरा दिला आहे.

त्यांनी बीबीसीला फोनवर सांगितलं की, "आमच्याकडे असलेल्या रिपोर्टनुसार, 1980 मध्ये सलीम आणि 6 इतर लोक 19 ते 20 वर्षांचे होते. त्यांनी बलसमुंद कांकड भागातील शेतातून गव्हाची चोरी केली होती. या प्रकरणात दोन एफआयआर नोंदवलेले होते, कारण दोन वेगवेगळ्या शेतांत चोरी झाली होती."

पोलीस रेकॉर्डनुसार, घटनेच्या वेळी सलीम यांचं वय 19 ते 20 वर्षे होतं. तर कुटुंबीयांच्या मते सलीम यांचा जन्म 1967 मध्ये झाला आणि त्या वेळी ते अल्पवयीन होते.

'45 वर्षांनंतर पोलीस सलीमपर्यंत कसे पोहोचले?'

मध्य प्रदेशमध्ये काही वर्षांपूर्वी जुन्या प्रकरणांचे डिजिटलायजेशन करण्यात आलं होतं. हे प्रकरणही त्यातीलच एक होतं.

खलटका चौकीचे प्रभारी मिथुन चौहान यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू केला होता. बीबीसीशी बोलताना त्यांनी सलीम यांची माहिती त्यांना या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीच्या कुटुंबाकडून मिळाल्याचे सांगितले.

पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात एकूण 7 आरोपी होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, 4 जण जामिनावर बाहेर आहेत आणि सलीम हे शेवटचे आरोपी होते.

Caption- मध्य प्रदेशमध्ये काही वर्षांपूर्वी जुन्या प्रकरणांचे डिजिटलायजेशन करण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

फोटो स्रोत, Ashif Khan

फोटो कॅप्शन, मध्य प्रदेशमध्ये काही वर्षांपूर्वी जुन्या प्रकरणांचे डिजिटलायजेशन करण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मिथुन चौहान यांनी सांगितलं, "या प्रकरणात ज्यांच्यावर स्थायी वॉरंट आहे, त्यांचा शोध आम्ही घेत होतो. त्यापैकी एका व्यक्तीचा पत्ता देवास जिल्ह्यात मिळाला. घरी गेल्यावर कळलं की, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यावेळीच सलीम मेवातीबद्दल माहिती मिळाली. त्यांच्याशी संपर्क करून आम्ही सलीम यांच्या घरी पोहोचलो आणि पुढील कायदेशीर कारवाई केली."

सलीम यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, त्यांना या प्रकरणाची कोणतीही माहिती नव्हती.

सलीम मेवातींच्या सून आयशा यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्हा सर्वांना धक्काच बसला होता. आम्हाला समजलंही नाही, पोलीस आले आणि त्यांनी सासर्‍यांना अटक करणार असल्याचं सांगितलं. 45 वर्षांपूर्वी सासर्‍यांनी 100 रुपयांचा गहू चोरला होता, असं आम्हाला सांगण्यात आलं."

सलीम यांच्या पत्नी तस्लीम या मागील तीन दिवसांपासून सलीम यांच्या अटकेनंतर आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करत आहेत. ही घटना आमच्यासाठी आश्चर्यकारक असल्याचं, त्यांनी बीबीसीला सांगितलं.

तस्लीम म्हणतात, "अचानक पोलीस येतात आणि आमच्या तीन मुली, एक मुलगा आणि नातवंडांचे आजोबा असलेल्या सलीम यांना चोर म्हणून गाडीमध्ये बसवून नेतात. आम्हाला काहीच समजत नव्हतं. मग आम्हीही पोलीस ठाणे गाठलं."

तस्लीम म्हणाल्या, "पोलीस ठाण्यात कळलं की, ही घटना माझ्या लग्नापूर्वीची आहे. जेव्हा ते स्वतः लहान होते."

'कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का'

सलीम मुळचे खरगोन जिल्ह्यातील बलसमुंद कांकड गावचे रहिवासी आहेत. लग्नानंतर ते सासर्‍यांकडे म्हणजे बलसमुंद कांकडपासून सुमारे 70 ते 80 किलोमीटर दूर धार जिल्ह्यातील बाघ गावात राहू लागले. मात्र, सलीम यांचे इतर नातेवाईक अजूनही बलसमुंद कांकड गावात राहतात.

पोलीस आणि प्रशासन एवढ्या वर्षांपासून काय करत होते, हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे, असं तस्लीम म्हणाल्या.

पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली त्यामुळे कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे सलीम यांच्या कुटुंबीयांचे म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Khargone police

फोटो कॅप्शन, पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली त्यामुळे कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे सलीम यांच्या कुटुंबीयांचे म्हणणं आहे.

तस्लीम म्हणाल्या, "समजा बलसमुंद कांकड गावात सलीम आणि इतरांनी लहानपणी काही खोडकरपणा केला असेल. लग्नानंतर आम्ही त्या गावापासून सुमारे 70 ते 80 किलोमीटर दूर राहत होतो.

बलसमुंदमध्ये सलीम यांचं संपूर्ण कुटुंब अजूनही राहतं. जर पोलिसांनी नीट काम केलं असतं, तर आमच्या कुटुंबापर्यंत नोटीस पोहोचली असती किंवा बलसमुंदमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितलं असतं."

सलीमच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, स्थानिक माध्यमांनी या प्रकरणात सलीम यांना फरार आणि कायद्यापासून पळणारा किंवा लपलेलं दाखवलं, हे चुकीचं आहे. त्यामुळे कुटुंबाच्या समाजातील प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.

तस्लीम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही कुठेही लपून बसलेलो नव्हतो. माझ्या पतीने लहानपणी जे केलं, ते आता त्यांना आठवतही नाही. त्या वेळी त्यांचं वय हे साधारण 13 ते 14 वर्षे असावं.

पण पोलीस कारवाई आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये हे प्रकरण ज्या पद्धतीने दाखवण्यात आले, त्यामुळे असं वाटतं की, माझे पती सलीम हे एखादे अट्टल गुन्हेगार आहेत. प्रत्यक्षात ते आपल्या कुटुंबासोबत जीवन व्यतीत करणारे एक साधे व्यक्ती आहेत."

'दोघांमध्ये तडजोड पण...'

7 फेब्रुवारीला सलीम यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं. त्यांच्यावर आधी भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात त्यांच्यात आणि आरोप करणाऱ्या पक्षात तडजोड (करार) झाली आहे, असं सलीम यांनी बीबीसीला सांगितलं.

सलीम म्हणाले, "साहेब, माझंही आता वय झालं आहे. मी शुगर आणि बीपीचा रुग्ण आहे. माझी नातवंडं आता मोठी झाली आहेत. तक्रार करणाऱ्यांचंही आता वय झालं आहे. हे खूप जुनं प्रकरण होतं आणि आता दोन्ही पक्षांना खटला लढण्याची ताकद उरलेली नाही. त्यामुळे आम्ही तडजोड केली आहे."

कायदेशीर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चोरीसारख्या प्रकरणांमध्ये न्यायालयाची परवानगी घेऊन दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या तडजोडीच्या आधारे कारवाई संपवता येऊ शकते.

Caption- खरगोन जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एसडीओपी श्वेता शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, हा 1980 चा गुन्हा आहे.

फोटो स्रोत, Ashif Khan

फोटो कॅप्शन, खरगोन जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एसडीओपी श्वेता शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, हा 1980 चा गुन्हा आहे.

या प्रकरणातील एक तक्रारदार माणिकचंद पटेल यांच्या कुटुंबीयांशी आम्ही बोललो, तेव्हा त्यांनीही तडजोड झाल्याचे मान्य केले.

माणिकचंद पटेल यांचे पुत्र राजेंद्र पटेल फोनवर म्हणाले, "माझ्या वडिलांचे वयही जवळपास 80 वर्षे आहे. हे प्रकरणही 45 वर्षांपूर्वीचे आहे. त्यावेळी ही रक्कम खूप मोठी असेल, पण आज ती फारच छोटी आहे. दोन्ही पक्षकारांचं वय झालेलं आहे, म्हणून दोघांनी एकमेकांशी चर्चा करून तडजोड केली आहे आणि प्रकरण संपवलं आहे."

45 वर्षे जुनी घटना आणि त्यावरून सलीम यांना झालेली अटक यामुळे वर्षानुवर्षे जुन्या प्रकरणांमध्ये पोलिसांची जबाबदारी केवळ कारवाईपुरती मर्यादित आहे की वेळेवर माहिती देणे हाही याच प्रक्रियेचा एक भाग आहे, या चर्चेला जोर आला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)