'त्या नसत्या तर अनेक मुलं दगावली असती', मधमाश्यांपासून 25 मुलांना वाचवताना जीव गमावणाऱ्या कंचनबाईंची गोष्ट

फोटो स्रोत, Akash Srivastava
- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"कंचनबाईंनी हिंमत दाखवली नसती, तर कदाचित अनेक मुलांचा जीव गेला असता."
मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील रानपूर गावात तुम्ही कुणाशीही बोलाल, तर तो कंचनबाईंच्या धैर्याची आणि शौर्याचीच गोष्ट सांगताना दिसतो.
जिल्हा मुख्यालयापासून 26 किलोमीटर दूर असलेल्या रानपूरमधील अंगणवाडी परिसरात सोमवारी (2 फेब्रुवारी) दुपारी मधमाश्यांनी हल्ला केला.
नेहमी मुलांचा हसरा आवाज आणि खोडकरपणा ऐकू येतो तिथून अचानक आरडाओरड, किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. याच अंगणवाडी परिसरात दुपारी दोन वाजेपासून प्राथमिक शाळा भरते.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे साडेतीनच्या सुमारास अंगणवाडीच्या परिसरात असलेल्या मुलांवर मधमाश्यांनी हल्ला केला. त्या वेळी तिथे साधारण 20 ते 25 मुलं होती.
'मुलांना वाचवण्यासाठी धावल्या'
शाळेतील शिक्षिका गुणसागर जैन सांगतात की, "मधमाश्या थेट मुलांकडे येत होत्या आणि परिसरात एकच गोंधळ उडाला होता."
त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या 55 वर्षांच्या अंगणवाडी कर्मचारी कंचनबाईंनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि मुलांना वाचवण्यासाठी धाव घेतली.

फोटो स्रोत, Puneet Barnala
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, कंचनबाईंनी क्षणाचाही विलंब न करता मुलांना आत घेऊन जायला सुरुवात केली. आधी अंगणवाडीतल्या चटई आणि ब्लँकेट्स काढून मुलांना झाकलं, आणि नंतर स्वतःच्या साडीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या या धाडसी कृतीमुळे सुमारे 25 मुलांचे प्राण वाचले, त्यात त्यांचा नातूही होता. पण मधमाशांच्या हल्ल्यात कंचनबाई स्वतः गंभीर जखमी झाल्या होत्या.

फोटो स्रोत, Aakash Srivastava
रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
नीमचचे पोलीस अधीक्षक अंकित जयस्वाल यांनी माध्यमांना सांगितलं की, "सोमवारी दुपारी जावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रानपूर गावातील अंगणवाडीवर मधमाश्यांनी हल्ला केला.
त्यावेळी तिथे काम करणाऱ्या कंचनबाईंनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मधमाश्यांच्या डंखामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला."
'मुलगा म्हणाला, 'आईचा अभिमान'
कंचनबाईंच्या घरी त्यांचा मुलगा रवी मेघवाल आणि पती शिवलाल आहेत. मुलाचं लग्न झालेलं असून कंचनबाईंना एक नातू आहे. तोही घटनेच्या वेळी शाळेतच होता.
कंचनबाईंचे पती काही वर्षांपूर्वी पक्षाघातामुळे आजारी पडले होते. तेव्हापासून ते अंथरुणाला खिळूनच आहेत.

फोटो स्रोत, Aakash Srivastava
त्यांचं संपूर्ण कुटुंब शोकात बुडालं आहे. त्यांचा मुलगा रवी मेघवाल म्हणतात की, त्यांना आईचा खूप अभिमान आहे.
रवी यांनी बीबीसीला सांगितलं की, "मी त्या वेळी गावात नव्हतो, पण सगळ्यांनी सांगितलं की, माझ्या आईने किती मुलांचे प्राण वाचवले. माझ्या आईचा स्वभाव खूप चांगला होता. ती प्रत्येकावर प्रेम करायची, पण मुलांवर सर्वात जास्त. ती नेहमी म्हणायची, मुलं देवासारखी असतात. ती त्यांना स्वतःच्या मुलांसारखं नाही, तर देवासारखं मानायची."
कंचनबाई गावातील 'जय माता दी' बचत गटाच्या अध्यक्षा होत्या आणि अंगणवाडीचं काम त्या सांभाळायच्या. मुलांसाठी स्वयंपाक करणं आणि त्यांची काळजी घेणे, ही त्यांची दैनंदिन जबाबदारी होती.

रवी म्हणतात की, ज्यांना त्याच्या आईने वाचवलं, त्यात तिचा स्वतःचा नातूही होता. "त्याच्या शरीरातूनही 5 ते 6 मधमाश्यांचे डंख काढण्यात आले होते."
रवी आईची आठवण सांगताना म्हणाले की, "तिने कधीही या कामाला फक्त काम म्हणून मानलं नाही. तिच्यासाठी हा आयुष्याचा अविभाज्य भाग होता. ती कधी उशीरा गेली नाही किंवा सुट्टीही घेतली नाही. कधी खूपच अडचण आली, तर आधी मुलांच्या जेवणाची व्यवस्था ती करायची."
सुरेशचंद्र मेघवाल यांचा मुलगा त्याच अंगणवाडीत शिकतो. त्यावेळी सुरेशचंद्र हे मुलाला न्यायला आले होते.
ते म्हणतात, "मी बाहेर पोहोचलो, तेव्हा मॅडम ओरडत होत्या आणि आतून मुलांचे रडण्याचे आवाज येत होते. थोडा जवळ गेलो, तर लक्षात आलं की मधमाश्यांचा हल्ला झाला आहे. कंचनबाई मुलांना चटई, चादरी आणि स्वतःच्या साडीने झाकत होत्या. तिथे मधमाश्यांचा मोठा थवा होता."
त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलांना वाचवताना कंचनबाई मधमाश्यांच्या हल्ल्यांना सामोरं गेल्या. सुरेश म्हणतात, "जर त्या दिवशी त्या तिथे नसत्या, तर अनेक मुलांना जीव गमवावा लागला असता."
'सर्वात आधी मदतीला गेलेल्या ग्रामस्थांनी काय सांगितलं?'
नात्याने कंचनबाईंचे दीर असलेले दिलीप मेघवाल म्हणाले की, गावातीलच एकाने त्यांना फोन करुन अंगणवाडीवर मधमाश्यांचा हल्ला झाल्याचे सांगितले.
जेव्हा ते अंगणवाडीत पोहोचले, तोपर्यंत तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती, असं दिलीप यांनी सांगितलं.
"मी कंचनबाई जमिनीवर पडलेल्या पाहिलं. त्यांच्या शरीरावर मधमाश्यांचे खूप डंख होते, आणि अजून काही मधमाश्या तिथेच होत्या. कंचनबाई शुद्धीवर नव्हत्या, त्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि त्यांना काहीच बोलता येत नव्हतं."
घटनेची आठवण सांगताना दिलीप म्हणतात, "लहान मुलं रडत होती आणि लोक घाबरलेले होते. मी एका मुलाला मदतीला घेऊन कंचनबाईंना उचलून बाहेर आणलं. सुरेशचंद्रही त्या वेळी पोहोचले होते आणि त्यांनी ऍम्बुलन्स आणि पोलिसांना फोन केला."
पोलिसांची गाडी आल्यावर कंचनबाईंना सर्वात जवळच्या सरवानिया महाराज प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) नेलं गेलं, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

फोटो स्रोत, Aakash Srivastava
सरवानिया महाराज प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी आणि एकमेव डॉक्टर संदीप शर्मा यांनी बीबीसीला सांगितलं की, "मी त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेलो होतो. त्यावेळी सायंकाळच्या सुमारास मला पीएचसीतून फोन आला की, एका महिलेला मधमाश्यांच्या तीव्र हल्ल्यानंतर रुग्णालयात आणलं आहे."
"त्या वेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंचनबाईंचा रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू झाला होता. मधमाश्यांच्या हल्ल्यात असे होणं शक्य आहे कारण माणूस अॅनाफायलॅक्टिक शॉकमध्ये जातो, जो जीवघेणा ठरू शकतो."

फोटो स्रोत, Aakash Srivastava
अॅनाफायलॅक्टिक शॉक ही एक गंभीर, अचानक होणारी आणि जीवघेणी अॅलर्जीची प्रतिक्रिया आहे, जी अॅलर्जी निर्माण करणाऱ्या गोष्टीच्या संपर्कात येताच काही मिनिटांत होऊ शकते. डॉ. संदीप यांच्या म्हणण्यानुसार, मधमाश्यांचा हल्ला अशा शॉकला कारणीभूत ठरू शकतो.
कंचनबाईंच्या मृत्यूने संपूर्ण रानपूर गावात शोककळा पसरली आहे. गावकरी त्यांची फक्त अंगणवाडीशी संबंधित महिला म्हणून नाही, तर अंगणवाडीतील विश्वासू व्यक्ती म्हणून आठवण काढतात.
एका गावकऱ्याने सांगितलं की, "कंचनबाई तिथे असल्या की आम्हाला मुलं सुरक्षित आहेत, याची खात्री असायची. त्यांची काळजी करण्याची गरजच नसायची."
दिलीप सांगतात की, त्या मुलांना एकत्र बसवून जेवू घालत आणि त्यांच्यासोबत त्या हसत-खेळत बोलायच्या.
'आर्थिक परिस्थिती बिकट, सरपंचांचे मदतीचे आश्वासन'
कंचनबाईंच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आधीच हलाखीची होती. रवीच्या वडिलांना चार-पाच वर्षांपूर्वी मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यानंतर अर्धांगवायू झाला होता.
रवी यांनी सांगितलं की, "घरची सगळी जबाबदारी आईवर होती. वडिलांच्या उपचारावर पाच-सहा लाख रुपये खर्च झाले आहेत. यासाठी मला जमीनही विकावी लागली. आजही दर महिन्याला औषधांवर 2500 ते 3500 रुपये खर्च होतात."

फोटो स्रोत, Aakash Srivastava
रवी म्हणतात, "आई फक्त घरातच नाही, बाहेरही कुटुंबासाठी खूप संघर्ष करत होती. सकाळी घराची जबाबदारी, वडिलांची काळजी, नंतर शाळेत काम आणि याच दरम्यान बचत गटाचं काम. हे तिने सगळं कसं सांभाळलं हे मला समजत नाही."
गावचे सरपंच लालाराम रावत म्हणतात, "मधमाश्यांचा हल्ला खूप मोठा होता. कंचनबाईंनी मुलांना वाचवताना स्वतःचा जीव गमावला. कुटुंबाची परिस्थिती खूप गंभीर आहे."
ते म्हणतात की, ग्रामपंचायत आपल्या नियमांनुसार कुटुंबाला मदत करेल.
"आम्ही सरकारलाही विनंती करतो की कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी आणि मुलाच्या नोकरीचाही विचार केला जावा."
'गावात भीतीचं वातावरण'
या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. अंगणवाडीच्या जवळचा हातपंप गावासाठी पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. त्याच ठिकाणी मधमाश्यांचे पोळं असल्यामुळे लोक तिथे जायलाच घाबरत आहेत.

फोटो स्रोत, Aakash Srivastava
रवी म्हणतात, "शाळेची इमारत खूप जीर्ण झाली आहे, त्यामुळे मुलांना अंगणवाडीतच शिकावं लागतं. मी सरकारला विनंती करतो की, शाळेची स्थिती सुधारावी, बाउंड्री आणि पाण्याची सोय करावी, जेणेकरून मुलांना अंगणवाडीत बसावं लागणार नाही. सगळं व्यवस्थित असतं, तर माझी आई त्या वेळी अंगणवाडीत नसती."
(स्थानिक पत्रकार आकाश श्रीवास्तव यांच्या रिपोर्टिंगसह)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











