ऑफिसमध्ये तासनतास बसता? व्हेरिकोज व्हेन्सचा धोका कसा वाढतो ते जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
रोजच्या धावपळीत आपल्या पायांकडे आपण सहसा फारसं लक्ष देत नाही. मात्र अनेक भारतीयांना जाणवणारी एक सामान्य पण दुर्लक्षित समस्या म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स. पायावर दिसणाऱ्या वाकड्या तिकड्या, फुगलेल्या उभ्या आणि निळसर दिसणाऱ्या नसा पाहून अनेकजण ही फक्त दिसण्याची समस्या आहे, असं म्हणतात.
पण ही केवळ कॉस्मेटिक समस्या नसून, पायांतील रक्ताभिसरणातील बिघाडाचे संकेतही असू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात.
दीर्घकाळ उभं राहणं, सतत बसून काम करणं, वजन वाढणं, गर्भधारणा, तसेच बदलती जीवनशैली यामुळे भारतात व्हेरिकोज व्हेन्सचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, अनेकजण वेदना, सूज, त्वचेतील बदल किंवा जखमा दिसेपर्यंत उपचाराकडे दुर्लक्ष करतात.
सुदैवाने आधुनिक संशोधनाने या समस्येच्या उपचारपद्धतींमध्ये मोठी क्रांती घडवली आहे. एकेकाळी मोठ्या शस्त्रक्रियेची भीती वाटणाऱ्या रुग्णांऐवजी आज बहुसंख्य रुग्णांना लेझर, RF, ग्लू किंवा स्क्लेरोथेरपीसारख्या मिनिमली इनवेसिव्ह पद्धतींमुळे काही तासांत उपचार करून घर गाठता येते. मात्र यासाठी वेळेत तज्ज्ञांकडे जाणं आणि योग्य निदान होणं अत्यावश्यक आहे.
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?
पायातील रक्त वर हृदयाकडे नेण्यासाठी नसांमध्ये सूक्ष्म झडपा असतात. या झडपा योग्यरित्या बंद-उघड होत राहिल्या तर रक्ताचा प्रवाह नीट राहातो.
पण जेव्हा या झडपा कमजोर होऊ लागतात किंवा त्यांचं कार्य बिघडतं, तेव्हा रक्त उलट्या दिशेने खाली साचू लागतं. अशा वेळी त्या शिरा फुगून बाहेरून दिसायला लागतात, यालाच व्हेरिकोज व्हेन्स म्हटलं जातं.
ही समस्या सुरुवातीला केवळ दिसण्यापुरती असू शकते, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास पायांमध्ये जडपणा, सततचा थकवा जाणवणे, मोजे काढल्यावरही सूज राहाणे, त्वचा काळवंडणे किंवा खाज सुटणे अशा त्रासांना सुरुवात होते. काही रुग्णांमध्ये वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाल्यामुळे पायांच्या घोट्याजवळ न भरून येणाऱ्या जखमा म्हणजे व्हेनस अल्सर्स तयार होऊ शकतात.
विशेष म्हणजे पाय दुखण्याच्या कोणत्याही तक्रारीला किंवा प्रत्येक दिसणाऱ्या नसांना व्हेरिकोज व्हेन्सचं लेबल लावता येत नाही. अनेकदा ही लक्षणं स्नायूंचा ताण, नसा दाबल्या जाणे, सांधेदुखी किंवा रक्तपुरवठा कमी होण्यामुळेही होऊ शकतात. म्हणूनच कोणता त्रास कोणत्या कारणामुळे आहे, हे समजून घेण्यासाठी तज्ज्ञांकडून विशेषतः व्हस्क्युलर सर्जनकडून सखोल तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरते.
योग्यवेळी केलेला कलर डॉपलर स्कॅन अचूक निदान आणि उपचारपद्धती ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावतो.
भारतात व्हेरिकोज व्हेन्स ही समस्या जरी सर्वसामान्य वाटत असली, तरी तिचं गांभीर्य अनेकदा लोकांना लक्षात येत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
पायांवर दिसणाऱ्या वळणावळणाच्या किंवा फुगलेल्या नसांना अनेकजण फक्त दिसण्याशी जोडून पाहतात. मात्र, "ही केवळ कॉस्मेटिक समस्या नाही. रक्ताच्या उलट प्रवाहामागची खोल कारणं या नसांमध्ये दडलेली असतात," असं कोकिलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटलचे व्हस्क्युलर सर्जरी विभाग प्रमुख डॉ. रघुराम शेखर सांगतात.
त्यांच्या मते, भारतात दीर्घकाळ उभं राहून काम करणारे शिक्षक, सुरक्षारक्षक, फॅक्टरी कामगार, दुकानदार किंवा अगदी तासनतास बसून काम करणारे ऑफिस कर्मचारी अशा सर्वांमध्येच हा आजार झपाट्याने वाढताना दिसतो. अनेक रुग्ण लक्षणं वाढेपर्यंत पुनःपुन्हा दुर्लक्ष करतात.
"जडपणा, सूज, त्वचा काळवंडणं ही सगळी शरीराची आगाऊ सूचनाच असते. पण आपल्याकडे लोक उपचार उशिरा घेतात, कारण अजूनही त्यांच्या मनात जुन्या मोठ्या शस्त्रक्रियेची भीती डोक्यात असते," ते म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
याच मुद्द्याला पुढे नेत जसलोक हॉस्पिटलचे व्हस्क्युलर सायन्सेस विभागाचे संचालक डॉ. शोएब पदारिया सांगतात, भारतात प्रत्यक्षात व्हेरिकोज व्हेन्सचे प्रमाण 10–20% पर्यंत असू शकते, पण अचूक आकडे कमी दिसतात; कारण "लोक या आजाराकडे आजही कॉस्मेटिक समजून पाहतात. जागरुकतेचा अभाव, योग्य तज्ज्ञांपर्यंत न पोहोचणं आणि जुनी भीतीयामुळे निदान उशिरा होतं."
ते पुढे स्पष्ट करतात की आज उपचार पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. "आज बहुतेक उपचार मिनिमली इनवेसिव्ह आहेत. लेझर, RF, ग्लू किंवा फोम स्क्लेरोथेरपी. हे डे-केअर प्रोसीजर्स असून रुग्णाला दुसऱ्या दिवशी कामावरही जाता येतं," असे ते सांगतात.
या दोन्ही तज्ज्ञांचा एकाच गोष्टीवर जास्त भर दिसून येतो तो म्हणदजे वेळेवर निदान. "प्रत्येक दिसणारी शीर धोकादायक नसते, पण प्रत्येक पायदुखीचं कारणही व्हेरिकोज व्हेन्स नसतं. योग्य निर्णयासाठी डॉपलर स्कॅन अत्यावश्यक आहे," असा सल्ला डॉ. शेखर देतात.
तर डॉ. पदारिया अधिक स्पष्ट करतात, "मिनिमली इनवेसिव्ह उपचार निवडताना व्हेनचा आकार, खोली, सरळपणा हे सर्व तपशील महत्त्वाचे आहेत. म्हणूनच स्वतःहून उपचार ठरवणं धोकादायक असतं आणि योग्य व्हस्क्युलर सर्जनकडे जाणं अनिवार्यच आहे."
लक्षणे आणि धोका
व्हेरिकोज व्हेन्स सुरुवातीला फक्त दिसण्यापुरती त्रासदायक वाटू शकते. परंतु दोन्ही तज्ज्ञांच्या मते, शरीर काही महत्त्वाचे संकेत आधीच देत असते.
"जडपणा, संध्याकाळीकडे वाढणारी वेदना, घोट्याभोवती सूज हे फक्त सौंदर्याशी संबंधित बदल नाहीत, ही बिघडलेल्या रक्ताभिसरणाची चिन्हं आहेत," असे डॉ. रघुराम शेखर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास त्वचा जाड होणे, काळवंडणे तसेच घोट्यांवर न भरून येणाऱ्या जखमा तयार होण्याचा धोका वाढतो. काही रुग्णांना वरवरच्या शिरांमध्ये रक्तसंचयामुळे सौम्य गाठी तयार होतात. "सुपरफिशियल व्हेन थ्रॉम्बोसिस वेदनादायक असते पण जीवघेणी नसते. त्याला लोक घाबरतात, परंतु धोकादायक क्लॉट्स हे आतल्या खोल शिरांमध्ये होतात," असे ते स्पष्ट करतात.
डॉ. शोएब पदारिया यांचा भर 'लक्षणं नसली तरीही धोका असू शकतो' यावर आहे. "मोठ्या नसांमध्ये कोणतीही वेदना नसतानाही पायात हळूहळू त्वचेचे नुकसान सुरू असू शकते. त्यामुळे प्रत्येक मोठ्या नसांवर वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला गरजेचा आहे," असा ते सल्ला देतात.
उपचार कसे ठरवले जातात?
डॉ. पदारिया यांच्या मार्गदर्शनानुसार, उपचार निवडताना व्हेनचा आकार, खोली, सरळपणा आणि त्वचेजवळील अंतर या चार गोष्टी निर्णायक ठरतात.
व्हेनच्या आकारानुसार
- 4-5 मिमीपेक्षा कमी व्हेनचा आकार कमी असेल तर फोम स्क्लेरोथेरपी
- 5-12 मिमी असेल तर लेझर (EVLT) किंवा RF ablation
- 12-15 मिमी किंवा अधिक असेल तर लेझर (EVLT) अधिक प्रभावी
व्हेनच्या रचनेनुसार
- सरळ मुख्य शीर असेल तर- लेझर / RF उपचार सुचवतात.
- वाकडी-तिकडी शीर (Tortuous) असेल तर फोम स्क्लेरोथेरपी सांगतात.
त्वचेजवळील खोली (Depth)नुसार
- 5 मिमीपेक्षा अधिक खोल असेल तर लेझर / RF सुरक्षित
- फारच त्वचेच्या जवळ (<5 mm) असेल तर ग्लू किंवा फोम
(कारण या पद्धतींमध्ये गरम ऊर्जा नसते (Skin burn चा धोका कमी)
व्हेरिकोज व्हेन्सच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या लेझर (EVLT), रेडिओफ्रिक्वेन्सी (RF), ग्लू आणि फोम स्क्लेरोथेरपी या चारही पद्धतींचे वेगवेगळे फायदे आणि वापराचे वेगवेगळे संदर्भ आहेत.
लेझर आणि RF या दोन्ही पद्धतींमध्ये उष्णतेचा वापर केला जातो, त्यामुळे शिरा आतून बंद करण्यासाठी 'थर्मल एनर्जी' लागते आणि प्रक्रियेदरम्यान स्थानिक अॅनेस्थेशिया म्हणजेच ट्यूमेसेंट इंजेक्शन देणं आवश्यक ठरतं.

फोटो स्रोत, Getty Images
या दोन्ही उपचारांनंतर रुग्णाला हलकी‑मध्यम वेदना जाणवू शकते, परंतु परिणाम दीर्घकालीन आणि विश्वासार्ह असतात. मोठ्या मुख्य शिरांसाठी अथवा सरळ पसरलेल्या GSV सारख्या शिरांसाठी हे उपचार अधिक योग्य मानले जातात, तसेच पुन्हा होण्याची शक्यता अत्यंत कमी असते.
याउलट, ग्लू उपचार आणि फोम स्क्लेरोथेरपी या थर्मल नसलेल्या पद्धती आहेत, म्हणजेच त्यामध्ये उष्णतेचा वापर होत नाही. त्यामुळे ट्यूमेसेंट इंजेक्शनची गरज नसते आणि प्रक्रियेनंतरची वेदना अत्यल्प किंवा अगदीच कमी असते.
ग्लू उपचार साधारणपणे अनेस्थेशिया नको असतो अशा रुग्णांसाठी तो उपयोगी असतो किंवा ज्यांच्या शिरा त्वचेजवळ फार उथळ असतात. फोम स्क्लेरोथेरपी वाकड्या–तिकड्या, लहान आकाराच्या किंवा बारीक फाटल्यासारख्या दिसणाऱ्या शिरांसाठी अधिक प्रभावी ठरते. मात्र, फोमच्या बाबतीत इतर पद्धतींच्या तुलनेत पुन्हा शिरा तयार होण्याचा धोका किंचित जास्त असू शकतो.
एकंदरीत, प्रत्येक पद्धतीचं स्थान वेगळं आहे. मोठ्या आणि सरळ शिरांसाठी लेझर किंवा RF, तर लहान, वाकड्या किंवा त्वचेजवळील शिरांसाठी ग्लू किंवा फोम योग्य आहे.. अचूक निवड ही नेहमीच डॉपलर मॅपिंग आणि तज्ज्ञांच्या मूल्यांकनावर अवलंबून असते.
दोन्ही डॉक्टर "प्रत्येकाच्या वाहिन्या वेगळ्या असतात. म्हणूनच 'एकाच प्रकारचा उपचार' सर्वांना लागू होत नाही. डॉपलर मॅपिंग हा उपाय निवडण्याचा पहिला आणि सर्वात अचूक टप्पा आहे." असं सांगतात.
लाइफस्टाइल बदल
डॉ. शेखर आणि डॉ. पदारिया यांच्या निरीक्षणांनुसार, आधुनिक जीवनशैली ही समस्या वाढवणारी महत्त्वाची कारणे आहेत. त्यामुळे काही साधे बदल मोठा फरक करू शकतात:
- दररोज चालणे - पिंडरी स्नायू पंप सक्रिय होतो, रक्त हृदयाकडे वर ढकललं जातं.
- वजन नियंत्रणात ठेवणे - पायांवरील दाब कमी होतो.
- दर 30 मिनिटांनी बसण्याची/उभं राहण्याची स्थिती बदलणे.
- पाय थोडे वर ठेवून विश्रांती घेणे- सूज आणि जडपणा कमी होतो.
- कॉम्प्रेशन स्टॉकिंग्सचा वापर - विशेषतः सुरुवातीच्या टप्प्यात उपयुक्त.
टाळाव्यात अशा सवयी
- तासनतास एकाच जागी उभं राहणं.
- दीर्घकाळ बसून राहणं.
- अतिघट्ट किंवा खूप सैल चप्पल, हाय हिल्समुळे पिंडरीच्या स्नायूचा जोर कमी होतो.
- गरम पाण्यात पाय बुडवण्याच्या सवयीमुळे शिरा अधिक फुगू शकतात.
डॉ. शेखर सांगतात, "लक्षणं सौम्य असतील तर लाइफस्टाइल बदलांनी खूप फायदा होऊ शकतो. पण त्वचेतील बदल किंवा सूज सुरू झाली की तज्ज्ञांकडे जायलाच हवं."
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.





























