'काबुलच्या रुग्णालयावरील पाकिस्तानच्या हल्ल्यात शेकडो जणांचा मृत्यू', अफगाणिस्तानचा आरोप

अफगाणिस्तान

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात हजारो लोक अमली पदार्थांच्या व्यसनावर उपचार घेत होते.
    • Author, यामा बारीझ आणि कॅथरीन आर्मस्ट्राँग
    • Role, बीबीसी अफगाण, काबुल
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

अफगाणिस्तानच्या काबूलमधील एका व्यसनमुक्ती केंद्रावर झालेल्या हल्ल्यात अनेकजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा हल्ला पाकिस्तानने केल्याचा आरोप तालिबान सरकारने केला आहे.

या हवाई हल्ल्यात अनेक लोक जखमी झाल्याची देखील माहिती आहे.

तालिबान सरकारच्या प्रवक्त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करून म्हटलं आहे की, सोमवारी (16 मार्च) संध्याकाळी या रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात काही जणांचा मृत्यू झाला असून, काही लोक जखमी देखील झाले आहेत.

पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने तालिबानचा हा दावा फेटाळून लावला आहे.

अफगाणिस्तानमधील रुग्णालयावर हल्ला केला नसल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या या मंत्रालयाने म्हटलं आहे की, "पाकिस्तानने काबूल आणि पूर्व अफगाणिस्तानच्या नांगाहार प्रांतातील काही लष्करी तळांना आणि 'दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या' ठिकाणांना त्यांनी लक्ष्य केलं आहे."

बीबीसीच्या टीमला घटनास्थळी काय दिसलं?

बीबीसीच्या प्रतिनिधींनी या नुकसानग्रस्त रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी या रुग्णालयाचा काही भाग अजूनही जळत होता आणि 30 पेक्षा जास्त मृतदेहांना इथून स्ट्रेचरवर बाहेर काढलं गेलं होतं.

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं आहे की, सुमारे 2 हजार लोक इथे उपचार घेत होते. या हल्ल्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला असण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली.

अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शराफत जमान अमरखैल यांनी बीबीसीला सांगितलं की, "या रुग्णालयाजवळ कोणतीही लष्करी सुविधा नाही."

रुग्णालय

स्थानिक वेळेनुसार रात्री 8.50 च्या सुमारास काबूलभर मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं रहिवाशांनी सांगितले; त्यानंतर विमानांचा आणि हवाई संरक्षण यंत्रणांचा आवाज आल्याचं देखील स्थानिकांनी म्हटलं आहे.

रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांच्या नातेवाईकांनी बाहेर गर्दी केली होती. आपल्या प्रियजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत होते.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारी राष्ट्रांमधील संघर्षाला मागच्या महिन्यात पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर दहशतवादी गटांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे, ज्याचे तालिबान सरकारने खंडन केले आहे.

अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मोहिमेच्या (UNAMA) माहितीनुसार, 26 फेब्रुवारीपासून या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात अफगाणिस्तानमध्ये किमान 75 लोकांचा मृत्यू झाला असून 193 जण जखमी झाले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात या दोन्ही देशांनी 'शस्त्रसंधीचा करार' केला आहे. मात्र, तो तकलादू असल्याचं या संघर्षांवरून दिसून येतं.

पाकिस्तानच्या मंत्र्यांनी अफगाणिस्तानवरील हल्ल्यासंदर्भात कोणते दावे केले?

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री, अताउल्ला तरार यांनी अफगाणिस्तानातील पाकिस्तानी हल्ल्यांची पुष्टी करणारे एक निवेदन जारी केलं आहे.

एक्सवर पोस्ट करून त्यांनी असं म्हटलं आहे की, हे हल्ले काबूल आणि नांगरहारमधील तालिबान राजवटीच्या 'दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या लष्करी तळांना' लक्ष्य करून करण्यात आले होते.

बीबीसी पश्तोने दिलेल्या बातमीनुसार, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने असा आरोप केला आहे की पाकिस्तानने काबूलमधील एका व्यसनमुक्ती रुग्णालयावर हल्ला केला, ज्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

अताउल्लाह तरार

फोटो स्रोत, MAXIM SHEMETOV/POOL/AFP via Getty

फोटो कॅप्शन, अताउल्लाह तरार यांनी तालिबान राजवटीच्या 'दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या लष्करी तळांवर' हल्ला केल्याचा दावा केला आहे (फाइल फोटो).

तालिबान सरकारचे उपप्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी सांगितलं की, 'आतापर्यंत अंदाजे 400 लोक ठार झाले असून सुमारे 250 जण जखमी झाले आहेत.'

पाकिस्तानचे मंत्री तरार यांनी सांगितलं की, "पाकिस्तानी लष्कराने काबूलमधल्या दोन ठिकाणांवर हल्ले केले. या तळांवर असणारी दारुगोळ्याची गोदामं आणि तांत्रिक सहाय्य देणारी व्यवस्था नष्ट करण्यात आली आहे."

त्यांनी आपल्या निवेदनासोबत एक व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला आहे.

याशिवाय तरार असंही म्हणाले की, "पाकिस्तानच्या सैन्याने अफगाणिस्तानातील नांगरहारमधल्या 'दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या चार लष्करी तळांवर'ही हल्ला करून, संबंधित रसद, दारुगोळा आणि तांत्रिक पायाभूत सुविधा नष्ट केल्या आहेत."

"तालिबान सरकार अनेक दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्यासाठी ज्या तळांचा वापर करतं अशा ठिकाणांवर अचूक पद्धतीने हे हल्ले करण्यात आले आहेत," असंही तरार यांनी लिहिलं आहे.

हा युद्ध गुन्हा आहे - क्रिकेटर रशिद खान

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशिद खानने या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एक्सवर पोस्ट करून या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

रशीद खानने लिहिलं आहे की, "पाकिस्तानने काबूलवर केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या जीवितहानीची बातमी अत्यंत दुःखद आहे. हेतुपुरस्सर असो वा अपघाताने अशा प्रकारे नागरिकांची घरे, शैक्षणिक संस्था किंवा वैद्यकीय सुविधांना लक्ष्य करणे, हा एक 'युद्ध गुन्हा' (वॉर क्राईम) आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

त्याने पुढे लिहिलं, "मानवी जीवनाबद्दलची अशी अनास्था, विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात, अत्यंत चिंताजनक आहे आणि यामुळे द्वेष व फूट वाढेल. मी संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवाधिकार संघटनांना आवाहन करतो की त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करावी आणि यासाठी जबाबदार लोकांना जाब विचारावा."

तो म्हणाला, "या कठीण काळात मी अफगाण लोकांसोबत उभा आहे. अफगाणिस्तान या संकटावर मात करेल आणि पुन्हा उभा राहील. इन्शाअल्लाह."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)