इंटरनेटवर ऑनलाइन विकली जातेय तुमची माहिती? गुगलचे हे प्रायव्हसी टूल वापरून करा संरक्षण?

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC
- Author, थॉमस जर्मेन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
तुम्ही गुगल सर्च करत असताना तुमच्याबद्दल जी माहिती तयार होते, ती माहिती काढून टाकणारं एक मोफत ऑटोमेटेड टूल किंवा साधन आहे. मात्र काही कारणास्तव, बहुतांश लोक त्याचा वापर करत नाहीत.
तुम्हाला हे माहिती आहे का? की, अनेक कंपन्या, तुमचं नाव, तुमच्या घराचा पत्ता, तुमचा फोन नंबर आणि बरंच काही ऑनलाइन विकत आहेत?
काहीजण तुमची माहिती चोरून ती स्वस्तात हवी असणाऱ्या कोणालाही ती विकतात. त्यांना डेटा ब्रोकर्स म्हणतात.
मग ते टेलीमार्केटिंग करणारे, एक्स जोडीदारांपासून ते ओळख चोरणाऱ्यांपर्यंत (तुमची वैयक्तिक माहिती चोरून तिचा वापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी किंवा तुमच्या नावानं बनवेगिरी करण्यासाठी करणारे) अनेकांना तुमची ही माहिती डेटा ब्रोकर्स विकतात. यामुळे तुमची सुरक्षितता धोक्यात येते.
मात्र एक टूल असं आहे ज्यामुळे ही माहिती शोधणं कठीण होतं. ते टूल मोफत उपलब्ध आहे.
गुगलकडून ही सेवा मोफत पुरवली जाते. त्याला 'रिझल्ट्स अबाउट यू' असं म्हणतात. मात्र अनेक लोकांना त्याबद्दल माहिती नसतं.
काय आहे 'रिझल्ट्स अबाउट यू'?
गुगल त्यांचं सर्च इंजिन चालवण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी सातत्यानं इंटरनेटवरील माहिती ऑटोमेटेड स्वरुपात गोळा करून त्यावर प्रक्रिया करत असतं. यात डेटा ब्रोकर्सकडून अचानक मिळालेल्या तुमच्या संवेदनशील तपशीलांचा समावेश असतो.
अर्थात ती गोळा करण्याचा गुगलचा उद्देश नसतो मात्र ऑटोमेटेड स्वरुपात ती माहिती इतर माहितीबरोबर गोळा केली जाते.
ही संवेदनशील माहिती कदाचित तुम्हाला गोपनीय ठेवायची असू शकते. गुगलच्या या प्रक्रियेमुळे, कंपनीचा तसा हेतू नसताना अनवधानाने तुम्हाला सर्व प्रकारच्या गंभीर धोक्यांना सामोरं जाऊ लागू शकतं.
मात्र रिझल्ट्स अबाउट यू या एका बटणानं तुम्ही गुगलला माहिती काढून टाकण्यास सांगू शकता. हे इतकं सोपं आहे. आता कंपनीनं ही सेवा अधिक उपयुक्त करण्यासाठी अपडेट केली आहे.
"ही अत्यंत सोपी गोष्ट आहे," असं थोरिन क्लोसोव्स्की म्हणाले. ते इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडेशनचे (ईएफएफ) सुरक्षा आणि प्रायव्हसीसाठी काम करणारे ॲक्टिविस्ट किंवा कार्यकर्ते आहेत. इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडेशन हा अमेरिकेतील डिजिटल हक्कांसाठी काम करणारा गट किंवा संस्था आहे.

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC
ते म्हणतात की रिझल्ट्स अबाउट यू हे अतिशय महत्त्वाचं आणि प्रायव्हसीच्या सुरक्षेसाठी वापरायचं अतिशय सोपं टूल आहे.
ते पुढे म्हणतात, "लगेच आणि सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा विचार करता, हा कदाचित सर्वोत्तम पर्याय आहे. याप्रकारच्या माहितीची जलद उपलब्धतता अनेक प्रकारे वापरली जाऊ शकते. अतिशय महत्त्वाच्या, मोठ्या पद्धतीनं आणि छोट्या पद्धतीनंदेखील."
तुम्ही या टूलचा वापर केल्यानंतर, तुमचं नाव, ईमेल, फोन नंबर किंवा पत्ता सापडल्यानंतर गुगल तुम्हाला ईमेल करतं. गुगलला सापडलेल्या वेबसाईट्सचं तुम्ही एका क्लिकनं पुनरावलोकन करू शकता.
अमेरिकेत रिझल्ट्स अबाउट यू हे टूल सोशल सिक्युरिटी नंबर्स, पासपोर्ट किंवा ड्रायव्हरचा लायसन्स हे तपशील ओळखण्यासाठी आणि त्यांचा बचाव करण्यासाठीदेखील वापरता येऊ शकतं.
ही ऑटोमेटेड सेवा वापरण्यासाठी तुमचं गुगल अकाउंट असणं आवश्यक आहे. मात्र जर सर्च रिझल्ट्समध्ये तुम्हाला स्वत:लाच संवेदनशील माहिती आढळली तर यासाठी एक मॅन्युअल प्रक्रियादेखील आहे. त्याचा वापर तुम्ही गुगल अकाउंटशिवाय करू शकता.
हे सर्व तपशील उघड झाल्यानं किंवा इतरांना उपलब्ध झाल्यानं तुम्हाला सर्व प्रकारच्या धोक्यांना तोंड द्यावं लागतं. हे टूल तुम्हाला इथं मिळू शकतं. मात्र तुम्ही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी, काही महत्त्वाच्या पूर्वसूचना लक्षात घ्याव्या लागतील.
तोटे किंवा छुप्या अडचणी काय आहेत?
गुन्हेगार हॅकिंग आणि डेटाचं उल्लंघन यातून सातत्यानं संवेदनशील माहिती खरेदी करत असतात आणि त्याची विक्री करतात. त्यामध्ये गुगल तुम्हाला मदत करू शकत नाही.
इथं हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, रिझल्ट्स अबाउट यू हे टूल इतर वेबपेजवर त्याला सापडणारी माहिती मिटवत किंवा काढून टाकत नाही. ते फक्त गुगल सर्चमधून संबंधित लिंक्स काढून टाकतं. अर्थात त्यामुळे खूप मोठा फरक पडतो.
गुगलच्या या टूलमुळे तुम्हाला पूर्ण प्रायव्हसी आणि मन:शांती मिळणार नाही. मात्र ते तुमची माहिती इतर कोणी मिळवण्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतं. त्यामुळे तुम्हाला सहजपणे लक्ष्य करता येत नाही.
क्लोसोव्स्की म्हणतात, "जर या कामात खूपच सखोलपणे उतरलेल्या लोकांची तुम्हाला शोधायची इच्छा असेल, तर ते शोधू शकतील. मात्र गुगल इतकं सर्वव्यापी आहे आणि ते वापरण्यास अतिशय सोपं आहे."
"तसंच गुगल सर्चवरील सर्वात वाईट आणि सर्वात स्पष्ट किंवा लक्षात येण्यासारख्या माहिती किंवा गोष्टी काढून टाकण्यास लोकांना त्यामुळं खूपच मदत होते. शोधण्यास सोपी असलेल्या माहितीचा पहिला थर तुम्ही याद्वारे काढून टाकत असता."
तुम्हाला डेटा पूर्णपणे काढून टाकायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पावलं उचलण्याची आवश्यकता असते. (त्यासंदर्भात अधिक माहिती खाली दिली आहे.)
रिझल्ट्स अबाउट यू हे टूल वापरताना तुम्हाला त्याला काय शोधायचं आहे, हेदेखील सांगावं लागतं. त्याचा अर्थ म्हणजे, ही संवेदनशील माहिती गुगलच्या सिस्टममध्ये टाईप करावी लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
गुगलचा प्रायव्हसीच्या संदर्भातील वादाचा इतिहास असताना त्यांना ही माहिती किंवा डेटा देण्याबाबत तुमच्या काही शंका असू शकतात किंवा तुम्ही सहमत नसू शकता. मात्र गुगलकडे तुमचा पत्ता आणि फोन नंबर यासारख्या गोष्टी आधीच आहेत, असं क्लोसोव्स्की म्हणतात.
शेवटी, गुगल जगातील सर्वात मोठ्या डेटा संकलन ऑपरेशन्सपैकी एक चालवतं. त्याशिवाय, या सेवेबाबत गुगल विशिष्ट प्रायव्हसीची हमी देतं.
गुगलच्या प्रवक्त्यानं बीबीसीला सांगितलं की रिझल्ट्स अबाउट यू ला सादर करण्यात आलेला डेटा इतर कोणत्याही गोष्टींसाठी वापरला जात नाही. (आणि ते काही प्रमाणात महत्त्वाचं आहे. तुमच्या प्रायव्हसीबद्दल सरळ सरळ खोटं बोलत असल्याबद्दल कंपन्यांना जर पकडण्यात आलं तर त्यांना लाखो किंवा अगदी अब्जावधी डॉलर्सचा दंड होऊ शकतो.)
गुगलचं म्हणणं आहे की, ते अतिशय कडक सुरक्षा आणि एन्क्रिप्शन प्रोटोकॉलचा म्हणजे प्रणालीचा देखील वापर करतात.
या टूलचा वापर कसा करायचा?
हे टूल किंवा सेवा अतिशय सोपी आहे. फक्त रिझल्ट्स अबाउट यू या हबवर जा आणि फॉर्म भरा. तुम्हाला गुगलवर आढळणारी कोणतंही समस्येसारखं कॉन्टेंट स्वत:देखील सबमिट करू शकता. सर्च रिझल्ट्सवरील लिंकच्या शेजारी तीन ठिपके असलेला मेनू उघडा आणि 'रिमूव्ह रिझल्ट'वर क्लिक करा किंवा या पेजचा वापर करा.
काही बाबतीत, गुगल कुटुंबातील सदस्यांबद्दलची माहिती असलेले रिझल्ट्सदेखील काढून टाकेल. मात्र ते तुम्हाला हवं असलेलं काहीही सर्च इंजिनमधून काढून टाकणार नाही. उदाहरणार्थ, सरकारी आणि न्यूज वेबसाईटवरील कॉन्टेंट यातून वगळण्यात आलं आहे.
जर तुम्हाला गुगलवर माहिती सापडत नसेल, तर अनेकजणांना ती माहिती अस्तित्वातच नसल्यासारखी वाटते. मात्र जर तुम्हाला इंटरनेटवरून डेटा पूर्णपणे काढून टाकायचा असेल किंवा नष्ट करायचा असेल, तर तसं करणं कठीण आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अशावेळी तुम्ही थेट डेटा ब्रोकर्सशी संपर्क साधू शकता आणि त्यांना तुमची माहिती काढून टाकण्याविषयी विचारू शकता. काही सशुल्क सेवांचा वापर करून तुम्हाला हे काम करता येईल.
कॅलिफोर्नियातील रहिवासी, यासाठी डीलीट रिक्वेस्ट अँड ऑप्ट-आऊट प्लॅटफॉर्म (ड्रॉप)चा वापर करू शकतात.
ही सेवा हजारो डेटा ब्रोकर्सना एकाचवेळी तुमची माहिती डीलीट करण्यास किंवा काढून टाकण्यास सांगते.
हे आतापर्यंतचं याप्रकारचं एकमेव सरकारी टूल आहे. जर तुम्हाला यासंदर्भात आणखी खोलात जायचं असेल, तर स्व-बचावासाठी पाळत ठेवण्याचं ईएफएफचं गाईड पाहा.
गुगलनुसार, 2022 मध्ये लाँच झाल्यापासून रिझल्ट्स अबाउट यू हे टूल 1 कोटींहून अधिक लोकांनी वापरलं आहे. ही मोठी संख्या आहे.
गुगलवरील 1.8 अब्ज अकाउंटचा विचार करता ही संख्या छोटी आहे. मात्र इतक्या कमी प्रयत्नात इतकं संरक्षण देणारं प्रायव्हसीसाठीचं दुसरं टूल शोधणं तुम्हाला कठीण जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











