नवीन पुरुषत्व ऐकून घेणारं, समजून घेणारं; विज्ञान सांगतं 'भावना दाखवणं म्हणजे कमकुवतपणा नाही'

सह-अनुभूती म्हणजे 'महिलांचा गुण' आणि खंबीरपणा म्हणजे 'पुरुषांचं लक्षण'...असं आपण बराच काळ मानत आलो आहोत. पण नवीन संशोधन सांगतंय की हा केवळ जैविक फरक नाही; आपल्या संस्कारांनी, अपेक्षांनी आणि समाजाने तयार केलेला साचा आहे. हार्मोन्सपासून जनुकांपर्यंत आणि लहानपणीच्या शिकवणीतून नेतृत्वापर्यंत सह-अनुभूती खरंच कोणाची? हा लेख सह-अनुभूतीवरील लिंगभेदांच्या मिथकांना वैज्ञानिक पुराव्यांसह नव्यानं उलगडतो.

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मेलिसा हॉगनबूम
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

सह-अनुभूती म्हणजे 'महिलांचा गुण' आणि खंबीरपणा म्हणजे 'पुरुषांचं लक्षण'...असं आपण बराच काळ मानत आलो आहोत. पण नवीन संशोधन सांगतंय की हा केवळ जैविक फरक नाही; आपल्या संस्कारांनी, अपेक्षांनी आणि समाजाने तयार केलेला साचा आहे. हार्मोन्सपासून जनुकांपर्यंत आणि लहानपणीच्या शिकवणीतून नेतृत्वापर्यंत सह-अनुभूती खरंच कोणाची? हा लेख सह-अनुभूतीवरील लिंगभेदांच्या मिथकांना वैज्ञानिक पुराव्यांसह नव्यानं उलगडतो.

सह-अनुभूती (एम्पथी) म्हणजे इतरांच्या भावनांशी समरस होण्याच्या संवेदनशीलतेसंदर्भात लिंगभेदावर आधारित रूढ कल्पना आहेत.

मात्र, आता वैज्ञानिक संशोधनातून या कल्पना किंवा साचेबद्ध विचारांमध्ये उलथापालथ होते आहे, ते उलगडत आहे. त्यातून पुरुषत्वाबद्दल विचार करण्याच्या नवीन पद्धती समोर येत आहेत.

जेव्हा महिला महान गोष्टी साध्य करायच्या, तेव्हा त्याबद्दल चुकीच्या प्रकारे मानलं जात असे की "त्या महान कार्य करणाऱ्या व्यक्ती महिला नव्हत्या, तर ते पेटीकोट घातलेले पुरुष होते!" असं मेरी ॲस्टेल या महिला तत्वज्ञानं 1705 मध्ये लिहिलं होतं.

अगदी राणी एलिझाबेथ (प्रथम) यांचेदेखील यासंदर्भात एक प्रसिद्ध उद्गार आहेत. त्या म्हणाल्या होत्या की त्यांचं शरीर 'दुर्बल महिले'चं असूनही त्यांनी एखाद्या राजाप्रमाणे देशावर राज्य केलं - जणूकाही राज्य करणं ही एक पुरुषी बाब असावी.

सह-अनुभूती

फोटो स्रोत, Getty Images/ Javier Hirschfeld/ BBC

अर्थात हे किस्से जरी भूतकाळातील असेल तरीदेखील, यशस्वी होणं, शक्तीशाली व्यक्ती असणं याबद्दलचे सुक्ष्म लिंगभेद अजूनही पसरलेले आहेत.

विशेषकरून, आपण अजूनही एम्पथी म्हणजे सह-अनुभूतीसारख्या गुणांचं वर्णन नैसर्गिकरित्या स्त्रीलिंगी किंवा महिलांशी संबंधित गुण म्हणून करतो.

तर वर्चस्व आणि खंबीरपणा यासारखे गुण पुरुषी असल्याचं मानतो. अगदी समान वर्तन दाखवताना, पुरुषांकडे खंबीर आणि महिलांकडे आक्रमक वृत्तीच्या म्हणून पाहिलं जातं.

अशाच प्रकारे, लिंगभेदावर आधारित असाच एक विशेष उल्लेखनीय गुण म्हणजे एम्पथी किंवा सह-अनुभूती. महिला नैसर्गिकरित्या सह-अनुभूती असणाऱ्या असतात, असं मानलं जातं, तर त्याउलट अधिक सह-अनुभूती दाखवणारे पुरुष सामान्यपणे कमकुवत मानले जातात.

मात्र हे असं का आहे? महिला नैसर्गिकरित्याच पुरुषांपेक्षा अधिक सह-अनुभूती असणाऱ्या असतात, की समाजात आपल्याला याप्रकारे विचार करण्यास शिकवलं जातं?

यासारख्या लिंगभेदावर आधारित कल्पनांचे, विचारांचे परिणाम आपण आपल्या मुलांचं संगोपन कसं करतो, कार्यसंस्कृती आणि नेतृत्व यावर होतात. मात्र हे पूर्वग्रह किती लवकर सुरू होतात आणि रूढीवादी विचार आपल्या अपेक्षांना कशाप्रकारे आधार देतात. इतरांनी कसं वागावं याची अपेक्षा आपण कशाप्रकारे करतो, यावर लक्षणीय बंधनं लादतात, हे कमी दिसून येतं.

सह-अनूभूती (एम्पथी) मागील हार्मोन्स

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एम्पथी म्हणजे सह-अनुभूतीमध्ये दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. इतरांचे विचार आणि भावना समजून घेण्याच्या क्षमतेचा यात समावेश असतो, ज्यामुळे आपण योग्यप्रकारे प्रतिसाद देतो. याचा विचार आकलनाशी संबंधित सह-अनुभूती आणि भावात्मक किंवा भावनिक सह-अनुभूतीच्या बाबतीत देखील केला जाऊ शकतो.

आकलनाशी संबंधित सह-अनुभूती म्हणजेच भावना ओळखण्याची आणि इतर दृष्टीकोन लक्षात घेण्याची आपली क्षमता. तर भावनिक सह-अनुभूती म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीच्या विचारांना आणि भावनांना भावनिक प्रतिसाद देतो.

प्रश्नावली आणि अनुभवात्मक कृतींसह सह-अनुभूती, अनुभवाच्या आधारे किंवा निरीक्षणाच्या आधारे मोजण्यासाठी वैज्ञानिक विविध पद्धती वापरतात.

आणि हे फार पूर्वीपासून आढळलं आहे की, सरासरी, महिला सातत्यानं पुरुषांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करतात.

सायमन बॅरन-कोहेन, केंब्रिज विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट) आहेत. त्यांचं म्हणणं आहे की महिलांचा मेंदू 'प्रामुख्यानं सह-अनुभूतीसाठी सक्षम असतो', त्यामुळे महिला काळजी घेण्याच्या भूमिकांसाठी विशेषकरून योग्य किंवा अनुरुप असतात. तर पुरुषांचा मेंदू प्रामुख्यानं 'समजून घेण्यासाठी आणि प्रणाली तयार करण्यासाठी सक्षम असतो'.

काळजी घेण्याच्या भूमिकांसाठी महिल अधिक योग्य असतात, हा एक सामान्य समज आहे, ज्याला काही संशोधनातून आधार मिळतो असं दिसतं

फोटो स्रोत, Alamy/ Javier Hirschfeld/ BBC

फोटो कॅप्शन, काळजी घेण्याच्या भूमिकांसाठी महिल अधिक योग्य असतात, हा एक सामान्य समज आहे, ज्याला काही संशोधनातून आधार मिळतो असं दिसतं

बॅरन-कोहेन म्हणतात की, सामाजिक घटकांचा सह-अनुभूतीवर स्पष्टपणे परिणाम होतो.

मात्र त्यांच्या कामातून असं सूचित होतं की गर्भाशयात येणारा हार्मोनचा संपर्क, सामाजिक विकासात भूमिका बजावतो.

त्यांनी 2006 मध्ये 6-9 वर्षे वयोगटातील 200 हून अधिक मुलांवर अभ्यास केला होता.

या अभ्यासातून असं आढळलं की, गर्भधारणेच्या काळात ॲम्नीओटिक द्रव पदार्थातील टेस्टोस्टेरॉनची पातळीचा - जी महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त असते. जगातील व्यवस्था, नियम यांच्यासंदर्भातील आकलनावरील (सिस्टमायझिंग) चाचण्यांमध्ये मुलं कशी कामगिरी करतात याच्याशी थेट संबंध असतो. याला नियम किंवा पॅटर्नचं विश्लेषण करण्याची क्षमता असं म्हटलं जातं.

गर्भाशयातील टेस्टोस्टेरॉनचा येणारा संपर्कामुळे मुलांच्या लिंगापेक्षा त्यांच्या चाचणी गुणांचा अधिक भक्कमपणे अंदाज लावता येत होता.

असाच एक अभ्यास 2007 मध्ये करण्यात आला होता. त्यातूनही असं दिसून आलं की गर्भाच्या टेस्टोस्टेरॉनशी येणारा संपर्क हा सह-अनुभूतीच्या चाचणीतील गुणांशी व्यस्त प्रमाणात होता. म्हणजेच टेस्टोस्टेरॉनचा संपर्क वाढला की सह-अनुभूतीच्या चाचणीतील गुण कमी होत होते.

"यातील स्पष्ट बाब म्हणजे सह-अनुभूती किंवा सिस्टमायझिंग हे जीवशास्त्र आणि सामाजिक घटकांचं गुंतागुंतीचं मिश्रण आहे," बॅरन-कोहेन म्हणतात.

सह-अनुभूती (एम्पथी) जनुकांमधून येते का?

गिना रिप्पॉन न्युरोसायंटिस्ट आहेत. त्यांच्यासारख्या इतर अनेक संशोधकांना या हार्मोनल सिद्धांतात समस्या आहेत असं वाटतं.

"सर्व महिला नैसर्गिकरित्या अधिक सह-अनुभूती असलेल्या असतात, ही कल्पना तथाकथित 'महिला मेंदू मिथका'च्या पाठपुराव्याचा किंवा सातत्याचा एक भाग आहे", असं त्या म्हणतात.

गिना रिप्पॉन असं म्हणतात की, आपण हेदेखील लक्षात ठेवलं पाहिजे की लहान मुलांचे मेंदू, "बाह्य प्रभावांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात".

एका महत्त्वाच्या अभ्यासात सह-अनुभूतीच्या बाबतीत लिंगावर आधारित फरक आढळला, मात्र ते फरक लहानच होते: अभ्यास करण्यात आलेल्या 57 पैकी 36 देशांमध्ये महिला अधिक सह-अनुभूती असणाऱ्या होत्या. मात्र 21 देशांमध्ये हे गुण खूपच समान होते. अभ्यासकांनी म्हटलं आहे की ते यामागचं कारण किंवा "कार्यकारणभाव निश्चित करू शकत नाहीत."

जरी, सह-अनुभूतीवरील अभ्यासात महिलांना सरासरीपेक्षा किंचित अधिक गुण मिळत असले तरीदेखील, एकाच लिंगामध्ये म्हणजे फक्त महिलांमध्येच किंवा फक्त पुरुषांमध्येच आपसात आढळणाऱ्या फरकांचं प्रमाण, हे महिला आणि पुरुषांची एकमेकांशी तुलना करता खूपच अधिक आहे.

रिप्पॉन म्हणतात, "जर तुम्ही पुरुष आणि महिलांमधील सह-अनुभूतीच्या गुणांचा आवाका किंवा व्याप्ती पाहिली तर ती खूप मोठी आहे".

सह-अनुभूती ही अशी गोष्ट आहे, जी आपण मोठं होत असताना शिकतो आणि त्यामुळे आपण ज्या सामाजिक वातावरणात राहतो, त्यातून ती आकार घेते

फोटो स्रोत, Alamy/ Javier Hirschfeld/ BBC

फोटो कॅप्शन, सह-अनुभूती ही अशी गोष्ट आहे, जी आपण मोठं होत असताना शिकतो आणि त्यामुळे आपण ज्या सामाजिक वातावरणात राहतो, त्यातून ती आकार घेते

असं मानलं जातं की मुली आणि महिला इतरांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि भावना ओळखण्यात अधिक चांगल्या असतात. सह-अनुभूतीसाठी आवश्यक असलेलं ते महत्त्वाचं कौशल्य असतं. मात्र यासंदर्भातील परिणाम मिश्र स्वरूपाचे आहेत.

अलीकडच्या संशोधनातून असं दिसून येतं की है वैशिष्ट्यं त्यांच्यात जन्मापासूनच नसतं. 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या एका सांख्यिकी-विश्लेषणात (मेटा-ॲनालिसिस) 31 अभ्यासांचं परीक्षण करण्यात आलं. या अभ्यासांमध्ये 40 स्वतंत्र प्रयोग करण्यात आलेले होते.

एक महिन्याच्या मुली आणि मुलांनी इतरांच्या चेहऱ्यांकडे कसं पाहिलं, इतरजण रडले तेव्हा ते रडले की नाही आणि त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांबद्दल ते किती सतर्क होते, यासंदर्भात हे प्रयोग होते.

या सर्व गोष्टींमध्ये लिंग काहीही असो, बालकांमध्ये त्यांच्यातील सामाजिक जागरुकता आणि इतरांच्या भावना समजून घेण्याबाबतची उत्सुकता यात फरक नव्हता.

जनुकांसंदर्भातील आणखी एक अभ्यासातूनही लिंगावर आधारित बाब समोर आली. सह-अनुभूतीबाबत एक मोठ्या प्रमाणात अनुवांशिक अभ्यास 2018 मध्ये करण्यात आला. यात 46,000 हून अधिक जणांचा सहभाग होता. सहभागी झालेल्या लोकांनी प्रश्नावली भरून दिली आणि डीएनएचे नमुने सादर केले.

या अभ्यासातून आढळून आलं की एखाद्या व्यक्तीमधील सह-अनुभूती किती आहे यात जनुकं भूमिका बजावतात. मात्र यातील कोणतीही जनुकं त्या व्यक्तीच्या लिंगाशी संबंधित नाहीत.

वरुण वॉरियर केंब्रिज विद्यापीठात न्युरोडेव्हलपमेंटल रिसर्चचे सहायक प्राध्यापक आहेत, तसंच या अभ्यासाचे संशोधक आहेत. वरुण यांनी त्यावेळी स्पष्ट केलं की, "लोकांमधील सह-अनुभूतीतील फक्त 10 टक्के फरक अनुवांशिकतेमुळे असतात. त्यामुळेच बिगर-अनुवांशिक घटक समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे."

याच अर्थ असा की, एखादी व्यक्ती ज्या वातावरणात वाढते आणि राहते, ते यात भूमिका बजावत असलं पाहिजे.

सामाजिक वातावरणाचा सह-अनुभूतीवरील परिणाम

महिलांमध्ये सह-अनुभूतीचे गुण अधिक दिसून येतात. अनेक वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की हे गुण त्यांच्यात जन्मजात असतात असं नाही, तर मुली आणि महिलांचं त्यांच्या भावनांबाबत कृती करण्यासाठी आणि इतरांच्या गरजांना प्राधान्य देण्यासाठी अगदी लहान वयापासूनच सामाजीकरण झालेलं असतं. म्हणजे सामाजिक नियमांचं पालन करण्यास त्यांना लहान वयातच शिकवलं जातं.

मुलींना अनेकदा अशी खेळणी दिली जातात, जी मवाळपणा, अधिक संगोपन कौशल्यांवर भर देणारी असतात. तर मुलांना खेळण्यातील अवजारं आणि गाड्यांबरोबर खेळण्यासह प्रोत्साहन दिलं जातं.

"लहान मुलींना इतरांबरोबर चांगलं राहण्यास सांगितलं जातं. त्यांना निर्दयी आणि उद्धट न राहण्यास सांगितलं जातं. त्यातूनच या गोष्टी हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात," असं रिप्पॉन म्हणतात.

जेव्हा पैशांच्या स्वरुपात एखादं बक्षीस दिलं जातं, तेव्हा पुरुष आणि महिलांमधील सह-अनुभूतीसंदर्भातील अंतर संपू शकतं.

फोटो स्रोत, Alamy/ Javier Hirschfeld/ BBC

फोटो कॅप्शन, जेव्हा पैशांच्या स्वरुपात एखादं बक्षीस दिलं जातं, तेव्हा पुरुष आणि महिलांमधील सह-अनुभूतीसंदर्भातील अंतर संपू शकतं.

अनेक अभ्यासांमधून असंच दिसून आलं आहे की, शक्ती किंवा सामर्थ्य आपल्या सह-अनुभूतीला विकृत करते किंवा त्यांचं स्वरूप बदलते. तसंच लोकांना त्याची जाणीव होण्यापासून रोखते.

'ब्रेडविनर्स' या माझ्या पुस्तकात, मी हा युक्तिवाद मांडला आहे की, ऐतिहासिकदृष्ट्या पुरुषांकडे महिलांपेक्षा अधिक शक्ती होती. व्यवसाय-उद्योग आणि राजकारणात अजूनही तसंच आहे. त्यामुळे पुरुषांना सह-अनुभूतीची जाणीव कमी असण्याची शक्यता जास्त असते.

दुसऱ्या बाजूला, जे लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, ते इतरांच्या भावना लक्षात घेण्याबाबत अधिक चांगले असल्याचं दिसून आलं आहे.

उदाहरणार्थ, एका अभ्यासात असं आढळलं आहे की जे लोक स्वत:ला "वैयक्तिक मतावर आधारित कमी दर्जा असलेले, कमी उत्पन्न असलेले आणि खालच्या वर्गाशी संबंधित सांस्कृतिक गटांशी संबंधित" असल्याचं समजत होते, ते इतरांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे जाणून किंवा समजून घेत होते.

महिलांमध्ये कदाचित अधिक सह-अनुभूती असते कारण त्यांना शक्तिशाली लोकांबद्दल अधिक जागरूक राहावं लागतं, त्याचबरोबर तुलनात्मकरित्या महिलांकडे कमी शक्ती असते.

सह-अनुभूती हा विकसित करता येणारा, बदलता येणारा गुण

महत्त्वाचं म्हणजे, सह-अनुभूती शिकता येते, असं नॅथन स्प्रेंग यांना वाटतं. ते कॅनडातील क्युबेकमधील मॉन्ट्रियलमधील मॅकगिल विद्यापीठातील न्युरोलॉजिस्ट आहेत.

"एकदा का आपल्याला ही भावनिक अनुभवांच्या व्याप्तीची कल्पना समजली की, आपण त्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. तसंच इतर लोकांच्या काय भावना आहेत, हे जाणून घेऊ शकतो आणि आपल्यातील सह-अनुभूतीमध्ये सुधारणा करू शकतो," असं स्प्रेंग बीबीसीच्या द डॉक्युमेंटरी पॉडकास्टमध्ये म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "ही स्थिर नसते, ती आयुष्यभरात सतत बदल जाणारी सक्रिय गोष्ट आहे."

असाच एक न्युरोलॉजिकल अभ्यास 2023 मध्ये करण्यात आला होता. या अभ्यासातून स्पष्टपणे दिसून आलं की, वेदनादायक किंवा चेहऱ्यावरील तटस्थ हावभावांच्या प्रतिमा किंवा फोटो दाखवल्यानंतर महिला आणि पुरुष दोघांच्याही मेंदूमधील लाटा सारख्याच प्रकारे प्रतिसाद देतात.

मात्र अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांनी जेव्हा सह-अनुभूतीशी संबंधित प्रश्नावली पूर्ण केली, ज्यात त्यांना किती सह-अनुभूतीची जाणीव झाली याचं मूल्यांकन करण्यात आलं, प्रयोगात त्या भागात पुरुषांना महिलांपेक्षा सरासरी कमी गुण मिळाले.

म्हणजेच जर त्यांना आधीच सांगितलं असतं की ते चांगली कामगिरी करू शकतात तर त्याचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला असता.

पुरुषदेखील नैसर्गिकरित्या इतरांच्या भावना समजून घेण्यात आणि त्यांची काळजी घेण्यात चांगले असतात, अशी माहिती विचारांवर प्रभाव टाकण्यासाठी पुरुषांच्या गटाला आधीच दिल्यावर, त्यांना किती सह-अनुभूती जाणवली यामधील लिंगावर आधारित फरक नाहीसे झाले.

या निष्कर्षांवरून असं दिसून येतं की असे प्रयोग जिथे लोक स्वत: त्यांच्या सह-अनुभूतीबद्दल नोंदवतात, तिथे ते वैयक्तिक आणि सामजिक पूर्वग्रहांपासून वेगळे करणं कठीण असतं. त्याचबरोबर, एखाद्या व्यक्तीच्या अपेक्षा आणि प्रेरणा यांचा त्यांच्या सह-अनुभूतीवर मोठा परिणाम होतो या गृहितकालादेखील ते पाठिंबा देतात.

"महिलांना जेव्हा त्यांच्या सह-अनुभूतीच्या प्रमाणाचं मूल्यांकन केलं जातं आहे हे माहित असतं, तेव्हा त्या अधिक सह-अनुभूती दाखवतात. हा एक सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह गुण आहे. त्यामुळे त्यांना याबाबतीत अधिक चांगली कामगिरी करायची असते," असं रिप्पॉन याप्रकारच्या प्रयोगांबद्दल म्हणतात.

महिलांना जेव्हा त्यांच्या सह-अनुभूतीच्या प्रमाणाचं मूल्यांकन केलं जातं आहे हे माहित असतं, तेव्हा त्या अधिक सह-अनुभूती दाखवतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महिलांना जेव्हा त्यांच्या सह-अनुभूतीच्या प्रमाणाचं मूल्यांकन केलं जातं आहे हे माहित असतं, तेव्हा त्या अधिक सह-अनुभूती दाखवतात.

एका अभ्यासात आढळलं की महिलांनी पुरुषांपेक्षा इतरांच्या भावना अचूक ओळखण्याच्या कामात फक्त तेव्हाच चांगली कामगिरी केली, जेव्हा त्यांना आधी स्वत:च्या भावनांबद्दल विचार करण्यास सांगण्यात आलं. जर त्यांना याप्रकारे धक्का देण्यात आला नाही, तर त्यात लिंगावर आधारित भेद दिसून आला नाही.

जेव्हा संशोधकांनी अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना इतरांच्या भावना अचूकपणे जाणण्यासाठी पैसे दिले, तेव्हा महिला आणि पुरुष दोघांमधील सह-अनुभूतीच्या अचूकतेमध्ये सुधारणा झाली. अभ्यासात सहभागी झालेले लोक सह-अनुभूती बाळगण्याबद्दल सहजपणे शिकले. कारण असं केल्यावर त्यांना पैशांच्या स्वरुपात बक्षीस मिळणार होतं.

सारा होजेस, ओरेगन विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ (सायकॉलॉजिस्ट) आहेत आणि या अभ्यासातील सह-संशोधक आहेत. सारा सुचवतात की, महिला त्यांच्यातील जन्मजात क्षमतेमुळे नाही तर त्यांच्याकडून असलेल्या सामाजिक अपेक्षांमुळे असं करण्यास प्रेरित होतात, म्हणून त्या सह-अनुभूतीसंदर्भातील अचूकता सुधारू शकतात.

सारा होजेस यांना वाटतं की, सह-अनुभूतीकडे एक निश्चित वैशिष्ट्य किंवा गुण म्हणून पाहण्याऐवजी, त्याकडे आपण माहितीच्या अनेक स्त्रोतांवर आधारित प्रक्रिया म्हणून पाहिलं पाहिजे. यामध्ये, देहबोली, भाषा किंवा बोलणं, साचेबद्ध विचार किंवा कल्पना, वैयक्तिक अनुभव आणि भूतकाळातील संवाद यांचा समावेश आहे.

"एखादी व्यक्ती काय विचार करते आहे किंवा तिच्या काय भावना आहेत, हे जाणून घेण्यासाठी जेव्हा लोक अधिक प्रेरित असतात, तेव्हा ते करण्यासाठी लोक अधिक स्त्रोतांचा वापर करतात," सारा होजेस म्हणतात.

सह-अनुभूतीविषयीच्या पूर्वग्रहाचे भयंकर परिणाम

सारा होजेस म्हणतात, सह-अनुभूती हे फक्त चांगल्या गोष्टीसाठी वापरलं जाणारं एक कौशल्य किंवा गुण नाही, तर त्याचा वापर इतरांना चतुराईनं हाताळण्यासाठी किंवा लबाडी करण्यासाठी किंवा लोकांचं शोषण करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो, या गोष्टीबद्दल कमी चर्चा केली जाते.

"उदाहरणार्थ, वाटाघाटींमध्ये, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल सर्वात महत्त्वाचा मुद्दा किंवा तो एखादी गोष्ट कुठल्या किमान पातळीपर्यंत स्वीकारू शकतो माहित असेल, तर तुम्ही उत्तमरित्या वाटाघाटी करू शकता," असं होजेस म्हणतात.

मात्र शेवटी, सह-अनुभूती आणि त्यासारख्या गोष्टींबाबत असलेल्या अपेक्षांच्या परिणामांमुळे समाजात असमानता निर्माण होऊ शकते. तसंच त्याचे महिला आणि पुरुष दोघांवरही गंभीर स्वरुपाचे परिणाम होऊ शकतात.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये नेतृत्वगुण कमी असल्याचं मानलं जातं. कारण आपण नेत्यांकडे वर्चस्व गाजवणारे आणि ठाम, खंबीर असण्याची आवश्यकता असलेले व्यक्ती म्हणून पाहतो. हे गुण सामान्यपणे पुरुषत्वाशी संबंधित असतात.

मात्र, जेव्हा एकाकीपणाचा प्रश्न येतो, तेव्हा पुरुषांपेक्षा महिला त्यांच्या सामाजिक नेटवर्क किंवा संबंधांचा आधार घेण्याची अधिक शक्यता असते. त्याऐवजी सामाजिक एकाकीपण किंवा लोकांपासून दूर किंवा अलग राहणं ही आत्महत्या करण्यासाठीची एक ज्ञात जोखीम आहे. पुरुषांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त आहे.

सुदैवानं, पुरुष आणि महिलांमधील भावनिक कौशल्यं असण्याच्या महत्त्वाबद्दलचा दृष्टीकोन हळूहळू बदलतो आहे. यात इतरांबद्दलची सह-अनुभूती आणि काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्या यांचा समावेश आहे, असं निअल हॅनलन यांना वाटतं. ते आयर्लंडमधील टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी डब्लिनमधील समाजशास्त्रज्ञ आहेत.

सह-अनुभूती

फोटो स्रोत, Getty Images

हॅनलन म्हणतात, "एकंदरीतच सांगायचं तर, समाजात पुरुष आणि मुलांना, भावनिक बाबी, काळजी घेणं, सह-अनुभूती याकडे पाहण्याबद्दल महिला आणि मुलींपेक्षा वेगळ्या प्रकारे शिकवलं जातं."

"कारण ती पुरुष होण्यासंदर्भातील गोष्ट मानली जात नाही. पुरुष भविष्यात वडील होण्याबद्दलची कल्पना करतात. मात्र ते प्राथमिक काळजी घेणारे व्यक्ती असतील अशी अपेक्षा ते करत नाहीत."

मात्र समाज आता अधिकाधिक पुरुषांना काळजी घेण्याच्या जबाबदाऱ्या घेण्याबद्दल आणि बाह्यदृष्ट्या अधिक सह-अनुभूती होण्यासाठीचा मार्ग मोकळा करण्याच्या दिशेनं बदलतो आहे. पूर्वीपेक्षा आता पुरुष मुलांबरोबर अधिक वेळ घालवत आहेत.

आता पुरुष म्हणतात की त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचा आहे. (अर्थात अजूनही महिला बहुतांशपणे फ्लेक्झिबल वर्किंग करतात आणि मुलांची काळजी घेतात.)

पुरुषांबद्दलचा दृष्टीकोन अधिक काळजी घेणारे आणि सह-अनुभूती असणारे म्हणून पुन्हा तयार करण्याच्या कामातून एका नवीन प्रकारच्या पुरुषत्वाचं दार खुलं होईल. ज्यातून एकाकीपणा टाळण्यास मदत होईल, असं हॅनलन म्हणतात. यात स्वायत्त, शक्ती-केंद्रीत व्यक्तींऐवजी परस्परावलंबन आणि सह-अनुभूतीवर भर दिला जातो.

"ही बाब बरीच चांगली आहे, हे दर्शविणारं बरंच संशोधन झालं आहे. पुरुष, महिला आणि मुलांसाठी," असं हॅनलन म्हणतात.

* मेलिसा होगेनबूम बीबीसीच्या आरोग्य प्रतिनिधी आहेत आणि ब्रेडविनर्स (2025) आणि द मदरहूड कॉम्प्लेक्सच्या लेखिका आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.