सावधान! तुम्ही पिताय ते दूध शुद्ध आहे का? अशी ओळखा दुधातील जीवघेणी भेसळ

सावधान! तुम्ही पिताय ते दूध शुद्ध आहे का? अशी ओळखा दुधातील जीवघेणी भेसळ

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, लक्कोजू श्रीनिवास
    • Role, बीबीसीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

दुधातील भेसळ ही सध्या एक गंभीर समस्या बनली आहे. केवळ अधिक नफा कमवण्यासाठी काही व्यापारी आणि विक्रेते लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे समोर येत आहे.

दुधात केवळ पाणीच मिसळलं जातं असं नाही. तर दूध घट्ट दिसावं यासाठी त्यात अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्याला घातक ठरणारे पदार्थ मिसळले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

अलीकडेच आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरममध्ये उघडकीस आलेल्या दूध भेसळीच्या प्रकरणामुळं लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

प्राथमिक चौकशीनुसार तब्बल 6 जणांच्या मृत्यूला हे भेसळयुक्त दूधच कारणीभूत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

मात्र या मृत्यूचे नेमके कारण काय? हे प्रयोगशाळेतील अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अधिकृतरित्या स्पष्ट होईल.

या घटनेनंतर आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे दूध आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत किती शुद्ध राहते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दूध भेसळयुक्त आहे की नाही, हे नेमके कसे ओळखायचे? घरच्या घरी कोणत्या सोप्या चाचण्या करता येतील?

या मुद्द्यांवर 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण' (FSSAI) च्या अधिकाऱ्यांसह डेअरी क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून बीबीसीने जाणून घेतले.

दुधात भेसळ का आणि कशी केली जाते?

"दूध हा केवळ एक द्रव पदार्थ नसून तो पोषक तत्वांचा खजिना आहे. विशेषतः लहान मुलांच्या वाढीसाठी हा आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. शरीराच्या विकासासाठी आवश्यक असणारे प्रोटिन्स, फॅट्स आणि कॅल्शियम दुधामुळेच मिळतात."

'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचे' (FSSAI) उपसंचालक सुरेश उप्परापल्ली यांनी बीबीसीशी बोलताना या गंभीर विषयावर प्रकाश टाकला.

ते म्हणतात, "दुधात भेसळ होणे ही एक अत्यंत चिंतेची बाब आहे. निव्वळ जास्त नफा कमावण्याच्या हव्यासापोटी दुधात निकृष्ट दर्जाचे किंवा आरोग्याला घातक ठरतील असे पदार्थ मिसळले जातात. हे कृत्य म्हणजे सरळ फसवणूक तर आहेच पण हा ग्राहकांच्या जिवाशी खेळही आहे."

सावधान! तुम्ही पिताय ते दूध शुद्ध आहे का? अशी ओळखा दुधातील जीवघेणी भेसळ

फोटो स्रोत, Getty Images

दुधात नेमकी भेसळ कशाची आणि कशी केली जाते? यावर सुरेश उप्परापल्ली यांनी सांगितले की, "दुधातील भेसळ ही अनेक मार्गांनी केली जाते. मात्र, काही साध्या आणि सोप्या चाचण्यांच्या मदतीने कोणीही सामान्य माणूस ही भेसळ घरच्या घरी ओळखू शकतो."

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नफेखोरीसाठी दुधामध्ये घातक गोष्टींची सर्रास भेसळ केली जाते जसे की, पाणी दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी.

दूध घट्ट आणि फेसळलेले दिसावे यासाठी युरिया आणि डिटर्जंट वापरले जाते. फॉर्मालिन आणि हायड्रोजन पेरोक्साईड हे दूध जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरले जाते.

दुधात भेसळ करण्याचे असे विविध प्रकार सध्या सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुधात केलेली भेसळ नेमकी कशी ओळखायची हेही सुरेश उप्परापल्ली यांनी सांगितले आहे.

दुधाच्या गुणवत्तेची प्रयोगशाळेत तपासणी
फोटो कॅप्शन, दुधाच्या गुणवत्तेची प्रयोगशाळेत तपासणी

पाणी मिसळले आहे का?–

  • हे ओळखण्यासाठी थोडे दूध प्लेटमध्ये किंवा टाईल्सवर ओतून पाहा. शुद्ध दूध हे घट्ट असते आणि ते हळूहळू वाहते. मात्र पाणी मिसळलेले पातळ जाणवते आणि अतिशय वेगाने वाहून जाते.
  • डिटर्जंट आहे का? - एका बाटलीत थोडे दूध घेऊन त्यात थोडे पाणी मिसळा आणि ते जोरात हलवून पाहा. शुद्ध दुधाला कमी फेस येतो. जर फेस जास्त असेल आणि तो बराच वेळ तसाच राहिला, तर त्यात डिटर्जंट असण्याची शक्यता असते.
  • स्टार्चची भेसळ - थोड्या दुधात आयोडिनचे 2 थेंब टाकून पाहा. शुद्ध दुधाचा रंग बदलत नाही पण जर दुधात स्टार्च असेल तर त्याचा रंग निळा किंवा काळा होतो.
  • युरिया मिसळला आहे का? - दुधात थोडी सोयाबीन पावडर मिसळून पाहा. शुद्ध दुधाच्या वासात बदल होत नाही पण जर त्यात युरिया असेल तर अमोनियासारखा तीव्र वास येतो.

सिंथेटिक दूध कसे ओळखाल?

दूध तळहातावर घेऊन घासून पाहा. शुद्ध दूध मऊ आणि नैसर्गिक वाटते. पण सिंथेटिक किंवा भेसळयुक्त दूध साबणासारखे बुळबुळीत वाटते.

सुरेश उप्परापल्ली यांनी स्पष्ट केलं की, हे केवळ प्राथमिक अंदाज आहेत. पूर्ण खात्री करण्यासाठी लॅबमधील चाचण्याच आवश्यक असतात.

दूध संकलन केंद्रांवर आपण अनेकदा 'लॅक्टोमीटर' नावाचं एक छोटं यंत्र वापरताना पाहतो. हे यंत्र दुधाचा घट्टपणा म्हणजेच त्याची घनता मोजण्यासाठी वापरलं जातं.

दुधात पाणी मिळवलं की त्याचा घट्टपणा कमी होतो, तर काही इतर पदार्थ मिसळले की तो वाढतो. याच बदलांवरून दूध किती शुद्ध आहे, याचा एक प्राथमिक अंदाज बांधला जातो.

सावधान! तुम्ही पिताय ते दूध शुद्ध आहे का? अशी ओळखा दुधातील जीवघेणी भेसळ

लॅक्टोमीटर दुधात सोडल्यावर ते किती वर तरंगतं, यावरून दुधाचा दर्जा तपासला जातो.

"साधारणपणे 20°C तापमानाला शुद्ध दुधाचे लॅक्टोमीटर रीडिंग 26 ते 32 च्या दरम्यान असायला हवे. जर हे रीडिंग कमी आले तर दुधात पाणी मिसळले आहे आणि जर रीडिंग जास्त आले तर त्यात स्टार्च किंवा युरियासारखे घन पदार्थ मिसळले असावेत, असा अंदाज लावता येतो," अशी माहिती विशाखा डेअरी आणि हेरिटेज डेअरीमध्ये दुधाची गुणवत्ता तपासणारे कर्मचारी रमेश आणि मुरली यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

सुरेश उप्परापल्ली, उपसंचालक
फोटो कॅप्शन, सुरेश उप्परापल्ली, उपसंचालक

मुरली पुढे म्हणाले की, "लॅक्टोमीटरमुळे निकाल झटपट मिळतो खरा, पण हे यंत्र फक्त दुधाचा घट्टपणा मोजते. त्यात नेमकी कोणती रसायने मिसळली आहेत हे यावरून थेट कळत नाही. त्यामुळे लॅक्टोमीटर ही केवळ एक प्राथमिक चाचणी आहे. दूध शंभर टक्के शुद्ध आहे की नाही हे ठरवण्यासाठी प्रयोगशाळेतील तपासणीच आवश्यक आहे."

"दूध किती शुद्ध आहे हे शंभर टक्के सांगण्यासाठी नुसतं लॅक्टोमीटर असून चालत नाही. त्यासाठी दुधातले फॅट्स, 'सॉलिड्स-नॉट-फॅट' (SNF) आणि दुधात काही जीवजंतू तर नाहीत ना हे तपासण्यासाठी मायक्रोबयोलॉजिकल टेस्ट करणंही तितकंच गरजेचं आहे," असं रमेश यांनी सांगितलं.

भेसळयुक्त दूध म्हणजे आरोग्याला धोका

भेसळ केलेलं दूध पिणं किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाणं हे आपल्या शरीराला खूप घातक ठरू शकतं," असं सुरेश उप्परापल्ली यांनी सांगितलंय.

आपण जे दही, ताक, पनीर, तूप, आईस्क्रीम, मिठाई किंवा दुधाची पावडर वापरतो त्या सगळ्यामध्येच ही भेसळ असू शकते.

यामुळे पोटाचे विकार तर होतातच पण शरीरात जंतूही वाढतात. जर हे असंच चालू राहिलं तर पुढे जाऊन किडनी आणि लिव्हरचे गंभीर आजार मागे लागू शकतात.

दुधात मिसळलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या शरीराला कशा प्रकारे पोखरतात याबद्दल माहिती देताना सुरेश उप्परापल्ली सांगतात की, पाणी मिसळलेलं दूध प्यायल्यानं पचनाचे आणि पोटाचे विकार सुरू होतात.

तर दुधातल्या युरियामुळे आपल्या किडनीवर विनाकारण ताण येतो आणि ती निकामी होण्याचा धोका वाढतो.

जर दुधात डिटर्जंट असेल तर आपल्या आतड्यांना सूज येऊन गॅस्ट्र्रायटिस किंवा गॅसचा भयंकर त्रास होऊ शकतो. त्यात वापरलेलं फॉर्मालिन हे तर एक प्रकारे विषच आहे जे लिव्हर आणि किडनीला गंभीर इजा पोहोचवते.

सावधान! तुम्ही पिताय ते दूध शुद्ध आहे का? अशी ओळखा दुधातील जीवघेणी भेसळ
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दुधाचा घट्टपणा वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टार्चमुळे जुलाब होतात आणि हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर खूपच घातक आहे.

तसेच, हायड्रोजन पेरोक्साईडसारखी रसायने पोटात गेल्यावर पचनाच्या गंभीर समस्या उभ्या राहतात.

दुधात काहीतरी घोळ आहे किंवा भेसळ झालीय, असं जर तुम्हाला थोडं जरी वाटलं, तर ते दूध अजिबात वापरू नका. समजा, कोणाला माहिती नसल्यामुळे त्यांनी ते दूध प्यायलं, तर त्यांना उलट्या, जुलाब किंवा डोकेदुखी असा काही त्रास होतोय का, याकडे नीट लक्ष द्या.

विशेषतः लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांच्या बाबतीत अशी लक्षणं दिसली तर अजिबात वेळ न घालवता लगेच डॉक्टरांकडे जा, असा महत्त्वाचा सल्ला सुरेश उप्परापल्ली यांनी दिला आहे.

त्यांनी पुढे असंही सांगितलं की, "जर तुम्हाला खात्री असेल की, दूध खराब आहे तर ते दूध व्यवस्थित सील करून ठेवा आणि आपल्या भागातील अन्न निरीक्षकाकडे त्याबद्दल तातडीने तक्रार करा."

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोर कृत्यांना "अन्न फसवणूक" (Food Fraud) मानले जाऊ शकते असे त्यांनी सांगितले.

शेवटी भेसळ नसलेलं शुद्ध दूध खरेदी करणं, त्याची गुणवत्ता स्वतः तपासून पाहणं आणि अन्न सुरक्षेबद्दल स्वतःमध्ये जागरूकता निर्माण करणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)