मासिक पाळीच्या रक्तातून कोणत्या आजारांचं निदान होऊ शकतं?

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC
- Author, सँडी ऑन्ग
- Role, बीबीसी फ्युचर
- वाचन वेळ: 8 मिनिटे
मासिक पाळी येणाऱ्या इतर अनेक महिलांप्रमाणेच एमा बॅकलुंड यांनादेखील दर महिन्याला होणाऱ्या रक्तस्त्रावाबद्दल जास्त विचार करायला आवडत नव्हतं.
मात्र 2023 मध्ये नेक्स्टजेन जेन या बायोटेकनं त्यांच्याकडे त्यांच्या पीरियड ब्लडची म्हणजे मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या रक्तस्त्रावातील द्रवाची मागणी केली. त्यावेळेस एमा यांनी कोणत्याही संकोचाशिवाय त्यांच्या एका मासिक पाळीतून 8 टॅम्पॉन एकत्र करून ते कॅलिफोर्नियातील ओकलँडमध्ये असणाऱ्या कंपनीच्या प्रयोगशाळेत पाठवून दिले.
ही नक्कीच एक असामान्य विनंती होती. मात्र यात कोणतीही अडचण नव्हती. यात मदत करून त्यांना आनंदच झाला. विशेषकरून त्यांनी लहानपणी जो त्रास, वेदना सहन केल्या होत्या, तशा वेदनादायक अनुभवातून पुढील मुलींना जावं लागू नये हा हेतू त्यामागे होता.
"मी जेव्हा 11 वर्षांची होती, तेव्हा मला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. त्यावेळेस मला वाटलं होतं की मी मरते आहे," असं अमेरिकेतील मिनेसोटामधील 27 वर्षांच्या पदवीधर विद्यार्थिनी एमा म्हणाल्या.
मासिक पाळीच्या वेदनेबद्दल एमा म्हणाल्या, "मला आठवतं की मी आईला म्हणाली होते की मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. त्यानंतर मला जितक्यांदा मासिक पाळी आली, त्या प्रत्येक वेळेस माझी तीच अवस्था होती."
"मी दर महिन्याला उलट्या करायची. सामाजिक कार्यक्रम, शाळा सर्वकाही बाजूला पडायचं. ती एक जळजळ वाटणारी, टोचल्यासारखं वाटणारी, पोट पिळवटून टाकणारी वेदना होती. ती सतत सुरूच राहायची."
हे एंडोमेट्रियोसिस आहे, हे कळण्यास एमा यांना 13 वर्षे लागली. हा एक जुना आणि अशक्त करणारा आजार असतो. यात गर्भाशयाचे अस्तर तयार करणारी ऊतीची गर्भाशयाच्या बाहेर वाढ होऊ लागते.
एंडोमेट्रियोसिसमुळे जगभरात 19 कोटी महिलांना भरपूर रक्तस्त्राव, ओटीपोटीमध्ये (पेल्विक) असह्य वेदना, मूत्राशय किंवा आतड्याच्या समस्या आणि इतकंच काय वंध्यत्वासारख्या समस्यांना देखील तोंड द्यावं लागतं.
यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे याचं निदान होण्यास सर्वसाधारणपणे 5 ते 12 वर्षे लागतात. एमा यांच्याबाबतीत देखील असंच झालं होतं.
नेक्स्टजेन जेनच्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रिधि तारियाल सांगतात की या आजाराचं निदान करण्यासाठी किंवा त्याची खात्री करून घेण्यासाठी लॅप्रोस्कोपी करावी लागते. ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. यात एक छोटा कॅमेरा उपकरण पेल्विक कॅव्हिटीमध्ये टाकण्यात येतं.
याच कारणामुळे तारियाल आणि इतर काही इनोव्हेटिव्ह स्टार्टअप एक अधिक चांगली निदान पद्धती किंवा चाचणी विकसित करण्याच प्रयत्न करत आहेत. एक अशी चाचणी जी शस्त्रक्रियेपेक्षा खूप स्वस्त, कमी वेदनादायी आणि वेगवान असेल. ही चाचणी फक्त एंडोमेट्रियोसिसच नाही तर, महिलांच्या आरोग्याशी निगडीत इतरही अनेक गोष्टी समोर आणू शकेल.
याचं गुपित पीरियड ब्लड म्हणजे मासिक पाळीच्या रक्तस्त्रावात दडलं असल्याचं त्यांना वाटतं.
वैद्यकशास्त्राची सोन्याची खाण
बॅबिलॉन आणि सुमेरच्या संस्कृतींच्या काळापासून म्हणजे जवळपास 6,000 वर्षांपासून डॉक्टर लघवीचे सॅम्पल तपासत आले आहेत. विष्ठेचे सॅम्पल आणि रक्ताचे सॅम्पल यांचा वैद्यकीय तपासणीमधील समावेश एक किंवा दोन शतकांपूर्वीच झाला.
मात्र पीरियड ब्लडकडे आजपर्यंत कधीही गांभीर्यानं वैद्यकीयदृष्ट्या लक्ष देण्यात आलं नाही. अर्थात हा एक अतिशय गुंतागुंतीचा द्रव असतो.
यातील अर्धा भाग सामान्य रक्त असतो, तर उर्वरित भाग प्रोटीन, हार्मोन, बॅक्टेरिया, एंडोमेट्रियल टिश्यू किंवा ऊती आणि योनी, गर्भाशयाचे मुख, फॅलोपियन ट्युब, अंडाशय (ओव्हरी) आणि इतर भागांमधून निघालेल्या पेशींपासून बनलेलं असतो.
तारियाल म्हणतात, "यातून तुम्हाला असा पेशींचा प्रकार आणि इतर आण्विक माहिती मिळते, जी संपूर्ण रक्त, लाळ किंवा इतर सॅम्पलमधून कधीही मिळत नाही. ही मूलत: एक नैसर्गिक बायोप्सी आहे. जी तुम्हाला प्रजननाशी संबंधित अवयवांची आतील माहिती देते."
नेक्स्टजेन जेन ही त्यांची कंपनी,एमासारख्या व्हॉलंटियर्सना विशेषरित्या डिझाईन करण्यात आलेले कॉटन टॅम्पॉन पाठवते. या कंपनीनं 2014 मध्ये स्थापन झाल्यापासून 330 हून अधिक महिलांच्या 2,000 हून अधिक मासिक पाळीच्या सॅम्पलचं विश्लेषण केलं आहे.

फोटो स्रोत, NextGen Jane
अमेरिकेतील, फाइनस्टीन इन्स्टिट्यूट्स फॉर मेडिकल रिसर्च नॉर्थवेल हेल्थच्या प्रजनन जीवशास्त्रज्ञ क्रिस्टीन मेट्ज सांगतात, "तुम्ही मासिक पाळीच्या रक्ताचा वापर गर्भाशयाशी संबंधित कोणत्याही आजाराची तपासणी करण्यासाठी करू शकतात. आणि ती पुरेशी असते."
मेट्ज यांनी एका दशकाच्याही आधी एंडोमेट्रियोसिसचे बायोमार्कर शोधण्यासाठी पीरियड ब्लडचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. या द्रवातून एंडोमेट्रियल कँन्सर, एडेनोमायोसिस (यात गर्भाशयाचे अस्तर भिंतीच्या आतून वाढू लागतं) आणि एंडोमेट्रायटिस (एंडोमेट्रियल थराची सततची सूज) यासारख्या इतर आजारांबद्दलही काही संकेत मिळू शकतात, याबद्दलही त्यांना आता जाणून घ्यायचं आहे.
त्या म्हणाल्या, "मासिक पाळीच्या वेळेस बाहेर पडणारा द्रव गर्भाशयाच्या आरोग्याबद्दल जाणून घेण्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा दुसरा कोणताही थेट मार्ग आपल्याकडे नाही. हे एक खूपच अनोखं जैविक सॅम्पल आहे."
उदाहरणार्थ, एका संशोधनात मासिक पाळीच्या रक्तात असे 385 प्रोटीन ओळखण्यात आली आहेत, जे इतर शरीरातील कोणत्याही द्रवपदार्थात आढळत नाहीत.
दर महिन्याला उपलब्ध होण्याव्यतिरिक्त पीरियड ब्लडचा आणखी एक मोठा फायदा आहे. तो म्हणजे यातून गर्भाशयाच्या आरोग्याचं संपूर्ण चित्र दिसतं. एंडोमेट्रियल बायोप्सीच्या वेळेस घेण्यात आलेल्या छोट्याशा ऊतीच्या सॅम्पलमधून ते शक्य होत नाही.
मेट्ज म्हणाल्या, "गर्भाशयाचा आकार जवळपास मोसंबीच्या आकाराइतका असतो. त्यामुळे एका छोटाशा बायोप्सीद्वारे तुम्हाला त्याचं संपूर्ण आकलन होत नाही. मात्र मासिक पाळीचा द्रवपदार्थ पूर्णपणे निघून गेलेलं एंडोमेट्रियम असतं."
त्या त्यांच्या संशोधनात व्हॉलंटियर्सकडून मेन्स्ट्रुअल कपद्वारे सॅम्पल गोळा करतात.
विशिष्ट बायोमार्करचा शोध
वैज्ञानिक संशोधनात पीरियड ब्लडकडे प्रदीर्घ काळ दुर्लक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे, ज्यांच्या आधारे विश्वासार्ह वैद्यकीय चाचणी (डायग्नोस्टिक टेस्ट) तयार करता येईल, असे एंडोमेट्रियोसिसचे विशिष्ट बायोमार्कर उपलब्ध आहेत की नाही, हे अजनूही स्पष्ट नाही.
मेट्ज आणि त्यांचे संशोधक सहकारी, जेनेटिसिस्ट पीटर ग्रेगरसन, यांनी आतापर्यंत 3,700 हून अधिक महिलांचा अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत.
मेट्ज म्हणतात, "बराच फरक स्पष्ट दिसून येतो."
सर्वात आधी, एंडोमेट्रियोसिस झालेल्या महिलांमध्ये गर्भाशयातील 'नॅचरल किलर' पेशी खूप कमी असतात. या इम्यून सेल्स म्हणजे रोगप्रतिकारक पेशी गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ एम्ब्रिया इम्प्लांटेशनची प्रक्रिया सोपं करणं, प्लेसेंटाचा विकास आणि संसर्गापासून बचाव करणं.
मेट्ज म्हणतात, "या पेशी प्रजनन क्षमताशी संबंधित असतात आणि त्यांचं प्रमाण कमी होणं चांगली गोष्ट नसते."
त्यांच्या टीमला स्ट्रोमल फायब्रोब्लास्ट पेशींमध्ये देखील एक महत्त्वाचा फरक दिसून आला. या पेशी प्रत्येक मासिक पाळीनंतर गर्भाशयातील अस्तराची दुरुस्ती आणि पुनर्निमिती करण्यात मदत करतात.
जेव्हा एंडोमेट्रियोसिस असतो, तेव्हा या पेशींमध्ये सूजेशी संबंधित मार्कर अधिक दिसतात. तसंच ज्या बदलांमुळे गर्भाशयाला गर्भावस्थेसाठी तयार केलं जातं, असे बदल करण्याची त्यांच्यातील क्षमता कमी होते.

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि वारंवार गर्भपात होणं, यासारख्या इतर समस्यांशीदेखील याचा संबंध आढळून आला आहे.
मेट्ज यांच्या लॅबला असंही आढळलं की एंडोमेट्रियोसिस झालेल्या रुग्णांमध्ये काही जनुकांचं वर्तन म्हणजे त्यांच्या सक्रिय होण्याची पद्धत बदलते.
या सर्व फरकांना एकत्र करून पाहिल्यास असं दिसतं की डॉक्टर एका पर्यायी, कमी वेदनादायी चाचणीसाठी ज्यांचा शोध घेत असतील, त्याचेच हे संकेत आहेत. हीच चाचणी पीरियड ब्लडच्या विश्लेषणावर आधारित एंडोमेट्रियोसिसच्या निदानाची नवीन पद्धत होऊ शकते.
मेट्ज यांनी आशा व्यक्त केली की त्या 2027 मध्ये घरात वापर करता येऊ शकणाऱ्या डायग्नोस्टिक किटसाठी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाची मंजूरी घेण्यासाठी अर्ज करू शकतील.
दुसऱ्या बाजूला, नेक्स्टजेन जेनचे संशोधक मासिक पाळीच्या रक्तातून मेसेंजर आरएनए (एमआरएनए) काढून त्याचं सीक्वेंसिंग करत आहेत. जेणेकरून एंडोमेट्रियोसिसच्या विशिष्ट बायोमार्करची ओळख पटवता येईल.
आतापर्यंत त्यांनी असे काही बायोमार्कर शोधले आहेत, ज्यांच्याबद्दल त्यांना वाटतं की यामुळे वंध्यत्वाला तोंड देत असलेल्या महिलांमधील एंडोमेट्रियोसिस आणि सामान्य प्रकरणांमधील फरक विश्वासार्हपणे लक्षात येऊ शकतो.
या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी अमेरिकेत एंडोमेट्रियोसिस झालेल्या शेकडो महिलांवर आधारित एक व्यापक अभ्यास सध्या सुरू आहे, असं तारियाल म्हणाल्या.
वंध्यत्वाला तोंड देत असलेल्या रुग्णांमध्ये मासिक पाळीवर आधारित एंडोमेट्रियोसिस टेस्टचं क्लिनिकल व्हॅलिडेशन म्हणजे वैद्यकीय खातरजमा करता यावी यासाठी मे 2025 मध्ये नेक्स्टेजेन जेनला 22 लाख डॉलरची (जवळपास 20 कोटी 36 लाख रुपये) ग्रँट म्हणजे अनुदान मिळालं.
फक्त प्रजननाच्या आरोग्यापुरतं मर्यादित नाही
मात्र पीरियड ब्लडचा उपयोग फक्त एंडोमेट्रियोसिसपर्यंतच मर्यादित नाही. उदाहरणार्थ, नेक्स्टजेन जेनच्या कामामुळे गर्भाशयाचं आरोग्य आणि वय वाढणं यामधील रंजक संबंधदेखील समोर आला आहे.
तारियाल म्हणतात, "हा सुरुवातीच्या टप्प्यातील डेटा आहे," मात्र शरीरात एस्ट्रोजनचं प्रमाण कमी होण्याचा - जी वय वाढण्याची एक व्याख्या आहे - आणि मासिक पाळी यामध्ये स्पष्टपणे एक संबंध किंवा ट्रेंड दिसून येतो.
मासिक पाळीच्या रक्तामुळे एक दिवस हायपो किंवा हायपरथायरॉयडिझम सारख्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजारांचं निदान करण्यात मदत होऊ शकते. यात थायरॉईड ग्रंथी, चयापचयाची क्रिया नियंत्रित करणाऱ्या हार्मोनची (थायरोक्सिन आणि ट्रायआयोडोथायरोनिन) निर्मिती अधिक प्रमाणात करतात किंवा खूप कमी प्रमाणात करतात, असंही त्यांच्या निरीक्षणातून आढळलं.
"सर्वसाधारणपणे एंडोमेट्रियोसिस झालेल्या लोकांमध्ये अनेकदा ऑटोइम्यूनची कोणती तरी स्थिती देखील असते," असं तारियाल म्हणाल्या.
संपूर्ण मासिक पाळीच्या वेळेस शरीर सूजेपासून कोणताही व्रण न सोडता जखम भरून निघण्याच्या अवस्थेतून जातं. त्यामुळे पीरियड ब्लडचा अभ्यास रूमेटोईड अर्थरायटिस, ल्युपस आणि मल्टीपल स्क्लेरोसिस सारख्या सूज आणि रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजारांसाठी एका नवीन मॉडेल सिस्टमप्रमाणे उपयुक्त ठरू शकतो, असं तारियाल म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
मासिक पाळीच्या रक्त मधुमेहाचं निदान करण्यामध्येही उपयुक्त असल्याचं दिसून आलं आहे. कॅलिफोर्नियातील क्यूविन या स्टार्टअपच्या संशोधकांना 2021 आणि 2024 च्या संशोधनामध्ये आढळलं की पीरियड ब्लडमध्ये मोजण्यात आलेलं रक्तातील साखरेचं सरासरी प्रमाण शरीरातील एकूण रक्तातील साखरेची पातळी विश्वासार्हपणे दाखवते.
त्यांच्या निष्कर्षांमुळे 2024 मध्ये आधी आणि आतापर्यंत मेनस्ट्रुअल ब्लड शुगर हेल्थ टेस्ट या एफडीए-मंजूर एकमेव चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हा एक सॅनिटरी नॅपकिन असतो. त्याला क्यू-पॅड म्हणतात. यात एक काढता येणारी स्ट्रिप असते. त्यावर रक्त गोळा केलं जातं. त्यानंतर युजर त्याला विश्लेषणासाठी क्यूविनच्य लॅबमध्ये पाठवू शकतात.
थायलंडमध्ये 2022 मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनाद्वारे क्यूविननं हेदेखील दाखवलं की त्यांच्या विशेष पॅड-पद्धतीद्वारे घेण्यात आलेले सॅम्पल, ह्यूमन पॅपिलोमावायरस (एचपीव्ही) च्या उच्च जोखमीच्या स्ट्रेनची ओळख पटवण्यात पारंपारिक पॅप स्मीयरच्या तुलनेत चांगले असल्याचं दिसून आलं आहे. एचपीव्हीमुळे व्यक्तीला सर्व्हाईकल कॅन्सर होण्याचा धोका असतो.
या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी अमेरिकेत व्यापक स्तरावर एक ट्रायल किंवा चाचणी सुरू आहे.
या वर्षी सुरू होत असलेल्या ट्रायलमध्ये, या गोष्टीची देखील तपासणी केली जाईल की क्यू-पॅडचा वापर, क्लॅमायडिया आणि गोनोरियासारख्या लैंगिक संसर्गांच्या स्क्रीनिंगसाठी देखील केला जाऊ शकतो, असं क्यूविनच्या को-सीईओ मॅड्स लिलेलुंड म्हणतात.
लिलेलुंड यांना यापुढे, आरोग्याशी निगडीत मार्कर्स, उदाहरणार्थ, थायरॉईड आणि प्रजननासाठीचे हार्मोन, सूजेशी संबंधित मार्कर आणि इतकंच काय, सार्स-सीओव्ही-2 संदर्भात रोगप्रतिकार शक्तीची प्रतिक्रिया दर्शविणाऱ्या अँडीबॉडीबाबत काम पुढे नेण्याची आशा आहे.
याचप्रकारे, बर्लिनमधील दब्लड हे स्टार्टअप सध्या एका अशा टेस्ट किटचं प्रमाणीकरण करतं आहे, ज्याची एंडोमेट्रिोसिस, वेळेआधीच येणारी रजोनिवृत्ती, पीसीओएस आणि प्रजननाशी संबंधित समस्यांची पूर्वसूचना देण्यास मदत होऊ शकेल.
मासिक पाळीची क्रांती
याप्रकारची प्रगती होऊनदेखील, पीरियड ब्लडबाबत अजूनही बरंच रहस्य आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आणि याबाबत अनेक संशोधक सहमत आहेत, की आपण आतापर्यंत यामध्ये असणाऱ्या सर्व घटकांची ओळख पटवू शकलेलो नाही. मासिक पाळीच्या प्रक्रियेच्या वेळेस हे घटक किती वेगानं बदलतात हेदेखील आपण समजू शकलेलो नाही.
संशोधन अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. तसंच सांस्कृतिकदृष्ट्या निषिद्ध असणं किंवा प्रतिबंधित असणं याच्याशी निगडीत आहे. ते देखील एक मोठं कारण आहे.
"हा एक निषिद्ध किंवा टाळायचा विषय आहे, यावर बोलायचं देखील नाही, ही गोष्ट लहानपणापासून आपल्या मनात बिंबवण्यात आली आहे," असं मेट्ज म्हणतात.
वैद्यकीय संशोधनात ऐतिहासिकदृष्ट्या पुरुषांच्या विषयांकडे असणारा कल आणि महिलांच्या आरोग्यावरील संशोधनासाठी निधीची कमतरता यामुळे हा विषय आणखी गुंतागुंतीची बनला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक संशोधन अँड विकासासाठीच्या (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) निधीमध्ये 2020 मध्ये महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या संशोधन फक्त 5 टक्के होतं.
लिलेलुंड म्हणतात, "बहुतांश औषधांच्या बाबतीतील संशोधन मुख्यत: पुरुषांवर, संभाव्यपणे श्वेतवर्णीय पुरुषांवर, करण्यात आलं आहे. यात लैंगिक वैविध्य नाही आणि जातीय वैविध्यदेखील नाही. एंडोमेटेरियोसिसच्या तुलनेत पुरुषांच्या टकलावरील गोष्टींसाठी जास्त पैसा खर्च होतो."
एंडोमेट्रियोसिस आणि गर्भाशयाशी संबंधित समस्यांच्या दैनंदिन वेदनांना सामोरं जाणाऱ्या बॅकलुंड यांच्याप्रमाणे अनेक महिला, म्हणतात की असं संशोधन अनेक वर्षांपूर्वीच व्हायला हवं होतं.
बॅकलुंड म्हणतात, "मासिक पाळीच्या वेळच्या वेदना सहन करणं आणि प्रत्येक वेळेस हाच विचार करणं की माझ्या बाबतीत काय चुकीचं घडतं आहे, हा खूपच एकटेपणाचा आणि एकाकीपणाचा अनुभव होता."
जर पीरियड ब्लडवर काम करणाऱ्या संशोधकांना यात यश आलं आणि त्यांना एक कमी वेदनादायी डायग्नोस्टिक टूल बनवण्यात यश आलं, तर आगामी पिढीतील मुलींवर लगेच उपचार होऊ शकतील, अशी आशा केली जाऊ शकते, असं त्या म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











