गॅस बिल स्कॅम: 'बिल भरा नाही तर कनेक्शन कट होईल,' महानगर गॅसचे नाव सांगून असा होतोय स्कॅम

महानगर गॅसच्या नाव सांगून फसवणूक होत आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महानगर गॅसच्या नाव सांगून फसवणूक होत आहे (महानगर गॅसच्या कार्यालयाचे संग्रहित छायाचित्र)
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"मला फोन आला की तुमचं गॅस बिल भरायचं आहे, ते भरून घ्या नाहीतर कनेक्शन कट होईल. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर एक लिंक आली आणि 'गॅस बिल अपडेट' नावाची एपीके (APK) फाइल पाठवण्यात आली. मी ती फाइल उघडली आणि काही वेळातच माझ्या खात्यातून पैसे कट झाल्याचे मेसेज येऊ लागले. बघता बघता माझ्या खात्यातून 4 लाख 18 हजार रुपये कट झाले."

मुंबईतील बोरीवली परिसरात राहणाऱ्या सतीश अमरगोंडा सांगत होते.

इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असताना सायबर स्कॅमर याचा गैरफायदा घेत असल्याचं दिसत आहे.

मुंबईत गॅस कनेक्शन कापले जाण्याची भीती दाखवून सतीश यांच्याप्रमाणेच गेल्या पंधरा दिवसांत विविध पोलीस ठाण्यांत 11 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच आतापर्यंत 48 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद आहे.

या प्रकरणांनुसार मुंबई पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, महानगर गॅस लिमिटेडकडून ग्राहकांना बनावट संदेश, फसवणूक करणाऱ्या लिंक्स आणि एपीके डाउनलोड्स यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत फसवणुकीचे सत्र वाढले

मुंबई पोलिसांत दाखल तक्रारीनुसार 7 मार्च रोजी मुंबईच्या बोरीवली (पश्चिम) परिसरात राहणाऱ्या सतीश मल्लप्पा अमरगोंडा या 36 वर्षीय व्यक्तीची सायबर स्कॅमर्सनी 4 लाख 18 हजार 320 रुपयांची फसवणूक केली.

7 मार्च 2026 रोजी सायंकाळी सतीश यांना एका अज्ञात क्रमांकावरून गॅस बिल भरण्यासाठी फोन आला. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर 'gas bill update.apk' नावाची फाइल पाठवण्यात आली. ही फाइल डाउनलोड करून उघडताच सतीश यांच्या बँक खात्यातून आणि क्रेडिट कार्डमधून टप्प्याटप्प्याने पैसे कापले गेल्याचे मेसेज येऊ लागले.

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवून पोलीस तपास करत आहेत.

गॅस पाइपलाइन ( प्रतीकात्मक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गॅस पाइपलाइन ( प्रतीकात्मक छायाचित्र)

बोरीवलीतील या प्रकरणासारखेच गेल्या 15 दिवसांत मुंबईतील विक्रोळी, नेहरू नगर, पार्कसाईट, साकीनाका, सांताक्रूज, विलेपार्ले, काळाचौकी आणि वडाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत.

या सर्व प्रकरणांत मिळून मुंबईकरांचे एकूण 26 लाख 43 हजार रुपये लुटले गेल्याची नोंद आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील आरोपींचा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध घेत आहेत.

तपास सुरू असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

या फसवणुकीच्या संदर्भात माहिती देताना बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सस्ते म्हणाले की, फिर्यादीच्या तक्रारीनुसार बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'गॅसचे बिल भरा अन्यथा कनेक्शन कट होईल,' अशी भीती दाखवून व्हॉट्सअ‍ॅपवर एपीके फाइल पाठवण्यात आली होती. तक्रारदाराने ती फाइल उघडल्यानंतर त्यांच्या खात्यातील पैसे कट झाले. या प्रकरणाचा तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू आहे.

ते पुढे म्हणाले की नागरिकांनी कोणत्याही प्रकारची एपीके फाइल किंवा अनोळखी फाइल उघडू नये. अशा फाइल्समुळे सायबर गुन्हेगार तुमची फसवणूक करू शकतात.

महानगर गॅस लिमिटेडकडून सतर्कतेचा इशारा

या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेडने (MGL) आपल्या ग्राहकांसाठी तातडीच्या सूचना जारी केल्या आहेत.

कंपनीने म्हटलं आहे की घोटाळेबाज स्वतःला एमजीएलचे प्रतिनिधी असल्याचं भासवून ग्राहकांना गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवत आहेत.

ग्राहकांना संशयास्पद लिंक्सवर क्लिक करण्यास किंवा एपीके फाइल्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त केलं जात आहे.

मुंबईच्या घाटकोपर येथील एका हॉटेलवर पाटी लावण्यात आलीय. 'एलपीजी गॅस नसल्याने हॉटेल बंद' ठेवण्यात आल्याची ही पाटी आहे. 11 मार्च 2026 रोजीचा हा फोटो. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक रेस्टाॅरंट बंद करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Satish Bate/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईच्या घाटकोपर येथील एका हॉटेलवर पाटी लावण्यात आलीय. 'एलपीजी गॅस नसल्याने हॉटेल बंद' ठेवण्यात आल्याची ही पाटी आहे. 11 मार्च 2026 रोजीचा हा फोटो. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक रेस्टाॅरंट बंद करण्यात आले आहेत.

एमजीएलने प्रेस नोटमध्ये स्पष्ट केलं आहे की -

• कंपनी कधीही फोन करत नाही, एसएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरून ओटीपी, कार्ड नंबर किंवा पासवर्ड मागत नाही.

• ग्राहकांनी कोणत्याही परिस्थितीत अनोळखी व्यक्तीने पाठवलेली एपीके फाइल मोबाइलमध्ये इन्स्टॉल करू नये.

• संशयास्पद कॉल आल्यास अधिकृत क्रमांक (022) 68674500 वर संपर्क साधावा.

• एमजीएलचा अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक +91 98992 03843 असून त्याला ब्लू टिक आहे, याची खात्री करावी.

काय असते एपीके फाइल?

सायबर स्कॅमर्स व्हॉट्सअ‍ॅपवर 'Gas Bill Update.apk' सारख्या नावाच्या फाइल्स पाठवतात. एकदा ही फाइल डाउनलोड करून इन्स्टॉल केली की तुमच्या मोबाइलचा ताबा हॅकर्सकडे जाऊ शकतो.

याद्वारे ते तुमचे मेसेज (OTP) वाचू शकतात आणि बँक खात्यांमधून पैसे काढण्याचा प्रयत्न करू शकतात.

या संदर्भात सायबर तज्ज्ञ सचिन रास्ते म्हणाले की सध्या 'रिमोट अ‍ॅक्सेस स्कॅम' मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गॅस बिल किंवा वीज बिलाच्या नावाखाली पाठवल्या जाणाऱ्या एपीके फाइल्स हे एक प्रकारचे सॉफ्टवेअर असते जे फोनमधील गुप्त माहिती चोरते.

त्यामुळे अशा एपीके फाइल्स उघडू नयेत. कोणत्याही परिस्थितीत प्ले स्टोअर व्यतिरिक्त इतर ठिकाणांहून अ‍ॅप डाउनलोड करू नयेत. अधिकृतरीत्या महानगर गॅसच्या वेबसाइटचा वापर करावा.

देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. (संग्रहित )

जर तुमची फसवणूक झाली तर तत्काळ 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [www.cybercrime.gov.in] (http://www.cybercrime.gov.in) वर तक्रार नोंदवावी.

महानगर गॅस लिमिटेड ही मुंबईतील 30 लाखांहून अधिक घरांना गॅस पुरवठा करणारी मोठी संस्था आहे.

सध्या एलपीजी गॅसच्या परिस्थितीचा आणि मोठ्या ग्राहकवर्गाचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या वापरत असल्याचं दिसून येत आहे.

एफआयआर कॉपी आणि पोलिसांची प्रतिक्रिया मुंबई पुणे ग्रुपवर टाकली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.