GLP‑1 औषधे वजन कमी करण्यासाठी खरोखर किती उपयोगी? तज्ज्ञांची माहिती

फोटो स्रोत, Getty Images
भारतामध्ये स्थूलता, टाइप‑2 डायबेटीस आणि मेटाबॉलिक आजार वेगाने वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर GLP‑1 औषधे (Semaglutide, Tirzepatide) आणि Peptide Therapy ही वजन कमी करणे, इन्शुलिन रेझिस्टन्स सुधारणा, फॅटी लिव्हर कमी करणे आणि हार्मोन्स संतुलित ठेवणे यासाठी प्रभावी उपचार म्हणून पुढे येत आहेत.
GLP‑1 मेंदूला तृप्ती संकेत देऊन भूक कमी करतात, रक्तातील साखर स्थिर ठेवतात आणि एक वर्षात 15–25% पर्यंत वजन कमी करण्यात मदत करू शकतात. पेप्टाइड्स शरीरातील सिग्नलिंग पाथवेमध्ये सुधारणा करुन निद्रा, संप्रेरक संतुलन, त्वचेची दुरुस्ती आणि स्नायूमान दुरुस्तीसाठी मदत करतात.
मात्र दोन्ही उपचारांसाठी तज्ज्ञांची मार्गदर्शन, बेसलाइन तपासण्या आणि सुरक्षिततेची काळजी आवश्यक आहे. भारतात अनेक कंपन्यांच्या नव्या फॉर्म्युलेशन्समुळे GLP‑1 ची उपलब्धता वाढत असून किमतीही कमी होत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात टाइप–2 डायबेटीस, स्थूलता, इन्शुलिन रेझिस्टन्स आणि फॅटी लिव्हर यांचे प्रमाण मागील दोन दशकांत कोणत्याही देशापेक्षा वेगाने वाढले आहे.
वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनच्या अहवालानुसार, " 2035 पर्यंत भारतातील प्रत्येक चार लोकांपैकी एकाचं वजन गरजेपेक्षा जास्त असेल किंवा त्याला लठ्ठपणा असेल." याचाच अर्थ मेटाबॉलिक म्हणजेच चयापचयासंबंधित आजारांची संख्या आणि रुग्णांची संख्या वाढत नसून अनेकांना यामुळे होणाऱ्या गुंतागुंतीच्या त्रासदायक स्थितीचा आयुष्यभर सामना करावा लागू शकतो.
या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत GLP‑1 agonists आणि therapeutic peptides ही संकल्पना वैद्यकीय जगात वेगाने पुढे आली आहे. पूर्वी वजन कमी करणे म्हणजे केवळ डाएट आणि व्यायाम असे समीकरण होते.
परंतु अनेकांच्या शरीराची जौविक रचना एवढी गुंतागुंतीची आहे की, केवळ जीवनशैलीचे बदल पुरेसे ठरत नाहीत असं काहींना वाटतं.. म्हणूनच GLP‑1 आणि peptide therapy ही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली नवी दिशा ठरत आहे. अर्थात यातील अनेक गोष्टी अजूनही क्लिनिकल ट्रायल टप्प्यावर आहेत.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबईचे एन्डोक्रिनोलॉजिस्ट आणि डायबेटॉलॉजिस्ट डॉ. व्यंकटेश शिवणे सांगतात, "काही लोकांचं वजन वाढण्याचं मूळ कारण मेटाबॉलिजमच असतं. अशी जैविक समस्या असताना फक्त कॅलरी कमी करणं किंवा जिम करणं पुरेसं ठरत नाही. GLP‑1 आणि peptide therapy शरीरातील 'सिग्नलिंग पाथवे'च दुरुस्त करतात."
पेप्टाइड म्हणजे काय? शरीरात त्यांची भूमिका कोणती?
पेप्टाइड्स म्हणजे अमिनो ॲसिड्सची 20 ते 80 युनिट्स असलेली छोटी साखळी. ही शरीरातील संदेशवाहक साखळी असते. प्रथिनांचे हे लहान तुकडे आपल्या पेशींना 'कधी काय करायचं' हे सांगतात. त्यामुळे शरीराची वाढ, चयापचय, प्रतिकारक्षमता, क्षती भरुन काढणे, निद्रा अशा जवळपास प्रत्येक जैविक प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असतो.
इन्शुलिन हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा पेप्टाइड हार्मोन मानला जातो. गेल्या 100 वर्षांपासून आपण मधुमेहाच्या उपचारांसाठी वापरत असलेले इन्सुलिन हे अत्यावश्यक पेप्टाइड संप्रेरक आहे. त्याचप्रमाणे ग्रोथ हार्मोन, एलएच, एफएसएच ही सर्व पेप्टाइड्सवर आधारित हार्मोन्स आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. शिवणे सांगतात, "आपल्या शरीरातील संकेतांचे मार्ग नीट काम करावेत यासाठी पेप्टाइड्स अत्यावश्यक आहेत. आज थेरपीमध्ये वापरले जाणारे बायो- इन्जिनियर्ड पेप्टाइड्स हे अगदी नैसर्गिक पेप्टाइड्स सारखंच काम करतात, पण अधिक विशिष्ट लक्ष्यकेंद्रित (specific target oriented) असतात."
आज थेराप्टिक पेप्टाइडस ही मेटॅबोलिजम, झोप सुरळीत करणे, स्नायूंची क्षती भरुन काढणं, त्वचेची दुरुस्ती तसेच अँटी एजिंग अशा अनेक बाबतीत वापरली जात आहेत. मात्र ती अजूनही क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर असल्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय त्यांचा वापर योग्य नाही.
GLP‑1 म्हणजे काय? भूक, साखर आणि वजन यावर ते कसं नियंत्रण ठेवतं?
GLP‑1 (Glucagon Like Peptide‑1) ही आतड्यातून स्रवणाऱ्या संप्रेरकांप्रमाणे काम करतात. ती जेवणानंतर मेंदूला "पोट भरलं आहे" असा सिग्नल देतात आणि नैसर्गिकरीत्या भूक कमी करतात. फक्त भूक कमी होत नाही तर त्यामुळे
• पॅनक्रियाजमधून योग्य वेळी इन्शुलिन स्रवते
• लिव्हरमध्ये glucose production कमी होते
• पोट रिकामे होण्याचा वेग मंदावतो
या सर्व परिणामांचा एकत्रित फायदा म्हणजे रक्तातील साखर स्थिर राहते आणि हळूहळू वजन कमी होऊ लागते.

फोटो स्रोत, Getty Images
पूर्वी GLP‑1 ॲग्नोईस्टस (Liraglutide, Semaglutide, Tirzepatide) केवळ टाइप-2 डायबेटिस साठी वापरली जात होती. पण डॉक्टरांच्या लक्षात आलं की रुग्णांचे वजनही सातत्याने कमी होत आहे. त्यानंतर स्वतंत्र क्लिनिकल ट्रायल्स घेण्यात आली आणि आज या औषधांना जगभरात लठ्ठपणावरील उपचारांसाठी मान्यता मिळाली आहे.
मुंबईतील कोकिलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल येथील एंडोक्रिनॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. धीरज कपूर यांनी बीबीसी मराठीला याबाबत अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, GLP-1 हे आतड्यातील संप्रेरकांप्रमाणे काम करतात. ती भूक कमी करतात, पोट सावकाश रिकामं होईल याची काळजी घेतात आणि इन्शुलिन नियंत्रित करतात. यासर्वाचा परिणाम एकत्रितरित्या होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
GLP‑1 औषधं एवढ्या वेगाने लोकप्रिय का झाली?
गेल्या पाच वर्षांत GLP‑1 थेरपीने वजन कमी करण्याच्या क्षेत्रात एकप्रकारे क्रांती घडवली आहे. कारण क्लिनिकल ट्रायल्समध्ये दिसलेले परिणाम अत्यंत प्रभावी आहेत.
इतकं वजन कमी करणारं, सुरक्षितता दाखवणारं आणि मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही साठीही उपयोगी ठरणारं औषध पूर्वी उपलब्ध नव्हतं.
याशिवाय GLP‑1 औषधांचे इतर फायदेही आहेत
- हृदयविकाराचा धोका कमी होतो
- कोलेस्टेरॉल व इन्फ्लेमेशनमध्ये घट
- फॅटी लिव्हरचे प्रमाण कमी होते
- पीसीओएस मध्ये सुधारणा होते
हे सर्व प्रभाव लक्षात घेतल्यावर GLP‑1 उपचार पद्धती ही फक्त वजन कमी करायचं इंजेक्शन म्हणून राहात नाही तर ती चयापचय सुधारण्याची एक पद्धतीच बनते.
भारतामध्ये GLP‑1 इतक्या वेगाने का वाढलं?
भारतामध्ये पोटावरील अवयवांवर जास्त मेद असणं आणि स्नायूमान (muscle mass) असणं ही मोठी समस्या आहे. त्यामुळे कमी वजन असलेल्या (BMI < 27) अनेक भारतीयांना डायबेटीस किंवा फॅटी लिव्हर होतो. चयापचयाची अशी शरीररचना असलेल्या स्थिती GLP‑1 थेरपी मोठा फरक घडवते.
डॉ. शिवणे सांगतात,"भारतीय रुग्णांमध्ये GLP‑1 ची पातळी नैसर्गिकरीत्या कमी आढळते. त्यामुळे भूक वाढते, साखर वाढते आणि वजन वाढतं. GLP‑1 थेरपी या मूळ समस्येलाच लक्ष्य करते."
तसेच भारतातील GLP‑1 औषधांची मागणी वाढण्यामागे आणखी एक कारण म्हणजे आता भारतातील 20–40 कंपन्या Semaglutide सारखी सूत्रिकरणं (formulations) बाजारात आणत आहेत. त्यामुळे खर्च कमी होईल आणि उपलब्धता वाढेल.
पेप्टाइड थेरपी आणि जीएलपी-1 थेरपी यात काय फरक?
डॉ. धीरज कपूर सांगतात, "लठ्ठपणा, मधुमेह किंवा चयापचयाचे आजार असले तर GLP-1 हा महत्त्वाचा उपचार मानला जातो. आणि पेप्टाइड्स हे विशिष्ट गोष्टींसाठी म्हणजे स्नायूंची क्षती भरुन काढणे, संप्रेरकांचे संतुलन साधणं, किंवा अँटि एजिंग गोष्टीसाठी वापरले जातात."
थोडक्यात
- जीएलपी-1 - मेटाबॉलिक आजार असलेल्या रुग्णांसाठी
- पेप्टाइड्स- विशिष्ट ध्येयं (हानी भरुन काढणं, निद्रा, त्वचा, संप्रेरकं)
दोन्ही थेरपी एकत्र वापरता येतात, पण योग्य रुग्णांची निवड आणि तज्ज्ञ मार्गदर्शन आवश्यक आहे.
उपचार सुरू करण्यापूर्वी कोणत्या तपासण्या आवश्यक?
हे दोन्ही उपचार सुरू करण्यापूर्वी बेसलाइन हेल्थ मॅपिंग गरजेचं आहे.
• फास्टिंग शुगर, एचबीए1सी
• लिपिड प्रोफाइल
• यकृत आणि मूत्रपिंडाचं कार्य
• थायरॉईड संप्रेरक
• जीवनसत्वांची पातळी
• अमायलेज-लायपेज (स्वादुपिंडाच्या सुरक्षिततेसाठी)
• पित्ताशयाची सोनोग्राफी
या तपासण्या रुग्णासाठी उपचार योग्य आहेत का? हे सांगतात.
या औषधांचे साइड इफेक्ट्स?
GLP‑1 औषधांचे सर्वाधिक सामान्य दुष्परिणाम पचनसंस्थेशी संबंधित असतात. उपचाराच्या पहिल्या काही आठवड्यांत मळमळ, उलटी, पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा वारंवार शौचाला जावं लागणं असे त्रास जाणवू शकतात. आम्लपित्त किंवा फोट फुगल्यासारखं, भरल्यासारणं जाणवणेही सामान्य आहे.
कारण पोट रिकामे होण्याचा वेग कमी झाल्याने मेंदूतील तृप्ती संकेत (स बदलतो. शरीर औषधाला सरावल्यावर हे त्रास साधारण 10–12 आठवड्यांत कमी होतात.
• स्वादुपिंडाचा दाह pancreatitis
• पित्ताशयाचा दाह gallbladder inflammation
म्हणूनच डॉ. शिवणे सावधगिरी सांगतात, "स्वतःहून GLP‑1 इंजेक्शन्स सुरू करणं धोकादायक आहे. काही लोकांना पहिल्या महिन्यातच इतका त्रास होतो की औषधे बंद करावी लागतात."
पीसीओएस, फॅटी लिव्हर आणि वंध्यत्व यावर GLP‑1 किती उपयोगी?
GLP‑1 उपचारांचा अप्रत्यक्ष फायदा पीसीओएस मध्ये खूप मोठा आहे. पीसीओएसमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स जास्त असल्याने मासिक पाळी अनियमित होतात. GLP‑1 इन्शुलिन सुधारतो आणि वजन कमी करतो, त्यामुळे हार्मोन्स स्थिरावतात आणि मासिक पाळी नियमित होऊ लागतात.

फोटो स्रोत, Getty Images
फॅटी लिव्हर मध्ये GLP‑1 औषधे पोटाच्या अवयवांवरील मेद कमी करून यकृतावरील मेदाचं प्रमाण घटवतात.
काही महिलांमध्ये या थेरपीमुळे प्रसवशक्तीच्या (फर्टिलिटी) स्थितीत सुधारणा, अंडोत्सर्ग (ओव्ह्युलेशन) सुधारण्याचे परिणाम दिसून आले आहेत. मात्र गर्भधारणेदरम्यान GLP‑1 औषधे पूर्णपणे निषिद्ध आहेत.
महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा
GLP‑1 थांबवल्यानंतर वजन वाढू शकते असं काही अभ्यासातून दिसून आलं आहे.
कारण औषधाने भूक कमी होते, पण चयापचय बदलण्यासाठी जीवनशैलीत बदल आवश्यक असतात.
डॉ. कपूर म्हणतात, "औषधं शरीराची रसायनं सुधारतात, पण भविष्यातलं आरोग्य तुमच्या जीवनशैलीच्या सवयी ठरवतात. दोन्ही गोष्टी एकत्र केल्याशिवाय दीर्घकालीन वजनकपात शक्य नाही."
आगामी काही वर्षांत भारतातील GLP‑1 आणि पेप्टाइड थेरपी आणखी चर्चेत राहातील. Indian GLP‑1 formulations आल्यावर किंमती कमी होतील. लठ्ठपणाला ला वैद्यकीय आजार म्हणून स्वीकारण्याचं प्रमाण वाढेल तसेच स्पोर्ट्स मेडिसिन, अँटि एजिंग, क्षती भरुन काढणे अशा बाबतीत पेप्टाइडचा वापर वाढेल असं डॉक्टर सांगतात. शहरीकरण वाढलेल्या भागांमध्ये मेटाबॉलिक केअर ही स्वतंत्र वैद्यकशाखाच होईल असं डॉक्टरांना वाटतं.
डॉ. शिवणे शेवटी म्हणतात, "लहान वयातच स्थूलता वाढत आहे. भारताची भावी पिढी निरोगी राहण्यासाठी योग्य आहार आणि चांगल्या सवयींची सुरुवात बालपणापासून झाली पाहिजे."
डॉ. धीरज कपूर सांगतात, "या उपचारांचा वापर पुढील काही वर्षांत निश्चितच वाढणार आहे. कारण स्थूलतेकडे आता वैयक्तिक कमकुवतपणा म्हणून नव्हे तर एक वैद्यकीय आजार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त डॉक्टर रुग्णांच्या उपचारयोजनांमध्ये औषधांची मदत घेण्याचा विचार करू लागले आहेत. संशोधन झपाट्याने पुढे जात आहे, नियम व धोरणांमध्ये बदल होत आहेत आणि रुग्णांची जागरूकताही वाढत आहे. मात्र या उपचारांचा व्यापक वापर करताना एकच मोठे आव्हान कायम राहते, ते म्हणजे हे सर्व योग्य वैद्यकीय तपासणी आणि तज्ज्ञांच्या देखरेखीशिवाय होऊ नये."

फोटो स्रोत, Getty Images
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, उपचार घ्यायचे असतील, औषधं घ्यायची असतील, शस्त्रक्रिया करायची असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)





























