दक्षिण आफ्रिका 6 बाद 164, सुरुवातीला विकेट्स पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनी डाव सावरला

दुसऱ्या ओव्हरमध्ये क्विंटन डी कॉकची विकेट घेतल्यानंतर जल्लोष करताना जसप्रीत बुमराह.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुसऱ्या ओव्हरमध्ये क्विंटन डी कॉकची विकेट घेतल्यानंतर जल्लोष करताना जसप्रीत बुमराह.
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज (22 फेब्रुवारी) भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान सुपर-8 फेरीतील हाय-व्होल्टेज टी-20 सामना खेळला जातोय. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या 6 विकेटच्या मोबदल्यात 160 धावा झाल्या.

दक्षिण आफ्रिकेनी टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे 20 धावांवर तीन फलंदाज बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेचा डाव सांभाळला.

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी सुरुवातीलाच जोरदार गोलंदाजी केली.

दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी सामन्याच्या 10 व्या चेंडूवर आपला पहिला चौकार मारला. पण पुढच्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने डी कॉकला बाद करून भारताला पहिला विजय मिळवून दिला.

पुढच्या षटकात अर्शदीपनेही शानदार कामगिरी केली आणि तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार मार्करमची विकेट घेतली. त्यानंतर रायन रिकलटनची विकेट पडली.

तीन विकेट पडल्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांनी चांगली भागीदारी केली. मिलरने 35 बॉलमध्ये 63 धावा केल्या आणि आफ्रिकेचा रनरेट सुधारला. वरुण चक्रवर्तीच्या बॉलवर तिलक वर्माने मिलरची कॅच घेतली.

हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जातोय. सुपर-8 फेरीतील भारताचा हा पहिलाच सामना आहे.

या दोन्ही संघांनी मागील विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. भारताने 2024 सालचा टी-20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जिंकला होता.

दरम्यान, आजच्या सामन्यात उपकर्णधार अक्षर पटेल संघाबाहेर असल्याचं कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे.

'अ' गटातील चारही सामने जिंकून जेतेपदाची दावेदारी बळकट करणाऱ्या टीम इंडियापुढे सुपर 8 च्या पहिल्या लढतीत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे.

दोन्ही संघ हे तुल्यबळ मानले जातात त्यामुळे हा सामना नेमकं कोण जिंकेल याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून आहे.

ग्रुप 1 सुपर 8 मधील या सामन्यात दोन्ही संघाना समान संधी असल्याचं दिसतं आहे.

अनेकांचं भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्याकडे लक्ष लागलेलं होतं. मात्र ही लढत इतक्या लवकर होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळेच हा सामना म्हणजे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधीचा अंतिम सामना असल्याचं म्हटलं जात आहे.

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं विजयांची मालिका कायम राखली आहे.

टी-20 क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी अहमदाबादचं मैदान तसं परिचयाचं आहे. कारण त्यांनी तिथे तीन सामने खेळले आहेत. हे मैदान फलंदाजासाठी अनुकूल आहे. त्यामुळे जो संघ आधी फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारेल त्याची स्थिती अधिक मजबूत राहू शकते. अर्थात या मैदानावर धावसंख्येचा पाठलाग करूनही सामना जिंकण्यात आला आहे.

भारतीय संघात अभिषेक शर्मा आणि इशान किशनकडून या सामन्यात मोठी अपेक्षा असणार आहे. तसंच मधल्या फळीत तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या यांच्यावर भारतीय फलंदाजी अवलंबून असणार आहे.

तर दक्षिण आफ्रिकेच्या संघात सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि एडन मारक्रम यांच्याकडून त्यांच्या संघाला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असेल. तसंच मधल्या फळीतील फलंदाज रायन रिकलटन, डेवाल्ड ब्रेविस, त्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर आणि मार्को जेनसन यांच्यावर धावसंख्या पुढे नेण्याची जबाबदारी असेल.

भारताचा सुपर 8 पर्यंतचा प्रवास

अमेरिकेविरुद्ध छोटा धक्का बसल्यानंतर भारतीय संघानं कामगिरीत सुधारणा केली आहे. भारतानं नामिबियावर विजय मिळवला. तर पाकिस्तानविरुद्धची बहुचर्चित लढतदेखील भारतानं जिंकली. तसंच भारतानं नेदरलँड्सवर देखील विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही भारत विजयी घोडदौड कायम राखेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

अहमदाबादच्या या स्टेडियममध्ये भारतानं आतापर्यंत 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत.

क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सुपर 8 पर्यंतचा प्रवास

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं कॅनडाविरुद्ध सहज विजय मिळवत चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर अहमदाबादमध्येच त्यांनी अफगाणिस्तानवर रोमांचक विजय मिळवला होता.

ग्रुप पातळीवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला न्यूझीलंडचा संघ जोरदार टक्कर देईल अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्यावर सहज विजय मिळवला.

त्यानंतर त्यांनी युएईच्या संघावरही आरामात विजय मिळवला होता. त्यांनी दोन विजय धावसंख्येचा पाठलाग करताना तर दोन विजय आधी फलंदाजी करून मिळवले आहेत.

अहमदाबादच्या स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघानं आतापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.