नाक बंद, डोळ्यात पाणी; आधी सर्दी वाटली पण 12 वर्षांच्या मुलीच्या नाकात बुरशी तयार झाली

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लक्ष्मी पटेल
- Role, बीबीसी गुजराती
- वाचन वेळ: 4 मिनिटे
डोळ्यातून पाणी येणं, नाक बंद होणं किंवा वास न येणं, अशा साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका 12 वर्षांच्या मुलीवर मायक्रोस्कोपच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करून तिच्या डोळे, नाक आणि मेंदूच्या काही भागातील बुरशी काढण्यात आली.
या बुरशीजन्य संसर्गाला वैद्यकीय भाषेत 'ॲलर्जिक फंगल राइनोसिनसायटिस' असं म्हणतात.
जर अशा प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गावर वेळेवर उपचार केले नाहीत, तर बुरशीची लागण झालेल्या भागाला ते खाऊ शकतं. त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते आणि मेंदूला गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते.
बनासकांठा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात राहणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीला गेल्या तीन महिन्यांपासून डोळ्यातून पाणी येणं, नाक बंद राहणं आणि चक्कर येणं यांसारखी समस्या जाणवत होती.
आई-वडिलांना आधी ही लक्षणं सर्दीची वाटत होती. मुलीवर आधी स्थानिक डॉक्टरांकडून उपचार केले, पण काही फरक पडला नाही. नंतर तिला विसनगर, डिसा आणि अहमदाबादमधील खासगी रुग्णालयात नेऊन उपचार केले गेले. डोळ्यांत पाणी येण्याची समस्या होती, त्यामुळे डोळ्यांच्या डॉक्टरांकडेही तिला नेलं, पण त्यानेही काहीच फरक पडला नाही.
शेवटी एका डॉक्टरांनी मुलीच्या पालकांना कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे दाखवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुलीला अहमदाबादमधील सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
'मुलीला नेमकी समस्या काय होती?'
मुलीचे वडील करसनभाई चौधरींनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "माझ्या मुलीच्या डोळ्यात सतत पाणी येत होतं. सुरुवातीला आम्हाला वाटलं की, ही फक्त साधी सर्दी आहे. पण हळूहळू डोळ्यात पाणी येण्याची समस्या वाढत होती. तिचं नाकही कायम बंद राहायचं."
"आम्हाला सुरुवातीला ही फक्त सर्दीची समस्या वाटली, म्हणून आम्ही तिला डॉक्टरांकडे नेलं. औषध घेतलं तरी आराम मिळाला नाही. नंतर तिला चक्कर येऊ लागली आणि दोन-दोन ऑब्जेक्ट दिसू लागले. त्यामुळे आम्ही तिला डोळ्याच्या डॉक्टरांकडे नेलं, पण तरीही तिला काही फरक पडला नाही."
मुलीला आराम मिळत नसल्यामुळे तिला अहमदाबादच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेलं.
करसनभाई चौधरी सांगतात की, "आमच्या ओळखीच्या एका डॉक्टरने सांगितलं की मुलीला डोळ्यांची काही समस्या नाही, तर कान-नाक-घसा संबंधित त्रास आहे. मग आम्ही तिला खासगी रुग्णालयात नेलं, तिथे उपचारासाठी चार लाख रुपये खर्च येईल असं सांगण्यात आलं. त्यामुळे आम्ही आमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या सल्ल्यानं सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो."

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "सोला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर निनाबेन यांनी सांगितलं की आमच्या मुलीच्या नाक, डोळे आणि मेंदूच्या काही भागात बुरशी झाली आहे, त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल."
"आमची मुलगी एक आठवडा सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होती. तिच्यावर तिथे शस्त्रक्रिया झाली. आता ती बरी आहे. तिला चक्कर येणं आणि डोळ्यातून पाणी येण्याची समस्या संपली आहे. तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत."
बुरशी म्हणजे काय आणि ही कशी होते?
मुलीवर सोला सिव्हिल हॉस्पिटलमधील कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. नीना भालोडिया यांनी उपचार केले.
डॉ. नीना भालोडियांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, 'जेव्हा मुलीला हॉस्पिटलमध्ये आणलं, तेव्हा तिला नाक बंद पडण्याची आणि डोळ्यात पाणी येण्याची समस्या होती.
तिचा डावा डोळा थोडासा सरकलेला आणि सुजलेला होता, तिला वास येत नव्हता. तिच्या लक्षणांवरून एमआरआय आणि सीटी स्कॅन केलं. यात डोळे, नाक आणि मेंदूच्या काही कोपर्यांमध्ये बुरशी दिसली.
मुलीला ॲलर्जिक फंगल राइनोसिनायटिस असल्याचं निदान झालं. आम्ही शस्त्रक्रियेत कोणत्याही चीराशिवाय मायक्रोस्कोपने (सूक्ष्मदर्शक) बुरशी काढली."
बुरशी काय आहे आणि ही कशी होते याबाबत बोलताना डॉ. नीना भालोडियांनी सांगितलं की, रुग्णांमध्ये दोन प्रकारची अॅलर्जिक सर्दी दिसून येते.
- पहिल्या प्रकारात रुग्णाला काही गोष्टींमुळे, जसं वास, परागकण, धूळ किंवा धुराची ॲलर्जी होते आणि त्यामुळे सर्दी होते.
- दुसऱ्या प्रकारात रुग्णाच्या श्वासातून विषाणू किंवा बॅक्टेरियामुळे सर्दी होते. या बॅक्टेरियामुळे ॲलर्जी होते आणि त्यामुळे बुरशी होऊ शकते.

फोटो स्रोत, gmersmchsola.com
ते सांगतात, "प्रत्येक सर्दीमध्ये बुरशी होत नाही, काही प्रकरणांमध्येच असं होतं. सुरुवातीला नाकात चिकटसर पू सारखा स्त्राव येतो, जी एक प्रकारची बुरशी असते. जर सुरुवातीला लक्ष दिले नाही, तर ही बुरशी सायनसच्या भागात पसरते आणि सायनसच्या आजूबाजूच्या संरचनेला संक्रमित करते."
"जसं डोळ्यात, डोळ्याच्या वरच्या भागात, मेंदूचा पुढील किंवा वरचा भाग, डोळ्यांची नस किंवा मेंदूच्या धमन्या. ज्या भागात बुरशी होते, तो हळूहळू खराब होतो किंवा त्या भागातील धमन्यांमध्ये रक्ताची गुठळी होऊ शकते."
ते म्हणाले की, "ही बुरशीही दोन प्रकारची असते. कोविड-19 काळात म्युकरमायक्रोसिस नावाची बुरशी चर्चेत होती. ही बुरशी प्रामुख्याने अशा रुग्णांमध्ये होते ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, जसं की किडनी, हृदय किंवा मधुमेहाचे रुग्ण, रक्तदाब किंवा इतर गंभीर आजार असलेले रुग्ण."
"मात्र या प्रकरणात दिसलेली बुरशी 'अॅलर्जिक फंगल राइनोसिनसायटिस' आहे. यामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, पण एखाद्या विषाणूमुळे होणाऱ्या अॅलर्जीक प्रतिक्रियामुळे बुरशी तयार होते."
या बुरशीचा संसर्ग फक्त डोळे, कान आणि मेंदूतच होतो का?
या प्रश्नावर डॉ. भालोडिया म्हणाल्या की, "या बुरशीच्या संसर्गाची सुरुवात नाकातून होते. कारण श्वास घेताना हवेतील कण नाकात जातात आणि जर विषाणू असेल तर संसर्ग नाकात होतो. या बुरशीचा संसर्ग साधारणपणे डोळे, नाक आणि घशात होतो, पण तो जास्त पसरला तर फुफ्फुस किंवा मेंदूपर्यंतही पोहोचू शकतो."
वेळेवर उपचार न केल्यास या संसर्गाचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात?
डॉ. भालोडियांनी सांगितलं की, "जर वेळेवर उपचार झाले नाही तर रुग्णाची डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते. मेंदूच्या भिंतींवर बुरशी आली तर भिंत पातळ होऊन क्षीण होते आणि मेंदूतील द्रव (सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड) नाकातून बाहेर येऊ लागतो, ज्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते."
त्या सांगतात की, "जर नाक दीर्घकाळ बंद राहणं, वास कमी होणं, डोळ्यातून पाणी येणं, कमी दिसणं किंवा डोळे फिरणं अशी लक्षणं दिसली की, लगेच कान-नाक-घशाच्या डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे."
"ही बुरशी शस्त्रक्रियेने काढली जाते, विशेषतः डोळे, नाक आणि मेंदूच्या कोपऱ्यात आलेली बुरशी काढून टाकली जाते. शस्त्रक्रियेनंतर 3 ते 6 महिन्यांपर्यंत अँटीफंगल उपचार केले जातात. वेळोवेळी नाक स्वच्छ करावं लागतं. उपचारानंतर डोळ्यांची दृष्टीही सुधारते."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











