वादात सापडलेल्या 'रोबो डॉग'वरून केंद्र सरकारलाही द्यावं लागलं स्पष्टीकरण; 'गलगोटिया विद्यापीठ' का आहे चर्चेत?

एआय इम्पॅक्ट समिट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 16 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू झालेले एआय इम्पॅक्ट समिट 20 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील.
वाचन वेळ: 5 मिनिटे

गलगोटिया विद्यापीठाचं नाव सध्या चांगलंच गाजत आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) इम्पॅक्ट समिटमध्ये या विद्यापीठाने केलेल्या दाव्याची चर्चा इंटरनेटवर चांगलीच रंगली आहे.

AI इम्पॅक्ट समिटमध्ये गलगोटिया विद्यापीठानेही सहभाग घेतला. विद्यापीठाच्या स्टॉलमध्ये रोबो डॉग होता. हा रोबो डॉग विद्यापीठात 'डेव्हलप' करण्यात आल्याचा दावा विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी केला.

त्यानंतरगलगोटिया विद्यापीठावर आरोप करण्यात आला की त्यांनी चीनमध्ये बनलेल्या एका रोबोटची नक्कल केली आहे.

भारतात एआयमध्ये होणारी संशोधनं दाखवणाऱ्या या समिटमध्ये अशा पद्धतीने नक्कल झाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा होत होती.

अशातच विद्यापीठाकडून आम्ही हा रोबोट बनवला नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे, शिवाय त्यांनी माफीही मागितली आहे.

हे प्रकरण सध्या इतकं चर्चेत आहे की, केंद्र सरकारलाही खुलासा करावा लागला आहे.

केंद्र सरकारला करावा लागला खुलासा

आता या संपूर्ण प्रकरणावर केंद्र सरकारलाही वक्तव्य जाहीर करावं लागलं आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी गलगोटिया युनिव्हर्सिटीला 'एआय समिट'मधून हटवण्याबाबतच्या प्रश्नांवर म्हटलं की, "आमची अशी इच्छा आहे की, या एक्सपोमध्ये लोक जे काही प्रदर्शित करत आहेत ते अस्सल आणि प्रामाणिकचं काम असावं. इतर कोणत्याही प्रकारे या एक्स्पोचा वापर व्हावा, असं आम्हाला वाटत नाही."

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन म्हणाले की, चुकीच्या माहितीला प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन म्हणाले की, चुकीच्या माहितीला प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही.

पुढे त्यांनी म्हटलं की, "इथे सुरू असलेल्या समिटबाबत कोणत्याही प्रकारचा वाद आम्हाला नको आहे. म्हणूनच, एका आचारसंहितेचं पालन होणं गरजेचं आहे. त्यामुळे, चुकीच्या माहितीला प्रोत्साहन दिलं जाऊ शकत नाही. आम्हाला हा वाद इथे नकोय. तो चुकीचा आहे की बरोबर आहे, या वादात मी जातच नाहीये. आम्हाला फक्त इतकंच अपेक्षित आहे की, इथे कोणताही वाद नकोय."

गलगोटिया विद्यापीठाने जागा रिकामी केली

गलगोटिया विद्यापीठाने एक पत्रक जारी करून घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

विद्यापीठातर्फे एक्सवर पोस्ट करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, "एआय समिटमध्ये झालेल्या गोंधळाबाबत आम्ही गलगोटिया विद्यापीठाकडून माफी मागतो. तंबूत उपस्थित असलेल्या आमच्या प्रतिनिधीला पुरेशी माहिती नव्हती. त्यांना या रोबोटच्या तांत्रिक बाबींची माहिती नव्हती आणि कॅमेऱ्यावर बोलताना उत्साहाच्या भरात त्यांनी खोटी माहिती दिली. पत्रकारांशी बोलण्यासाठी त्यांना अधिकृत परवानगी नव्हती. आयोजकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही आमचा तंबू रिकामा केला आहे."

गलगोटिया विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेलं पत्रक

फोटो स्रोत, X/GalgotiasGU

फोटो कॅप्शन, गलगोटिया विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेलं पत्रक

नेमकं काय आहे प्रकरण?

दिल्लीत सुरू असलेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये, भारतात एआयमध्ये होणाऱ्या संशोधनाची माहिती देणारे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले आहे. यातच एक स्टॉल उत्तर प्रदेशच्या गलगोटिया विद्यापीठाचा देखील आहे.

या विद्यापीठाच्या स्टॉलमध्ये एक कुत्र्यासारखा दिसणारा रोबोट देखील प्रदर्शित करण्यात आला होता. या समिटचं उदघाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक व्हीडिओ व्हायरल झाला.

यामध्ये विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा सिंग यांनी डीडी न्यूजच्या प्रतिनिधींना बोलताना सांगितलं की, "हा ओरायन (Orion) नावाचा रोबोट गलगोटिया विद्यापीठाच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'तर्फे विकसित केला जात आहे. मला आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल की गलगोटिया विद्यापीठ हे पहिलं खाजगी विद्यापीठ आहे ज्यांच्यातर्फे एआयमध्ये 350 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे."

गलगोटिया विद्यापीठ

फोटो स्रोत, Facebook/Galgotias University

फोटो कॅप्शन, गलगोटिया विद्यापीठ

सहायक प्राध्यापक नेहा सिंह यांचा हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर या ओरायन नावाच्या रोबोटची चर्चा होऊ लागली.

अखेर हा रोबोट चीनच्या एका कंपनीचं असल्याचं लक्षात आलं. गलगोटिया विद्यापीठाच्या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या करामती करणारा हा रोबोट युनिट्री नावाच्या कंपनीने बनवलेला आहे.

विद्यापीठावर टीका झाल्यानंतर केलेल्या खुलाशात विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी देखील ही बाब मान्य केली.

एआय समिटमध्ये झालेल्या या गोंधळानंतर विद्यापीठाकडून प्राध्यापिका नेहा सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

नेहा सिंह म्हणाल्या की, "मी जे बोलले त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आम्ही असं कुठेही म्हणालो नाही की आम्ही हा रोबोट बनवला आहे. आमच्या विद्यार्थ्यांकडून या रोबोटवर काम केलं जात आहे. आणि आम्ही एआयमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक देखील केलेली आहे."

गलगोटिया विद्यापीठ काय आहे?

उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडामध्ये हे खाजगी विद्यापीठ आहे. 2011 साली उत्तर प्रदेश विधिमंडळ कायद्यांतर्गत या विद्यापीठाला मान्यता देण्यात आली. पण मागच्या काही वर्षांमध्ये विविध वादांमुळे हे विद्यापीठ चर्चेत राहिलेलं आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींच्या एका वक्तव्याचा विरोध करण्यासाठी या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून एक आंदोलन देखील करण्यात आलं होतं.

या विद्यापीठात इंजिनियरिंग, व्यवस्थापन, विज्ञान, कायदा आणि इतर क्षेत्रांमध्ये पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट कार्यक्रम शिकवले जातात. इथे हजारो विद्यार्थी शिकत असल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.

एआय समिटच्या उद्घटनावेळी गोंधळ उडाल्याचा आरोप

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या उद्घाटनाच्या दिवशी उपस्थितांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर 'या समिटमध्ये पूर्ण अनागोंदी आणि गंभीर गैरव्यवस्थापन' केल्याची टीका केली.

समिटच्या उद्घाटनावेळी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. या समिटमध्ये आलेल्या लोकांच्या लांबच लांब रांगा इथे दिसून आल्या. तसेच मुख्य प्रदर्शनात प्रवेश करताना लोकांचा गोंधळ उडाला होता.

सुरक्षा तपासणीदरम्यान देखील मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीपूर्वी काही स्टॉल तात्पुरते रिकामे करण्यास सांगण्यात आलं. यामध्ये काहींनी त्यांच्या वस्तू चोरीला गेल्याचे आरोप देखील केले.

एआय समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एआय समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी

निओसेपियन या कंपनीचे सीईओ धनंजय यादव यांनी एक्सवर लिहिलं की, "सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी स्टॉल रिकामा करण्यास सांगितले आणि सामान सुरक्षित राहील याची खात्री दिली."

धनंजय यादव यांनी एक्स वर लिहिलं की, "आम्ही इथे येण्यासाठी विमानाची तिकिटं, राहण्याची व्यवस्था, इथला स्टॉल सगळ्यांसाठी पैसे मोजले. नंतर, आमच्या वस्तू गायब झाल्या. इथे कडक सुरक्षा व्यवस्था असून देखील हा प्रकार घडला. जर इथे फक्त सुरक्षा कर्मचारी आणि अधिकृत पथकांना येऊ दिलं जात होतं तर हे नेमकं कसं घडलं? हे खूप निराशाजनक आहे."

रेसकिलचे संस्थापक पुनीत जैन यांनी देखील सुरुवातीच्या गोंधळावर टीका केली. मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती सुधारल्याचं त्यांनी मान्य केलं. उद्योजक प्रियांशु रत्नाकर यांनीही लांब रांगा, स्टॉल्समध्ये प्रवेश करण्यात अडचणी, खराब कनेक्टिव्हिटी आणि नोंदणी करताना येणाऱ्या समस्यांचा उल्लेख करून टीका केली.

परदेशी माध्यमांमध्येही चर्चा

दिल्लीतलं हे एआय समिट आंतरराष्ट्रीय स्तरावरचं आहे. यामध्ये 20 देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती सहभागी आले आहेत. त्यामुळे या परिषदेवर आंतरराष्ट्रीय माध्यमांचं देखील लक्ष आहे.

अमेरिकन मीडिया आउटलेट ब्लूमबर्गने लिहिलं आहे की, "भारतातील अलिकडच्या काळात होणारी सर्वात मोठी व्यावसायिक शिखर परिषद या आठवड्यात गोंधळात सुरू झाली. अचानक झालेल्या सुरक्षा कारवाईमुळे शेकडो प्रतिनिधी अन्न आणि पाण्याशिवाय अडकून पडले. देशाच्या एआय प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी हा एक धक्का होता."

16 फेब्रुवारी रोजी शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी गोंधळ उडाला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 16 फेब्रुवारी रोजी शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी गोंधळ उडाला.

ब्लूमबर्गने लिहिले आहे की, "इंडिया एआय समिटमध्ये पहिल्या दिवशी झालेल्या गोंधळानंतर, मंगळवारी गोष्टी अधिक शांत दिसल्या. यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले लोक नवी दिल्लीतील भारत मंडपम येथील विस्तीर्ण प्रदर्शन संकुलाच्या हॉलमध्ये सुरळीतपणे फिरत होते."

ब्रिटिश वृत्तसंस्था रॉयटर्सने लिहिलं आहे की, सोमवारी भारताने एआय इम्पॅक्ट समिट आयोजित केल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला.

रॉयटर्सशी बोललेल्या अनेक लोकांनी सांगितलं की, "अस्पष्ट माहितीमुळे सुरक्षा तपासणीसाठी प्रदर्शन हॉल अचानक रिकामा केल्यानंतर लोकांना त्यांचे सामान बाहेर काढताना गोंधळलेला वेळ सहन करावा लागला."

रॉयटर्सने लिहिले, "या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात झालेल्या गोंधळामुळे फक्त नरेंद्र मोदी यांच्या सरकारची प्रतिमा खराब होत नाही तर यामुळे भारतात तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीवर देखील संशय निर्माण होण्याचा धोका आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.