कफ सिरप प्रकरण : नागपुरात उपचारादरम्यान 18 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू,वडिलांनी काय सांगितलं?

छिंदवाडा येथील कंपनीवर छापा टाकत संबंधित औषधांचा साठा जप्त करण्यात आला.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, छिंदवाडा येथील कंपनीवर छापा टाकत संबंधित औषधांचा साठा जप्त करण्यात आला.
वाचन वेळ: 6 मिनिटे

कफ सिरपच्या दुष्परिणामांमुळं गंभीर अवस्थेत असलेल्या मध्ये प्रदेशातील जवळपास 11 चिमुकल्यांना उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होते.

यापैकी 7 रुग्णांचा जवळपास उपचारानंतर मृत्यू झाला, तर 4 जणांची अवस्था गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या 4 पैकी 2 मुलं व्हेंटिलेटरवर आहेत, तर दोघांचे डायलिसिस सुरू आहे. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनीष तिवारी यांनी सांगितलं.

याशिवाय मध्य प्रदेशातील काही मुलांना नागपूरच्याच एम्स आणि खासगी रुग्णलयातही दाखल करण्यात आलं होतं, अशीही माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मृतांपैकी एका 18 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू सोमवारी रात्री उशिरा झाला आहे. तिच्या वडिलांनी सोमवारीच बीबीसी मराठीशी बोलताना त्यांच्या वेदना मांडल्या होत्या.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

डॉक्टरांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, "1 सप्टेंबरला आमच्याकडं पहिला रुग्ण दाखल झाला होता. त्यानंतर आणखी एक रुग्ण दाखल झाला. या मुलांना खूप ताप होता आणि लघवी न होण्याचा त्रास होत होता.

सुरुवातीला त्यांना साधं इन्फेक्शन असेल असं वाटलं होतं. पण 8 सप्टेंबरला अशीच लक्षणं असलेला आणि एक रुग्ण दाखल झाला. त्यामुळं हे काहीतरी वेगळं प्रकरण असल्याचं लक्षात आलं.

या लहान मुलांच्या किडनी निकामी झाल्या आहेत. तसंच मेंदूही प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उपचारानंतर काही मुलांच्या किडनी काम करत आहेत. पण मेंदूचा प्रतिसाद मिळत नसल्यानं ही मुलं कोमात आहेत.

यापैकी काही मुलं अत्यंत गंभीर अवस्थेत म्हणजे अखेरच्या क्षणी रुग्णालयात आली होती. मुलांचा मृत्यू क्लोड्रिफ कफ सिरपमधल्या 'डायइथिलीन ग्लायकॉल'मुळं झाल्याची शक्यता असल्याचंही डॉ. तिवारी म्हणाले.

कुठे किती रुग्ण?

सद्यस्थितीत नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये 0 ते 16 वर्ष वयोगटातील संशयित मेंदूज्वराचे (एइएस) एकूण 12 रुग्ण आहेत. यातील मध्यप्रदेशातील 10 व महाराष्ट्रातील 1 आणि तेलंगणाचा 1 रुग्ण आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये 6 रुग्ण उपचार घेत आहेत. एम्समध्ये 2 रुग्ण, न्यू हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये 1 रुग्ण, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 1 रुग्ण, कलर्स हॉस्पिटलमध्ये 1 आणि गेट वेल हॉस्पिटल 1 रुग्ण उपचार घेत आहेत.

रुग्णांचे नातेवाईक काय म्हणाले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालायात एकूण 6 बालकांवर उपचार सुरू होते. यापैकी पाच बालकं ही मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहेत.

यापैकीच एक मध्य प्रदेशातील जूनापानी येथील नवीन दहेरिया यांची 18 महिन्यांची मुलगी आहे. तिचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.

दहेरिया बीबीसी मराठीसोबत बोलताना सोमवारी म्हणाले होते की, "माझ्या मुलीला 18 तारखेला ताप आला. त्यानंतर गावापासून 30 किलोमीटरवर असलेल्या परासिया येथील डॉ. सोनी यांच्या हॉस्पीटलमध्ये नेलं.

त्यांनी तपासणी करून डेंग्यू, मलेरिया काढला. त्यानंतर औषध दिली. इंजेक्शन, सिरप दिलं. चार दिवसांचा डोस होता. पण, नंतर ती रात्रभर उलट्या करत होती. त्यामुळे आम्ही घाबरलो. त्यानंतर त्याच डॉ. सोनीकडे घेऊन गेलो. त्यानं रक्ताची चाचणी केली. परासियाच्या सरकारी रुग्णालयात पाठवलं. तिथं पण रक्ताची चाचणी करून छिंदवाड्याला सरकारी रुग्णालयात पाठवलं.

तिथंही रक्ताची चाचणी केली. तिथं समजलं की मुलीच्या किडनीत इन्फेक्शन आहे. तिथून आम्ही थेट नागपूरला आलो. इथं 24 सप्टेंबरपासून मुलीला दाखल केलं. पण, अजूनही काही आराम नाही. डॉ. उपचार बरोबर करत आहे. पण, मुलीची स्थिती गंभीरच आहे."

छिंदवाडा येथील सरकारी रुग्णालय
फोटो कॅप्शन, छिंदवाडा येथील सरकारी रुग्णालय

दहेरिया यांच्या मुलीला दोनवेळा एकच कफ सिरप लिहून दिलं. दुसऱ्या कफ सिरपचा एक डोस घेतल्यानंतर त्यांच्या मुलीला उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि लघवी थांबल्याचं ते सांगतात. सध्या ते कफ सिरप छिंदवाडा येथील डॉक्टरांनी तपासणीसाठी ठेवून घेतलं आहे.

तसेच छिंदवाडा जिल्ह्यातील राजेश यदूवंशी हे शेतकरी असून ते गेल्या 25 सप्टेंबरपासून नागपुरातील वेगवेगळ्या रुग्णालयात आपल्या दोन वर्षांच्या मुलीच्या उपचारासाठी फिरत आहेत.

आतापर्यंत खासगी रुग्णालयात साडेचार लाख रुपये खर्च आला. त्यानंतर मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणलं. पण, मुलीच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याचं ते सांगतात.

यदूवंशी बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "माझ्या मुलीची 15 सप्टेंबरपासून तब्येत खराब होती. खासगी डॉक्टरांकडून 20 तारखेपर्यंत उपचार घेतले. त्यानंतर मुलीची तब्येत आणखी बिघडली. आम्ही 25 सप्टेंबरला नागपुरातील खासगी रुग्णालयात आलो.

तिथं काहीच आराम मिळाला नाही. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पण, अजूनही मुलीची तब्येत तशीच आहे. माझ्या मुलीची स्थिती गंभीर असून व्हेंटीलेटरवर आहे. आमच्या मुलांवर चांगले उपचार करा इतकीच विनंती आहे."

छिंदवाड्यात महिनाभरात 11 मृत्यू

गेल्या महिन्याभरात मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 11 आणि राजस्थानमधील 3 मुलांच्या मृत्यूनंतर दोन्ही राज्यांच्या आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या मुलांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, कफ सिरप प्यायल्यानंतर मुलांचं आरोग्य वेगानं बिघडू लागलं आणि परिणामी त्यांना वाचवता आलं नाही.

मध्य प्रदेशातील ड्रग कंट्रोल विभागानं शनिवारी (4 ऑक्टोबर) सकाळी तामिळनाडूत बनणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी आणली होती. त्यानंतर सरकारी डॉक्टर प्रवीण सोनी, कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचे संचालक आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

परसरिया ब्लॉकचे वैद्यकीय अधइकारी डॉ. अंकित सहलाम यांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली.

सिरप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

या मृत्यूंनंतर, 1 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेश सरकारनं तामिळनाडू सरकारला पत्र लिहून औषध निर्मात्या कंपनीची चौकशी करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर तामिळनाडूच्या ड्रग कंट्रोल विभागानं चौकसीत श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीत बनणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये 'भेसळ' असल्याला दुजोरा दिला होता.

यासंदर्भात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वरून माहिती दिली होती.

दुसरीकडे, राजस्थानमध्येही कथितरित्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कफ सिरपमुळे भरतपूर आणि झुंझुनू जिल्ह्यातील दोन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी (4 ऑक्टोबर) चुरू जिल्ह्यातही एका मुलाच्या मृत्यूची माहिती समोर आली. या मुलांचा मृत्यू कफ सिरपमुळे झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

राजस्थानचे आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खिंवसर यांनी म्हटलं की, "औषधांची आम्ही चौकशी केली, त्यात असा कोणताच पदार्थ आढळला नाही, जो जीवघेणा असेल. औषधांमुळे यातला कोणताच मृत्यू झालेला नाही. तरीही प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एक समिती बनवलीय."

भारत सरकारनं जारी केली मार्गदर्शक तत्वं

लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

सर्व आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांनी केवळ उत्तम उत्पादन मानकांनुसार (GMP) तयार केलेली आणि उच्च औषधी दर्जाची कफ सिरप खरेदी करावीत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे.

या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्व दवाखाने, जिल्हा आरोग्य विभाग, औषध वितरण केंद्रे, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये तातडीने करावी, असे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

तज्ज्ञ काय सांगतात?

पीडियाट्रिशियन डॉ. अवेश सैनी यांच्याशी बीबीसी हिंदीच्या प्रतिनिधींनी बातचित केली.

सर्वसामान्य व्यक्ती औषधं खरी आहेत की बनावट, हे कसे ओळखू शकते, असा प्रश्न डॉ. सैनी यांनी विचारला असता, त्यांनी सांगितलं, "सिरपची बांधणी (फिजिकल अपीअरन्स) कशी आहे? त्याचा रंग ढगाळ दिसतो का, बदलला आहे का किंवा त्यात काही कण दिसत आहेत का? औषधातील मीठ खाली बसले आहे का? बॅच नंबर लिहिलेला नाही किंवा पुसून टाकलेला आहे का? असे संकेत दिसत असतील, तर शंका घेण्यास वाव आहे. तसंच, औषधावर ड्रग लायसन्स नंबर लिहिलेला असणेही आवश्यक आहे. तो नसेल तर अशी औषधे घेऊ नयेत."

डॉ. सैनी पुढे सांगतात, "असे नाही की दोन वर्षांखालील मुलांबाबतच्या गाईडलाइन्स आत्ताच आल्या आहेत. त्या आधीपासूनच आहेत. दोन वर्षांखालील मुलांवर कोणतीही स्टडी नाही. त्यामुळे ही औषधे दोन वर्षांवरील मुलांनाच दिली जातात."

किती डोस द्यावा, याबाबत ते म्हणतात, "औषधाचा डोस ठरलेला असतो, जो डॉक्टर सांगतात. तो वजनानुसार असतो. म्हणून औषध देण्यापूर्वी मुलांचे वजन केले जाते."

बनावट सिरपमुळे आणखी कोणत्या समस्या होऊ शकतात, याबाबत ते सांगतात, "श्वास घेण्यास त्रास, पोटदुखी होऊ शकते. हे किडनीवर परिणाम करू शकते. सर्व केमिकल्स शरीरात साचतात आणि मग ब्रेनवर परिणाम होतो. त्यानंतर झटके (दौरे) येऊ शकतात आणि हृदयाचे ठोके थांबू शकतात."

कफ सिरप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

दरम्यान, भोपालमध्ये गेल्या दशकभरापासून कार्यरत असलेल्या डॉ. हर्षिता शर्मा यांनी बीबीसीला सांगितलं की, "कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉल हे मूळतः कूलंट म्हणून वापरले जातात. यांची चव गोड आणि थंडसर असते, जे खाद्य सोर्बिटॉलसारखी वाटते.

पण सोर्बिटॉल महाग असतो, म्हणून औषध कंपन्या त्याच्या ऐवजी स्वस्त पर्याय म्हणून डायथिलीन ग्लायकॉलचा वापर करतात. हे दोन्ही घटक देशी दारूमध्ये असलेल्या मिथाइल अल्कोहोलच्या श्रेणीत येतात आणि दोन्ही रसायने शरीरासाठी अतिशय घातक असतात."

डॉ. हर्षित शर्मा पुढे सांगतात की, "या रसायनांपासून तयार झालेली औषधे मुलांसाठी विशेषतः 'नेफ्रोटॉक्सिक' असतात, म्हणजेच ती थेट किडनीवर परिणाम करतात. ही रसायने शरीरातील आम्लाची (ॲसिड) पातळी वाढवतात, जी नियंत्रित करण्याचे काम किडनी करते. पण जेव्हा तोच अवयव बाधित होतो, तेव्हा विष शरीरात पसरते आणि मृत्यू होतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)