एपस्टिन फाइल्स: केंद्रीय मंत्री हरदीप पुरींबद्दल आतापर्यंत काय काय समोर आले?

एपस्टिनच्या गुन्हेगारी कृत्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एपस्टिनच्या गुन्हेगारी कृत्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं म्हणणं आहे.
    • Author, राघवेंद्र राव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांचं नाव 'एपस्टिन फाइल्स' मध्ये आलं आहे. लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टिनबरोबर नाव जोडलं गेल्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नुकतंच विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरातील मकर द्वारबाहेर निदर्शने करत

त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

अमेरिकेच्या न्याय विभागाने अलीकडे एपस्टिनशी संबंधित अनेक कागदपत्रं जाहीर केली आहेत.

हरदीपसिंग पुरी आणि जेफ्री एपस्टिन यांच्यात 2014 आणि 2015 मध्ये अनेक वेळा ई-मेलद्वारे संपर्क झाला होता, असे एपस्टिन फाइल्समधून दिसून येते.

एपस्टिनला 2008 मध्येच लैंगिक गुन्ह्याप्रकरणी शिक्षा झाली होती, तरीही हरदीपसिंग पुरी त्याच्या संपर्कात का होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एपस्टिनच्या गुन्हेगारी कृत्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचं हरदीपसिंग पुरी यांचं म्हणणं आहे.

या संदर्भात बीबीसीने एपस्टिन फाइल्सचे विश्लेषण केले असून, यात ज्याला आक्षेपार्ह म्हटलं जात आहे, ते नक्की काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्यामुळे हरदीपसिंग पुरी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, त्या एपस्टिन फाइल्सचे ई-मेल पद्धतशीरपणे म्हणजेच क्रमवार पद्धतीने वाचणे आवश्यक आहे.

इथे आम्ही त्या ई-मेल्समधील असे भाग सादर करत आहोत, ज्यातून त्यांच्यात कशा प्रकारचं संभाषण होत होतं, हे लक्षात येतं.

'अजून काही सल्ला'

रीड हॉफमन हे अमेरिकेचे इंटरनेट उद्योजक आणि लिंक्डइनचे सह-संस्थापक आहेत. जेफ्री एपस्टिनने हरदीपसिंग पुरी यांना एका ई-मेलमध्ये लिहिलं की, "…माझी टेर्जेसोबत चर्चा झाली आहे. रीड हॉफमन भारतात येण्यासाठी तयार आहेत."

एपस्टिनच्या 18 जूनच्या ई-मेलला उत्तर देताना हरदीपसिंग पुरी म्हणाले, "रीड हॉफमनच्या भारत दौऱ्यासाठी मदत करायला मला आनंद होईल."

4 ऑक्टोबर 2014 च्या एका ई-मेलमध्ये हरदीप पुरी यांनी एपस्टिनचं कौतुक केलं आणि सल्ला मागितला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 4 ऑक्टोबर 2014 च्या एका ई-मेलमध्ये हरदीप पुरी यांनी एपस्टिनचं कौतुक केलं आणि सल्ला मागितला होता.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एपस्टिनने रीड हॉफमन आणि हरदीपसिंग पुरी यांची ओळख करून देताना एका ई-मेलमध्ये लिहिले, "रीड, भारतात हरदीप हेच तुमचे सहाय्यक आहेत."

रीड हॉफमन यांनी 24 सप्टेंबरच्या ई-मेलला उत्तर देताना लिहिलं, "हरदीप, आपल्याला भेटून खूप आनंद झाला. लोकांची निवड करण्याबाबत जेफ्रीची निवड उत्तम आहे. (मी अपवाद आहे)."

25 सप्टेंबर 2014 रोजी या ई-मेलला उत्तर देताना हरदीप पुरी म्हणाले, "लोकांबद्दल जेफ्रीचं जे आकलन आहे, त्याविषयी मला शंका नाहीय. त्याचे 'इन्स्टिंक्ट्स' (लोक ओळखण्याची आणि समजण्याची क्षमता) तर आणखी चांगली आहे."

एपस्टिनने हरदीपसिंग पुरींना विचारलं की, "रीडची भेट झाली का?"

याला उत्तर देताना 4 ऑक्टोबर रोजी हरदीपसिंग पुरी म्हणाले, "मी आज दुपारी एका मीटिंगसाठी एसएफमध्ये (सॅन फ्रॅन्सिस्को) आहे. तू, माझ्या मित्रा, खरंच काम करून घेतोस."

"अजून काही सूचना?"

एपस्टिनने 4 ऑक्टोबरच्या त्याच्या उत्तरात लिहिलं, "त्यांना सांगा की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित लोक आणि सोशल नेटवर्किंग तज्ज्ञांच्या भेटीसाठी तुम्ही त्यांचा भारत दौरा आयोजित करणार आहात."

'प्रवासासाठी व्हिसाची व्यवस्था'

एपस्टिनने हॉफमन यांना एका ई-मेलमध्ये विचारलं, "तुम्हाला हरदीप उपयुक्त वाटतात का?"

याला उत्तर देताना 12 ऑक्टोबर 2014 रोजी रीड हॉफमन म्हणाले, "कॉम्प्लिकेटेड (गुंतागुंतीचे) वाटतात".

जेफ्री एपस्टिनने हरदीपसिंग पुरींना एका ई-मेलमध्ये लिहिले, "हरदीप, मला एक मदत हवी आहे. माझ्या सहाय्यकाला भारतातील एका लग्नात सहभागी होण्यासाठी ताबडतोब व्हिसा हवा आहे. दूतावासात असं कुणी आहे का, ज्यांच्याशी ते बोलू शकतील?"

याला उत्तर देताना 24 ऑक्टोबर रोजी हरदीपसिंग पुरींनी सेवानिवृत्त राजदूत प्रमोद बजाज यांना एका ई-मेलमध्ये लिहिले, "प्रमोद, जर तुम्ही हे प्राधान्याने केलं तर मी तुमचा आभारी राहीन. मी अर्जदाराला थेट तुमच्याशी संपर्क साधण्याची विनंती करेन."

एपस्टिन आपली सहकारी मॅक्सवेलबरोबर (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एपस्टिन आपली सहकारी मॅक्सवेलबरोबर (फाइल फोटो)

"जेफ्री, राजदूत बजाज, जे आता माझ्यासोबत काम करतात, ते याची व्यवस्था करतील."

"प्रमोद, जर तुम्हाला विनंती करायची असेल, तर न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या संजीवलाही या ई-मेलमध्ये कॉपी केलं आहे."

24 ऑक्टोबर रोजी प्रमोद बजाज यांनी जेफ्री एपस्टिनला एक ई-मेलमध्ये केला. त्यांनी यात एपस्टिनने हरदीपसिंग पुरी यांना पाठवलेल्या ई-मेलचा हवाला दे म्हटलं की, "व्हिसासंबंधी तुमची मदत करण्यात आम्हाला खूप आनंद होईल."

यानंतर प्रमोद बजाज यांनी लिहिलं की, आजकाल "व्हिसा प्रक्रिया ऑनलाइन होते' आणि ऑनलाइन अर्ज केल्यावर 'व्हिसा अर्जाची हार्ड कॉपी आउटसोर्सिंग कंपनीच्या कार्यालयात जमा करावी लागेल'."

शेवटी प्रमोद बजाज यांनी लिहिलं, "ही प्रक्रिया पूर्ण होताच कृपया आम्हाला कळवा. आम्ही पुढील टप्प्यात तुमची मदत करू."

"जर तुमच्या सहकाऱ्याला आणखी काही माहिती किंवा मदत हवी असेल, तर कृपया विनासंकोच आमच्याशी संपर्क साधा."

'डिजिटल इंडिया'

हरदीपसिंग पुरी यांनी जेफ्री एपस्टिनला एक ई-मेल लिहिला. त्यात त्यांनी 'एक्झॉटिक आयलंड' किंवा 'अनोख्या बेटा'चा उल्लेख केला आहे.

पुरी यांनी लिहिलं की, "जेव्हा तुम्ही आपल्या 'एक्झॉटिक आयलंड'वरून परत याल, तेव्हा कृपया कळवा. मला तुमच्याशी थोडी चर्चा करायची आहे. तसेच, मी तुम्हाला भारताविषयी आवड निर्माण करणारी काही पुस्तके देऊ इच्छितो."

त्याच दिवशी एपस्टिनने उत्तर दिले, "मी तुम्हालाच लिहित होतो- कमाल आहे! मी रीडशी बोललो."

याला उत्तर देताना हरदीपसिंग पुरी म्हणाले, "खरंच, ही तर टेलीपॅथीच आहे. जेव्हा तुम्ही परत याल, तेव्हा मला नक्की कळवा. आणि मजा करा - यासाठी तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या प्रोत्साहन गरज नाही!"

'डिजिटल इंडियाचा उल्लेख'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात 1 जुलै 2015 रोजी 'डिजिटल इंडिया' लाँच करण्यात आले.

पण यापूर्वी सुमारे साडेसात महिन्यांपूर्वी, 13 नोव्हेंबर 2014 रोजी, हरदीपसिंग पुरी यांनी जेफ्री एपस्टिनला एका ई-मेलमध्ये याचा उल्लेख केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात 1 जुलै 2015 रोजी 'डिजिटल इंडिया' लाँच करण्यात आले. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Ajay Aggarwal/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात 1 जुलै 2015 रोजी 'डिजिटल इंडिया' लाँच करण्यात आले. (फाइल फोटो)

हरदीपसिंग पुरी यांनी लिहिलं, "जेफ, मी तुम्हाला 3 ऑक्टोबरला सिलिकॉन व्हॅलीत रीडसोबत झालेल्या माझ्या चर्चेबद्दल सांगितलं होते. तुमची प्रतिक्रिया अशी होती की, रीडने लवकरात लवकर भारताला भेट देणं आवश्यक आहे. ऑक्टोबरच्या मध्यात भारतात परतल्यानंतर, मला पूर्वीपेक्षा जास्त विश्वास आहे की आज भारतात इंटरनेटवर आधारित आर्थिक कामांसाठी उत्तम संधी आहे."

हरदीपसिंग पुरी यांनी या ई-मेलमध्ये पुढे लिहिलं की, "उदाहरणार्थ, जपानी दूरसंचार आणि इंटरनेट कंपनी सॉफ्टबँकेने नुकतीच घोषणा केली आहे की, पुढील 10 वर्षांत ती भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात 10 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणार आहे.

भारतीय कंपनी 'स्नॅपडील' ही 600 दशलक्ष अमेरिकी डॉलर फंडिंग मिळवणारी पहिली कंपनी आहे. मजबूत बहुमत असलेलं नवीन सरकार आल्यामुळे बाजारात चैतन्य आणखी वाढले आहे. हे सरकार 'डिजिटल इंडिया'वर खास लक्ष केंद्रित करुन भारतीय अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यास कटिबद्ध आहे."

राजकीय वर्तुळात असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे की, 'डिजिटल इंडिया' प्रकल्प 2015 मध्ये लाँच झाला. तर हरदीपसिंग पुरी नोव्हेंबर 2014 मध्येच एपस्टिनसोबत यावर कशी चर्चा करत होते?

इशाराः या ई-मेल संवादात पुढे वांशिक टिप्पण्या आहेत.

25 डिसेंबर 2015 रोजी एपस्टिनने हरदीपसिंग पुरींचा एक ई-मेल नॉर्वेचे मुत्सद्दी टेर्जे रोड-लार्सन यांना पाठवला.

या ई-मेलच्या खालच्या भागात पुरींनी एपस्टिनला 'कॉफीसाठी वेळ' मागितला होता.

रोड-लार्सन यांना फॉरवर्ड केलेल्या या ई-मेलमध्ये एपस्टिनने लिहिले, 'टू-फेस्ड' (दुतोंडी).

रोड-लार्सन यांनी उत्तर दिलं की, "तुम्ही ही म्हण ऐकली आहे का: जेव्हा तुम्ही ए भारतीय आणि एका सापाला भेटता, तेव्हा आधी भारतीयाला मारून टाका!"

एपस्टिनने उत्तर दिले, "प्रश्न असा आहे की, तुम्ही दोघांमध्ये फरक कसा कराल."

'या चर्चेवर विरोधकांनी कोणते प्रश्न उपस्थित केले?'

एपस्टिन फाइल्समध्ये केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरींचे नाव आल्यानंतर काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हे एक गंभीर प्रकरण असल्याचे पक्षाने म्हटले आहे. मंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी करत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेसने सर्वप्रथम हरदीपसिंग पुरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. पक्षाचं म्हणणं आहे की, जेव्हा एखाद्या केंद्रीय मंत्र्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी तपासाशी संबंधित कागदपत्रांमध्ये येतं, तेव्हा त्यांनी नैतिकदृष्ट्या या पदावर राहू नये.

पवन खेरा

फोटो स्रोत, ANI

काँग्रेसने हरदीपसिंग पुरी यांच्या ई-मेलशी संबंधित हे 6 प्रश्न उपस्थित केले आहेत.

1. हरदीपसिंग आणि रीड यांच्या भेटीबाबत एपस्टिनला आधीच कसं कळलं?

2. एपस्टिनच तो 'कॉन्टॅक्ट' होता का, ज्याने रीड हॉफमॅनसोबत भेट घडवून आणली होती?

3. हरदीप हे त्याच्याशी भेटीबाबत का चर्चा करत होते?

4. एपस्टिनला 'मित्र' म्हणून का संबोधित केलं गेलं?

5. एपस्टिन हरदीप यांच्यासाठी काय 'करत' होता?

6. जर त्यांचा संबंध फक्त योगायोगाने किंवा वरवरचा होता, तर हरदीप हे एपस्टिनकडे 'सल्ला किंवा सूचनेबद्दल' का विचारत होते?

दरम्यान, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मंगळवारी (17 फेब्रुवारी) दावा केला की, 2014 ते 2017 दरम्यान केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टिन यांच्यात 62 वेळा ई-मेलची देवाणघेवाण झाली.

काँग्रेसने पुन्हा एकदा हरदीपसिंग पुरींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हरदीप पुरींनी त्यांची बाजू मांडताना काय म्हटलं?

हरदीपसिंग पुरी यावेळी म्हणाले की, "एपस्टिनशी संबंधित प्रकरणे गैरकृत्य आणि गुन्ह्यांशी संबंधित आहेत. एपस्टिनवर आरोप आहेत की, त्याच्याकडे एक बेट होतं, जिथे तो लोकांना लैंगिक कृत्यांमध्ये सहभागी करण्यासाठी नेत असे."

"त्याच्यावर बाल लैंगिक शोषणाचेही आरोप आहेत. त्या पीडितांनी खटलेही दाखल केले आहेत. माझा याच्याशी काहीही संबंध नाही."

त्यांनी सांगितलं, "एपस्टिनशी संबंधित 30 लाख फाइल्स प्रसिद्ध झाल्या आहेत आणि मी न्यूयॉर्कमध्ये 8 वर्षे राहिलो. आपण मे 2009 पासूनच्या काळाबद्दल बोलत आहोत, जेव्हा मी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रात भारताचा राजदूत झालो आणि 2017 मध्ये मंत्री झालो. या 8 वर्षांत कदाचित 3 ते 4 बैठकींचा संदर्भ सापडतो."

हरदीपसिंग पुरी म्हणतात की, एपस्टिन न्यूयॉर्क समाजातील एक खूप महत्त्वाचा सदस्य होता.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, हरदीपसिंग पुरी म्हणतात की, एपस्टिन न्यूयॉर्क समाजातील एक खूप महत्त्वाचा सदस्य होता.

हरदीपसिंग पुरी म्हणाले की, "गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका कार्यक्रमात राहुल गांधी माझ्याकडे आले आणि म्हणाले की 'काही नावे रंजक ठिकाणी आली आहेत.' त्यानंतर मी युवा नेते राहुल गांधी यांना सांगायचं ठरवलं आणि म्हटलं की, मी एक चिठ्ठी पाठवतो."

त्यांनी सांगितलं की, "या चिठ्ठीमध्ये मी लिहिलं होतं की, अमेरिकेत भारतीय राजदूतपदावरून निवृत्त झाल्यानंतर काही महिन्यांनी मला इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूटमध्ये (आयपीआय) आमंत्रित केलं गेलं. मी आयसीएममध्ये महासचिव होतो आणि त्याचे अध्यक्ष ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान होते."

"आइसीएम हा आइपीआय प्रोजेक्टचा भाग होता. आयपीआयमध्ये माझे बॉस टेरियल रोड लार्सन एपस्टिनला ओळखत होते. मी आयपीआय आणि आयसीएमच्या शिष्टमंडळाचा प्रतिनिधी म्हणून काही वेळा एपस्टिनला भेटलो, कदाचित 3 किंवा जास्तीत जास्त 4 वेळा. आयपीआय आणि आयसीएम आंतरराष्ट्रीय प्रकरणांवर काम करत होते आणि एपस्टिन त्याचा भाग नव्हता."

एका शिक्षा झालेल्या दोषीच्या संपर्कात ते का होते, असा प्रश्न हरदीपसिंग यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटलं, "तो न्यूयॉर्कच्या वर्तुळातला महत्त्वाची व्यक्ती होता. त्याच्याशी संबंधित बहुतेक लोकांना त्याच्या भूतकाळाची फारशी माहिती नव्हती. पण इथे मुद्दा तो नाही. आमच्यासारख्या लोकांना आयुष्यात वेगवेगळ्या लोकांना भेटावं लागत असतं."

हरदीप पुरी म्हणतात की, न्यूयॉर्कमध्ये आठ वर्षांच्या वास्तव्यादरम्यान कदाचित एपस्टीनसोबत बैठकींचे 3 ते 4 संदर्भ सापडले आहेत.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, हरदीप पुरी म्हणतात की, न्यूयॉर्कमध्ये आठ वर्षांच्या वास्तव्यादरम्यान कदाचित एपस्टीनसोबत बैठकींचे 3 ते 4 संदर्भ सापडले आहेत.

हरदीपसिंग पुरींनी आपल्या बचावात म्हटलं की, "कोलंबोमध्ये मी एक युवा प्रथम सचिव होतो आणि मला वेलुपिल्लई प्रभाकरन नावाच्या व्यक्तीशी चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आलं, जो एलटीटीइचा (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम) प्रमुख होता."

"मी फक्त प्रभाकनशी चर्चा करत होतो. जो एलटीटीइचा प्रमुख होता आणि त्याच्यावर नंतर आमच्या पंतप्रधानांची हत्या करण्याचा आरोप झाला होता. फक्त मी एका दहशतवाद्याशी बोलत होतो म्हणून… मीही त्याच्या दहशतवादी मूल्यांशी सहमत आहे, असा अर्थ होतो का?"

हरदीपसिंग पुरी म्हणाले, "आठ वर्षांत फक्त दोन संदर्भ आहेत - एक ई मेल. माझ्या संपर्कांनी मला रीड हॉफमन नावाच्या व्यक्तीशी भेट घडवून दिली. रीड हॉफमन हे लिंक्डइनचे संस्थापक होते. त्यामुळे मी लिंक्डइनच्या रीड हॉफमन यांना भेटलो आणि भेटीनंतर मी त्यांना एक संदेश पाठवला."

रीड हॉफमन प्रकरणावर पुरी म्हणाले, "नोव्हेंबर 2014 मध्ये मी एक सामान्य नागरिक होतो. कोणीतरी सांगितलं की, ते भारत समजून घेऊ इच्छितात. अमेरिका वेस्ट कोस्टवर लिंक्डइनचे संस्थापक रीड हॉफमनशी झाली.

आणि मी माझ्या ई-मेलची सुरुवात असं सांगून केली की, मला आता पूर्वीपेक्षा जास्त विश्वास आहे की आजचा भारत उत्तम संधी देतो आणि रीड हॉफमन यांनी भारतात येऊन हे बदल पाहायला हवेत."

"मी नोव्हेंबर 2014 मध्ये डिजिटल इंडिया बद्दल बोलत होतो. जर माझी स्मरणशक्ती बरोबर असेल, तर ही योजना 2015 मध्ये सुरू झाली. तेव्हा मी एक दूरदृष्टी असलेला नागरिक होतो. मोदी सरकार कशा पद्धतीने काम करेल हे मला समजत होतं."

एपस्टिनच्या सहकाऱ्याला व्हिसा मिळवून देण्याच्या प्रकरणावर हरदीप पुरी म्हणाले की, "जेव्हा व्हिसाची विनंती आली, तेव्हा मी उत्तर दिले नाही. मी हे माझ्या एका सहकाऱ्याकडे पाठवलं. ज्याने ते एका व्यक्तीकडे दिले आणि त्याने ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितलं. याचा अर्थ कोणावर काही उपकार करणे आहे का?"

ते म्हणाले, "एपस्टिनने माझ्याबद्दल लिहिलं की मी 'टू-फेस्ड' आहे. टू फेस्ड म्हणजे दुतोंडी, म्हणजे हा माणूस योग्य नाही. त्याच्या मूल्य प्रणालीत मी अजिबात योग्य नव्हतो."

तसेच, केंद्रीय मंत्र्यांनी 'भारतीय आणि साप' या मुद्द्याचा उल्लेख करत त्यांचा एपस्टिनशी जवळचा संबंध नव्हता, हे सांगण्याचाही प्रयत्न केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)