राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची खरंच शक्यता आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, छायाचित्रात एकीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, तर दुसरीकडे शरद पवार आणि जयंत पाटील.
    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार, हे निश्चित झाल्यावर शरद पवार यांनी मात्र 'आमचा पक्ष एकत्र करण्याचा निर्णय झाला होता' असं जाहीर केलं.

'अजित पवारांचं हे स्वप्न आम्ही पूर्ण करु' असंही पवार म्हणाले.

तर अजित पवारांच्या नेतृत्त्वात सत्तेत सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र यावर स्पष्टपणे भाष्य करणं टाळल्याचं दिसलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये नेमकं काय सुरू आहे? सध्याच्या परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता खरंच आहे का? आणि मुळात या एकत्रीकरणाचा अर्थ काय? या प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर, त्यांच्या अंत्यविधीनंतर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं की, "आता सुनेत्रा पवारांनी नेतृत्व करावं."

त्यानंतर उपमुख्यमंत्रिपद, राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व यासंबंधी विविध नेत्यांकडून वक्तव्य होत राहिली.

अजित पवारांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली आणि त्यात गटनेत्या म्हणून सुनेत्रा पवारांची निवड झाली. त्याच दिवशी संध्याकाळी सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड होऊन, लोकभवनात शपथविधीही पार पडला.

मात्र, तत्पूर्वी दिवसभरात घडलेल्या घटना महत्त्वाच्या होत्या.

सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार होता, त्याच दिवशी शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषदेत या शपथविधीबाबत आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलं.

तसंच, राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार होतं, असंही वक्तव्य शरद पवारांनी केलं.

17 जानेवारी 2026 रोजी शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्रित झालेली बैठकही याचसाठी होती, असा दावा केला गेला आणि पाठोपाठ या बैठकीचे फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत अजित पवारांच्या बैठका झाल्या होत्या, असाही दावा करण्यात आला. एवढंच नव्हे, तर 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण होणार असल्याचाही दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला.

राष्ट्रवादीचं हे एकत्रीकरण नेमकं कसं होणार होतं?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या नेत्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया महापालिका निवडणुकीपासून सुरू झाली होती.

महापालिका निवडणूकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार दोन वेगवेगळ्या चिन्हांवर म्हणजे घड्याळ आणि तुतारी या चिन्हांवर लढले, तरी जागावाटपापासून तिकिटं देण्यापर्यंत सर्व निर्णय अजित पवारांनी घेतले होते.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही दोन्ही राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर उभे केले गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असतानाचं छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असतानाचं छायाचित्र

एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते या एकत्रीकरणावर भाष्य करताना दिसतात, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते वगळता इतर प्रमुख नेते मात्र यावर भाष्य करणं टाळत आहेत.

हे नेमकं काय सुरू आहे आणि तीन दिवसात शपथविधी करण्यामागे काय कारण आहे? याबाबत राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली.

याविषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर म्हणाले, "अजित पवार असताना शरद पवारांना सांभाळणं शक्य होतं. आता त्यांच्या अनुपस्थितिमध्ये हे कितपत शक्य होईल, याची भीती अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना वाटत आहे."

2023 मध्ये जेव्हा अजित पवारांचं पक्षांतर्गत दुसरं बंड झालं तेव्हा छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील असे बरेचसे महत्त्वाचे नेते अजित पवारांसोबत गेले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2023 मध्ये जेव्हा अजित पवारांचं पक्षांतर्गत दुसरं बंड झालं तेव्हा छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील असे बरेचसे महत्त्वाचे नेते अजित पवारांसोबत गेले.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तर ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी यात भाजप महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं.

अद्वैत मेहता म्हणाले, "झिरवाळ बोलले तेव्हाच हे सगळं भाजप करत आहे, असं दिसतं. देवेंद्र फडणवीस देखील दोन दिवसांपूर्वी जे बोलले आणि आज जे बोलले त्यात फरक आहे. अमित शहांचं भेटणं हे देखील त्याचा भाग."

"शरद पवार हे भावनिक पातळीवर नेतील असं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे हे चपळाईने केलं. सुनेत्रा पवारांना नेतृत्व देत अजित पवारांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं नाही असं दाखवलं. त्याचवेळी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना दावा करता येणार नाही याची व्यवस्था केली.

"त्यातच तटकरे, भुजबळ, पटेल यांचे हात अडकलेले आहेतच. शिवाय, अजित पवार नसल्याने अंतर्गत सुप्तावस्थेतल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी त्यांना भाजप सोबत जायचं आहे. विलिनीकरण म्हणजे अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडणं नव्हे तर पवारांनी भाजपसोबत जाणं होतं."

एकत्र येणार म्हणजे शरद पवारांनी अखेर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला गेला होता का? असा प्रश्न सुहास पळशीकरांनीही उपस्थित केला.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस

याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल (2 फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, "समजा अजित पवार अशा प्रकारच्या एकत्रीकरणाची कोणती चर्चा करत होते, तर ते ही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर करत असतील तर त्यांनी भाजपशी चर्चा केली पाहिजे. करत नसतील कर वेगळी गोष्ट आहे.

"विलिनीकरण करणं किंवा न करणं हे सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसचं डोमेन आहे. पण आमची अपेक्षा आहे की, कुठलाही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी. आणि ते करतातच.

"अजित पवार अशी चर्चा करत होते, तर ते एनडीएमधून बाहेर पडणार होते का? त्यामुळे रोज काही तरी गोंधळ तयार करायचं आणि आपली इकोसिस्टिम वापरून ते इको करायचं ही पद्धत अयोग्य आहे. आता आम्हाला राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो.

"अजित पवार माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायचे. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला. दोन पक्ष झाले आहेत. अजित पवारांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की, सुनेत्रा पवारांनी नेतृत्व करावं. त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहाणं ही आमची जबाबदारी आहे."

अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुनेत्रा पवार यांचं सांत्वन केलं.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अजित पवारांच्या अंत्यविधीला उपस्थित केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुनेत्रा पवार यांचं सांत्वन केलं.

या सगळ्यात अजित पवारांसोबत असलेले आमदार आता शरद पवारांकडे परततील की काय अशी भीती होती, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण होणारच, असा दावा करत आहेत.

बीबीसी मराठीशी बोलताना राष्ट्रवादीचे बारामतीचे नेते आणि अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे किरण गुजर म्हणाले, "पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी तेव्हा सांगितलंय की, मला कळलेलं आहे की माझ्या वडिलांची म्हणजे अजितदादांची इच्छा ही एकत्रीकरण करावं ही राहणार आहे. आणि त्या करता मी सकारात्मक राहणार आहे."

सध्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्र सुनेत्रा पवारांकडे दिली गेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे.

तूर्तास, शरद पवारांच्या गटाकडूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते, असे दावे केले जात आहेत. मात्र, सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीकडून याला दुजोरा दिला जात नाहीय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची किंवा विलिनीकरणाची चर्चा केवळ गोंधळाचं रूप घेऊन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांचा धुरळा उडवते आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)