चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीच का दिसत नाही? चंद्राची निर्मिती कशी झाली?

व्हीडिओ कॅप्शन, चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीच का दिसत नाही?
चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीच का दिसत नाही? चंद्राची निर्मिती कशी झाली?

चंद्र.. पृथ्वीचा एकुलता एक नैसर्गिक उपग्रह...अपोलो मोहिमा चंद्रावर उतरल्या - आर्टेमिसने चंद्राला फेरी मारली.. पण मुळात हा चंद्र आहे कसा? कधीपासून आहे पृथ्वीसोबत?

चंद्राची निर्मिती कशी झाली? तर साधारण 4.5 अब्ज वर्षांपूर्वी ज्यावेळी सौरमाला तयार होत होती त्यावेळी मंगळ ग्रहाच्या आकाराइतक्या एक वा अनेक खगोलीय गोष्टी - space objects पृथ्वीवर आदळल्या. मंगळाच्या आकाराच्या या ग्रहाला Theia असंही म्हटलं जातं.

पृथ्वीची निर्मिती तेव्हा होत होती - या आघातानंतर पृथ्वीपासून काही वितळलेले घटक आणि इतर गोष्टी अवकाशात फेकल्या गेल्या - आणि चंद्राची निर्मिती झाली. मोठ्या आघातामुळेच चंद्राची निर्मिती झाल्याचं अपोलो मोहिमांनी चंद्रावरून आणलेल्या खडकांच्या अभ्यासातूनही सिद्ध झालंय. सौरमालेची निर्मिती व्हायला सुरुवात झाल्याच्या साधारण 6 कोटी वर्षांनंतर चंद्राची निर्मिती झाल्याचं, चंद्र आणि पृथ्वीवरच्या दगडांमध्ये रासायनिक साधर्म्य असल्याचंही या दगडांवरून आढळलं.

पृथ्वीच्या या उपग्रहाला आपण - चंद्र - Moon म्हणतो. पण इतरही ग्रहांना असे उपग्रह - चंद्र आहेत हे दीर्घकाळ लोकांना माहितीच नव्हतं. 1610 मध्ये गॅलिलिओ गॅलिलींनी गुरूचे 4 चंद्र शोधल्यावर हे लक्षात आलं. लॅटिनमध्ये या चंद्राला म्हटलं जातं Luna - म्हणूनच चंद्राशी संबंधित गोष्टींसाठी Lunar हा शब्द वापरला जातो.

चंद्राचा आकार आहे पृथ्वीच्या 25% हून साधारण थोडा मोठा. त्याचा व्यास आहे 1,740 किमीचा आणि तो पृथ्वीपासून 384,400 किमी अंतरावर आहे. आणि आपला हा चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून साधारण इंचभर दूर जातोय. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला चंद्राला 27.3217 दिवस लागतात. म्हणजे साधारणपण 27 दिवस 7 तास 43 मिनिटं. पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण 1/6 आहे. याचा परिणाम एकीकडे पृथ्वीवरच्या भरती - ओहोटीवर होत असतो. तर दुसरीकडे आपल्याला मूनवॉक करणारे अंतराळवीर टुणटुण उड्या मारत चालताना दिसतात.

चंद्रावरचं तापमान आहे पूर्ण सूर्य दिसत असेल तर 127 डिग्री सेल्शियस आणि अंधाऱ्या भागांमध्ये ते -173 डिग्री सेल्शियस इतकं खाली जाऊ शकतं.

चंद्र कसा आहे? तर आपल्या पृथ्वीसारखेच चंद्राचेही तीन मुख्य थर आहेत. कवच (Crust), आवरण (Mantle) आणि गाभा (Core). अब्जावधी वर्षांपूर्वी चंद्र वितळलेल्या स्थितीत होता. तो घन होत असताना लोहासारखी जड खनिजं विवरांमधून आत गेली तर वजनला हलक्या गोष्टी, कमी घनतेचे दगड पृष्ठभागावर राहिले. म्हणूनच चंद्राचा गाभा घन आहे, आवरण बहुतांश घन स्थितीत पण काही प्रमाणात द्रव स्थिती आहे आणि बाह्य कवच पातळ - असमान आहे.

गंमत म्हणजे आपल्याला चंद्राची जी बाजू दिसते तिथलं कवच मागच्या बाजूपेक्षा अधिक पातळ आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर Moon dust आहे. याला म्हणतात Lunar Regolith.चंद्रावर उतरलेल्या अंतराळवीरांना चंद्रावरच्या या धुळीचा त्रास झाला होता. चंद्राच्या पृष्ठभागावरच्या रोव्हर्सनाही याच धुळीमुळे अडचणी येतात. पाणी वा हवा नसल्याने या कणांची झीज होत नाही - परिणामी ते अतिशय तीक्ष्ण असतात. आणि ते electrostatically म्हणजे स्थिर विद्युत भारित असल्याने सगळ्या गोष्टींनी चिकटतात - आणि त्यांना गनपावडरसारखा वास येतो.

चंद्रावर वातावरण आहे, पण ते अगदी विरळ आहे. पृथ्वीसारखं दाट नाही. याला lunar exosphere म्हटलं जातं. आणि यात प्रामुख्याने हेलियम, निऑन आणि अरगॉन हे वायू आहे. अगदी तुरळक प्रमाणात हायड्रोजनचे रेणू आढळतात. चंद्रावर सोडियम दुर्मिळ आहे. चंद्रावर आता ज्वालामुखी नसले तरी एकेकाळी इथे ज्वालामुखीचे उद्रेक होऊन गेल्याच्या खुणा सगळीकडे आहेत.

तुम्हाला माहित्येय चंद्र कधीही पाहिला - कधीही पृथ्वीवरून त्याचा फोटो काढला - तरी तो एकसारखाच दिसतो. कारण चंद्राची एकच बाजू आपल्याला कायम दिसते. दुसरी बाजू दिसतच नाही. कारण चंद्राला पृथ्वीभवती प्रदक्षिणा घालायला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला लागतो. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा एकूण 59 % भाग दिसतो. पण दुसरी बाजू कधीही दिसत नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)