रॅपर बालेन शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान; कोणत्या पक्षाला किती जागा?

राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते बालेन्द्र (बालेन) शाह

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 3 मिनिटे

नेपाळमधील निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (RSP) प्रचंड विजय मिळवला आहे.

सप्टेंबर 2025 मध्ये नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली होती. तरुणांच्या या आंदोलनांमुळे तत्कालीन सरकार कोसळल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती.

अंतिम मतमोजणीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला 182 जागा मिळाल्या. मात्र, नेपाळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा हा आकडा 2 जागांनी कमी आहे. मात्र, गेल्या अनेक दशकांत एका पक्षाला मिळालेला हा सर्वांत मोठा विजय मानला जात आहे.

दुसऱ्या जागेवर नेपाळी काँग्रेस पक्ष आहे. या पक्षाला 38 जागांवर विजय मिळाला. कम्युनिस्ट पक्षाला 25 जागा मिळाल्या. हा पक्ष तिसऱ्या स्थानावर राहिला.

नेपाळमधील 1.9 कोटी पात्र मतदारांपैकी जवळपास 60 टक्के मतदारांनी मतदान केले.

या निकालामुळे राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते बालेन्द्र (बालेन) शाह देशाचे पुढील पंतप्रधान होतील. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले, इंजिनिअर, रॅपर ते काठमांडूचे महापौर असा प्रवास असलेले बालेन शाह हे वयाच्या पस्तिशीतच नेपाळचे पंतप्रधान बनतील.

राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (RSP) हा 2022 साली स्थापन झाला होता आणि त्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत चौथ्या स्थानावर राहिला होता.

नेपाळमध्ये निवडणुका 2 पद्धतींनी घेतल्या जातात. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला थेट बहुमत मिळणं कठीण मानले जाते. या पार्श्वभूमीवर आरएसपीची ही कामगिरी विशेष मानली जात आहे.

एकूण 165 खासदारांची निवड 'फर्स्ट पास्ट-द-पोस्ट' (एफपीटीपी) पद्धतीने होते. या पद्धतीत सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो. उर्वरित 110 खासदारांची निवड 'प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन' (पीआर) पद्धतीने होते. यात एखाद्या पक्षाला मिळालेल्या एकूण मतांच्या प्रमाणाचा विचार केला जातो.

बालेन शाह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बालेन शाह

निवडणुकीच्या निकालाने नेपाळी जनतेची बदलाची इच्छा व्यक्त केली. प्रचारादरम्यान राजकीय पक्षांनी बेरोजगारी, आर्थिक ठप्पपणा आणि वाढती विषमता यांसारख्या मुद्द्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन देत नेपाळमधील महत्त्वाच्या युवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

याच समस्यांमुळे सप्टेंबर 2025 मध्ये नेपाळी युवकांनी आंदोलन केले होते. त्याची सुरूवात सोशल मीडियावरील बंदीवरून झाली असली तरी नंतर ते अधिक व्यापक बनलं. आंदोलकांनी नेपाळमधील भ्रष्टाचार, राजकारणातील घराणेशाही याविरोधात असंतोष व्यक्त केला. 'नेपो बेबीज' असं संबोधत सत्ताधारी कुटुंबांतील मुलांना मिळणाऱ्या विशेष वागणुकीवर असंतोष व्यक्त केला.

नेपाळ आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

या आंदोलनांदरम्यान एकूण 77 जणांचा मृत्यू झाला. देशाच्या पोलीस प्रमुखांनी हजारो निःशस्त्र आंदोलनकर्त्यांविरुद्ध बळाचा वापर करण्याची परवानगी देणारा आदेश दिल्याचंही बीबीसीच्या तपासात उघड झालं होतं.

या आंदोलनामुळे तत्कालिन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. मात्र, त्यानंतरही त्यांनी पुन्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि आपण पुन्हा निवडून येऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला होता.

परंतु या निकालात ओली यांच्या कम्युनिस्ट पक्षाला तिसरं स्थान मिळालं. बालेन शाह यांनी झापा मतदारसंघातून ओली यांचा पराभव केला. हा मतदारसंघ ओली यांचा बालेकिल्ला मानला जात होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)