'होर्मुझची सामुद्रधुनी' डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'गळ्याचा फास' बनत चाललीय का?

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 7 मिनिटे

इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. कारण होर्मुझची सामुद्रधुनी (स्ट्रेट ऑफ होर्मुझ) जवळपास बंद आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सागरी मार्गाद्वारे जगातील जवळपास 20 कच्च्या तेलाची वाहतूक होते.

याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचली आहे.

अनेक देशांमध्ये यामुळे इंधनाचं संकट निर्माण झालं आहे. इराण युद्धापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत साधारण 68 ते 70 डॉलर प्रति बॅरल इतकी होती.

अमेरिका 'कोणत्याही परिस्थितीत' होर्मुझची सामुद्रधुनीतील मार्ग सुरू करेल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. त्यांनी अनेक देशांना त्यांच्या युद्धनौका पाठवण्याचं आवाहन केलं आहे.

अर्थात इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची म्हणाले आहेत की, होर्मुझची सामुद्रधुनी फक्त 'शत्रू राष्ट्रांच्या जहाजां'साठी बंद आहे.

शनिवारी (14 मार्च) भारत सरकारनं सांगितलं की होर्मुझच्या सामुद्रधुनीतून शिवालिक आणि नंदा देवी ही दोन जहाजं एलपीजी घेऊन बाहेर पडली आहेत. ही जहाजं भारत पोहोचणार आहेत. सध्या भारतात एलपीजीच्या संकटावरील बातम्या चर्चेत आहेत.

ब्लूमबर्गनुसार, "इराणची लष्करी ताकद, अमेरिका आणि इस्रायलच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे इराण शेजारी देशांबरोबरच मालवाहतूक करणारी जहाजं आणि ऊर्जेच्या ठिकाणांना लक्ष्य करतो आहे."

"जेणेकरून इंधनाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण करता येईल आणि कच्चे तेल-नैसर्गिक वायूची बाजारपेठ अस्थिर होईल. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्ध संपवण्यासाठी दबाव वाढेल, असं इराणला वाटतं."

तर दुसऱ्या बाजूला, डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतच टीकेला तोंड द्यावं लागतं आहे. पेट्रोल पंपांवरील इंधनांच्या किमतीत वेगानं वाढ होते आहे.

जर कच्च्या तेलाच्या किमतीत याच गतीनं वाढ होत राहिली तर जागतिक अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होईल, असं आर्थिक विषयांच्या जाणकारांचं म्हणणं आहे.

ट्रम्प यांनी इराणकडून दिलं जाणारं प्रत्युत्तर आणि त्याच्या शक्तीचं चुकीचं आकलन केलं होतं, असं अनेक राजकीय विरोधकांचं म्हणणं आहे.

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्ये देखील याच प्रकारचं मत मांडलं जात आहे. साहजिकच ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढला आहे.

ट्रम्प यांनी केलेल्या ताज्या वक्तव्याकडे याच संदर्भात पाहिलं जात आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल ट्रम्प काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडियावर 14 मार्चला लिहिलं, "अनेक देश, विशेषकरून इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ज्या देशांवर परिणाम झाला आहे, ते हा मार्ग सुरू करण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेसोबत युद्धनौका पाठवतील."

"आम्ही आधीच इराणची 100 टक्के लष्करी शक्ती नष्ट केली आहे. मात्र त्यांचा कितीही मोठा पराभव झालेला असला तरीदेखील, एक-दोन ड्रोन पाठवणं, सागरी सुरुंग पेरणं किंवा या सागरी मार्गाच्य किनाऱ्यावर किंवा आतल्या बाजूला, कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा करणं, त्यांच्यासाठी सोपं आहे."

"ज्या देशाला पूर्णपणे उदध्वस्त करण्यात आलं आहे अशा देशापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि इतर प्रभावग्रस्त देशदेखील या प्रदेशात त्यांच्या युद्धनौका पाठवतील, अशी आशा आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी सुरू करू, सुरक्षित करू आणि तो मार्ग मुक्त करू."

डोनाल्ड ट्रम्प
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एका पोस्टमध्ये लिहिलं आहे, "अमेरिकेनं इराणचा लष्करी, आर्थिक आणि सर्वप्रकारे पूर्ण पराभव केला आहे. मात्र होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ज्या देशांना कच्च्या तेलाचा पुरवठा होतो, त्यांना त्या सागरी मार्गाच्या सुरक्षेची खातरजमा करावी लागेल. आम्ही यात पूर्ण मदत करू. सर्वकाही लवकर आणि सुरळीतपणे व्हावं, यासाठी अमेरिका त्या देशांशी ताळमेळदेखील साधेल."

याआधी अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या खार्ग बेटावरील 90 हून अधिक लष्करी तळ नष्ट केले. हे महत्त्वाचं बेट खाडीच्या उत्तर भागात आहे. ते इराणच्या जवळपास 90 टक्के कच्च्या तेलाच्या निर्यातीचं केंद्रदेखील आहे.

या बेटावरील कच्च्या तेलाच्या पायाभूत सुविधांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असं इराणचं म्हणणं आहे.

इराणनं म्हटलं आहे की जर त्यांच्या ऊर्जा ठिकाणांवर हल्ला झाला तर ते अमेरिकेशी संबंधित सर्व ऊर्जा ठिकाणांवर हल्ला करतील.

शनिवारी (14 मार्च) युएईच्या फुजैरा बंदरावर हल्ला झाला. हे ठिकाण ओमानच्या खाडीतील कच्च्या तेलाच्या पश्चिम आशियातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधांपैकी आहे.

इराण युद्धाचा तिसरा आठवडा सुरू होतो आहे. ऊर्जा केंद्रांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे युद्ध लवकर संपुष्टात येण्याची चिन्हं दिसत नाहीत.

'होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये युद्धनौका पाठवण्याचं आवाहन घाईघाईचं'

  • जोनाथन बील, संरक्षण प्रतिनिधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला करण्यासाठी युद्धनौका पाठवण्याचं आवाहन केलं. मात्र हे आवाहन सध्या घाईघाईनं केल्याचं वाटू शकतं.

विशेषकरून हे युद्ध संपण्याची कोणतीही चिन्ह दिसल्यामुळे तसं वाटू शकतं.

वस्तुस्थिती अशी आहे की, सध्या अमेरिकेचं नौदलदेखील या अरुंद सागरी मार्गातून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना सुरक्षा पुरवून तिथून नेत नाहिये.

सद्यपरिस्थितीत हा सागरी मार्ग अत्यंत धोकादायक मानला जातो आहे. अनेक तेलवाहू जहाजांनी इथून जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर आधीच हल्ले झाले आहेत.

होर्मुझ

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक जवळजवळ बंद झाली आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे की फ्रान्स आखाती प्रदेशात युद्धनौका पाठवण्यासाठी तयार आहे. मात्र ती फक्त 'एस्कॉर्ट मोहीम' असेल.

जेव्हा या युद्धाचा सर्वात भीषण टप्पा संपेल तेव्हा हे पाऊल उचलण्यात येईल, असंही ते म्हणाले आहेत.

फ्रान्सव्यतिरिक्त ट्रम्प यांनी जपान, चीन, दक्षिण कोरिया आणि ब्रिटनचं देखील नाव घेतलं आहे. हे देश जहाजांना सुरक्षा पुरवण्यासाठी युद्धनौका पाठवू शकतात.

अर्थात गेल्या आठवड्यातच ट्रम्प म्हणाले होते की "आम्ही आधीच जिंकलो असल्यामुळे", अमेरिकेला ब्रिटनच्या विमानवाहू युद्धनौकेची आवश्यकता नाही.

ब्रिटनच्या रॉयल नेव्हीकडे दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. यातील, एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स या एक युद्धनौकेला हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. मात्र या युद्धनौकेला उत्तर अटलांटिकच्या दिशेनं निघावं लागेल.

सध्या या प्रदेशात नौदलाकडे दुसरी कोणतीही युद्धनौका नाही. अर्थात एचएमएस ड्रॅगन ही डीस्ट्रॉयर (युद्धनौकेचा प्रकार) आता सायप्रसकडे निघाली आहे. तिथे ही युद्धनौका अतिरिक्त हवाई सुरक्षा पुरवेल.

होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाची का आहे?

होर्मुझची सामुद्रधुनी हा एक महत्त्वाचा व्यापारी सागरी मार्ग आहे. या सागरी मार्गातून जगातील जवळपास 20 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते.

युद्धाची सुरुवात झाल्यापासूनच या भागात अनेक जहाजांवर हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी गुरुवारी (12 मार्च) म्हणाले होते की होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यासाठी इराणनं शस्त्रास्त्रांचा वापर सुरू ठेवला पाहिजे.

होर्मुझची सामुद्रधुनी

अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशन (ईआयए) च्या अंदाजानुसार, सर्वसाधारणपणे या सागरी मार्गातून दर महिन्याला जवळपास 3,000 जहाज जातात.

या सागरी मार्गातून 2025 मध्ये दररोज जवळपास 2 कोटी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक झाली. याचं वार्षिक पातळीवरील मूल्य जवळपास 600 अब्ज डॉलरच्या (जवळपास 55 लाख 44 हजार कोटी रुपये) ऊर्जा व्यापाराइतकं आहे.

इथून जाणारं कच्चे तेल फक्त इराणचंच नसतं तर, आखातातील इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि युएई यासारख्या देशांमधूनही येतं.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अंदाजानुसार, 2022 मध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक झालेलं जवळपास 82 टक्के कच्चे तेल आणि द्रव स्वरुपातील हायड्रोकार्बन आशियातील देशांना गेलं होतं.

होर्मुझची सामुद्रधुनी, जगातील सर्वात मोठ्या तेलवाहू जहाजांची वाहतूक करण्याशी पुरेशी खोल आहे. या सागरी मार्गाचा वापर पश्चिम आशियातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रमुख उत्पादक आणि त्यांचे ग्राहक करतात.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमांनुसार, कोणत्याही देशाला त्याच्या समुद्रकिनाऱ्यापासून समुद्रात 12 नॉटिकल मैल (13.8 मैल) अंतरापर्यंत नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असतो.

होर्मुझची सामुद्रधुनी जिथे सर्वाधिक अरुंद आहे, तो भाग आणि त्यातील सागरी व्यापारी मार्ग (शिपिंग लेन) पूर्णपणे इराण आणि ओमानच्या प्रादेशिक सागरी सीमेमध्ये येतात.

जर हा सागरी मार्ग बंद करण्यात आला, तर फक्त इराणच नाही तर आखातातील अनेक देशांची कच्च्या तेलाची वाहतूक बंद होईल. इराणच्या 90 टक्के कच्च्या तेलाची निर्यात चीनला होते.

त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा सागरी मार्ग खुला करण्याचा संबंध युद्धातील पराभव-विजयाशी जोडला गेला आहे.

अमेरिकेच्या लष्करानं 4 दिवसांपूर्वीच म्हटलं आहे की त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरुंग पेरणारी इराणची 16 जहाजं नष्ट केली आहेत.

युद्ध कोणत्या दिशेला जातंय?

आंतरराष्ट्रीय बाबींचे जाणकार ब्रह्मा चेलानी यांनी एक्सवर लिहिलं, 'ऑपरेशन एपिक फ्यूरी'चं रुपांतर 'ऑपरेशन एपिक फेल्युयर' मध्ये होण्याचा धोका वाढत असताना डोनाल्ड ट्रम्प यांची अस्वस्थता आता अधिक स्पष्टपणे दिसून येते आहे.

चेलानी यांनी लिहिलं आहे, "त्यांनी आधी म्हटलं होतं की 'हे युद्ध जवळपास पूर्णपणे संपलं आहे' आणि अमेरिकेला ज्या लष्करी तळांना लक्ष्य करायचं होतं, त्या सर्वांवर हल्ला करण्यात आला आहे. मात्र त्याच्या उलट त्यांनी युद्ध आणखी वाढवत इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीचं मुख्य केंद्र असलेल्या खार्ग बेटावर बॉम्बहल्ला केला."

"त्याचबरोबर इराणच्या जमिनीवर संभाव्यरित्या उतरवण्यासाठी मरीन मोहीम दलांना आखाती प्रदेशात पाठवून ट्रम्प यांनी तेच पाऊल उचललं आहे, ज्यामुळे कधीकाळी अमेरिका व्हिएतनाममध्ये प्रदीर्घ काळ युद्धात अडकली होती."

"त्या युद्धाचा शेवट अमेरिकेच्या पराभवानं झाला होता. व्हिएतनाम युद्धातून मिळालेला सर्वात मोठा धडा म्हणजे हळूहळू वाढवण्यात आलेली लष्करी कारवाई, एका मर्यादित हस्तक्षेपाचं रुपांतर हळूच प्रदीर्घ आणि खुल्या युद्धात करू शकते."

खार्ग बेट

फोटो स्रोत, Gallo Images/Orbital Horizon/Copernicus Sentinel Data 2024

फोटो कॅप्शन, खार्ग बेट खाडीच्या उत्तर भागात आहेत आणि ते इराणच्या जवळपास 90 टक्के कच्च्या तेलाच्या निर्यातीचं केंद्र आहे

ब्रह्मा चेलानी यांनी लिहिलं आहे, "खरंतर, अनेकदा युद्धाची व्याप्ती तेव्हाच वाढू लागते जेव्हा नेते दावा करतात की त्यांची वाटचाल युद्ध संपवण्याच्या दिशेनं होते आहे."

भू-राजकीय विषयांचे जाणकार शनाका अंसलेम परेरा म्हणतात की इराणनं फुजैरा टर्मिनसवर हल्ला करून दाखवून दिलं आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीला बगल देऊन जाणारा मार्ग सुरक्षित नाही.

त्यांनी एक्सवर लिहिलं, "फुजैरा फक्त एक बंदरच नाही. ते हबशन-फुजैरा पाईपलाईनचं शेवटचं टर्मिनस आहे. संयुक्त अरब अमिरातीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी टाळून जाण्याचा तो एकमेव मार्ग आहे. इराणनं आता याच पर्यायी मार्गाला लक्ष्य केलं आहे."

"होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या शक्यतेबद्दल बहुतांश विश्लेषकांनी या आधारे अंदाज बांधला होता की दररोज 40 ते 65 लाख बॅरल कच्चे तेल पाईपलाईनद्वारे या सामुद्रधुनीच्या बाहेरून पाठवलं जाऊ शकतं. फुजैरा या अंदाजाच्या केंद्रस्थानी होतं. दुसरा प्रमुख पर्याय सौदी अरामकोची ईस्ट-वेस्ट पेट्रोलाईन पाईपलाईन आहे. ती जेद्दाहपर्यत जाते."

त्यांनी लिहिलं आहे, "इराणच्या क्षेपणास्त्रांनी 1 मार्चला सौदी अरेबियाच्या रास तनुरा या मुख्य तेल निर्यात टर्मिनलला लक्ष्य केलं. तर 3 मार्चला इराणचे ड्रोन फुजैरा ऑईल इंडस्ट्री झोनपर्यंत पोहोचले. रोखण्यात आलेल्या एका ड्रोनच्या अवशेषांमुळे तिथे आग लागली. मात्र विमा कंपन्यांना दिला जाणारा खरा संदेश या आगीबद्दल नाही. खरी चिंता पुढील संभाव्य घटनेची आहे."

परेरा यांचं म्हणणं आहे की फक्त होर्मुझची सामुद्रधुनीच नाही तर पर्याय मार्गदेखील आपल्या टप्प्यात असल्याचं इराणनं दाखवून दिलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)