नाक चोंदून 'डोकेदुखी' वाढवणारा सायनसचा त्रास नेमका कशामुळे वाढतो?

सायनसचा त्रास नेमका कशामुळे वाढतो? तज्ज्ञ सांगतात कारणं आणि उपाय

फोटो स्रोत, Getty Images

डोकेदुखी, नाक बंद होणं, चेहऱ्यावर दाब जाणवणं किंवा सतत होणारं थकवा ही लक्षणं अनेकांना साध्या सर्दीचीच वाटतातय, पण अनेक वेळा त्यामागे असतं ते अधिक गंभीर कारण म्हणजे सायनसायटिस किंवा सामान्य भाषेत सायनसचा त्रास.

बदलणारं हवामान, प्रदूषण, वाढत्या ॲलर्जी, धूळ-कण, एसीचा जास्त वापर आणि जीवनशैलीतले बदल यामुळे आजकाल सायनसच्या आजाराची समस्या वाढताना दिसते आहे.

सर्दी होवो किंवा नाही, तरी चेहऱ्यातील या पोकळ जागा म्हणजे सायनसेस एकदा सूजल्या की त्यांच्या निचऱ्याचा मार्ग अडतो आणि इथेच वेदना, जडपणा आणि जंतूसंसर्गाचं दुष्टचक्र सुरू होतं असं डॉक्टर सांगतात.

डॉक्टरांच्या माहितीनुसार बहुतांश सायनसच्या तक्रारी काही दिवसांत बऱ्या होतात, पण लक्षणं 10 दिवसांहून जास्त टिकली, वाढली किंवा चेहऱ्यावर सूज, डोळ्याभोवती लालसरपणा किंवा दृष्टी बदलल्यास तात्काळ वैद्यकीय मदत गरजेची ठरते.

काही रुग्णांमध्ये ॲलर्जी, नाकातील पॉलीप्स किंवा संरचनात्मक अडथळे असल्यास हा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवतो आणि काही वेळा शस्त्रक्रियेचीही गरज भासते.

तज्ज्ञांचा सल्ला, योग्य निदान आणि जीवनशैलीतील छोटे बदल यामुळे सायनसवर प्रभावी नियंत्रण शक्य आहे.

सायनस म्हणजे काय?

सायनस म्हणजे आपल्या चेहऱ्यात आणि कवटीत असलेल्या पोकळ, हवेने भरलेल्या जागा. या जागा नाकाशी जोडलेल्या असतात आणि त्यांची आतील त्वचा सतत म्यूकस तयार करते. हा म्यूकस नाकाद्वारे बाहेर जातो. त्यामुळे धूळ, ॲलर्जन्स आणि जंतू फिल्टर होऊन श्वसनमार्ग स्वच्छ राहतात.

सामान्य स्थितीत सायनसचे नैसर्गिक वायुविजन आणि निचरा सुरळीत चालू असतो. पण कोणत्याही कारणामुळे जसे की सर्दी, ॲलर्जी, संक्रमण, प्रदूषण किंवा रचनात्मक अडथळे या निचऱ्याचा मार्ग बंद झाला की सायनसची आतलं अस्तर सुजतं. यालाच सायनसायटिस म्हणतात.

सायनस म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

सूजल्यावर सायनसमधील हवा अडते, म्यूकस जमा होतो आणि त्यात जीवाणू वाढण्याची शक्यता वाढते. परिणामी जडपणा, डोकेदुखी, चेहऱ्यावर दाब, जाड-पिवळट स्राव, वास न येणं अशी लक्षणं दिसू लागतात. सायनसायटिस दोन प्रकारचा असू शकतोॲक्यूट (4 आठवड्यांपेक्षा कमी काळ) आणि क्रॉनिक (12 आठवड्यांपेक्षा जास्त).

ॲक्यूट प्रकारात संसर्ग हे प्रमुख कारण असतं, तर क्रॉनिकमध्ये ॲलर्जी किंवा नाकातील संरचनात्मक अडथळे जास्त जबाबदार असतात. योग्य उपचार, नाकाची स्वच्छता आणि ट्रिगर्स टाळले तर बहुतेक रुग्ण यातून आराम मिळवू शकतात.

गैरसमज आणि उत्तर

अनेक लोकांना हा फक्त सर्दीचा आजार वाटतो. किंवा सर्दी वाढली की त्याला सायनसचा त्रास असं म्हटलं जातं. पण योग्य निदान केल्याशिवाय आणि डॉक्टरांच्या मदतीशिवाय स्वतःच निदान करणं आणि स्वतःच उपचार घेणं अतिशय धोकादायक आहे.

चेन्नई इथं एसआरएम ग्लोबल रुग्णालयात सिनियर कन्सल्टंट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. के. प्रिया यांनी हे गैरसमज दूर होण्यासाठी आमच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

गैरसमज आणि उत्तर सायनस म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

त्या सांगतात, "सायनसायटिस हा फक्त सर्दीचा वाढलेला त्रास नाही; हे आपल्या चेहऱ्यातील आणि कवटीतील पोकळ हवेनं भरलेल्या जागांमध्ये सूज आली आहे. याचा संकेत देतं. "

लक्षणांच्या बाबतीत त्या सांगतात, " सामान्य सर्दी, व्हायरल इन्फेक्शन, ॲलर्जी, प्रदूषण, धूळीचे कण, तसेच नाकातील पॉलीप्स किंवा विचलित सेप्टम यांसारखे संरचनात्मक अडथळे हे सायनसायटिसचे प्रमुख घटक आहेत. बहुतांश रुग्णांना साध्या उपायांनी आराम मिळतो, परंतु लक्षणं दहा दिवसांहून जास्त टिकली, वाढली किंवा चेहऱ्यावर सूज, डोळ्याभोवती लालसरपणा आणि दृष्टीत बदल दिसू लागले तर तातडीच्या वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. वारंवार किंवा दीर्घकाल टिकणाऱ्या सायनसायटिसमध्ये औषधोपचारांसोबत अॅलर्जी नियंत्रण, जीवनशैलीतील बदल आणि काही प्रसंगी एंडोस्कोपिक सर्जरीचीही गरज भासू शकते. योग्य निदान आणि वेळेवर केलेला हस्तक्षेप यामुळे सायनसायटिसवर प्रभावी नियंत्रण मिळवणं पूर्णत: शक्य आहे."

डॉक्टरकडे कधी जायचं?

मुंबईच्या कोकिलाबेन धिरुभाई रुग्णालयात इएनटी कन्सल्टंट म्हणून कार्यरत असणारे डॉ. राहुल मोदी सांगतात, "

"बहुतांश व्हायरल सायनसायटिसमध्ये घरगुती उपाय आणि ओव्हर द काऊंटर औषधं पुरेशी ठरू शकतात, पण लक्षणं पाच ते सात दिवसांपेक्षा जास्त टिकली किंवा सुधारल्यानंतर पुन्हा वाढली तर तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. तीव्र वेदना, उच्च ताप, डोळ्यांशी संबंधित बदल किंवा अँटिबायोटिक्सना प्रतिसाद न मिळणं ही गंभीर संसर्गाची चिन्हं असू शकतात. सलाईन इरिगेशन, स्टिरॉइड स्प्रे आणि अल्पकाळासाठीच वापरायचे डीकंजेस्टंट्स हे उपचारांचे महत्त्वाचे घटक आहेत. अँटिबायोटिक्स मात्र फक्त बॅक्टेरियल संसर्गाचा ठोस संशय असतानाच दिली पाहिजेत, अन्यथा त्यांचा अनावश्यक वापर भविष्यात प्रतिकारशक्ती कमी करू शकतो."

निदान कसं करतात?

आता या सायनसला होणाऱ्या त्रासाचं निदानही होणं तितकंच महत्त्वाचं आहे.

डोंबिवली येथील अरिंदम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी बीबीसी मराठीला निदानाबद्दल माहिती दिली.

निदान कसं करतात? सायनस म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते सांगतात, "निदानासाठी एंडोस्कोपी आणि सीटी स्कॅन अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते नेमका अडथळा कुठे आहे हे स्पष्ट दाखवतात. औषधोपचार प्रभावी नसतील, किंवा त्रास वारंवार परत येत असेल तर एंडोस्कोपिक सर्जरी हा सुरक्षित आणि अचूक उपाय आहे. योग्य वेळी उपचार घेतले, तर सायनसायटिसमुळे दीर्घकालीन त्रास टाळता येऊ शकतो."

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये कान-नाक-घसा कन्सल्टंट म्हणून कार्यरत असणारे डॉ. दिव्य प्रभात सांगतात, "सायनसायटिसचं मूळ स्रोत अनेकदा ॲलर्जीमध्ये दडलेलं असतं आणि म्हणूनच त्याची सखोल तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कोणत्या विशिष्ट घटकामुळे ॲलर्जी होते हे अचूक ओळखण्यासाठी स्किन प्रिक टेस्ट ही जागतिक मान्यताप्राप्त 'गोल्ड स्टँडर्ड' आहे. दुर्लक्ष झालेला क्रॉनिक सायनसायटिस फक्त नाकापुरता मर्यादित राहत नाही. तो कानांचे इन्फेक्शन, टॉन्सिल-ॲडेनॉइडची वाढ, ब्रॉन्कायटिस किंवा ॲझ्मा (अस्थमा) यांसारख्या समस्या तयार करू शकतो. त्यामुळे वेळेत उपचार सुरू करणे अत्यावश्यक आहे. औषधोपचारांनी साधारणपणे रुग्णांना त्वरित आराम मिळतो; मात्र लक्षणं वारंवार परतत असतील तर FESSसारखी एंडोस्कोपिक प्रक्रिया सायनसचे नैसर्गिक मार्ग मोकळे करून दीर्घकालीन आराम देते."

औषधांना दाद मिळाली नाही तर?

औषधोपचारांनी पूर्ण आराम न मिळणाऱ्या किंवा वारंवार सायनसायटिस होणाऱ्या रुग्णांमध्ये अनेकदा सायनसच्या आत खोलवर अडथळे किंवा अरुंद मार्ग आढळतात.

त्यामुळे सूज वारंवार परत येते आणि निचरा योग्यरीत्या होत नाही. अशा वेळी FESS म्हणजेच Functional Endoscopic Sinus Surgery हा प्रभावी पर्याय ठरतो.

ही प्रक्रिया एंडोस्कोपच्या मदतीने सायनसचे नैसर्गिक मार्ग स्वच्छ आणि रुंद करण्यावर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे हवा खेळती राहते आणि स्रावाचा निचरा सुधारतो.

उपचारानंतर रुग्णांचे दैनंदिन लक्षणं लक्षणीय कमी होतात आणि संसर्ग परत येण्याचा धोका कमी होतो.

औषधांना दाद मिळाली नाही तर? सायनस म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. राहुल मोदी सांगतात, "ज्यांना औषधोपचारांवर पूर्ण प्रतिसाद मिळत नाही किंवा सायनसायटिस वारंवार पुनरावृत्ती होत असेल, त्यांच्यासाठी FESS ही अचूक आणि कमीत कमी इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया अत्यंत परिणामकारक ठरते. एंडोस्कोपच्या मदतीने अडथळे दूर करण्यात येतात आणि सायनस ड्रेनेज कायमस्वरूपी सुधारतो. बहुतेक रुग्णांना यामुळे दीर्घकाल टिकणारा आराम मिळतो. अनुभवी शल्यविशारदांकडे केल्यास या प्रक्रियेतील गुंतागुंत अत्यंत दुर्मिळ असतात."

ते पुढं सांगतात, " मुंबईसारख्या शहरांमध्ये हवेतला PM2.5 प्रदूषक, आर्द्रता, एसीमुळे होणारी कोरडेपणा आणि अचानक बदलणारे हवामान हे सर्वच घटक सायनसच्या अस्तराला त्रास देऊन सूज वाढवू शकतात. त्यामुळे पर्यावरणीय काळजी आणि जीवनशैलीतले बदल हे उपचाराइतकेच महत्त्वाचे आहेत."

हा त्रास कसा टाळाल?

सायनसायटिस पूर्णपणे रोखणं शक्य नसले तरी, त्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे नाकाच्या आरोग्याची नियमित काळजी घेणं. हवेतल्या धूळ-कण, प्रदूषण, परागकण आणि ॲलर्जन्स यामुळे सायनसच्या आतील अस्तराला वारंवार त्रास होत असतो.

त्यामुळे, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच, दररोज एकदा सलाईन वॉश किंवा सलाईन स्प्रे वापरणं फायदेशीर ठरतं यामुळे नाकात साचलेली धूळ, सूक्ष्मकण आणि जंतू बाहेर पडतात. घरातील हवा स्वच्छ ठेवणं, एसीचे फिल्टर वेळेवर बदलणं आणि आर्द्रता 40–50% दरम्यान ठेवणं सायनसला अनुकूल वातावरण तयार करतं.

अॅलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी आपले ट्रिगर्स टाळणं अत्यंत महत्त्वाचं. परागकणांचा हंगाम, धूळ, पाळीव प्राण्यांचे केसं किंवा बुरशी यांच्याशी संपर्क कमी ठेवला तर सायनसायटिसची शक्यता कमी होते. पुरेसं पाणी पिणं आणि दिवसभर हायड्रेटेड राहणं म्यूकस पातळ ठेवतं, ज्यामुळे सायनसचा निचरा सहज होतो. सिगारेटचा धूर, वाहनांचं धूर-प्रदूषण आणि रासायनिक वाफा हे सायनसला सर्वाधिक त्रासदायक असतात, त्यामुळे त्यापासून दूर राहणं अत्यावश्यक.

हवामानात अचानक बदल होणाऱ्या दिवसांत संरक्षण घेणं, पुरेशी झोप, स्ट्रेस कमी ठेवणं आणि प्रतिकारशक्ती वाढवणं या सर्व गोष्टी मिळून सायनसायटिसपासून दीर्घकालीन संरक्षण देतात.

डॉ. दिव्य प्रभात सांगतात, "प्रदूषण, तीव्र सुगंध, मच्छर रिपेलंट्स किंवा धूपकाड्या यांसारखे ट्रिगर्स टाळणं आणि संतुलित आहार, स्लीप-सायकल, व्यायाम व तणाव नियंत्रण यांसारख्या जीवनशैलीतील बदल केल्यास सायनसायटिसचे अटॅक्स कमी वेळा आणि कमी तीव्रतेने येऊ शकतात."

डॉ. राहुल मोदी सांगतात, "सायनसायटिस टाळण्यासाठी नाक आणि श्वसनमार्गांची नैसर्गिक ओलावा कायम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवसाला किमान दोन लिटर पाणी प्याल्यास म्यूकस पातळ राहतो आणि निचरा चांगल्या प्रकारे होतो. कोरड्या हवेत राहणाऱ्यांनी सलाईन स्प्रे किंवा ह्युमिडिफायरचा वापर करावा आणि धूर, प्रदूषण किंवा स्मोक एक्स्पोजरपासून लांब राहावं. एसीचे फिल्टर नियमितपणे साफ करणंही सायनसच्या आरोग्यासाठी तेवढंच गरजेचं आहे. "

ते पुढं सांगतात, "प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित चालणे, भाजीपाला-पोषक पदार्थांनी भरलेला आहार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित झोपेची सवय आवश्यक आहे. स्वच्छतेच्या सवयी विशेषत: वारंवार हात धुणे या व्हायरस आणि बॅक्टेरिया दूर ठेवण्यात मदत करतात. आणि डायबिटीसवर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक आहे, कारण अनियंत्रित रक्तशर्करा जीवघेण्या प्रकारच्या फंगल सायनसायटिसचा धोका वाढवू शकते."

सायनस म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.