अबूधाबीत क्षेपणास्त्राच्या तुकड्याने भारतीय व्यक्ती जखमी; अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

ड्रोन हल्ले

फोटो स्रोत, JACK GUEZ / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, सोमवारी पहाटे इस्रायलच्या किनारपट्टीवर असणाऱ्या एका शहराच्या आकाशात इराणच्या हवाई हल्ल्यांचे फोटो दिसले. अनेक आखाती देशांनी दावा केला आहे की त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले रोखले.
वाचन वेळ: 9 मिनिटे

संयुक्त अरब अमिरातीची (UAE) राजधानी अबूधाबीमध्ये क्षेपणास्त्राचा तुकडा पडल्याने एक भारतीय नागरिक जखमी झाला आहे.

अबूधाबीच्या सरकारी माध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की, हवाई संरक्षण प्रणालीने एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राला यशस्वीरित्या रोखल्यानंतर ही घटना घडली. या घटनेत एक भारतीय नागरिक किरकोळ जखमी झाला आहे.

अबूधाबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, लोकांनी केवळ अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्यावी आणि अफवा किंवा पडताळणी न झालेली माहिती टाळावी, तसेच अशी माहिती इतरांना देखील देऊ नये.

अबु धाबीमध्ये क्षेपणास्त्राच्या अवशेषांमुळे एक भारतीय नागरिक जखमी झाल्याचे वृत्त पीटीआयने देखील दिले आहे.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, "अधिकारी म्हणाले की, सोमवारी अबू धाबीमध्ये एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राला यशस्वीरित्या रोखल्यानंतर अल-शवामेख परिसरात क्षेपणास्त्राचा तुकडा (मलबा) पडल्याने एक भारतीय नागरिक किरकोळ जखमी झाला."

संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) संरक्षण मंत्रालयाने काही वेळापूर्वीच सांगितलं होतं की, देशाची हवाई संरक्षण यंत्रणा इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनना रोखण्यात व्यस्त होती.

क्षेपणास्त्र आणि ड्रोन रोखल्यामुळे मोठे आवाज येत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली होती.

इराण विरोधातील युद्ध कधीपर्यंत सुरू राहील? इस्रायल डिफेन्स फोर्सच्या प्रवक्त्यांनी दिलं उत्तर

इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या (IDF) प्रवक्त्यांनी काही वेळापूर्वी माध्यमांना दिलेल्या निवेदनातून इराण आणि हिजबुल्लासोबतच्या युद्धाच्या भविष्यासंदर्भात भाष्य केलंय.

आयडीएफचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी सांगितले की, इराण आणि लेबनॉनमधील हिजुबल्लाविरुद्धची लढाई अजून "काही आठवडे" सुरू राहणार आहे.

डेफ्रिन यांच्या मते, "आम्हाला अपेक्षा आहे की, इराण आणि हिजबुल्लाविरुद्धचे युद्ध अजून काही आठवडे चालू राहील."

ते पुढे म्हणाले, "दिवसागणिक आम्ही या दहशतवादी सत्तेला अधिक कमकुवत करत आहोत. आम्ही या दहशतवादी सत्तेला आणि त्यांच्या साथीदारांना इस्रायलसाठी कोणताही धोका निर्माण करू देणार नाही."

आयडीएफचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन

फोटो स्रोत, @IDF

फोटो कॅप्शन, आयडीएफचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन

इराण लंडनवर क्षेपणास्त्रे डागू शकतो का? ब्रिटनचे मंत्री काय म्हणाले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ब्रिटनमधील एका कॅबिनेट मंत्र्यांनी म्हटलं आहे की, इराणकडे लंडनपर्यंत पोहोचू शकणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे असल्याचा कोणताही 'पुरावा' नाही.

गृहनिर्माण सचिव स्टीव्ह रीड यांनी बीबीसीला सांगितलं की, "इराण ब्रिटनला लक्ष्य करतोय किंवा तसे करण्याची त्याची क्षमता आहे, अशी कोणताही स्पष्टता दिसून येत नाही."

त्यांचं हे विधान अशावेळी आलं आहे, जेव्हा इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) शनिवारी (21 मार्च) दावा केला होता की "इराणकडे 4,000 किलोमीटर (2,485 मैल) पल्ल्याची मारक क्षमता असलेली शस्त्रे आहेत."

इराणपासून सुमारे 3,800 किमी अंतरावर, हिंद महासागरातील चागोस बेटांवरील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळाला इराणने लक्ष्य केल्याचे समोर आल्यानंतर इस्रायलने हा दावा केला.

मात्र, ही क्षेपणास्त्रे ब्रिटिश भूभागाच्या किती जवळ पोहोचली होती, याबाबत माहिती देण्यास स्टीव्ह रीड यांनी नकार दिला. त्यांनी "ऑपरेशनल माहिती" उघड करू शकत नाही, असं सांगितलं.

दरम्यान, शुक्रवारी (20 मार्च) रात्री इराणने दिएगो गार्सियावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. त्यापैकी एक हवेतच कोसळले, तर दुसरे रोखण्यात आले.

कतारचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळून 6 जणांचा मृत्यू; संरक्षण मंत्रालयानं काय कारण सांगितलं?

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर कतारच्या सागरी हद्दीत एक लष्करी हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कतारच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

हे हेलिकॉप्टर 'नियमित कर्तव्यावर'वर होते आणि त्यात तांत्रिक बिघाड झाला होता, अशी माहिती कतारने रविवारी (22 मार्च) सकाळी दिली.

संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक निवेदन जारी करत म्हटलं की, "शोध मोहिमेदरम्यान 7 पैकी 6 जणांना शोधण्यात यश आलं आहे."

मंत्रालयाकडून हेही सांगितलं की, कॅप्टन (पायलट) सईद नासिर सामेख यांचा शोध अद्याप सुरू आहे. ते कतारच्या सशस्त्र दलाचा भाग आहेत.

हेलिकॉप्टर 'नियमित कर्तव्यावर' होते आणि त्यात तांत्रिक बिघाड झाला होता, असं कतारकडून सांगण्यात आलं. (प्रातिनिधिक फोटो: 18 डिसेंबर 2020 रोजी दोहा येथे पार पडलेल्या लष्करी संचलनादरम्यानचा फोटो).

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, हेलिकॉप्टर 'नियमित कर्तव्यावर' होते आणि त्यात तांत्रिक बिघाड झाला होता, असं कतारकडून सांगण्यात आलं. (प्रातिनिधिक फोटो: 18 डिसेंबर 2020 रोजी दोहा येथे पार पडलेल्या लष्करी संचलनादरम्यानचा फोटो).

महत्वाचं म्हणजे, गेल्या काही आठवड्यांपासून इराणच्या हल्ल्यांमुळे कतार प्रभावित झाला आहे. गेल्या आठवड्यात इराणने कतारच्या मुख्य गॅस प्रकल्पाला लक्ष्य केलं होतं.

मात्र, या हेलिकॉप्टर अपघाताचा इराण युद्धाशी काही संबंध आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

'इराणकडे आता फक्त 48 तास शिल्लक'; ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर इराणनं दिली 'ही' प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे की, जर इराणच्या इंधन आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ला झाला, तर इराणचं लष्कर अमेरिकेशी संबंधित ऊर्जा सुविधा लक्ष्य करेल.

इराणचा हा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या अल्टिमेटमनंतर आला आहे.

'इराणकडे आता फक्त 48 तास शिल्लक'; ट्रम्प यांचा इशारा

फोटो स्रोत, Getty Images

ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर इराणने 48 तासांच्या आत होर्मुझ सामुद्रधुनी उघडली नाही, तर अमेरिका इराणच्या वीज प्रकल्पांना 'पूर्णपणे नष्ट' करेल.

यापूर्वी इराणने दक्षिण इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. लक्ष्य केलेल्या भागांमध्ये इस्रायलच्या अघोषित अण्वस्त्र साठा असलेले डिमोना शहरही समाविष्ट आहे.

इराणने म्हटले आहे की, "आता युद्ध नव्या टप्प्यात पोहोचले आहे."

इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

इस्रायलमधील आपत्कालीन सेवांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील अराद शहरावर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळं मोठं नुकसान झालं आहे.

मागेन डेव्हीड अडोम या आपत्कालीन सेवेनुसार, हल्ल्यांनंतर 88 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्यापैकी 10 जण गंभीर जखमी, 19 जण मध्यम जखमी आणि 55 जण किरकोळ जखमी आहेत.

हल्ल्यांनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अरादच्या महापौरांशी संवाद साधला. ही "अत्यंत कठीण संध्याकाळ" असल्याचं ते म्हणाले.

दक्षिणेकडील अराद शहरावर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळं मोठं नुकसान झालं आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, दक्षिणेकडील अराद शहरावर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळं मोठं नुकसान झालं आहे.

नेतन्याहू यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, "आपल्या भविष्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेत आजची संध्याकाळ खूप कठीण आहे. मी महासंचालकांना सर्व सरकारी मंत्रालयांच्या सहकार्याने सर्व आवश्यक मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत."

नेतन्याहू यांनी म्हटलं की, "मी सध्या घटनास्थळी काम करणाऱ्या आपत्कालीन आणि बचाव पथकांना धीर देऊ इच्छितो. तसंच, सर्वांना होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करतो."

इस्रायल सर्व आघाड्यांवर शत्रूंवर हल्ले करत राहील, असंही त्यांनी सांगितलं.

डोनाल्ड ट्रम्प यांचे इराण विरोधातील युद्ध आवरते घेण्याचे संकेत

इराणविरुद्धची अमेरिकेची लष्करी मोहीम आता आवरती घेण्याचा विचार सुरू असल्याचा संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

त्यांनी मध्य पूर्वेतील महत्त्वाची उद्दिष्टे साध्य होत असल्याचा दावा केला. पण, होर्मुझ सामुद्रधुनीचे रक्षण आता इतर देशांनी करावे, असंही त्यांनी स्पष्ट केले.

इराणमधील युद्ध आवरते घेण्याचा अमेरिकेचा विचार; होर्मुझचे रक्षण इतर देशांनी करावे- ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

मध्य पूर्वेत इराणच्या दहशतवादी राजवटीविरुद्ध आमच्या महान लष्करी मोहिमेचा शेवट करण्याचा विचार करताना आम्ही आमचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या खूप जवळ पोहोचलो आहोत:

  • इराणची क्षेपणास्त्र क्षमता, प्रक्षेपक आणि त्यासंबंधित सर्वकाही पूर्णपणे नष्ट करणे.
  • इराणचा संरक्षण औद्योगिक पाया उद्ध्वस्त करणे.
  • त्यांचे नौदल आणि वायूदलफोर्स तसेच हवाई रक्षण शस्त्रास्त्रांचा नायनाट करणे.
  • इराणला अण्वस्त्र क्षमतेच्या जवळदेखील जाऊ न देणे आणि अशी कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास अमेरिका वेगाने आणि शक्तीशालीपणे प्रतिसाद देऊ शकेल अशा स्थितीत नेहमी राहणे.
  • आमचे मध्य पूर्वेतील सहकारी इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत आणि इतर यांचे सर्वोच्च स्तरावर संरक्षण करणे.
आयआरजीसीने 21 मार्च रोजी इस्रायलविरुद्ध वापरलेल्या एका क्षेपणास्त्राचा व्हिडिओ फुटेज जारी केला आहे.

फोटो स्रोत, SEPAHNEWS.COM / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, आयआरजीसीने 21 मार्च रोजी इस्रायलविरुद्ध वापरलेल्या एका क्षेपणास्त्राचा व्हिडिओ फुटेज जारी केला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीचे रक्षण आणि नियंत्रण ती वापरणाऱ्या इतर राष्ट्रांनी करायला हवे, कारण अमेरिका ती वापरत नाही.

विनंती केल्यास आम्ही त्या देशांना मदत करू, परंतु एकदा इराणचा धोका संपुष्टात आला की त्याची गरज भासू नये.

महत्त्वाचे म्हणजे, ही त्यांच्या दृष्टीने एक सोपी लष्करी कारवाई ठरेल.

इराणचा हिंदी महासागरातील ब्रिटिश तळावर क्षेपणास्त्र हल्ला

इराणचा हिंदी महासागरातील ब्रिटिश तळावर क्षेपणास्त्र हल्ला

फोटो स्रोत, US National Archives

इराणने हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया येथील ब्रिटिश लष्करी तळाच्या दिशेने 2 क्षेपणास्त्रे डागली आहेत. असं असलं तरी, यातील एकही क्षेपणास्त्र ब्रिटिश तळापर्यंत पोहोचले नाही.

ब्रिटनने शुक्रवारी (20 मार्च) म्हटलं होतं की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणी हल्ले रोखण्यासाठी त्यांच्या लष्करी तळाचा वापर केला जाऊ शकतो.

याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने ब्रिटनला इशारा दिला की, अमेरिकेने लष्करी तळाचा वापर करणे हे "तणाव वाढवण्याच्या" स्वरुपात पाहिले जाईल.

शनिवारी (21 मार्च) इराणच्या 'अयशस्वी' क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इराण आणि मध्य-पूर्वेतील संघर्ष भारताच्या हद्दीत म्हणजेच हिंदी महासागरात पोहोचला आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

'नतान्झ अणु केंद्रावर पुन्हा हल्ला', इराणचा दावा

"मध्य इराणमधील नतान्झ अणु केंद्रावर आज सकाळी पुन्हा हल्ला झाला," अशी माहिती इराणच्या अणुऊर्जा संघटनेने दिली आहे.

इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, "तपासात असे दिसून आले आहे की, या केंद्रामधून कोणत्याही किरणोत्सर्गी पदार्थाची गळती झालेली नाही. आजूबाजूच्या परिसरातील लोकांना कोणताही धोका नाही."

इराणच्या अणुऊर्जा संघटनेने या हल्ल्याचा निषेध केला. तसेच "हे अणुप्रसारबंदी करार (NPT) आणि इतर अणुसुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे," असंही म्हटलं.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) एका एक्स-पोस्टमध्ये म्हटले, "इराणने आम्हाला कळवले आहे की, आज नतान्झ अणु केंद्रावर हल्ला झाला. हल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात किरणोत्सर्गाच्या पातळीत कोणतीही वाढ नोंदवली गेली नाही. आम्ही याची चौकशी करत आहोत."

"अणु अपघाताचा धोका टाळण्यासाठी IAEA च्या महासंचालकांनी पुन्हा एकदा लष्करी संयम राखण्याचे आवाहन केले आहे."

इराणच्या अणुऊर्जा संघटनेने यापूर्वी नतान्झवरील हल्ल्याची कबुली दिली होती. 3 मार्चला, असे सांगण्यात आले होते की, 2 दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर कोणत्याही किरणोत्साराची गळती नोंदवली गेली नाही.

जून 2025 मध्ये, अमेरिकेने नतान्झ, फोर्डो आणि इस्फहान या 3 अणु केंद्रांवर बॉम्बहल्ला केला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, या हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रम "पूर्णपणे नष्ट" झाला आहे.

इराणने दिली UAE च्या 'या' शहरावर 'मोठ्या हल्ल्याची' धमकी

तेहरानमधील एक जाहिरात फलक, ज्यात इराणी टपाल तिकिटांवर अबू मूसा आणि ग्रेटर टुनब बेटे दर्शविली आहेत (फाइल फोटो).

फोटो स्रोत, ATTA KENARE/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, तेहरानमधील एक जाहिरात फलक, ज्यामध्ये इराणी स्टॅम्पवर अबू मूसा आणि ग्रेटर टुनब बेटे दर्शविली आहेत (फाइल फोटो).

इराणने संयुक्त अरब अमिरातीतील रास अल-खैमाह या शहरावर 'निर्णायक ताकदीने' हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

पर्शियन आखातातील दोन बेटांच्या मुद्द्यावरून यूएईसोबत दीर्घकाळ सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर इराणने ही धमकी दिली आहे.

सरकारी माध्यमांनी टेलिग्रामवर प्रसिद्ध केलेल्या संदेशात इराणच्या सशस्त्र दलांच्या प्रवक्त्याने असा इशारा दिला आहे की 'अबू मूसा आणि ग्रेटर टुनब बेटांवर कोणतीही नवीन आक्रमक कारवाई झाल्यास त्याला यूएईतील त्या शहरावर हल्ला करून प्रत्युत्तर दिलं जाईल.'

या संदेशात आक्रमकतेचे स्वरुप स्पष्ट करण्यात आलेले नाही, मात्र ही धमकी अशा वेळी आली आहे जेव्हा ही दोन्ही बेटे अनेक दशकांपासून इराणच्या नियंत्रणाखाली आहेत.

ही बेटे पर्शियन आखातात स्थित असून सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जातात. यूएईने या दोन्ही बेटांवर आपला दावा केला आहे.

इराणी तेलावरील निर्बंध शिथिल

अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने समुद्रात असलेल्या इराणी तेलावरील निर्बंध तात्पुरते शिथिल केले आहेत. त्यामुळे इराणला हे तेल बहुतेक देशांना विकता येईल आणि त्यामुळे जागतिक बाजारातील तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.

शुक्रवारी X वर पोस्ट केलेल्या निवेदनात अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की या "अल्पकालीन परवानगी"मुळे सुमारे 14 कोटी बॅरल इराणी तेल जागतिक बाजारात येऊ शकेल.

बेसेंट म्हणाले की या तेलविक्रीतून होणारा आर्थिक फायदा 'इराणला मिळवणे कठीण जाईल'.

ही परवानगी फक्त आधीच प्रवासात असलेल्या तेलापुरती मर्यादित आहे आणि त्यातून नवी खरेदी किंवा उत्पादन करण्यास परवानगी मिळत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'थोडक्यात, किंमत खाली ठेवण्यासाठी आपण तेहरानविरुद्ध इराणी तेलाचाच वापर करणार आहोत,' असेही बेसेंट म्हणाले.

युद्ध सुरू झाल्यापासून, आणि इराणच्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील ऊर्जा पायाभूत संरचना बाधित झाल्यानंतर, तेल आणि गॅसचे दर झपाट्याने वाढले आहेत.

ब्रेंट क्रूड तेलाचा भाव सध्या प्रति बॅरल सुमारे 112 डॉलर्सवर स्थिर आहे. शुक्रवारी यात 3% वाढ झाली आणि गेल्या वर्षभरात 53% वाढ झालेली दिसते.

होर्मुझची सामुद्रधुनी नेमकी आहे कुठे?

पर्शिया अर्थात इराणच्या आखातात (Persian Gulf) शिरण्याचा हा मुख्य मार्ग आहे.

या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेला आहे इराण, तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी पर्शियाच्या आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते. इथल्या निसर्गरम्य होर्मुझ बेटावरून तिला हे नाव पडलं आहे.

हा जलमार्ग आकारानं लहान असला, तरी हा जगातला सर्वात महत्त्वाचा जहाजांसाठीचा जलमार्ग आहे.

या जलमार्गाची लांबी आहे साधारण 96 मैल म्हणजे 154.497 किलोमीटर आहे. तुलना करायची झाली, तर मुंबई ते पुणे हे अंतर आहे 152 किमी.

आणि सर्वात चिंचोळ्या भागामध्ये हा जलमार्ग फक्त 21 मैल म्हणजे 33.7962 किमी रुंद आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी नेमकी आहे कुठे?

याच्या प्रत्येक बाजूच्या शिपींग लेन्स फक्त 2 मैल म्हणजे 3.21 किमी रुंद आहेत.

हा मार्ग लहानसा, चिंचोळा असला तरी यातून जगातले सर्वात मोठे क्रूड ऑईल टँकर्स जाऊ शकतील, इतपत खोल आहे आणि मिडल ईस्ट म्हणजे मध्य-पूर्व अर्थात पश्चिम आशियामधले बहुतेक तेल आणि गॅस उत्पादक आणि त्यांचे ग्राहक या सामुद्रधुनीचा वापर करतात.

कोणत्याही वेळी काही डझन ऑईल टँकर्स या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दिशेने जात असतात किंवा त्यातून बाहेर पडत असतात.

गेल्यावर्षी जगभरातल्या एकूण क्रूड ऑईलपैकी 20% म्हणजे दररोज सुमारे 2.1 कोटी बॅरल तेल या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेलं होतं.

हिंद महासागर (Indian Ocean) मधला महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय जलमार्ग असणारा मलाक्काची सामुद्रधुनी (Strait of Malacca), सुएझ कालवा, लाल समुद्रातली बाब एल्- मांदेब सामुद्रधुनी हे इतर मोठे जलमार्ग आहेत, पण होर्मुझची सामुद्रधुनी हा तेलासाठीचा 'World's Busiest Sea Route' आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी किती महत्त्वाची?

होर्मुझची सामुद्रधुनी ही गल्फ भागातल्या तेल निर्यातदारांसाठी महत्त्वाची आहे. कारण या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच तेल आणि गॅस उत्पादनावर आधारित आहे.

सौदी अरेबियाने 2018 साली या सामुद्रधुनीतून दररोज 64 लाख बॅरल्स तेलाची वाहतूक केली होती, तर इराकने 34 लाख, UAE ने 27 लाख आणि कुवेतने दररोज 20 लाखापेक्षा अधिक बॅरल्स तेलाची वाहतूक केली होती.

इराणही याच सामुद्रधुनीवर तेल निर्यातीसाठी अवलंबून आहे.

Liquefied Natural Gas (LNG) चा जगातला सर्वात मोठा उत्पादक असणारा कतारही जवळपास सगळ्या गॅसची निर्यात याच मार्गाने करतो.

गेल्या काही वर्षांमध्ये आशियातल्या बहुतेक सगळ्या अर्थव्यवस्थांसाठी हा मार्ग महत्त्वाचा झालाय.

भारत, चीन, जपान, दक्षिण कोरियापर्यंत पोहोचणारं बहुतेक क्रूड तेल याच मार्गाने येतं. अमेरिकाही याच मार्गाने तेल आयात करते.

युकेही या मार्गाने आखाती भागातून काही प्रमाणात तेल आणि LNG ची आयात करतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)