कुर्द गटाच्या युद्धातील सहभागावर ट्रम्प काय म्हणाले? बंडखोर कुर्द नेमकं कसं काम करतात?

कुर्द इराणमध्ये प्रत्यक्ष जमिनीवरून युद्धात सहभागी होतील का? यावर बीबीसीने एक विशेष रिपोर्ट केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कुर्द इराणमध्ये प्रत्यक्ष जमिनीवरून युद्धात सहभागी होतील का? यावर बीबीसीने एक विशेष रिपोर्ट केला आहे.
    • Author, ओरला गुएरिन
    • Role, वरिष्ठ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, उत्तर इराक
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

इराणविरोधातील अमेरिका-इस्रायल संघर्षात कुर्दीश गटांनी उडी घ्यावी, असं मला वाटत नाही, असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (7 मार्च) संध्याकाळी एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांसमोर बोलताना हे मत मांडलंय.

ते म्हणाले की, "या संघर्षात कुर्दीश गट उडी घेतील, अशी आम्हाला अपेक्षा नाही."

पुढे ते म्हणाले की, "आम्हाला युद्ध आता आहे त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं करायचं नाहीये."

"मला कुर्द सैनिकांना दुखापत झालेलं आणि मृत्युमुखी पडलेलं पाहायचं नाहीये. तसेच, आमचे संबंधही चांगले आहेत. या संघर्षात येण्याची त्यांची तयारी आहे. पण खरोखर, मी त्यांना सांगितलं आहे की त्यांनी या संघर्षात उडी मारू नये, असं मला वाटतं."

इराकच्या उत्तर भागात निर्वासित म्हणून राहणाऱ्या इराणी कुर्द दशकांपासून इराणच्या इस्लामिक राजवटीच्या शेवटासाठी होणाऱ्या युद्धात सहभागी होण्याची वाट पाहत आहेत.

कुर्द इराणमध्ये प्रत्यक्ष जमिनीवरून युद्धात सहभागी होतील का? यावर बीबीसीने एक विशेष रिपोर्ट केला आहे.

कुर्द इराणमध्ये प्रत्यक्ष जमिनीवरून युद्धात सहभागी होतील का? बीबीसीचा विशेष रिपोर्ट

अमेरिका आणि इस्रायलकडून आकाशातून जमिनीवर मारा करत युद्ध सुरू आहे. यादरम्यान इराणमध्ये लक्ष्यावर आधारित हल्ले केले जात आहेत. मात्र आता प्रश्न उपस्थित होत आहेत की प्रत्यक्ष जमिनीवरूनदेखील सैनिक हल्ला करू शकतात का? शक्य आहे. मात्र हे अमेरिकेचे सैनिक असणार नाहीत.

इराकच्या उत्तर भागात निर्वासित म्हणून राहणाऱ्या इराणी कुर्द विरोधी गटांनी बीबीसीला सांगितलं की सीमा ओलांडण्यासाठी त्यांच्या योजना तयार आहेत. या योजना दशकांपूर्वीच्या आहेत. मात्र ते ही गोष्ट स्पष्टपणे नाकारतात की त्यांच्या सैनिकांनी आधीच सीमा ओलांडली आहे.

कुर्दिस्तान फ्रीडम पार्टी (पीएके) च्या हना यजदानपाना यांचा दावा आहे की त्यांच्या गटाकडे सर्वात मोठं सशस्त्र दल आहे.

त्या म्हणतात, "आम्ही गेल्या 47 वर्षांपासून, इस्लामिक रिपब्लिकच्या काळापासूनच यासाठी तयारी करत आहेत."

त्या सांगतात की, "एकाही पेशमर्गानं (कुर्दिश बंडखोर सैनिक) अद्याप पाऊल पुढे टाकलेलं नाही."

पेशमर्गा हा कुर्दिश शब्द असून त्याचा अर्थ आहे, 'मृत्यूचा सामना करणारा.'

यजदानपाना यांनी आम्हाला सांगितलं की सहा विरोधी गट, ज्यांनी अलीकडेच एक आघाडी तयार केली आहे, राजकीय आणि लष्करी पातळीवर एकमेकांशी ताळमेळ साधत आहेत.

त्या म्हणतात, "कोणीही एकट्यानं काम करत नाही. जर आमचे बांधव पुढे जाणार असतील, तर त्याबद्दल आम्हाला माहीत होईल."

या आठवड्यात या सैनिकांकडून काही हालचाल होईल असं त्यांना वाटत नाही. त्यासाठी सर्वात आधी, अमेरिकेला मार्ग मोकळा करावा लागेल.

त्या म्हणतात, "आम्ही तोपर्यंत पुढे जाऊ शकत नाही, जोपर्यंत आमच्यावरील आकाश मोकळं नसेल. सरकारच्या शस्त्रास्त्रांच्या गोदामांना आधी नष्ट करण्यात यावं, ही आमची गरज आहे. नाही तर हे आत्मघातकी पाऊल ठरेल. सरकार (इराण) अत्यंत क्रूर आहे. आमच्याकडे असणारं सर्वात आधुनिक शस्त्र म्हणजे कलाश्निकोव रायफल आहे."

त्यांची इच्छा आहे की अमेरिकेनं कुर्द सैनिकांच्या सुरक्षेसाठी नो-फ्लाय झोन लागू करावा. त्या म्हणतात, "आम्ही अनेकदा ही मागणी केली आहे."

"ईमेल पाठवून मीच लिहिलं होतं की 'आम्हाला याची तत्काळ आवश्यकता आहे'."

इराकच्या उत्तर भागात निर्वासित म्हणून राहणाऱ्या इराणी कुर्द दशकांपासून इराणच्या इस्लामिक राजवटीच्या शेवटासाठी होणाऱ्या युद्धात सहभागी होण्याची वाट पाहत आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराकच्या उत्तर भागात निर्वासित म्हणून राहणाऱ्या इराणी कुर्द दशकांपासून इराणच्या इस्लामिक राजवटीच्या शेवटासाठी होणाऱ्या युद्धात सहभागी होण्याची वाट पाहत आहेत

'डोंगरांशिवाय आमचा कोणीही मित्र नाही'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकेनं ते वृत्त फेटाळलं आहे, ज्यात म्हटलं होतं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कुर्द सैनिकांना शस्त्र देण्याबाबत विचार करत होते.

अर्थात आधी अमेरिकेनंच यापैकी अनेकांना इराकमध्ये इस्लामिक स्टेट (आयएस)च्या विरोधात लढण्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं.

मात्र जसजशी (बंडखोर) इराणी कुर्द सैनिक सीमेकडे पुढे सरकण्याची चर्चा होते आहे, तसतसे इराणकडून त्यांच्यावर होणारे हल्लेदेखील वाढले आहेत.

आम्ही दोन वेगवेगळ्या गटांवर हल्ला झाल्यानंतरची परिस्थिती पाहिली. यात एक हल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा होता. या हल्ल्यामुळे पीएकेचा एक तळ उदध्वस्त झाला आणि त्यात एका कुर्द सैनिकाचा मृत्यू झाला.

काही गटांनी त्यांचे तळ सोडले आहेत. ते त्यांच्या सैनिकांना दुसऱ्या ठिकाणी नेऊन हल्ल्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

इराणच्या सरकारच्या विरोधात लढाईत सहभागी होणं हे अतिशय जोखमीचं असेल. याबदल्यात ट्रम्प त्यांना काय देणार आहेत, हे स्पष्ट नाही.

संख्येचा विचार करता, कुर्द पश्चिम आशियातील चौथ्या क्रमांकाचा जातीय समूह आहे. इराण, इराक, सीरिया आणि तुर्कियेमध्ये ते विखुरलेले आहेत.

इराणनं केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात पीएकेचा एक तळ उदध्वस्त झाला आणि त्यांचा एक सैनिक मारला गेला

फोटो स्रोत, Matthew Goddard/BBC

फोटो कॅप्शन, इराणनं केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात पीएकेचा एक तळ उदध्वस्त झाला आणि त्यांचा एक सैनिक मारला गेला

त्यांचा प्रदीर्घ इतिहास आहे. यात त्यांना सातत्यानं त्रास देण्यात आला आहे आणि त्यांचा विश्वासघात करण्यात आला आहे.

एक जुनी कुर्दिश म्हण आहे, 'डोंगरांशिवाय आमचा कोणीही मित्र नाही'.

अमेरिका जे आश्वासन देतील, ते पूर्ण करेल असा अमेरिकेवर विश्वास ठेवता येईल का?

सीरियामधील अनेक कुर्द आयएसच्या विरोधातील लढाईत अमेरिकेचे मजबूत सहकारी होते. मात्र अलीकडेच ट्रम्प यांनी दमिश्कच्या हंगामी सरकारला साथ दिली आणि या कुर्दांकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर सीरियातील अनेक कुर्द नाराज झाले.

तरीदेखील, काही वरिष्ठ इराणी कुर्दिश नेत्यांचा व्यावहारिक दृष्टीकोन आहे.

कुर्दिस्तान डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इराण (केडीपीआय) चे उपाध्यक्ष मुस्तफा माउलूदी म्हणाले, "अमेरिका आणि इस्रायलनं हे युद्ध आमच्या आकांक्षांसाठी नाही तर, त्यांच्या हितांसाठी सुरू केलं आहे."

"मात्र ते इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) तळांवर हल्ला करत आहेत. ते आमच्यासाठी चांगलं आहे. यामुळे आम्हाला आत शिरण्यास मदत होईल."

'ही संधी आम्ही दवडणार नाही'

मुस्तफा माउलूदी 67 वर्षांचे आहेत. इस्लामी राजवटीचा शेवट होईल, याच आशेमध्ये त्यांचं बहुतांश आयुष्य गेलं आहे.

त्यांनी पारंपारिक कुर्द पोशाख घातलेला होता. त्यांनी आम्हाला त्यांच्या वेदनादायी कौटुंबिक इतिहासाबद्दल सांगितलं. त्यांच्या एका चुलत भावाला वयाच्या फक्त 13 व्या वर्षी इराण सरकारनं मारलं होतं. दुसरा भाऊ विरोधकांची मदत करण्याच्या संशयाखाली गेल्या 31 वर्षांपासून तुरुंगात आहे.

त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या राजकीय कारवायांमुळे त्यांच्या कुटुंबातील जवळपास 60 टक्के लोकांना अटक करण्यात आली आणि वाईट वागणुकीला सामोरं जावं लागलं.

आपल्या भूमीत परत गेल्यावर काय करायचं, याचं चित्र माउलूदी यांच्या मनात आधीपासून तयार आहे.

ते म्हणाले, "मी आधी जेव्हा गावी जाईन, तेव्हा ओरडून म्हणेन: मी तुमच्यासाठी लढत राहिलो आहे, तुम्ही माझी माणसं आहात आणि आता मी आणखीन लढेन."

मुस्तफा माउलूदी यांना विश्वास वाटतो की नवरोज या कुर्दिश नववर्षांच्या दिवसापर्यंत ते इराणमध्ये पोहोचतील

फोटो स्रोत, Matthew Goddard/BBC

फोटो कॅप्शन, मुस्तफा माउलूदी यांना विश्वास वाटतो की नवरोज या कुर्दिश नववर्षांच्या दिवसापर्यंत ते इराणमध्ये पोहोचतील

त्यांना विश्वास वाटतो की 21 मार्चला असणाऱ्या नवरोज या कुर्दिश नववर्ष दिनापर्यंत ते तिथे पोहोचलेले असतील.

इराणच्या 9 कोटी लोकसंख्येत कुर्दांची संख्या जवळपास 10 टक्के आहे. त्यांचे नेते आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करत आहेत की त्यांनी ट्रम्प यांना साथ द्यावी आणि त्यांनादेखील साथ द्यावी.

इराणी कुर्दिस्तानच्या कोमाला पार्टीचे सरचिटणीस अब्दुल्ला मोहतादी म्हणाले, "आम्ही इराणमधील सर्वात संघटित राजकीय गट आहोत. आम्ही ही संधी (परिवर्तनाची) दवडणार नाही."

ते ब्रिटनच्या भूमिकेमुळे निराश झाले आहेत.

मोहतादी म्हणाले, "मला आश्चर्य वाटतं की युरोपमध्ये ब्रिटन एकमेव देश आहे, ज्यानं आयआरजीसीला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेलं नाही."

ब्रिटननं त्यांच्या तळांवरून इराणवर हल्ला करण्याची परवानगी अमेरिकेला दिलेली नाही. यासाठी देखील ते ब्रिटनवर टीका करतात.

अमेरिकेच्या आश्वासनांवर कुर्दांचा किती विश्वास आहे?

हे सांगता येणं कठीण आहे की कुर्द किती सैनिक उभे करू शकतील. एका स्थानिक पत्रकार स्वत:देखील कुर्द आहेत. त्यांच्यानुसार, "ही संख्या कदाचित काही हजार असू शकते, ज्यातील काही आधीच आत उपस्थित असतील."

ते म्हणाले, "इराणमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा त्यांना भाग व्हायचं आहे, जेणेकरून भविष्यात त्यांनादेखील त्यात वाटा मिळेल. इतिहासातून धडे मिळालेले असूनदेखील ते आशा बाळगून आहेत."

काही इराणी कुर्दांचं म्हणणं आहे की अमेरिका आश्वासनांची पूर्तता करो न करो, आता पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.

इराणच्या सीमेजवळ वसलेल्या सुलैमानिया या शहरातील एक महिला म्हणाल्या, "आम्हाला आमच्या भूमीची एक झलक पाहण्याची थोडीशी आशा जरी दिसली, तरीदेखील ती आमच्यासाठी पुरेशी आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "आम्ही याला (इराण) जल्लादांची इस्लामी राजवट म्हणतो. आम्ही त्यांचा अत्यंत तिरस्कार करतो. त्यांनी मोठ्या संख्येनं लोक मारले आहेत."

कुर्दिश गटांनी ही गोष्ट फेटाळली आहे की त्यांच्या सैनिकांनी इराणची सीमा ओलांडली आहे

फोटो स्रोत, Matthew Goddard/BBC

फोटो कॅप्शन, कुर्दिश गटांनी ही गोष्ट फेटाळली आहे की त्यांच्या सैनिकांनी इराणची सीमा ओलांडली आहे

या सर्व गोष्टींनी इराकला मोठ्या अडचणीत आणलं आहे. कारण शेजारी सुरू असलेल्या युद्धात ते ओढले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

इराकच्या सरकारनं म्हटलं आहे की ते कोणत्याही गटाला "इराकच्या भूमीवरून इराणची सीमा ओलांडून दहशतवादी कारवाया करण्याची" परवानगी देणार नाहीत.

जर कुर्द सैनिकांनी सीमा ओलांडली, तर पीएकेच्या हना यजदानपाना यांच्यासाठी तो क्षण कटू-गोड भावनांचा असेल.

त्या म्हणाल्या, "आपल्या देशात परतणं हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण असेल."

"माझे काका आणि आजोबा-आजी यांचा इथेच (उत्तर इराक) मृत्यू झाला. मला कळत नाही की माझ्या भावना कशा व्यक्त करू...आनंदी होऊ की दु:खी. कारण हा दिवस पाहण्याचा ज्यांना खरोखरंच अधिकार होता, ते आता राहिलेले नाहीत."

(अतिरिक्त वार्तांकन - वीट्स्के बुरेमा, मॅथ्यू गोडार्ड आणि बिजहार शरीफ)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)