'मी अवतारी पुरुष, तर तू गेल्या जन्मीची अप्सरा'; अशोक खरातविरोधातील नव्या तक्रारींमध्ये काय आहे उल्लेख?

अशोक खरात
फोटो कॅप्शन, अशोक खरात
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

राज्यभर अशोक खरात प्रकरण सध्या चर्चेत आहे. दररोज नवीन खुलासे आणि धक्कादायक माहिती या प्रकरणी समोर येत आहे.

धार्मिक विधी आणि उपासनेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी मुख्य आरोपी अशोक खरात याच्याविरोधात तीन गंभीर तक्रारी आतापर्यंत दाखल करण्यात आल्या आहेत.

तिन्ही दाखल तक्रारीत अशोक खरात याचा आसुरी चेहरा समोर आला आहे. ज्यात खरात धार्मिक विधींचा बहाणा करून महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने 'एसआयटी' (विशेष तपास पथक) स्थापन केली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दुसरीकडे, या प्रकरणातील आरोपांबाबत आरोपी खरात यांचे वकील आणि त्यांच्या कुटुंबीयांची बाजू जाणून घेण्याचा 'बीबीसी मराठी'ने प्रयत्न केला.

मात्र, वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

खरातविरोधातील पहिल्या तक्रारीत काय म्हटले?

खरातविरोधात सर्वांत पहिली ही तक्रार दाखल झाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

स्वतःजवळ धार्मिक व तांत्रिक शक्ती असल्याचा दावा करुन शोषण करणाऱ्या अशोक खरातविरोधात महिलेनी तक्रार दाखल केली.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली ओळख करून घेतल्यानंतर या व्यक्तीने धार्मिक विधींचा आधार घेत दोन वर्षांहून अधिक काळ तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. ही तक्रार 17 मार्च 2026 रोजी नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, जुलै 2021 मध्ये तिची आरोपीशी ओळख झाली. लग्न जुळवून देण्याच्या निमित्ताने सुरू झालेल्या या संपर्कात आरोपीने तिला विविध धार्मिक उपाय, ताईत आणि विधी करण्याचा सल्ला दिला. तिचं लग्न लवकर जुळावं आणि अडथळे दूर व्हावेत, यासाठी मंदिरात अर्पण करण्यास सांगत त्याने पैसेही घेतल्याचा आरोप आहे. या काळात आरोपीने तिच्याकडून सुमारे एक लाख रुपयांहून अधिक रक्कम घेतल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये महिलेचा साखरपुडा झाला आणि 29 डिसेंबर 2022 रोजी तिचं लग्न पार पडलं. मात्र, लग्नानंतरही आरोपीने 'आशीर्वाद' आणि 'वैवाहिक आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी' असे सांगत तिला वारंवार आपल्या ऑफिसमध्ये बोलावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

सुरुवातीला धार्मिक विधींच्या नावाखाली सुरू झालेल्या या भेटी पुढे गंभीर स्वरूप धारण करू लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अशोक खरात याने त्या महिलेशी दैवी शक्ती असल्याचा दावा करत विश्वास संपादन केला.
फोटो कॅप्शन, अशोक खरात याने त्या महिलेशी दैवी शक्ती असल्याचा दावा करत विश्वास संपादन केला.

महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी तिला प्रसाद म्हणून पेढे आणि पाणी देत असे. ते घेतल्यानंतर तिला चक्कर येत असे किंवा ती अर्धबेशुद्ध अवस्थेत जात असे. याच अवस्थेचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हे प्रकार फेब्रुवारी 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अनेकदा घडल्याचं तिने म्हटलं आहे.

तक्रारीत पुढे असंही नमूद करण्यात आलं आहे की, या प्रकारांबद्दल कुणालाही सांगितल्यास तिचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करेल, तिचं लग्न मोडेल किंवा तिच्या पतीला इजा पोहोचवेल अशा धमक्या आरोपी देत असे. या भीतीमुळे ती बराच काळ गप्प राहिल्याचं तिने सांगितलं आहे. काही प्रसंगी तिच्या पतीलाही आरोपीच्या सांगण्यावरून धार्मिक विधींसाठी बोलावण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

शेवटी, हा प्रकार सहन न झाल्याने महिलेने आपल्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली आणि त्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. 17 मार्च 2026 रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी अशोक खरात याला अटक केली.

गरोदर असताना लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल

20 मार्च 2026 रोजी रात्री अशोक खरातविरोधात आणखी दुसरी तक्रार आल्याचं समोर आलं आहे. एका महिलेच्या पतीने पोलीसात ही तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.

यात तक्रारीनुसार, सदर महिला गरोदर असताना आरोपी खरातने तिचं लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं आहे.

गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याशिवाय महिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आरोपी अशोक खरातचे पाय धुत असल्याचा व्हीडिओ सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला होता.
फोटो कॅप्शन, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आरोपी अशोक खरातचे पाय धुत असल्याचा व्हीडिओ सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला होता.

महिलेसोबत आलेल्या पतीला बाहेर बसवून एका खोलीत तिचं लैंगिक शोषण करत असल्याचा उल्लेख आहे.

खरात नकली साप आणि नकली वाघाचे कातडी आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करत असल्याचाही या तक्रारीत उल्लेख आहे.

नराधम अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचार तसेच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा व BNS 64(1), 74, 351(2) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'मी अवतारी पुरुष असून तू मागील जन्माची अप्सरा' तिसऱ्या तक्रारीत काय म्हटले?

अशोक खरातने महिलेला लुटले आणि शारीरिक शोषण केल्याचं तक्रारीत एका महिलेने म्हटले आहे. खरात याचं वास्तव समोर आल्यानंतर 21 मार्च 2026 रोजी तिसऱ्या महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

'कॅप्टन' अशोक कुमार एकनाथ खरात याने 'मी अवतारी पुरुष असून तू मागील जन्माची अप्सरा आहेस' असे सांगण्याच्या बहाण्याने एका महिलेची केवळ आर्थिक फसवणूकच केली नाही, तर तिला दैवी शक्तीची भीती दाखवून वारंवार तिचं शारीरिक शोषण केल्याचा प्रकार तक्रारीत नमूद आहे.

पोलीसांनी खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असता, तिथे अनेक आक्षेपार्ह पुरावे हाती लागले आहेत.
फोटो कॅप्शन, पोलीसांनी खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असता, तिथे अनेक आक्षेपार्ह पुरावे हाती लागले आहेत.

सदर महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, खरातने तिला आणि तिच्या मुलांना जीवे मारण्याची भीती दाखवून हे कृत्य केलं.

महिलेच्या तक्रारीत म्हटलं आहे की, 2013 मध्ये महिलेचे आई-वडील तिच्या विवाहासाठी स्थळ शोधत असताना, परिचितांच्या सांगण्यावरून ते कॅनडा कॉर्नर येथील अशोक खरातच्या कार्यालयात गेले होते. खरातने चेहरा पाहून भविष्य सांगत महिलेचा विवाह सुखाचा होईल, असा सल्ला दिला.

लग्नानंतर मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात जाऊन धार्मिक विधी करण्यास सांगितलं आणि हे विधी करताना सासरच्या लोकांना सोबत नेऊ नका, अशी अट घातली.

वैवाहिक वादाचा फायदा आणि अश्लील वर्तन

सदर महिलेचा विवाह झाला, मात्र काही काळाने पतीशी वाद होऊ लागल्याने ती पुन्हा सल्ल्यासाठी खरातकडे जाऊ लागली. फेब्रुवारी 2020 मध्ये, खरातने सदर महिलेच्या आईला केबिनबाहेर थांबवून एकटे बोलवले.

"मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाल ज्ञान आहे, तुझा घटस्फोट ठरलेला आहे आणि तू मागील जन्माची अप्सरा आहेस," असे सांगून त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. महिलेनी विरोध केला असता, त्याने तिला भविष्याची भीती दाखवून गप्प करण्याचा प्रयत्न केला, असं तक्रारीत म्हटलं आहे.

'मंतरलेले पाणी' देऊन बळजबरीने शारीरिक संबंध

सदर महिला तक्रारीत म्हणते की, ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर ती तणावात होती. मे 2022 मध्ये खरातने तिला फोन करून कार्यालयात बोलावले.

तिथे त्याने "मीच तुझ्याशी लग्न करणार आहे, तुझे भविष्य सुधारायचे असेल तर माझं ऐकावं लागेल, नाहीतर तुझ्यावर कोप होईल," अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने तांब्याच्या बाटलीतील 'मंतरलेले पाणी' तिला पाजले आणि तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

गर्भपात आणि आर्थिक फसवणूक

तक्रारीत नमूद आहे की, खरातने त्यानंतर 3 ते 4 वेळा तिचं शारीरिक शोषण केलं, ज्यामुळे ती गरोदर राहिली.

ही बाब सांगितल्यावर त्याने तिला काही गोळ्या दिल्या, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. तसेच बँकिंग कामाच्या नावाखाली तिच्या कुटुंबाचे आधार कार्ड, पॅन कार्ड घेतले आणि मोबाईलवर आलेला OTP मिळवून आर्थिक फसवणूक केली. 'दिव्य जडीबुटी' देण्याच्या नावाखाली 12,500 रुपये घेतल्याचाही उल्लेख आहे.

18 मार्च 2026 रोजी स्थानिक वृत्तपत्रात अशोक खरातने इतरही अनेक महिलांचे अशाच प्रकारे शोषण केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. हे वाचल्यानंतर या महिलेने धैर्य एकवटून पोलीस ठाण्यात धाव घेतली.

"तुझ्या मुलांचे वाईट होईल" अशी भीती दाखवली जात असल्यामुळे आपण आतापर्यंत गप्प होतो, असं तिने तक्रारीत म्हटलं आहे.

अनेक आक्षेपार्ह पुरावे; अधिक तपास सुरू

पोलिसांनी खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असता, तिथे अनेक आक्षेपार्ह पुरावे हाती लागले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, एक पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आला असून त्यात अनेक आक्षेपार्ह व्हीडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज आढळले. इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, खरातवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(1), 74, 352, 351(1) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आता या प्रकरणातील तांत्रिक पुरावे आणि इतर बाबींचा तपास करत आहेत. विविध टीम्सकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. 'कॅप्टन' अशोक खरातच्या मालमत्तेची झाडाझडती सुरू आहे.

महिलेनी सरकारवाडा पोलीसांत धाव घेतली आणि फिर्याद दिली आणि हे प्रकरण पोलीसांसमोर आलं.
फोटो कॅप्शन, महिलेनी सरकारवाडा पोलीसांत धाव घेतली आणि फिर्याद दिली आणि हे प्रकरण पोलीसांसमोर आलं.

नाशिक पोलिसांनी सिन्नरमधील मिरगाव येथील फार्म हाऊसची तपासणी केली. तसेच ईशान्येश्वर मंदिर आणि कुटीचीही तपासणी करण्यात आली. या ठिकाणी अनेक नेते आणि कलाकारांची वर्दळ असायची, त्या अनुषंगानेही तपास सुरू आहे.

यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांनी सांगितलं की, फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून अशोक खरातला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सध्या अशोक खरात हा नाशिक पोलीसांच्या कोठडीत असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे. 24 मार्च 2026 रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

खरात व कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

खरात यांच्या कुटुंबीयांशी आणि वकिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रतिक्रिया मिळालेली नाही. त्यांच्या घरी जाऊनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यास बातमी अपडेट करण्यात येईल.

22 मार्च 2025 रोजी पोलीस चौकशीदरम्यान बाहेर आल्यानंतर खरात यांनी "नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. चालायची ताकद राहिली नाही," असं म्हटलं.

विरोधक आक्रमक; मुख्यमंत्री लवकरच निवेदन देणार

अशोक खरात प्रकरणावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं की, या प्रकरणात पोलीसांनी जलदगतीने कारवाई केली आहे. ट्रॅप लावून कारवाई करण्यात आली. त्या महिलांना धीर देऊन समोर आणलं जात आहे. काही महिलांनी तक्रार दाखल केली असून आणखी तक्रारी येण्याची शक्यता आहे.

हे प्रकरण राजकारणाचा मुद्दा नसून महिलांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. महिलांचा गैरफायदा घेऊन त्यांना चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडण्यात आलं. यासंदर्भात लवकरच सभागृहात सविस्तर निवेदन दिलं जाईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.