खामेनींच्या मृत्यूवर सट्टा लावून अनेकांनी केली तगडी कमाई, युद्धासारख्या स्थितीवर देखील कसा चालतो सट्टाबाजार?

फोटो स्रोत, Reuters
- Author, अब्दुल रहमान बिन तालिब
- Role, बीबीसी न्यूज अरबी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अली खामेनी यांची हत्या होण्याच्या काही तास आधी, शेकडो लोकांनी एका ऑनलाइन अमेरिकन प्लॅटफॉर्मवर एका विशेष गोष्टीवर सट्टा किंवा पैज लावली होती. ती म्हणजे खामेनी यांना बरोबर त्याच दिवशी मारलं जाणार आहे.
'पोलिमार्केट' नावाच्या या सट्टेबाजीच्या प्लॅटफॉर्मवरील सर्वात प्रमुख सट्ट्यांपैकी हा सट्टा होता.
या सट्ट्यावर 13 कोटी डॉलर (जवळपास 1222 कोटी रुपये)ची रक्कम लावण्यात आली होती. काही सट्टेबाजांनी यावर हजारो डॉलरपर्यंतची कमाई केली.
अमेरिकेत ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे राजकीय घटनांवर सट्टा लावण्याचा बाजार वेगानं वाढतो आहे. अर्थात या सट्टाबाजाराबद्दल वाददेखील आहे.
हा सट्टाबाजार कशाप्रकारे काम करतो?
हे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म असतात. तिथे एखादा युजर एक प्रश्न विचारतो किंवा पैज लावतो. तर इतर युजर्स कोणताही एक संभाव्य परिणाम निवडून त्यावर सट्टा किंवा पैज लावतात. म्हणजेच त्या पर्यायावर पैसे लावतात.
पारंपारिक सट्टेबाजीमध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला सट्टा कंपनीकडून पैसे मिळतात. मात्र पॉलीमार्केटसारख्या प्लॅटफॉर्मवर नफा आणि तोटा यावर अवलंबून असतो की सट्ट्याची सुरुवात झाल्यापासून ट्रेड बंद होईपर्यंत किंवा शेवटचा सट्टा लागेपर्यंत त्याच्या किंमतीत किती बदल झाला.

फोटो स्रोत, Getty Images
'बेट' किंवा 'सट्ट्या'ची किंमत प्रत्येक क्षणाला मागणी आणि पुरवठा याच्या आधारे बदल राहते. ट्रेडिंग किंवा व्यवहार बंद झाल्यानंतर, योग्य पर्यायावर सट्टा लावणाऱ्यांना त्यांनी लावलेल्या पैशांच्या अनेक पट रक्कम मिळते. ही रक्कम त्या सट्ट्याच्या किंमतीत झालेल्या बदलांवर अवलंबून असते.
हा सट्टा अनेक क्षेत्रांमध्ये लावला जातो. उदाहरणार्थ, क्रीडा, विज्ञान आणि अर्थव्यवस्था.
सट्टेबाजीसाठीचे प्लॅटफॉर्म ही मुळात काही नवीन संकल्पना नाही. यातील काही तर गेल्या 25 वर्षांपासून आहेत. तसंच राजकीय घटनांबद्दल बोलायचं तर त्यावर सट्टा लावणं ही देखील नवीन गोष्ट नाही. यातील नवीन गोष्ट म्हणजे, काही प्लॅटफॉर्मचा वापर करणं आता पूर्वीपेक्षा आणखी सोपं झालं आहे. यामुळे अधिक लोकांना सट्टा लावण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आहे.
कोणतीही व्यक्ती किरकोळ माहितीच्या आधारे सट्टा लावू शकतो. तसंच त्याला फक्त 'हो' किंवा 'नाही' सारखे सोपे पर्याय निवडता येतात. पारंपारिक पद्धतीच्या सट्टेबाजीपेक्षा हे वेगळं आहे. त्यात वित्तीय बाबींचं चांगलं आकलन आणि ज्या विषयावर सट्टा लावला जातो आहे, त्याचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक असायचं.
वाढत चाललेला राजकीय सट्टेबाजीचा बाजार
ब्लूमबर्गनुसार, इराणशी संबंधित राजकीय सट्ट्यानं पॉलीमार्केट या प्लॅटफॉर्मवर अली खामेनी यांचा हल्ल्यामुळे मृत्यू झाला त्या दिवशी 40 कोटी डॉलर (जवळपास 3760 कोटी रुपये)हून अधिकचा व्यवसाय केला. आधीच्या तुलनेत तो जवळपास तिप्पट होता.
काहीजणांनी या गोष्टीवर सट्टा लावला होता की अमेरिकेचं सैन्य इराणमध्ये शिरले का, शस्त्रसंधी कधी होणार आणि इराण होर्मुझची सामुद्रधुनी किती काळ बंद ठेवेल.
हा विषय इतका वाढला की काहीजणांनी इराणवर अणुबॉम्ब टाकला जाण्यावरदेखील सट्टा लावला. यानंतर या प्लॅटफॉर्मनं याप्रकारचा सट्टा काढून टाकला.
सध्या सट्टा लावणाऱ्यांमध्ये, इराणमधील सध्याच्या राजवटीचा संभाव्य शेवट होण्याची तारीख हा सर्वात लोकप्रिय टॉपिक आहे.
एका युजरनं 28 फेब्रुवारीला इराणशी संबंधित सट्ट्यातून 5 लाख डॉलरहून (जवळपास 4.7 कोटी रुपये) अधिकची कमाई केली. त्यानं अमेरिका-इस्रायलच्या इराणविरुद्धच्या संभाव्य युद्धाशी संबंधित अनेक अंदाज लावले होते.
बीबीसी अरबीनं यशस्वी सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांपैकी एकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र कायदेशीर निर्बंधांमुळे तो खोट्या नावाचा वापर करतो. यामुळे त्याच्याशी संपर्क करणं शक्य झालं नाही.

फोटो स्रोत, Donald Trump / TruthSocial
जानेवारी महिन्यात आणखी एका सट्टेबाजानं निकोलस मादुरो यांना पदावरून हटवलं जाण्याच्या सट्ट्यावर 30 हजार डॉलर (जवळपास 28,20,000 रुपये) लावले होते. त्यातून त्यानं 4 लाख डॉलरहून (3.76 कोटी रुपये) अधिकची कमाई केली.
फेब्रुवारीच्या शेवटी अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात खामेनी यांना लक्ष्य करण्यात ल्याच्या बातम्या आल्यानंतरदेखील त्यांच्या हत्येवर सट्टा लावणं सुरूच होतं.
त्यावेळेस 'हो' या पर्यायावर सट्टा लावणाऱ्यांचं प्रमाण वाढून 90 टक्क्यांहून अधिक झालं होतं. आदल्या दिवशी ते जवळपास 1 टक्काच होतं.
याप्रकारच्या सट्टेबाजीच्या व्यवहारांमुळे ट्रेडिंगमधील पारदर्शकतेबद्दल अनेक टीका झाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिमार्केटनं यावर टिप्पणी करत म्हटलं की जर या गोष्टीबाबत स्पष्टता नसेल की खामेनी यांना त्यावेळेस सत्तेतून हटवण्यात आलं की नाही, तर "हा बाजार तोपर्यंत खुला राहू शकतो, जोपर्यंत विश्वासार्ह बातम्यांच्या आधारे त्याबाबत सहमती होत नाही."
याचबरोबर, अनेक युजर्स खोट्या नावांनी सट्टा लावतात. यामुळे वृत्तपत्र आणि सोशल मीडिया युजर्सनं हा प्रश्न उपस्थित केला की निर्णय घेणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारशी संबंधित लोक संवेदनशील माहितीचा वापर सट्टेबाजी करण्यासाठी करत आहेत का?
अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) एका विधेयकावर विचार करतं आहे. यात केंद्रीय कर्मचारी आणि संसदेतील कर्मचाऱ्यांना बिगर-सार्वजनिक माहितीचा वापर करून ऑनलाईन भाकित वर्तवणाऱ्या बाजारांमध्ये सट्टा लावण्यापासून रोखलं जाणार आहे. निकोलस मादुरो यांना हटवण्यासंदर्भात लावण्यात आलेल्या सट्ट्यानंतर निर्माण झालेल्या वादामुळे हे पाऊल उचलण्यात येत आहे.
अलीकडेच, इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी 2 जणांवर पॉलीमार्केटवर गुप्त माहितीचा वापर करून सट्टा लावण्याचा आरोप केला. तर, नॉर्वेच्या अधिकाऱ्यांनी एका सट्ट्याबाबत तपास सुरू केला. यात व्हेनेझ्युएलाच्या विरोधी पक्षनेत्या मरिया कोरीना मचादो या नोबेल शांतता पुरस्कार जिंकतील असं भाकित वर्तवण्यात आलं होतं. यातून एका सट्टेबाजानं 50,000 डॉलरहून (जवळपास 47 लाख रुपये) अधिकची कमाई केली.
युद्धावर सट्टा लावणं नैतिकदृष्ट्या किती योग्य?
दुसऱ्या बाजूला, अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत की युद्धावर सट्टा लावणं किती कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे. विशेषकरून जेव्हा युद्धांमध्ये मोठ्या संख्येनं लोक मारले जातात.
सर्वसामान्यपणे, अमेरिकेतील कायद्यानुसार सार्वजनिक हिताच्या विरोधात असणाऱ्या सट्टेबाजीवर बंदी आहे. याचप्रमाणे, युद्धावर सट्टा लावण्यावर अमेरिकेतील वेगवेगळ्या कायद्यांनुसार आणि प्रशासकीय नियमांनुसार बंदी आहे.
याच कारणामुळे, याप्रकारची सट्टेबाजी फक्त पॉलीमार्केटच्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होती. हा प्लॅटफॉर्म पनामातून कार्यरत असणाऱ्या एका कंपनीद्वारे चालवला जातो.
याला उत्तर देताना, पॉलीमार्केटनं खामेनी यांच्या हत्येशी संबंधित सट्ट्याच्या पेजवर एक नोटीस जारी केली. त्यात म्हटलं होतं की प्रीडिक्शन मार्केट्सचं महत्त्व या गोष्टीवर अवलंबून आहे की ते 'जनतेच्या सामूहिक आकलना'च्या आधारे अचूक अंदाज व्यक्त करतात. प्लॅटफॉर्मनुसार, असे अंदाज, 'सद्यपरिस्थितीत' अत्यंत मौल्यवान होतात.

फोटो स्रोत, Reuters
प्लॅटफॉर्मनं असंही म्हटलं की त्यांना असंख्य प्रश्न विचारण्यात आले. तसंच ते हल्ल्यांचा थेट परिणाम झालेल्या लोकांशी बोलले. त्यांचं म्हणणं आहे, "प्रेडिक्शन मार्केट्स त्यांना अशी उत्तरं देऊ शकतात, जी टीव्हीवरील बातम्या आणि एक्ससारख्या प्लॅटफॉर्ममधून मिळू शकत नाहीत."
ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, ऑनलाइन सट्टेबाजीचा हा बाजार सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. यात पैसे लावणारे बहुतांश लोक छोटे सट्टेबाज आहेत. या वृत्तात असंही म्हटलं आहे की खामेनी यांच्या मृत्यूवर सट्टा लावणाऱ्या बहुतांश लोकांनी 1,000 डॉलर (जवळपास 94 हजार रुपये) हून कमी रक्कम लावली होती.
असं असूनही, या बाजाराचा विस्तार होण्याची आणि तो युरोप तसंच इतर मोठ्या शहरांमध्ये पसरण्याबाबत चिंता वाढत आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























