औरंगजेबानंच केली होती मुघल साम्राज्याच्या पतनाची भविष्यवाणी, नेमकं काय घडलं होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
- वाचन वेळ: 9 मिनिटे
आजसुद्धा अनेकजण त्यांच्या दिवसाची सुरुवात वृत्तपत्रात आलेलं राशीचक्र वाचून करतात. मात्र दुसऱ्या बाजूला असेही लोक आहेत, ज्यांना ज्योतिषशास्त्रात अजिबात विश्वास नाही.
प्रदीर्घ काळापासून मानवाला चंद्र-ताऱ्यांची गती समजून घेण्यात रस राहिला आहे. त्याबद्दल उत्कंठा वाटत आली आहे.
प्राचीन काळातील ग्रीसपासून ते भारतापर्यंत खगोलशास्त्राच्या क्षेत्रात काम होत होतं. त्यानंतर मध्ययुगीन कालखंड येईपर्यंत ग्रह-नक्षत्रांच्या हालचाली, गती यांचा संबंध भविष्यवाणी करण्याशी किंवा ज्योतिषशास्त्राशी जोडला गेला.
भारतात प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्या मुघलांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता. ते त्यांची महत्त्वाची कामं ज्योतिषांचा सल्ला घेऊन करत असत.
इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मासारख्या अनेक धर्मांमध्ये ज्योतिषशास्त्राला जादूटोण्याप्रमाणे पाहिलं जातं. तसंच त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. इस्लाममध्ये फक्त अल्लाहमध्येच भविष्य जाणण्याची क्षमता आहे, असं मानलं जातं.
अलीकडेच प्रसिद्ध पत्रकार एम. जे. अकबर यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं. पुस्तकाचं नाव आहे, 'आफ्टर मी केयॉस, ॲस्ट्रॉलॉजी इन द मुघल एम्पायर'. या पुस्तकात त्यांनी ज्योतिषशास्त्रासंदर्भातील प्रत्येक मुघल बादशाहच्या दृष्टीकोनावर सविस्तर लिहिलं आहे.
एम. जे. अकबर यांनी बीबीसीला सांगितलं, "हुमायून असो की अकबर, जहांगीर, औरंगजेब असो, हे सर्वच ज्योतिषशास्त्राला खूप मानायचे. बादशाह अकबराच्या काळात ज्योतिष्यांना दरबारात स्थान होतं."
"इतकंच काय औरंगजेबदेखील नियमितपणे प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर ज्योतिषांचा सल्ला घेत असे. या सर्व मुघल बादशाहांना वाटायचं की, धर्मावर आधारित शुद्धतावाद राजकीय स्थैर्यासाठी हानिकारक आहे."
जगभरात ज्योतिषशास्त्राचा वापर
इतिहासकार आणि लेखक बेनसन बॉब्रिक यांनी 'खलीफ्स स्पलेंडर' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं, "अबू जाफर अल मंसूर यानं 31 जुलै 762 ला दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी बगदाद शहराची कोनशिला ठेवली होती. कारण त्यावेळेस शुभ मुहूर्त होता."
आणखी एक इतिहासकार प्राध्यापक मोहम्मद मुजीब यांनी 'द इंडियन मुस्लीम' हे पुस्तक लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Bloomsbury
या पुस्तकात त्यांनी लिहिलं, "भारतात मुस्लीम राजवट येण्याच्या बऱ्याच आधी संपूर्ण जगभरातील मुस्लीम चमत्कार, मौल्यवान रत्नांचे रहस्यमयी गुण आणि शकून-अपशकून यावर विश्वास करू लागले होते. भारतात तर ज्योतिषशास्त्राला विज्ञानाप्रमाणे मानलं जात होतं. मुस्लीमदेखील त्यावर विश्वास ठेवायचे."
मध्ययुगीन इतिहासकार जियाउद्दीन बर्नी यांनीदेखील 'तारीख-ए-फिरोजशाही'मध्ये लिहिलं होतं, "कोणत्याही प्रतिष्ठित कुटुंबात कोणताही समारंभ किंवा महत्त्वाचं काम ज्योतिष्यांच्या सल्ल्याशिवाय केलं जात नसे. त्याचा परिणाम असा झाला होता की, प्रत्येक रस्त्यावर ज्योतिषी आढळत असत. ते हिंदूही असायचे आणि मुस्लीमदेखील असायचे."
बादशाह अकबराचा जन्म पुढे ढकलण्याचा प्रयत्न
तिसरा मुघल बादशाह अकबराचा जन्म 15 ऑक्टोबर 1542 ला रात्री 1 वाजून 6 मिनिटांनी होण्याच्या कहाणीत मुघल बादशाहांचा ज्योतिषशास्त्रात किती विश्वास होता याची झलक दिसून येते.
भारताचा बादशाह राहिलेल्या हुमायून याचा शेरशाहनं पराभव करून त्याला सिंधच्या वाळवंटाकडे पळवून लावलं. तेव्हा हुमायूनला एका राजपूत राजानं उमरकोटच्या किल्ल्यात आश्रय दिला. हुमायूनची पत्नी हमीदा बेगम त्यावेळेस गरोदर होती.

फोटो स्रोत, Sang-e-Meel Publications
एम जे अकबर सांगतात, "हमीदाला जेव्हा प्रसववेदना सुरू झाल्या, त्यावेळेस हुमायून तिथून 30 मैल अंतरावरील थट्टा इथं होता. त्यानं त्याचा खासगी ज्योतिषी मौलाना चांद याला त्याच्या पत्नीजवळ ठेवलं होतं. जेणेकरून बाळाच्या जन्माची बरोबर वेळ नोंदवली जावी. म्हणजे त्याची जन्मकुंडली अचूक तयार होईल."
"मग 14 ऑक्टोबरची रात्र झाली. हमीदा बानो यांची प्रसूती वेदना वाढत गेली आणि बाळाच्या जन्माची तयारी केली जाऊ लागली. त्यामुळे मौलाना चांद खूप घाबरले."
राज ज्योतिष्यांना वाटत होतं की, बाळाचा जन्म शुभ वेळेच्या आधीच होतो आहे. जर हा जन्म थोड्या वेळानं झालं, तर नक्षत्रांचा दुर्मिळ योग जुळून येणार होता. तसा योग हजारो वर्षांमध्ये एकदाच होतो. मौलाना चांद यांनी सुईणींना विचारलं की, बाळंतपण थोडा वेळ पुढे ढकललं जाऊ शकतं का?
प्रसूती वेदना रोखण्यात आली
प्रसूतीसाठी मदत करण्यासाठी नेमण्यात आलेल्या महिला ज्योतिषाचा सल्ला ऐकून स्तब्ध झाल्या. त्यांचं म्हणणं होतं की, निसर्गाचा नियम हा देवाचा आदेश असतो. या गोष्टींमध्ये मानवी इच्छा चालत नाहीत.
अबुल फजल यांनी अकबरनामामध्ये लिहिलं, "अचानक मौलाना चांद याच्या डोक्यात एक विचित्र विचार आला. अंधाऱ्या रात्री तो भीतीदायक चेहरा करत एका सुईणीला हमीदा बानोच्या पलंगाजवळ घेऊन गेला."

फोटो स्रोत, Getty Images
"एका पातळ पडद्यातून तो भयानक चेहरा हमीदा बानोला दाखवण्यात आला. अंधाऱ्या रात्री तो चेहरा पाहताच हमीदा बानो अत्यंत घाबरली. तिची प्रसूती वेदनादेखील थांबली आणि तिला झोप आली."
अकबरनामामध्ये लिहिलं आहे, "आता मौलाना चांद विचार करू लागला की, शुभ समयी जर हमीदा बानो झोपलेली राहिली तर काय होईल? ती वेळ जवळ येताच मौलाना चांदनं सांगितलं की राणीला लगेच झोपेतून जागं करण्यात यावं."
"झोपलेल्या राणीची झोपमोड करण्याची सुईणींची हिंमत होत नव्हती. त्याचवेळेस हमीदा बेगमचे डोळे आपोआप उघडले. तिला पुन्हा प्रसूती वेदना होऊ लागल्या आणि अकबराचा जन्म झाला."
मौलाना चांद यानं हुमायूनला अकबराच्या जन्म कुंडलीसोबत संदेश पाठवला की, हा मुलगा प्रदीर्घ काळ सिंहासनावर बसेल.
ज्योतिष्यांच्या सल्ल्यानुसार हुमायूनची राज्य पुन्हा मिळवण्यासाठी मोहीम
ज्योतिष्यांनी निश्चित केलेल्या वेळेवर 22 नोव्हेंबर 1542 ला हमीदा बेगम हुमायूनकडे गेली. हुमायूननं जेव्हा पहिल्यांदा अकबराला पाहिलं, तेव्हा अकबर 35 दिवसांचा झाला होता. अकबराचं संगोपन करताना प्रत्येक पावलावर नक्षत्रांना लक्षात घेऊन निर्णय घेतले जात होते.
अबुल फजल यांनी लिहिलं आहे, "सर्व बाजूनं दु:खी वातावरण असताना हुमायूनला पूर्ण विश्वास होता की त्याच्या मुलाच्या बाबतीत कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही. कारण तो देवाच्या संरक्षणात आहे. त्याचा विश्वास चुकीचा ठरला नाही."
"हुमायून गेल्यानंतर शत्रुत्व असूनही त्याचा भाऊ अस्करी यानं अकबराची काळजी घेतली. त्याला कंधारच्या किल्ल्यात वरच्या भागात राहण्यासाठी एक खोली देण्यात आली. अस्करीची पत्नी सुलतान बेगमनं 14 महिन्यांच्या अकबरावर प्रेमाचा वर्षाव केला."
ज्योतिष्यांच्या सल्ल्यानुसार, 14 मार्च 1545 ला हुमायूननं एका शुभसमयी पुन्हा सिंहासन मिळवण्यासाठीची मोहीम सुरू केली. अस्करीनं 3 सप्टेंबर 1545 ला पराभव मान्य केला. बैरम खान अस्करीच्या मानेवर तलवार ठेवून त्याला हुमायूनसमोर हजर करण्यात आलं. हुमायूननं कुटुंबाच्या सांगण्यावरून अस्करीला जीवनदान दिलं.
अकबर 4 वर्षे 4 महिने आणि 4 दिवसांचा असताना मुल्ला इस्लामुद्दीन इब्राहीमच्या देखरेखीखाली त्याचं औपचारिक शिक्षण सुरू झालं. हुमायूननं ज्योतिष्यांच्या सल्ल्यानुसार शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी 20 नोव्हेंबर 1547 चा दिवस निवडला. मात्र हा मुहुर्त तसा कामी आला नाही. कारण बहुतांश इतिहासकार मानतात की अकबर शिकू शकला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ज्योतिष्यांच्या सल्ल्यानुसार, 14 मार्च 1545 ला हुमायूननं एका शुभसमयी पुन्हा सिंहासन मिळवण्यासाठीची मोहीम सुरू केली. अस्करीनं 3 सप्टेंबर 1545 ला पराभव मान्य केला. बैरम खान अस्करीच्या मानेवर तलवार ठेवून त्याला हुमायूनसमोर हजर करण्यात आलं. हुमायूननं कुटुंबाच्या सांगण्यावरून अस्करीला जीवनदान दिलं.
अकबर 4 वर्षे 4 महिने आणि 4 दिवसांचा असताना मुल्ला इस्लामुद्दीन इब्राहीमच्या देखरेखीखाली त्याचं औपचारिक शिक्षण सुरू झालं. हुमायूननं ज्योतिष्यांच्या सल्ल्यानुसार शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी 20 नोव्हेंबर 1547 चा दिवस निवडला. मात्र हा मुहुर्त तसा कामी आला नाही. कारण बहुतांश इतिहासकार मानतात की अकबर शिकू शकला नाही.
हुमायूनला मिळाली होती स्वत:च्या मृत्यूची पूर्वसूचना
हुमायूनला वाटत होतं की 7 हा त्याच्यासाठी भाग्यवान किंवा शुभ अंक आहे. त्याच्या कपड्यांचा रंग दिवसाच्या नक्षत्रांनुसार असायचा. रविवारी तो पिवळा आणि सोमवारी हिरवा पोशाख परिधान करायचा.
एम जे अकबर यांनी लिहिलं आहे, "हुमायूनला पुढील 15 दिवसांसाठी अफीम देण्यात आली. तेव्हा त्यानं फक्त 7 दिवसांचाच खुराक घेऊन अफीम कागदात ठेवून दिली. हुमायूननं त्याच्या सेवकांना सांगितलं की फक्त इतक्याच दिवसांच्या खुराकची आवश्यकता आहे."

फोटो स्रोत, Bloomsbury
"शुक्रवार, 24 जानेवारी 1556 ला त्यानं गुलाब जलासोबत अफीम घेतली. दुपारी हुमायूननं त्याच्या अवतीभोवती उभे असलेल्या लोकांना सांगितलं, 'आज आपल्या काळातील एका खूप मोठ्या व्यक्तीला एक मोठी जखम होईल आणि तो या जगाचा निरोप घेईल.'"
संध्याकाळी हुमायून काही गणितज्ज्ञांना घेऊन किल्ल्याच्या छतावर गेला. त्याला सांगण्यात आलं होतं की त्या रात्री आकाशात पूर्ण चमक असलेला शुक्र ग्रह दिसेल. हुमायूनला तो ग्रह स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचा होता. हुमायून पायऱ्या उतरत असताना, त्यानं अजानचा आवाज ऐकला आणि तो सजदा करायला गेला म्हणजे डोकं टेकवायला गेला.

फोटो स्रोत, Getty Images
अबुल फजल यांनी लिहिलं आहे, "किल्ल्याच्या पायऱ्या उभ्या चढाच्या होत्या. त्यांचा दगड निसरडा होता. हुमायून डोकं टेकवायला खाली बसला असता, त्याचा पाय त्याच्या पोशाखात अडकला. तो पायऱ्यांवरून घसरत खाली येऊन पडला. त्याच्या डोक्याला खोल जखम झाली."
"त्याच्या उजव्या कानातून रक्त येऊ लागलं. सुरुवातीला जाहीर करण्यात आलं की बादशाहाला झालेली जखम गंभीर नाही. मात्र दरबारातील लोकांनी असं जाणूनबुजून केलं होतं. जेणेकरून पुढील बादशाहाची विधीवत घोषणा करण्यासाठी त्यांना थोडा वेळ मिळावा."
अखेरीस, 27 जानेवारीला हुमायूनचा मृत्यू झाला. तो पायऱ्यांवरून पडल्यानंतर 17 दिवसांनी म्हणजे 10 फेब्रुवारी, 1556 ला त्याच्या मृत्यूची माहिती सर्वसामान्य लोकांना देण्यात आली. त्याच दिवशी त्याचा मुलगा अकबराच्या नावावर पहिल्यांदा खुत्बा पढण्यात आला. इमाम गजनवी याच्या नेतृत्वाखाली ज्योतिष्यांनी अकबराच्या राज्याभिषेकाची वेळ ठरवली.
अकबरानं केली राज ज्योतिष्याची नियुक्ती
ज्योतिष्यांचा सल्ला घेऊनच अकबरानं हेमूच्या विरोधात लढाई सुरू केली. ऐन लढाईत हेमूच्या डोळ्यात एक बाण लागला आणि त्याच्या डोक्याच्या आरपार गेला. हेमूच्या सैनिकांनी हे दृश्य पाहताच त्यांची हिंमत खचली. त्यांना अकबराच्या सैन्यासमोर पराभव पत्करावा लागला.
लढाईच्या ठिकाणाहून अकबरानं दिल्लीत येण्याची वेळदेखील ज्योतिष्यांनी ठरवली. बादशाह म्हणून अकबरानं 'जोतिक राय' किंवा ज्योतिषराज हे नवं पद तयार केलं.

फोटो स्रोत, Atlantic Publishers
अकबराच्या वेळेचा प्रसिद्ध ज्योतिषी अजूदुदौला शिराजी यानं भविष्य वर्तवलं होतं की 'अकबर विवाहाच्या बंधनाद्वारे त्याची सत्ता आणखी मजबूत करेल.'
अकबराच्या तोशाखान्यात एक हजार पोशाख होते. त्यात 120 पोशाख परिधान करण्यासाठी नेहमी तयार ठेवले जात असत. हुमायूनप्रमाणेच अकबरदेखील दिवसाच्या नक्षत्रांच्या रंगानुसार पोशाख परिधान करत असे.
अबुल फजल यांनी लिहिलं आहे, "अकबरानं दर शुक्रवार, रविवार आणि प्रत्येक सौर महिन्याच्या पहिल्या दिवशी आणि सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी मांसाहार करणं सोडलं होतं."
जहांगीर आणि त्याची नात
अकबराप्रमाणेच त्याचा मुलगा जहांगीर याचादेखील ज्योतिषशास्त्रावर खूप विश्वास होता. अकबराप्रमाणेच जहांगीरचं शिक्षणदेखील तो 4 वर्षे, 4 महिने आणि 4 दिवसांचा असताना 1573 साली सुरू झालं.
जहांगीरच्या राज्याभिषेकासाठी 20 मार्च 1606 हा दिवसदेखील ज्योतिषांनीच निवडला होता. ज्योतिष्यांच्या सल्ल्यावरूनच जहांगीरनं त्याचा मुलगा खुसरो याच्या मुलीचा चेहरा 3 वर्षे पाहिला नव्हता.
जहांगीरनं 'तुजुक-ए-जहांगीरी' या त्याच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, "मी 13 तारखेला माझी नात आणि खुसरोच्या मुलीला बोलावलं. ज्योतिष्यांचं म्हणणं होतं की तिचा जन्म तिच्या वडिलांसाठी शुभ ठरणार नाही. मात्र आजोबा म्हणजे माझ्यासाठी शुभ असेल."

फोटो स्रोत, Getty Images
"त्यांनी सांगितलं की ती 3 वर्षांची झाल्यावर मी तिला पहिल्यांदा भेटायला हवं. ती जेव्हा या वयाची झाली, तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं."
जहांगीरचा 'जोतिकराय' म्हणजे राजज्योतिष्याचं नाव केशव शर्मा होतं. त्यानं भविष्य वर्तवलं होतं की बादशाहचा 4 वर्षांचा नातू शाहशुजा याचं आयुष्य धोक्यात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जहांगीरनं लिहिलं आहे, "शाहशुजा 17 तारखेला रविवारच्या दिवशी एका खिडकीजवळ खेळत होता. त्या दिवशी खिडकीची कवाडं बंद करण्यात आली नव्हती. शहजादा खेळता-खेळता जेव्हा खिडकीबाहेर डोकावला, तेव्हा त्याला त्याचा तोल सांभाळता आला नाही. तो खाली डोक्यावर पडला. खाली पडताच तो बेशुद्द झाला."
"मी हे ऐकताच सर्वकाही सोडून खाली पळालो. जोपर्यंत तो शुद्धीवर आला नाही तोपर्यंत मी त्याला छातीला कवटाळून राहिलो. तो शुद्धीवर येताच मी देवाचे आभार मानण्यासाठी डोकं टेकवण्यासाठी गेलो."
शिक्क्यांच्या म्हणजे नाण्यांच्या एका बाजूला राशीची प्रतिमा कोरणारा जहांगीर पहिला मुघल बादशाह होता.
औरंगजेबानं देखील तयार करून घेतली होती स्वत:ची जन्मकुंडली
लाहोरच्या किल्ल्यात 5 जानेवारी 1592 ला शाहजहानचा जन्म झाला. त्यानंतर 3 दिवसांनी त्याचे आजोबा बादशाह अकबर त्याला पाहण्यासाठी तिथे पोहोचले. बादशाह अकबरानं बाळाचं नाव खुर्रम ठेवलं. कारण ज्योतिष्यांनी सल्ला दिला होता की बाळाचं नाव 'ख' या अक्षरानं सुरू झालं पाहिजे.
जहांगीराचा नातू आणि अकबराचा पणतू औरंगजेब यालादेखील जन्म कुंडलीवर पूर्ण विश्वास होता. त्याच्या दरबारातील ज्योतिष्यांनी त्याच्या राज्याभिषेकाची वेळ ठरवली होती.
जदुनाथ सरकार यांनी 'द हिस्ट्री ऑफ औरंगजेब' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, "ज्योतिष्यांनी सांगितलं होतं की रविवार, 5 जूनला सुर्योदयानंतर 3 तास 15 मिनिटांची वेळ औरंगजेबाच्या राज्याभिषेकासाठी सर्वात योग्य आहे."
"योग्य वेळ येताच ज्योतिष्यांनी इशारा केला. त्यानंतर एका पडद्यामागे तयार बसलेला बादशाह औरंगजेब बाहेर येऊन सिंहासनावर बसला."

फोटो स्रोत, Getty Images
औरंगजेबच्या काळात भारतात आलेला फ्रेंच प्रवासी फ्रांसुआ बर्नियर यानंदेखील औरंगजेबाच्या ज्योतिषशास्त्रावरील विश्वासाची पुष्टी केली आहे.
बर्नियरनं लिहिलं आहे, "ज्योतिष्यांच्या सल्ल्यानुसार, 6 डिसेंबर 1664 च्या दुपारी 3 वाजता औरंगजेबानं दक्षिणेसाठी कूच केलं. त्यांचं म्हणणं होतं की दीर्घ प्रवासासाठी ही सर्वात योग्य वेळ आहे."
एम जे अकबर यांनी लिहिलं आहे, "औरंगजेबानं त्याच्या मुलाला सांगितलं की त्यांचा ज्योतिषी फजील अहमदनं त्याची जी जन्मकुंडली तयार केली आहे, त्यातील प्रत्येक गोष्ट आतापर्यंत खरी ठरली आहे. माझ्या कुंडलीत असंही लिहिलं आहे की माझ्या मृत्यूनंतर काय होईल?"
"औरंगजेबानं म्हटलं, 'अज मअस्त हमाह फसाद-ए-बाकी' म्हणजे माझ्या मृत्यूनंतर सर्व बाजूला अराजकता निर्माण होईल. माझ्यानंतर एक असा बादशाह येईल जो अज्ञानी आणि संकुचित विचारांचा व्यक्ती असेल. अर्थात मी माझ्या मागे असद खान हा एक सक्षम वजीर सोडून जाईन. मात्र माझी चारही मुलं त्याला त्याचं काम करू देणार नाहीत."
जेव्हा ज्योतिष्यांचं भविष्य खोटं ठरलं
ज्योतिष्यांनी वर्तवलेल्या सर्वच गोष्टी खऱ्या ठरल्या असं नाही. खोटं किंवा चुकीच्या ठरलेल्या भविष्यवाण्यांना अनेकदा विसरण्यात आल्या किंवा त्यांची नोंद करण्यात आली नाही.
अशीच एका चुकीच्या ठरलेल्या भविष्यवाणीची कहाणी, बाबरची मुलगी गुलबदन बेगमशी संबंधित आहे.
त्यांनी 'हुमायूननामा' या त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे, "ज्योतिषी मोहम्मद शरीफनं सांगितलं की खानवाच्या लढाईत न जाणं हेच बाबरसाठी योग्य आहे. कारण नक्षत्र त्याच्या बाजूचे नाहीत. हे ऐकून शाही सैन्यात अस्वस्थता आणि निराशा पसरली. मात्र भविष्यवाणीकडे लक्ष न देता बाबरनं त्याच्या योजनेत कोणताही बदल केला नाही."

फोटो स्रोत, Juggernaut
बाबरनं त्याच्या सैनिकांना गोळा करून सांगितलं, "आग्र्याहून काबूलला परत जाण्यास अनेक महिने लागतील. जर ते या लढाईत मृत्यूमुखी पडले तर ते शहीद होतील. जर ते जिवंत राहिले, तर त्यांचं यश आणि प्रतिष्ठा वाढेल."
लढाईच्या दोन दिवस आधी बाबरनं मद्यपान सोडलं. या ऐतिहासिक लढाईत ज्योतिष्यांनी जे भविष्य वर्तवलं होतं, त्याच्या उलट बाबर लढाई जिंकला. राणा सांगाचा पराभव झाला. त्यानंतर बाबरनं भारतात मुघल साम्राज्याच्या पाया घातला. भारताच्या इतिहासातील ही पहिली लढाई होती, ज्यात दारूगोळ्याच्या वापरानं निर्णायक भूमिका बजावली होती.
लढाईत पराभव होण्याचं भविष्य वर्तवणाऱ्या ज्योतिषी मोहम्मद शरीफवर बाबरनं जाणूनबुजून दिशाभूल केल्याचा आरोप केला. ज्योतिष्याला शिक्षा तर देण्यात आली नाही. मात्र त्याला त्याच्या पदावरून हटवून काबूलला परत पाठवण्यात आलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











