तीन आघाड्यांवरची लढाई आणि अचानक मारला गेलेला नेता; लारिजानी यांच्यानंतर इराणचं काय होणार?

फोटो स्रोत, Anadolu via Getty Images
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी मारले गेले. इराणने एका अत्यंत अनुभवी आणि प्रभावशाली नेत्याला गमावलं आहे. ते देशाच्या मोठ्या निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. अशा गंभीर काळात त्यांचा मृत्यू इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
लारिजानी हे लष्करी कमांडर नव्हते, परंतु इराणचे धोरणात्मक निर्णय कसे घ्यायचे यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ते देशाची धोरणं आणि योजना ठरवणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक होते.
सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव म्हणून ते युद्ध, परराष्ट्र संबंध (मुत्सद्देगिरी) आणि देशाच्या सुरक्षेसंबंधी मोठ्या निर्णयांच्या केंद्रस्थानी होते.
त्याचं मत सरकारमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जायचं. विशेषतः अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेला तणाव आणि संघर्ष हाताळताना त्यांचा मोठा प्रभाव होता.
मागील महिन्यात 28 फेब्रुवारीला इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर, अली लारिजानी यांनी ठाम आणि कठोर भूमिका घेतली होती. इराण दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षासाठी तयार आहे, याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले होते.
पाश्चिमात्य देशांविरोधात त्याची भूमिका कठोर होती, परंतु इराणमध्ये त्यांना अनेकदा व्यवहारवादी नेता मानलं जायचं. ते फक्त विचारसरणीवर नाही, तर वास्तव परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचे. ते भावनिक भाषणांपेक्षा विचारपूर्वक नियोजन करून रणनीती ठरवण्यास जास्त महत्त्व द्यायचे.
पाश्चिमात्य देशांशी जवळीक वाढवण्याबाबत ते संशयाने पाहायचे. पण तरीही ते महत्त्वाच्या परराष्ट्र चर्चांमध्ये सहभागी व्हायचे. चीनसोबत इराणचा दीर्घकालीन करार करण्यासाठी ते विशेष प्रतिनिधी म्हणूनही काम करत होते.
शेवटपर्यंत महत्त्वाची जबाबदारी...
मृत्यूच्या वेळी, लारिजानी तीन मोठ्या संकटांना हाताळण्याची जबाबदारी सांभाळत होते.
पहिलं संकट म्हणजे युद्धच होतं. लारिजानी यांचं म्हणणं होतं की, इराणने दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षासाठी तयार राहायला हवं. त्यासाठी हा संघर्ष फक्त आपल्या देशापुरता न ठेवता इतर भागांपर्यंतही वाढवावा, अगदी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यासारखी पावलंही उचलावीत.
दुसरं संकट म्हणजे देशांतर्गत उसळलेलं आंदोलन होतं. सुरुवात महागाई आणि आर्थिक अडचणींमुळे झाली, पण नंतर हे आंदोलन वाढत जाऊन सरकारविरोधी मोठ्या आंदोलनात रुपांतरीत झालं. लोक इस्लामिक रिपब्लिक सरकार पाडण्याची मागणी करू लागले. या आंदोलनावर सरकारने कठोर कारवाई केली, ज्यात देशभरात हजारो आंदोलकांचा मृत्यू झाला.
तिसरं संकट म्हणजे इराणचा अणू कार्यक्रम आणि अमेरिकेसोबत चाललेल्या अप्रत्यक्ष वाटाघाटी होत्या. परंतु, लष्करी हल्ल्यांमुळे हे दोन्ही आधीच बिघडले होते आणि चर्चाही थांबल्या होत्या.
इराणचे लष्कर प्रमुख अमीर हतामी यांनी लारिजानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 'निर्णायक' प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे.
पण काळ जसा पुढे जाईल, तसं सातत्याने मोठे नेते गमावणारी ही व्यवस्था नीट चालवणं कठीण होत जाईल. विशेषतः 90 दशलक्षांहून (9 कोटींहून) जास्त लोकसंख्या असलेल्या देशात.
लारिजानी यांच्या मृत्यूचा परिणाम फक्त एका नेत्याच्या जाण्यापुरता मर्यादित नाही. यामुळे इराणमध्ये नेतृत्वाचं संकट अधिक वाढलं आहे. त्याचा परिणाम युद्धाच्या पुढील दिशेवर आणि इराणच्या स्थैर्यावरही होऊ शकतो.

फोटो स्रोत, Iranian President's Press Office/UPI/Shutterstock
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी त्यांच्या वक्तवात म्हटलं आहे की रात्रभर चाललेल्या इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी मारले गेल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे.
शुक्रवारी (13 मार्च) तेहरानमध्ये कुड्स डे च्या मोर्चात लारिजानी दिसले होते.
इस्रायलच्या प्रसारमाध्यमांमधील बातम्यांमध्ये दावा करण्यात आला आहे की अली लारिजानी आणि त्यांचा मुलगा एका अपार्टमेंटमध्ये लपलेले होते. तिथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
इराणमधील किमान दोन मीडिया हाऊसचं म्हणणं आहे की सर्वोच्च सुरक्षा अधिकारी अली लारिजानी लवकरच एक संदेश जारी करतील.
तसनीम आणि मेहर या वृत्तसंस्थांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की हा संदेश "काही मिनिटांमध्येच जारी करण्यात येईल."
इस्रायलच्या सैन्यातील एका अधिकाऱ्यानं बीबीसीकडे पुष्टी केली आहे की आयडीएफनं लारिजानी यांना लक्ष्य केलं होतं.

फोटो स्रोत, NAKKAS / AFP via Getty Images
इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की इस्रायलच्या सशस्त्र दलांनी गुलाम रजा सुलेमानी या आणखी एका उच्च स्तरीय सुरक्षा अधिकारी आणि बसीज कमांडरला देखील मारलं आहे.
काट्झ म्हणाले की "पंतप्रधान आणि मी आयडीएफला सूचना केल्या आहेत की त्यांनी इराणच्या दहशत निर्माण करणाऱ्या आणि अन्याय करणाऱ्या शासनाच्या नेतृत्वाला लक्ष्य करणं सुरू ठेवावं."
ते म्हणाले, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या नेतृत्वात वेगानं होत असलेल्या बदलाबद्दल बोलले होते. आम्ही त्यांना सांगू की हा बदल अजूनही सुरू आहे आणि उरलेल्या दोन सर्वात वरिष्ठ नेत्यांना मारल्यानंतर तो आणखी वेगवान झाला आहे."
या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या इस्रायलच्या हवाई दलाच्या वैमानिकांचं आणि गुप्तचर अधिकाऱ्यांचं देखील काट्झ यांनी कौतुक केलं.
वक्तव्यांमुळे होते चर्चेत
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेल्यानंतर अली लारिजानी बऱ्याच उघडपणे त्यांची मतं मांडत होते.
अली लारिजानी शेवटचे 13 मार्चला तेहरानमध्ये कुड्स डे च्या मोर्चात सार्वजनिकपणे दिसले होते. त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोंमध्ये ते रस्त्यावर लोकांशी बोलताना आणि हात हलवत असताना दिसले होते.

फोटो स्रोत, Reuters
एक दिवस आधी त्यांनी सोशल मीडियावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टोमणा मारला होता. त्यांनी एक्सवर लिहिलं होतं, "ट्रम्प म्हणतायेत की त्यांना लवकर विजय मिळवायचा आहे. युद्ध सुरू करणं सोपं आहे. मात्र काही ट्विट्सकरून ते जिंकता येत नाही."
त्यांनी पुढे लिहिलं होतं, "तुम्हाला या चुकीच्या गंभीर आकलनाबाबत पश्ताताप होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही."
लारिजानी यांनी 10 मार्चला केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की इराण ट्रम्प यांच्या 'धमक्यां'ना घाबरत नाही. त्यांनी लिहिलं होतं, "तुमच्यापेक्षाही मोठी माणसं इराणचं राष्ट्र संपवू शकले नाहीत."
त्यांनी इशारा देत म्हटलं होतं, "सावध राहा, नाहीतर तुमचाच अंत व्हायचा."
कोण होते अली लारिजानी - बीबीसी प्रतिनिधी जेरेमी बोवेन यांचे विश्लेषण
अली लारिजानी यांच्याकडे एक व्यवहारी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिलं जातं.
गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांनी काही फार कठोर वक्तव्यं केली आहेत. मात्र अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे प्रत्येक पैलू समजून घेण्याचा प्रयत्नं करणारं एक लवचिक व्यक्ती म्हणून पाहण्यात आलं आहे.
कदाचित याच कारणामुळे, त्यांच्याकडे कदाचित चर्चा करता येईल अशी व्यक्ती म्हणूनही पाहिलं जातं.
मात्र यातील अडचण अशी आहे की इस्रायलला यापैकी कोणाशीही चर्चा करायची नाही.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
इस्रायलनं वारंवार म्हटलं आहे की त्यांना इराणमधील राजवट संपवायची आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची प्रदीर्घ काळापासून हीच भूमिका राहिली आहे.
इस्रायलचा आता पूर्वीपेक्षाही अधिक लष्करी बळाच्या वापरावर विश्वास आहे.
अली लारिजानी कोण आहेत?
अली लारिजानी इराणच्या सर्वोच्च नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे (एएनएससी) प्रभावशाली सचिव आहेत.
राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. त्याचबरोबर त्यांना इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा या कौन्सिलमधील प्रतिनिधीदेखील करण्यात आलं होतं.
इराणमधील प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचा उल्लेख सर्वोच्च नेत्यांचे सल्लागार म्हणूनही करण्यात आला आहे. मे 2008 ते मे 2020 अशी 12 वर्षे ते इराणच्या संसदेचे अध्यक्ष (स्पीकर) होते.
अर्थात 2008 ते 2012 पर्यंत त्यांनी संसदेत प्रिन्सिपलिस्ट गटाचं नेतृत्व केलं होतं. मात्र अलीकडच्या वर्षांमध्ये त्यांच्याकडे 'मध्यममार्गी कॉन्झर्व्हेटिव्ह' म्हणून पाहिलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
संसदेचे स्पीकर होण्याआधी लारिजानी 2005 ते 2007 दरम्यान इराणचे अणु कार्यक्रमासाठीचे मुख्य वाटाघाटीकार देखील होते.
त्यांचे भाऊ सादेग लारिजानीदेखील इस्लामिक रिपब्लिकमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती आहेत. ते एक्सपीडिएन्सी कौन्सिलचे प्रमुख आहेत. ही एक सर्वोच्च संस्था आहे. ती संसद तसंच गार्डियन कौन्सिलमधील वादांबाबत अंतिम निर्णय घेते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











