'रक्तचंदन' प्रकरणाला नवं वळण, शेतकऱ्याचा मृत्यू; रेल्वेनं दिलेल्या 1 कोटी रुपये मोबदल्याचे काय होणार?

रक्तचंदन

फोटो स्रोत, Bhagyashree Raut

फोटो कॅप्शन, केशव शिंदे आणि त्यांच्या शेतातील झाड
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

मुंबई हायकोर्टानं एका शेतकऱ्याला रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला म्हणून एक कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. रेल्वेनं मोबदला दिला आणि हे झाड रक्तचंदनाचं नाहीतर 10 हजार रुपये किंमतीचं बिजासाल आहे, असा अहवाल कोर्टात सादर केला होता आणि या प्रकरणाला नवीन वळण मिळालं होतं.

आता या प्रकरणात पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे.

यवतमाळच्या पुसद इथल्या ज्या शेतकऱ्याला दिलेला एक कोटी रुपयांचा मोबदला परत मिळावा यासाठी रेल्वेनं अर्ज केला आहे ते शेतकरी आणि मुख्य याचिकाकर्ते केशव शिंदे यांचा मृत्यू झाला.

त्यांना मधुमेह होता आणि ते घरातच पडले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

मृत शेतकरी केशव शिंदे यांनी 1 कोटी मोबदल्यापैकी 50 लाख रुपये उचलले होते आणि 50 लाख रुपये अजूनही हायकोर्टात जमा आहेत.

शिंदेंनी उचललेल्या 50 लाख रुपयांचं काय होईल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता त्यांच्या वारसांनी पैसे परत करावे अशी मागणी रेल्वेनं कोर्टात केली आहे.

रेल्वेच्या वकील निरजा चौबे म्हणाल्या, की "हायकोर्टानं खालच्या सिव्हील कोर्टात जायला सांगितलं आहे. हे रक्तचंदन नसून बिजासाल आहे असं बंगळुरूमधील लाकूड विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेनं दिलेल्या अहवालात आहे. पण, आता खालच्या कोर्टात शेतकऱ्याला हे रक्तचंदन आहे की नाही हे सिद्ध करायला लागेल. ते सिद्ध करू शकले नाहीतर झाडाचं मूल्यांकन 10 हजार रुपये कापून उर्वरीत पैसे शेतकऱ्याला परत करायला लागतील."

पण, 10,000 रुपये मूल्यांकन हे चुकीच्या पद्धतीनं केलं असून त्यावर शेतकऱ्यानं आक्षेप घेतला आहे.

शिंदे यांच्या शेतातील झाडाच्या फांदीचा फोटो
फोटो कॅप्शन, शिंदे यांच्या शेतातील झाडाच्या फांदीचा फोटो

शेतकऱ्याची बाजू मांडणाऱ्या वकील अ‍ॅड. अंजना राऊत म्हणाल्या की, "रेल्वेनं कोर्टात सादर केलेल्या अहवालात अवैधरीत्या तोडून चोरी केलेल्या लाकडाच्या किमतीनुसार झाडाची किंमत काढली आहे. पण, झाड जशास तसं उभं आहे. आमचं झाड 400 टन आहे. त्यानुसार मूल्यांकन व्हायला पाहिजे.

"तसेच झाडाचं पुन्हा मूल्यांकन होणार. त्या मूल्यांकनाची किंमत जर शेतकऱ्यानं उचललेल्या 50 लाख रुपये किंमतीपेक्षा जास्त असेल तर रेल्वेला पैसे द्यायला लागतील आणि कमी असेल तर शेतकऱ्याला पैसे परत करायला लागतील, असं कोर्टानं सुनावणीदरम्यान तोंडी टिप्पणी केली आहे. त्याचे अजून लिखित आदेश आलेले नाहीत," अशीही माहिती त्यांनी दिली.

आता हे प्रकरण यवतमाळच्या सिव्हील कोर्टात चालणार आहे.

शेतकऱ्याच्या वारसांचं म्हणणं काय आहे?

मृत शेतकरी केशव शिंदे यांनी 1 कोटी मोबदल्यापैकी 50 लाख रुपये उचलले होते आणि 50 लाख रुपये अजूनही हायकोर्टात जमा आहेत. या 50 लाख रुपयांपैकी शेतकऱ्यानं आपल्या मुलांमध्ये सगळे पैसे वाटून दिले. त्यामुळे मूल्यांकन जर कमी निघालं तर पैसे परत करायचे कसे? हा प्रश्नही आता त्यांच्या वारसांसमोर निर्माण झाला आहे.

पण, पुन्हा नव्यानं होणाऱ्या मूल्यांकनाच्या अधीन राहून आम्ही पैसे परत करायला तयार आहोत, असं मृत शेतकरी केशव शिंदे यांचा मोठा मुलगा पंजाब शिंदे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हटलेलं आहे.

केशव शिंदे यांच्या सगळ्या मुलांपैकी पंजाब शिक्षित असून तेच हे प्रकरण बघत आहेत.

तसेच रेल्वेनं जो 10 हजार रुपये मूल्यांकनाचा बीजासाल झाड असल्याचा अहवाल कोर्टात सादर केला त्यावरही पंजाब यांचा आक्षेप आहे.

केशव शिंदे आणि पंजाब शिंदे
फोटो कॅप्शन, केशव शिंदे आणि पंजाब शिंदे

"आमचं झाड 100 वर्ष जुनं आहे. त्यामुळे ते झाड देत असलेलं ऑक्सिजन, त्याची पर्यावरणीय किंमत हे ग्राह्य धरायला पाहिजे. तसेच त्यांनी मूल्यांकन चुकीच्या पद्धतीनं केलं आहे. 100 वर्ष जुन्या झाडाचं मूल्यांकन केलं तर आम्ही उचललेल्या 50 लाख रुपयांच्या वर जातं," असा दावा पंजाब शिंदे यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, "आमच्या शेतातल्या अंडरग्राऊंड पाईपलाईन, विहीरीचा वाढीव मोबदला आणि इतर 31 झाडांचं सुद्धा मूल्यांकन काढून आम्हाला मोबदला मिळाला नाही. ह्या सगळ्यचा मोबदला मिळून 1 कोटी रुपयांच्या वर जातो. पण, त्या झाडाचं मूल्यांकन योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे. त्याची वैधता सिद्ध व्हायला पाहिजे. ते झाल्यानंतर आम्ही नियमाच्या अधीन राहून पैसे परत करायला तयार आहोत."

नेमकं काय घडलं होतं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यवतमाळ जिल्ह्यातील खरशी इथले शेतकरी केशव शिंदे यांनी हायकोर्टात रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी 7 ऑक्टोबर 2024 ला याचिका दाखल केली होती.

केशव शिंदे यांची पुसद तालुक्यातल्या खरशी गावात 2.29 हेक्टर जमीन आहे. पण, वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून जात असल्यानं मध्य रेल्वेनं त्यांची जमीन संपादित केली.

त्यांना संपादीत जमिनीचा मोबदला मिळाला. शिंदे यांनी शेतात उभं असलेलं रक्तचंदनाचं झाड, तसेच येनाचं झाडं, खैर यासारखे आडजातीचे आठ-दहा झाडं आणि भूमिगत पाईपलाईन याच्या मोबदल्याचीही मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे केली.

पण, रक्तचंदनाच्या झाडाचं आधी मूल्यांकन करायला लागेल असं त्यांचं म्हणणं होतं. मूल्यांकन करण्यासाठी वनविभागालाही पत्र देण्यात आलं.

केशव शिंदे यांचा मुलगा आणि याचिकाकर्ते पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेतजमिनीवर आंब्यासह इतर फळबाग होती. त्याचा मोबदला मिळाला होता. विहीरीचाही आठ लाख रुपये मोबदला मिळाला. पण, रक्तचंदनाच्या झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मिळाला नव्हता. त्यासाठी 2014 पासून जिल्हाधिकारी, वनविभाग, रेल्वे, सिंचन विभाग सगळ्यांना पत्र व्यवहार केला. पण, आम्हाला मोबदला मिळाला नाही. त्यामुळे मग आम्ही आठ वर्षानंतर हायकोर्टात धाव घेतली.

शिंदे यांच्या शेतातील झाड ज्यावरून वाद सुरु आहे

फोटो स्रोत, Bhagyashree Raut

फोटो कॅप्शन, शिंदे यांच्या शेतातील झाड ज्यावरून वाद सुरु आहे

हायकोर्टानं गेल्या एप्रिल महिन्यात 1 कोटी रुपये मोबदला शेतकऱ्याला द्यावा असे आदेश मध्य रेल्वेला दिले होते. त्यानुसार रेल्वेनं 1 कोटी रुपये कोर्टात जमा केले होते. त्यापैकी 50 लाख रुपये काढण्याची परवानगी कोर्टानं दिली होती. शेतकऱ्यानं 50 लाख रुपये उचलले होते.

पण, त्यावेळी झाडाचं मूल्यांकन झालेलं नव्हतं. त्याचं मूल्यांकन करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. मूल्यांकन झाल्यानंतर मोबदला वाढला तर रेल्वेला आणखी पैसे द्यायला लागतील असेही आदेश कोर्टानं त्यावेळी दिले होते.

त्यानंतर पुसद वनविभागानं पुसद वनविभागाच्या उपवनसंरक्षकानं बंगळुरूमधील लाकूड विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेला मूल्यांकन करण्याचं काम दिलं. यामध्ये हे रक्तचंदन नसून बिजासाल असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्याचं शास्त्रीय नाव हे टेरोकॉर्पस मार्सुपिअम (Pterocarpus Marsupium) असल्याचं त्या अहवालात नमूद आहे.

याच अहवालाच्या आधारे मध्य रेल्वेनं कोर्टात धाव घेतली असून या झाडाचं मूल्यांकन फक्त दहा हजार रुपये असल्याचं म्हटलं आहे.

आता खालच्या कोर्टात प्रकरण चालणार असून पुन्हा मूल्यांकन होणार असल्याची माहिती वकील अंजना राऊत यांनी दिली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.