अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे तेलाच्या किमतीत चार वर्षातील उच्चांकी वाढ

तेहरानमधील तेल साठ्यांवर हवाई हल्ले झाले आहेत.

फोटो स्रोत, Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, तेहरानमधील तेल साठ्यांवर हवाई हल्ले झाले आहेत.
वाचन वेळ: 3 मिनिटे

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम शेअर बाजार आणि जागतिक तेल बाजारावर होताना दिसत आहे.

तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरहून जास्त (9 हजार 232 रुपयांहून अधिक) झाली आहे. तसेच शेअर बाजारात घसरण झाली आहे.

युद्धाच्या स्थितीमुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतुकीत दीर्घकाळ अडथळे येण्याची भीती निर्माण झाली आहे.

इराणच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिले आहे की, अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते होतील.

आठवड्याभरापासून संघर्ष सुरू असताना सत्ता अद्याप आपल्याच हातात असल्याचे संकेत इराणने या नव्या निवडीतून दिल्याचे दिसते.

गेल्या 2-3 दिवसात अमेरिका-इस्रायलने इराणवर नव्याने हवाई हल्ले केले. त्यात अनेक ऑइल डेपोंचे नुकसान झाले.

या प्रदेशातील तेलसाठ्यांना झालेल्या हानीमुळे तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. सोमवारी (9 मार्च) सकाळी तेलाच्या किमतीत 18 टक्क्यांनी वाढ झाली असून प्रति बॅरल तेलाची किंमत 109 डॉलर झाली आहे.

तेलसाठ्यांवर कसे हल्ले झाले?

इराणच्या नागरिकांनी बीबीसीला सांगितले की अनेक तेलसाठ्यांवर रात्रीतून अमेरिका-इस्रायलकडून हल्ले करण्यात आले.

हे हल्ले इतक्या मोठ्या प्रमाणावर होते की रात्र ही दिवसाप्रमाणे लख्ख दिसत होती, असे एका इराणी नागरिकाने बीबीसीला सांगितले.

तेलसाठ्यांवर कसे हल्ले झाले?

फोटो स्रोत, Getty Images

तेहरान आणि कराज या ठिकाणच्या तेलसाठ्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे एका स्थानिक वृत्तसंस्थेनी इराणच्या तेल मंत्रालयातील सूत्राच्या हवाल्याने सांगितले.

तेहरानमधील एका तेलसाठ्याजवळ आग लागलेली असतानाचा व्हीडिओ समोर आला आहे. दुकाने आणि घरांना आग लागली असल्याचे एक व्यक्ती या व्हीडिओत म्हणत आहे.

कराज एका दिवसासाठी शांत होते पण आता पुन्हा स्थिती गंभीर झाली आहे. त्यांनी शहर उडवले आहे, असं एका रहिवाशाने बीबीसीला सांगितले.

हवेची गुणवत्ता प्रचंड वाईट

कराजमधील 30 वर्षांच्या आणखी एका व्यक्तीनं सांगितलं की, "सुरुवात एका लाल प्रकाशाने झाली. त्यामुळे सर्व काही जळायला लागलं आणि त्यानंतर एका उष्म लाटेनं दरवाजा हादरला."

"त्यानंतर मग आकाश पुन्हा उजळून निघालं आणि एक मोठा लाल रंगाचा धूराने व्यापलेला ढग दिसू लागला. आम्हाला काय चाललं आहे तेच कळलं नाही," असंही तो म्हणाला.

त्यानंतर तो त्याच्या छतावर गेला. तिथे त्याला स्थानिक तेल डेपोला आग लागली असल्याचं दिसलं.

बीबीसी ज्या इराणी लोकांशी बोलत आहे, त्यांच्या संरक्षणासाठी बीबीसी त्यांची ओळख उघड करत नाहीये.

इराणी अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं आहे की, ते राजधानीतील हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून आहेत. तसेच, त्यांनी इराणच्या रहिवाशांना घरीच राहण्यास सांगितलेलं आहे.

तेलसाठ्यांवर कसे हल्ले झाले?

फोटो स्रोत, Reuters

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकायी म्हणाले की, या हल्ल्यांमुळे "हवेत धोकादायक पदार्थ आणि विषारी पदार्थ मिसळले जात आहेत."

यामुळे "जीवाला मोठ्या प्रमाणावर धोका आहे".

तेहरानमधील एका महिलेनं सांगितलं की, शहर धुरानं व्यापलेलं आहे.

"सहजपणे काहीतरी जळत असल्याचा सतत वास येतोय. मला सूर्य दिसत नाहीये. भयानक धूर आहे. धूर अजूनही प्रचंड आहे, मी खूप थकलेले आहे."

कराजमधील आणखी एका व्यक्तीनं सांगितलं की, डेपोवरील हल्ल्यामुळे "मोठा स्फोट झाला आणि तासन्तास तो आगीनं जळत होता".

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येपासून सुरू झालेला हा संघर्ष अद्यापही सुरूच आहे.

अमेरिका-इस्रायलचे इराणवरील हल्ले आता दुसऱ्या आठवड्यात कायम आहेत.

इराणने अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर आणि त्या प्रदेशातील अमेरिकेच्या मालमत्तेवर हल्ले करून प्रत्युत्तर दिलेलं आहे.

अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांची खामेनींचे उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)