चहापासून ते चारमिनारपर्यंत : इराण आणि भारताचा काय संबंध आहे?

फोटो स्रोत, BBC/GettyImages
- Author, बल्ला सतीश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
इस्रायल-अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे सध्या भारत-इराण संबंधांवर एक जोरदार चर्चा सुरू आहे.
इराण आणि भारत यांचे संबंध कधीपासून आहेत, यावर तर चर्चा सुरू आहेच, पण ही सुद्धा चर्चा सुरू आहे की हैदराबादवर इराणचा किती प्रभाव आहे?
भारत आणि इराणचे नाते तसे हजारो वर्षं जुने आहे. एकेकाळी या दोन्ही देशांच्या सीमा एकमेकांना जोडलेल्या होत्या. ते एकमेकांचे शेजारी देश होते.
जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा ही सगळी सीमा पाकिस्तानच्या वाट्याला गेली. पण इतकी वर्षं शेजारी राहिल्यामुळे दोन्ही देशांमधील ऋणानुबंध खूप घट्ट झाले होते.
इराणला पूर्वी 'पर्शिया' म्हणून ओळखलं जायचं. तिथल्या संस्कृतीचा भारतावर विशेषतः हैदराबादवर खूप मोठा प्रभाव पडला. मग त्या इराणच्या सुंदर इमारती असोत, तिथले कपडे, धर्म, भाषा किंवा संगीत आणि साहित्य... अगदी खाण्यापिण्यापर्यंत सगळ्या गोष्टीत भारत आणि इराणचं एक वेगळं कनेक्शन आपल्याला आजही पाहायला मिळतं.
मध्ययुगीन काळात तर पर्शियन भाषेचा प्रभाव खूप मोठा होता.

भारतातील झोरोस्ट्रियन म्हणजेच पारशी लोक इराणमधून आले. म्हणूनच त्यांना 'पारशी' हे नाव पडले. प्रसिद्ध उद्योगपती टाटा घराणे हे पारशीच आहे.
पर्शियन ही मध्ययुगीन भारतातील अनेक राजांची अधिकृत राजभाषा होती. प्राचीन भारतातील अनेक ग्रंथ पर्शियन भाषेत लिहिले गेले आहेत.
ऐतिहासिक संशोधक आणि 'डेक्कन हेरिटेज ट्रस्ट'चे मानद व्यवस्थापकीय विश्वस्त मोहम्मद सफीउल्लाह यांच्या मते, उर्दूच्या आगमनापूर्वी गोवळकोंडाची राजभाषा ही पर्शियन होती. उर्दू 1883-86 च्या दरम्यान आली. त्यापूर्वी कित्येक वर्षं हैदराबाद संस्थानाचा सगळा कारभार याच भाषेत चालायचा.

- प्रसिद्ध ताजमहाल हे भारत आणि पर्शियाच्या (इराण) कलाकुसरीचा एक उत्तम नमुना आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? हैदराबाद शहराचे मुख्य 'आर्किटेक्ट' स्वतः इराणहून आले होते. त्यांनी इराणमधील 'इस्फहान' शहराच्या धर्तीवरच चारमिनार आणि संपूर्ण हैदराबाद शहराची रचना केली.
- आज आपण ज्या गोष्टी आवडीने खातो, त्यामागेही इराण कनेक्शन आहे. फक्त इराणी चहा किंवा इराणी कॅफेच नाही, तर रमझानमध्ये मोठ्या आवडीने खाल्ली जाणारी 'हलीम' सुद्धा इराणी खाद्यसंस्कृतीतूनच इथे आली आहे. इतकंच काय, तर आपला रोजचा 'नान' हा शब्द सुद्धा मूळचा पर्शियनच आहे.
- हैदराबादची स्थापना करणारे कुतुबशाही राजे इराणचे शिया मुस्लीम होते. इतिहासकारांच्या मते, शियांचे पहिले खलिफा आणि सुन्नींचे चौथे खलिफा 'अली' यांना 'हैदर' ही पदवी होती आणि त्यांच्याच नावावरून या शहराचे नाव 'हैदराबाद' पडले.
- सरकार, दरबार, शिपाई... हे सर्व शब्द सुद्धा मूळचे पर्शियन भाषेतूनच आले आहेत.
हैदराबादमध्ये खामेनी यांच्या नावाचा रस्ता आहे का?
अनेकांचा असा समज आहे की, हैदराबादमध्ये ज्यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला ते इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या नावाचा रस्ता आहे . पण, हे खरे नाही. त्या रस्त्याला खामेनी यांचे नाव नसून खोमेनी यांचे नाव आहे.
इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर दोन शिया धर्मगुरूंनी तिथले सर्वोच्च नेते म्हणून काम पाहिले. पहिले सर्वोच्च नेते रुहोल्ला खोमेनी होते. त्यांनी 1979 ते 1989 पर्यंत काम पाहिले. इराण आणि हैदराबादमधील सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक म्हणून बंजारा हिल्स रोड नंबर 7 ला खोमेनी यांचे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे याच रस्त्यावर इराणचे दूतावास देखील आहे.

1989 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर अली खामेनी यांनी पदभार स्वीकारला. आता याच अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. रुहोल्ला खोमेनी आणि अली खामेनी या दोघांची नावे एकमेकांशी खूप मिळतीजुळती असल्यामुळे अनेकांचा असा गैरसमज होतोय की, हैदराबादमधील तो रस्ता आत्ताच्या 'खामेनी' यांच्या नावावर आहे.
'अयातुल्ला' हे शिया मुस्लिमांमधील प्रमुख धार्मिक पद मानले जाते.
इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निधनाबद्दल भारतीय मुस्लीम आणि जगभरातील मुस्लीम का काळजी व्यक्त करत आहेत यावरही चर्चा सुरू आहे. पण येथील मुस्लिमांच्या प्रतिक्रियेचे एक कारण म्हणजे खामेनी हे केवळ इराणचे राजकीय नेते नव्हते, तर एक धर्मगुरू देखील होते.
इराणमधील राजेशाही संपल्यानंतर तिथे राष्ट्राध्यक्ष हे पद असले तरी शिया धर्मगुरूच सर्वोच्च नेते राहिले आहेत. शिया इस्लाममध्ये त्यांना मोठे महत्त्व आहे. खोमेनी आणि खामेनी या दोघांकडेही 'अयातुल्ला' ही पदवी होती. मुस्लीम त्यांना अत्यंत आदराचे आणि पवित्र स्थान म्हणून पाहतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











