संध्याकाळी भोंगा वाजतो आणि मुलं दप्तर घेऊन स्मशानात जातात; 'या' गावात भरते स्मशानातली अभ्यासिका

स्मशानातली अभ्यासिका

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

'आडाची वाडी'मध्ये साधारण संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजतो. भोंगा सुरू होतो तशी मुलं आपापली दप्तरं आवरतात आणि स्मशानात जाण्यासाठी घराबाहेर पडतात. बरोबर वाचलं स्मशानात जाण्यासाठी!

याच गावातल्या स्मशानात चालणाऱ्या रात्रीच्या अभ्यासिकेमुळेच पवार यांच्या मुलांमध्ये फरक दिसत आहे.

"आमच्या मुलांचं मोबाईल पहाणं बंद झालं आहे," ज्योती पवार सांगतात.

ज्योती पुणे जिल्ह्यातल्या आडाचीवाडी गावच्या रहिवासी. त्यांना 2 मुलं आहेत. यातली मोठी मुलगी टीव्ही तर लहान मुलगा बऱ्याचदा मोबाईल पाहत होता.

पण आता गावातल्या अभ्यासिकेमुळे शाळेतून आलं की, मुलं अभ्यासाला बसतात. यात मोबाईल पाहणं कमी झाल्याचं त्या सांगतात.

नेमका काय आहे उपक्रम?

आधी गट ग्रामपंचायतीचा भाग असणाऱ्या आडाचीवाडी गावात फारसा विकास झाला नव्हता. सगळ्या गावांना आणि वाड्यांना मिळून येणारा निधी वाटून खर्च होत होता. त्यामुळे गावात धड रस्तेही नसल्याचं ग्रामस्थ सांगतात.

यामुळेच ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायत होण्यासाठी प्रस्ताव दिला आणि त्याला मंजुरी सुद्धा मिळाली. यानंतर गावातल्या लोकांनी विकास कामांना सुरुवात केली.

रस्ते, पाणी अशा सुविधा करतानाच गावातल्या स्मशानभूमीचंही बांधकाम झालं. गावाच्या शेवटी स्मशानभूमी आणि त्याला लागून मुलांसाठी गावातल्या लोकांसाठी बाग विकसित झाली. स्मशानभूमीसाठी पायऱ्या बांधल्या गेल्या. वरती पत्रा, लाईट अशी सगळी सोय झाली.

इतकी चांगली स्मशानभूमी झाली आहे, तर त्याचा काही दुसरा वापर करता येईल का याचा विचार ग्रामस्थांकडून पुढे आला. त्यानंतर या अभ्यासिकेची संकल्पना पुढे आली.

आडाची वाडी ग्रामपंचायत

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

संकल्पना अगदी साधी- स्मशानभूमीसाठी ज्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत तिथे दररोज संध्याकाळी गावातली मुलं गोळा होऊन 2 तास अभ्यास करतील.

संध्याकाळी 5 वाजता शाळा सुट्ल्यानंतर मुलं घरी येतात. काही मुलं जवळच्या गावांमध्ये शाळेत जातात हे लक्षात घेऊन यासाठी संध्याकाळी 7 ते 9 अशी अभ्यासिकेची वेळ ठरवण्यात आली. मुलांना सवय होण्यासाठी बाहेर पडण्यासाठी भोंगा वाजवायला सुरुवात झाली.

आडाची वाडी इथे स्मशानात भरणाऱ्या अभ्यासिकेतले विद्यार्थी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, आडाची वाडी इथे स्मशानात भरणाऱ्या अभ्यासिकेतले विद्यार्थी

ग्रामस्थांच्या या विचाराबद्दल सांगताना आडाचीवाडी ग्रामपंचायत सदस्य लता पवार म्हणाल्या, "मुलांनी शांत ठिकाणी शिकावं असा विचार होता. स्मशानभूमीत शांतता असते. त्यामुळे तिथे मुलांचा अभ्यास घेऊन त्यांचं मन परिवर्तन करावं असा हेतू होता."

"आधी पालक मुलांना घेऊन गेले. त्यामुळे मुलांची स्मशानाबद्दलची भीती गेली. अंधश्रद्धा होती की स्मशानात भूतं असतात. पण आता त्यांना वैज्ञानिक पद्धतीने सांगितलं गेलं. त्यांच्याही लक्षात आलं की गेलेला माणूस परत येत नाही. त्यांना वास्तवाची जाणीव झाल्यामुळे मुलांची भीती गेली."

या मागचा मुलांच्या भविष्याचा विचार सांगताना ग्रामस्थ प्रशांत पवार म्हणाले, "ही लहान वाडी आहे. इथं थोड्या जमिनी आहेत. पिढ्या वाढल्या तरी जमीन तेवढीच राहणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचं साधन कमी होईल."

"पुढची पिढी शिकली त्यांनी चार पैसे कमावले तर त्यांना फायदा होईल. यासाठी ग्रामस्थांनी ठराव करून ही अभ्यासिका सुरू केली."

निवृत्त शिक्षकांची साथ

गावात काही निवृत्त शिक्षक होते. त्यांनी मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी उचलली. दररोज मुलं संध्याकाळी अभ्यासिकेत दाखल झाली की, त्यांनी काय आणि कसा अभ्यास करायचा याचं नियोजन हे शिक्षक करतात.

सुरुवातीचा एक तास मुलं शाळेत शिकवलेल्या विषयांची उजळणी किंवा गृहपाठ पूर्ण करतात. त्यानंतरचा एक तास हे शिक्षक मुलांचा अभ्यास घेतात.

आडाची वाडी इथे स्मशानात भरणाऱ्या अभ्यासिकेतले विद्यार्थी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, आडाची वाडी इथे स्मशानात भरणाऱ्या अभ्यासिकेतले विद्यार्थी

या अभ्यासिकेत पहिली ते बारावी पर्यंतची सगळीच मुलं एकत्र अभ्यास करतात. हे लक्षात घेऊन त्या टप्प्यांप्रमाणे अभ्यासाचं नियोजन केलं जातं. तसंच याच वेळात मुलांना असलेल्या शंकांचं निरसन देखील शिक्षक करतात. रोजच्या अभ्यासासाठी स्मशानभूमित फळा देखील लावण्यात आला आहे.

याविषयी बोलताना शिक्षक प्रकाश पवार म्हणाले, "मी आणि अनिल सर असे दोघं इथं अभ्यास घेतो. मुलांना अनेकदा काही शंका असतात. काहींचे पालक अशिक्षित आहेत तर काहीजण शेतामधून दमून येतात. अशावेळी मुलांच्या शंका सोडवणं त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे मुलांना अडचणी किंवा शंका असतात त्या ते आम्हाला विचारतात. हे एक माध्यम झालं आहे."

मुलं आणि पालक यांच्या भूमिका

यामुळे अभ्यासाची गोडी निर्माण झाल्यामुळे पालक खूष, तर अभ्यास पूर्ण होत असल्याने मुलंही खूष आहेत.

आपला अनुभव सांगताना गौरांगी पवार ही विद्यार्थीनी म्हणाली, "एक महिना झाला मी इथं अभ्यासाला येते. इथं खूप छान अभ्यास होतो. घरी टीव्हीचा आवाज असतो, आजोबा बातम्या लावतात. छोटा भाऊ मोबाईल घेतो. त्यामुळे अभ्यास होत नाही."

"आईचा पण स्वयंपाक चालू असतो. त्यामुळं गावातल्यांनी निर्णय घेतला की मुलांचा अभ्यास होत नाही म्हणून स्मशानात अभ्यास घेऊयात. इथं शांतता असते आणि भीती सुद्धा वाटत नाही."

आडाची वाडी इथे स्मशानात भरणाऱ्या अभ्यासिकेत चाललेल्या विद्यार्थिनी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, आडाची वाडी इथे स्मशानात भरणाऱ्या अभ्यासिकेत चाललेल्या विद्यार्थिनी

दिशा पवार ही विद्यार्थिनी सांगते," आम्ही कुठे बाहेरगावी गेलो आणि त्यांना सांगितलं की,आम्ही स्मशानात अभ्यास करतो तर त्यांना ते पटत नाही आश्चर्य वाटतं."

"ते म्हणतात स्मशानात अभ्यासाला जाता? आता 2-3 महिने झाले आम्ही सलग येत आहोत. इथं सर इंग्रजीचं व्याकरण शिकवतात. आम्ही आमचाही अभ्यास करतो."

आडाची वाडी इथे स्मशानात भरणाऱ्या अभ्यासिकेतले विद्यार्थी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, आडाची वाडी इथे स्मशानात भरणाऱ्या अभ्यासिकेतले विद्यार्थी

अर्थात; स्मशानात चालणाऱ्या या अभ्यासाबाबत मुलांच्या मनातली भीती गेली तरी पालकांच्या मनात अजूनही धाकधूक आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना रंजना पवार म्हणाल्या, " आधी सुद्धा भीती वाटली की मुलांना स्मशानात कसं पाठवायचं. आता सुद्धा वाटतंच."

"पण तरी आम्ही मनाला आवर घालतो. मुलांचं चांगलंच होत असेल, तर आपण कशाला मध्ये यायचं. आणि आपण घाबरलो तर मुलंही घाबरतील. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो तुम्ही जा."

ज्योती पवार म्हणाल्या," मुलांना मोबाईल आणि टीव्ही पहायची सवय होती. अभ्यासात नीट लक्ष नसायचं. पण आता भोंगा वाजला की 2 तास सलग अभ्यास करतात. मोबाईल पाहणंही कमी झालं."

गावात कोणाचा मृत्यू झाला तर ही अभ्यासिका बंद ठेवली जाते.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी स्मशानाबाबत अंधश्रद्धा दूर व्हाव्या म्हणून स्मशान सहली आयोजित केल्या होत्या. आता या मुलांच्या अभ्यासिकेच्या निमित्ताने एक यातच एक पाऊल पुढ़े टाकलं जात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी सजग पिढी घडवण्यासाठी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)