विष्ठेतून रक्त येतंय? शौचाच्या सवयींमध्ये बदल झालाय? आतड्याच्या कर्करोगाची महत्त्वाची चिन्हं लक्षात घ्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फिलिपा रॉक्बी
- Role, आरोग्य रिपोर्टर
- वाचन वेळ: 4 मिनिटे
डॉसन क्रीकमधील अभिनेते जेम्स वॅन डेर बीक यांचं आतड्याच्या कर्करोगानं (बॉवेल- उच्चार बाउअल् कॅन्सर) वयाच्या 48 व्या वर्षी निधन झालं आहे.
आतड्याच्या कर्करोगाची मुख्य लक्षणं आणि कारणं कोणती? हा आजार होण्याचा धोका तुम्ही कमी कसा करू शकता?
आतड्याच्या कर्करोगाची मुख्य लक्षणं कोणती?
यासंदर्भात 3 मुख्य गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
- तुमच्या शौच किंवा विष्ठेमध्ये कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय रक्त येणं - ते चमकदार किंवा गडद लाल असू शकतं.
- शौचास जाण्याच्या पॅटर्नमध्ये बदल - उदाहरणार्थ, जास्त वेळा शौचास जावं लागणं किंवा विष्ठा पातळ किंवा कडक होणं.
- तुमचं पोट भरलेलं किंवा घट्ट वाटतं, पोटाच्या खालच्या भागात दुखणं किंवा पोट फुगल्यासारखं जाणवणं

फोटो स्रोत, Getty Images
इतरही लक्षणंसुद्धा असू शकतात, उदाहरणार्थ -
- वजन कमी होणं
- शौचानंतरदेखील पोट व्यवस्थित रिकामं न झाल्यासारखं वाटणं
- नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणं किंवा चक्कर येणं
ही लक्षणं असली म्हणजे तो आतड्यांचा कर्करोगच असेलच असं नाही.
मात्र एनएचएसची शिफारस आहे की जर ही लक्षणं तुम्हाला 3 आठवडे किंवा त्याहून अधिक काळ दिसली आणि जर तब्येत चांगली वाटत नसेल, किंवा आरोग्याची समस्या वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या.
कधीकधी आतड्यांच्या कर्करोगामुळे आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, विष्ठा सामान्यपणे पुढे सरकत नाही.
यामुळे प्रचंड पोटदुखी जाणवते, बद्धकोष्ठता होते आणि आजारी असल्यासारखं वाटतं. अशा परिस्थितीत, तुम्ही लगेचच डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं.
आपली विष्ठा किंवा मल कसा तपासावा?
शौचालयात, शौच करत असताना मलातून किंवा विष्ठेतून रक्त येत आहे का किवा रक्तस्त्राव होतो आहे का हे पाहावं.
गुदद्वाराच्या म्हणजे शौचाच्या ठिकाणच्या सुजलेल्या रक्तवाहिन्यांमधून (मूळव्याध) चमकदार किंवा गडद लाल रक्त येऊ शकतं. हे मूळव्याधामुळे होऊ शकतं, मात्र तसंच ते आतड्याच्या कर्करोगामुळे देखील होऊ शकतं.
तुमच्या शौचाला जाण्याच्या सवयींमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसू शकतो. उदाहरणार्थ, शौचास पातळ होणं, सामान्यपेक्षा जास्त वेळा शौचास जाणं किंवा शौचास जाऊन आल्यानंतरही पोट साफ न झाल्यासारखं वाटणं.

फोटो स्रोत, Getty Images
बॉवेल कॅन्सर युके शिफारस करतं की तुमच्या लक्षणांची नोंद ठेवा, म्हणजे त्यासंदर्भात तुम्हाला डॉक्टरांशी चर्चा करता येईल.
डॉक्टर आतड्यांशी निगडीत विविध समस्या असलेल्या अनेक रुग्णांना तपासत असतात. त्यामुळे त्याबाबत संकोच किंवा लज्जा वाटून घेऊ नये.
आतड्याचा कर्करोग कशामुळे होतो?
आतड्याचा कर्करोग नेमका कशामुळे होतो, यामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र काही गोष्टींमुळे तो होण्याची अधिक शक्यता असू शकते :
- तुम्ही जितके प्रौढ असाल किंवा तुमचं वय जितकं अधिक असेल तितका तुम्हाला कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते - आतड्याचा कर्करोग झालेले बहुतांश रुग्ण वयानं 50 वर्षांपेक्षा अधिक असतात. अर्थात तरुणांमध्येही हा आजार होण्याचं प्रमाण वाढत आहे.
- सॉसेज, बेकन, सलामी यासारखे भरपूर लाल मांस आणि प्रक्रिया केलेलं मांस यांचा आहारात समावेश असणं
- तुमच्या आतड्यामध्ये पॉलिप्स असल्याची पार्श्वभूमी असणं. जे ट्युमर किंवा गाठीच्या स्वरुपात वाढू शकतात.
- धूम्रपान (सिगारेट ओढणं) केल्यामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो
- जास्त प्रमाणात मद्यपान करणं
- जास्त वजन असणं किंवा लठ्ठपणा असणं

फोटो स्रोत, Getty Images
बहुतांश रुग्णांच्या बाबतीत, आतड्याचा कर्करोग अनुवांशिक स्वरुपाचा नसतो. मात्र जर तुमच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाला 50 वर्षे वयाच्या आधीच त्याचं निदान झालं तर तुम्ही याची माहिती डॉक्टरांना द्यावी.
लिंच सिंड्रोमसारख्या काही अनुवांशिक आजारांमुळे तुम्हाला आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका खूप जास्त असतो. मात्र डॉक्टर रुग्णांसोबत काम करून याबाबतीतील अतिरिक्त धोका कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात.
तसंच अशा लोकांच्या बाबतीत या आजाराचं निदान सुरुवातीच्याच टप्प्यात होईल याची खबरदारी घेऊ शकतात. त्या टप्प्यात त्यावर उपचार करणं सोपं असतं.
आतड्याच्या कर्करोगाचा धोका कशाप्रकारे कमी करता येऊ शकतो?
जर लोकांनी निरोगी जीवनशैलीचं पालन केलं, तर अर्ध्याहून अधिक आतड्याच्या कर्करोगाचे रुग्ण कदाचित टाळता येतील, असं वैज्ञानिक म्हणतात.
- अधिक व्यायाम करणं
- अधिक फायबरयुक्त आणि कमी चरबीयुक्त आहार घेणं
- दिवसातून 6 ते 8 ग्लास द्रवपदार्थाचं सेवन करणं
कोणतीही चिंताजनक लक्षणं आढळल्यास डॉक्टरांकडे जावं आणि त्यांच्या सल्ल्यानं कर्करोगाची तपासणी करून घ्यावी.
आतड्याच्या कर्करोगावर कशाप्रकारे उपचार केले जातात?
या आजारासंदर्भात आता अधिक वैयक्तिक स्वरुपाचे म्हणजे रुग्णाच्या आवश्यकतेनुसार उपचार केले जात आहेत. अनुवांशिक चाचणीतील प्रगतीमुळे ते शक्य होत आहे. कारण प्रत्येक व्यक्ती त्याच्या कर्करोगाला कशाप्रकारे हाताळतो, त्यानुसार काळजी घेतली जाऊ शकतो.
या पद्धतीत आणखी सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. मात्र त्याचा अर्थ ज्यांना कर्करोग झाला आहे त्यांना आणखी काही अतिरिक्त वर्षे आयुष्य मिळू शकतं.
कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला कर्करोग झाल्याचं निदान जरी झालं, तरीदेखील उपलब्ध उपचारांबद्दल तुम्हाला डॉक्टरांकडून सांगितलं जातं.
हा उपचार कदाचित शस्त्रक्रिया असेल किंवा केमोथेरेपी आणि रेडिओथेरेपी हे दोन्ही एकत्रित उपचार असू शकतात. तुम्हाला असलेल्या कर्करोगावर ते अवलंबून असेल.
आतड्याचा कर्करोग पूर्ण बरा होऊ शकतो का?
आतड्याचा कर्करोग बरा होऊ शकतो. विशेषकरून जर त्याचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात झालं तर.
स्टेज 1 कर्करोग - आजार छोट्या स्वरुपात, मात्र तो पसरलेला नसतो.
स्टेज 2 कर्करोग - मोठ्या स्वरुपात, पण अजूनही तो पसरलेला नसतो.
स्टेज 3 कर्करोग - लिम्फ नोड्ससारख्या आसपासच्या काही ऊतींमध्ये तो पसरलेला असतो.
स्टेज 4 कर्करोग - आजार शरीरातील दुसऱ्या अवयवात पसरलेला असतो, यामुळे दुय्यम स्वरुपाचा ट्युमर तयार होतो
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात, उपचारात, औषधांमध्ये बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











