पोलीस भरतीदरम्यान तिघांचा मृत्यू, तरुणांनी धावण्याअगोदर काय काळजी घ्यावी?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

घटना क्र.1- बीज जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी दीपक वाव्हळ या तरुणाचा मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू झाला. दीपक 26 वर्षांचा होता. कडक ऊन आणि उकाड्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी वर्तवण्यात आला.

घटना क्र.2- छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीची 1600 मीटरची फिजिकल टेस्ट सुरू होती. यादरम्यान सांगली जिल्ह्याचा संग्राम शिंदे हा 23 हा तरुण अचानक जमिनीवर कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

घटना क्र.3- बुलढाण्याचा अक्षय मुंबईत पोलिसात भरती व्हायचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईला पोहचला. मैदानी चाचणीत त्याने 1600 मीटरचं अंतर पूर्ण केलं. पण त्यानंतर काही वेळातच अक्षयला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. यात त्याचा मृत्यू झाला

सध्या राज्यभरात सगळीकडे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यानची मैदानी चाचणी सुरू आहे. या चाचणीदरम्यान आतापर्यंत 3 तरुणांना जीव गमवावा लागलाय.

मैदानी चाचणी देण्यासाठी गेलेल्या तरुणांचे अनुभव काय आहेत? तरुणांनी या चाचणीदरम्यान काय काळजी घ्यायला हवी? पोलीस भरती प्रक्रियेदरम्यानचे हे मृत्यू थांबवता येतील का? समजून घेऊया.

तरुणांचे अनुभव काय?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावातील 23 वर्षांच्या तरुणानं यंदा पहिल्यांदाच पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला होता. 11 फेब्रुवारी रोजी अलिबागला त्याची मैदानी चाचणी पार पडली.

बीबीसी मराठीशी बोलताना तो म्हणाला, "11 फेब्रुवारीला अलिबागला माझं ग्राऊंड होतं. आदल्या दिवशी रात्री आम्ही अलिबागला पोहचलो.

तिथं राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे कॉटेज घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता आमचा रिपोर्टिंग टाईम होता. आम्ही 4 वाजताच पोहचलो.

लाईनमध्ये 500-600 जण उभे होते. आमच्याकडील आधार कार्ड, हॉल तिकीट चेक केले. त्यानंतर त्यांनी आम्हाला 8 वाजता आतमध्ये सोडलं. 20-20 जणांच्या ग्रुपने आतमध्ये सोडलं.

पोलीस भरती, प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

"छाती, कंबर, उंची अशी एक एक गोष्ट तपासण्यात एक-एक तास गेला. दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या दरम्यान आमची 1600 मीटर रनिंग झाली.

उन्हातच धावावं लागलं. सकाळी काही केळी खाल्ली होती आणि एक पाणी बॉटल सोबत होती. दुपारपर्यंत त्यावरच होतो."

छत्रपती संभाजीनगरहून अलिबागला प्रवासाचा आणि तिथं मुक्कामाचा असा धरुन अडीच ते तीन हजार रुपये खर्च आल्याचं हा तरुण सांगतो.

त्याचे आई-वडील शेती करतात.

मैदानी चाचणीला उशीर का होतो?

पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान तरुणांसाठी मैदानी चाचणीदरम्यान 1600 मीटर आणि 100 मीटर धावण्याची स्पर्धा घेतली जाते.

1600 मीटर अंतर 5 मिनिटे 10 सेकंदात, तर 100 मीटर अंतर 11:50 सेकंदात पूर्ण करणं अपेक्षित असतं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

पवन राजपूत हा तरुण गेल्या 4 वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत आहे.

तो सांगतो, "यंदा रायगड आणि हिंगोलीमध्ये मैदानी चाचणी दिली. हिंगोलीमध्ये सोयीसुविधा चांगल्या होत्या. प्रशासनानं मुलांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली होती. सकाळी 5 वाजता ग्राऊंडसाठी बोलावलं होतं, ते संपवून आम्ही सगळे साडेदहापर्यंत बाहेर पडलो.

"काही ठिकाणी कागदपत्रं पडताळणी करताना जास्त वेळ लागतो आणि मग मैदानी चाचणीला उशीर होतो, तर काही ठिकाणी जास्त मुलं बोलावलेले असले की मैदानी चाचणीला उशीर होतो,"असं तो पुढे सांगतो.

तरुणांनी काय काळजी घ्यावी?

ग्रामीण भागात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश तरुणांचा कल पोलीस भरतीकडे असतो. पोलीस भरतीच्या तयारीसाठी तालुका पातळीवर जागोजागी अकॅडमी सुरू झालेल्या दिसून येतात.

सकाळी वर्क आऊट, दिवसभर अभ्यास आणि संध्याकाळी पुन्हा मैदानावर सराव, असा पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांचा दिनक्रम असतो. पोलीस भरतीसाठी हे तरुण जीवतोड तयारी करतात.

पण, भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यूसारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी?

डॉ. उमेश खेडकर हे हृदयरोगतज्ज्ञ आहेत. अतिपरिश्रमामुळे हृदयावर ताण पडून अशाप्रकारे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असं ते सांगतात.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उमेश खेडकर

फोटो स्रोत, Dr Umesh Khedkar

फोटो कॅप्शन, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उमेश खेडकर

मैदानी चाचणीदरम्यान तरुणांनी काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी डॉ. खेडकर सांगतात, "धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याआधी उमेदवारांनी काही प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं आहे. जसं की हेमोग्लोबिन लेव्हल, ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके आणि ईसीजी इत्यादी.

"उन्हामध्ये बराच वेळ उभा राहिल्यामुळे किंवा धावल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका असतो. त्याचप्रमाणे शरिरातील इलेक्ट्रॉईटची पातळी देखील खालावते. या सर्व गोष्टींचा हृदयावर विपरित परिणाम होऊन बीपी कमी होणे किंवा हृदयविकाराचा झटका येणे, याचा धोका वाढतो."

डॉ. खेडकर पुढे सांगतात, "ज्या दिवशी धावण्याची स्पर्धा असते, त्या दिवशी शरिरातील पाण्याची पातळी म्हणजेच हायड्रेशन नॉर्मल ठेवणे गरजेचे असते.

स्पर्धेत सहभागी व्हायच्या दिवशी सकाळी तरुण हलकासा नाश्ता करू शकतात. सोबत एक ओआरएस किंवा ग्लुकोज ड्रिंक सोबत ठेवून आवश्यक तेव्हा त्याचे सेवन करू शकतात."

मैदानी चाचणी सकाळीच घेणे हा उपाय?

पोलीस भरतीसाठी काही हजार रिक्त जागा असतात, तर त्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या काही लाखोंमध्ये असते.

अशास्थितीत, मैदानी चाचणी सकाळी घेतल्यास तरुणांना फायदा होऊ शकतो.

"सकाळी 5 ते 10 आणि उर्वरित तरुणांची चाचणी दुपारी 4 ते 7.30 अशा काळात घेतल्यास तरुणांना त्याचा फायदा होऊ शकतो," असं पवन सांगतो.

पोलीस भरतीप्रक्रियेदरम्यान झालेले तरुणांचे मृत्यू हे भरतीप्रक्रियेदरम्यानच्या सरकारी गैरव्यवस्थापनाचे बळी आहेत, असं म्हणता येणार नाही, असं मत माजी आयपीएस अधिकारी शिरीष इनामदार मांडतात.

पण, सकाळच्या लवकरच्या तासातच धावण्याची शर्यत व्हायला पाहिजे, असं ते पुढे म्हणाले.

पोलीस भरतीसाठी आलेले तरुण (संग्रहित)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोलीस भरतीसाठी आलेले तरुण (संग्रहित)

शिरीष इनामदार सांगतात, "पोलीस भरतीसाठी एकूण इच्छुकांची संख्या पाहता रांग लागणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे उमेदवारांनी स्वत:हून खाण्या-पिण्यासंबंधित काळजी घेतली पाहिजे.

मूळात पोलीस भरतीसाठी येणारी मुलं ज्या वर्गातून येतात, त्यांची भरतीआधी संपूर्ण आरोग्य तपासणी होते का? तर नाही. ही तपासणी झाली आणि त्यांना हृदयाशी संबंधित किंवा इतर काही आजार असेल तर त्याचे आधीच निदान होऊ शकते आणि त्यावर उपाय होऊ शकतो.

"पण, ही आरोग्य तपासणी या लोकांच्या आर्थिक आवाक्यात आहे का? हा खरा प्रश्न आहे. ही तपासणी होत नाही म्हणून त्यांना दुपारी उन्हात पळवणं योग्य आहे का? हाही प्रश्न आहे.

त्यामुळे सकाळच्या लवकरच्या तासातच ही धावण्याची शर्यत व्हायला पाहिजे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)