1971 नंतर 15 वर्षांनी पुन्हा निर्माण झालेली भारत-पाक युद्धाची शक्यता, कसं टळलं हे युद्ध?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
- वाचन वेळ: 10 मिनिटे
ते 1986 सालच्या हिवाळ्यातील दिवस होते. भारताचे हजारो सैनिक पाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या पश्चिम सीमेकडे जात होते.
राजस्थानकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर लष्करी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. रेल्वेच्या डब्यांमधून शस्त्र, रणगाडे आणि वाहनं सीमेजवळ नेण्यात येत होते.
ऑपरेशन ब्रासटॅक्सची सुरुवात झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर इतक्या मोठ्या प्रमाणातील लष्करी सराव पाहण्यात आला नव्हता.
प्रोबल दासगुप्ता यांचं 'जनरल ब्रासटॅक्स, द सुंदरजी स्टोरी' हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं.
या पुस्तकात दासगुप्ता म्हणतात, "त्यावेळेस पाकिस्तानदेखील दोन प्रकारचे लष्करी सराव करत होता. 'सफ-शिकन' आणि 'फ्लाईंग हॉर्स' हे ते दोन सराव होते. 'सफ शिकन'मध्ये पाकिस्तानच्या सैन्यातील दक्षिण भागातील राखीव सैनिक सहभागी झालेले होते. हा सराव राजस्थानच्या सीमेवर असणाऱ्या बहावलपूर-मारोट भागात केंद्रित होता. तर 'फ्लाईंग हॉर्स' या लष्करी सरावात पाकिस्तानच्या उत्तर भागातील राखीव सैनिक सहभागी झालेले होते."
"पाकिस्तानचे सैनिक भारतीय सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. इतक्या मोठ्या संख्येनं भारतीय सैनिक सीमेजवळ आल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले होते."
सुंदरजी यांनी तयार केली होती योजना
ऑपरेशन ब्रासटॅक्सची संकल्पना त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल सुंदरजी यांची होती. सुंदरजींवर अमेरिकेच्या सैन्याच्या एफएम 100-5 म्हणजे हवाई आणि जमिनीवरील युद्धाच्या संकल्पनेचा प्रभाव होता.
त्यांनी हीच संकल्पना लक्षात घेऊन मेकनाईज्ड इंफंट्री रेजिमेंट तयार केली होती. त्यांनी लष्कराच्या काही इंफंट्री डिव्हिजनचं रुपांतर रीऑर्गनाईज्ड आर्मी प्लेंस इंफंट्री डिव्हिजन (रॅपिड) मध्ये केलं होतं.
सुंदरजी यांची इच्छा होती की भारताच्या या लष्करी सरावाचं स्वरुप, 'ऑटम फोर्स' या नाटोच्या लष्करी सरावापेक्षा मोठं असावं. युरोपात झालेल्या या लष्करी सरावात नाटोच्या जवळपास साडे बारा हजार सैनिकांनी भाग घेतला होता. सुंदरजी यांना याच्या चार पट सैनिकांचा सहभाग असलेला लष्करी सराव घ्यायचा होता.

फोटो स्रोत, Penguin
लष्करी इतिहासकार एअर व्हाईस मार्शल अर्जुन सुब्रमणियम यांनी 'इंडियाज वॉर्स 2 (1972- 2020)' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलं आहे, "सुंदरजी यांनी मोठ्या प्रमाणात वायुदल-भूदल सरावाची योजना तयार केली होती. हा सराव तीन टप्प्यांमध्ये केला जाणार होता. त्याचा शेवट राजस्थान सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य जमवून केला जाणार होता."
"या लष्करी सरावात लष्कराच्या 1 आणि 2 चा कोअरचा समावेश करण्यात आला होता. त्याचा केंद्रबिंदू राजस्थान आणि गुजरात सेक्टर होता. रात्रीच्या अंधारात किरकोळ प्रतिकारादरम्यान भारतीय सैन्य कितपत आणि किती वेगानं पुढे सरकू शकतं, हे जाणून घेणं हा या सरावाचा मुख्य उद्देश होता."
टी-72 रणगाड्यांची यशस्वी चाचणी
लेफ्टनंट जनरल प्रवीण बक्षी त्यावेळेस 'स्किनर हॉर्स' या टी-72 रणगाड्यांच्या रेजिमेंटमध्ये मेजर होते.
त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "आमच्या रणगाड्यांनी रात्रीतून 60 किलोमीटरचं अंतर सहजपणे पार केलं. दिवसा रस्त्यांवरून रणगाड्यांनी 800 किलोमीटर अंतर कापलं. टी-72 रणगाड्यांच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून देखील त्यांना कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागलं नाही."
"त्यामध्ये फक्त नाईट व्हिजन उपकरणांची उणीव भासली. आम्ही रणगाड्यांमध्ये खरी शस्त्र घेतली नव्हती. त्यामुळे युद्ध करण्याचा तर प्रश्नच नव्हता. याचा उद्देश फक्त शत्रूला हे दाखवण्याचा होता की आम्ही भविष्यातील संभाव्य युद्धासाठी किती सज्ज आहोत."

फोटो स्रोत, Penguin
"भारताच्या या पावलामुळे पाकिस्तान आणि अमेरिकेत धोक्याची घंटा वाजली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करानं प्रत्युत्तरादाखल पंजाब आणि जम्मूच्या सीमेवरील त्यांच्या सैनिकांची तैनात वाढवली होती."
भारताच्या गुप्तहेर सूत्रांपर्यंत बातम्या येऊ लागल्या होत्या की पाकिस्तानच्या दक्षिण भागातील राखीव सैनिक बहावलपूरमध्ये त्यांचा लष्करी सराव झाल्यानंतर त्यांच्या बराकींमध्ये परतले नव्हते. ते युद्धासाठी सज्ज राहिले होते.
लढाऊ विमानांनी ओलांडली सीमा
भारतीय लष्करानं 1986 मध्ये केलेल्या या लष्करी सरावात भारतीय वायुदलाच्या एकमेव इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर स्क्वाड्रन 35 नं देखील भाग घेतला होता. यात कॅनबेरा आणि मिग-21 लढाऊ विमानांचा समावेश होता. त्यांच्यामध्ये थोडा बदल करून त्यांना स्वीडनमध्ये निर्मिती झालेल्या ईडब्ल्यू पॉड्स घेऊन जाण्यास सक्षम करण्यात आलं होतं.
या सरावादरम्यान 1986 च्या सुरुवातीला संपूर्ण स्क्वाड्रन हरियाणातील अंबाला आणि राजस्थानात बीकानेरजवळ नाल इथं नेण्यात आलं होतं. ऑपरेशन ब्रासटॅक्सदरम्यान या विमानांनी दोन महिने जॅग्वार आणि मिग-27 विमानांच्या मोहिमांना एस्कॉर्ट केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
एअर व्हाईस मार्शल अर्जुन सुब्रमणियम यांनी लिहिलं आहे, "अनेकवेळा, या विमानांनी मुद्दाम पाकिस्तानच्या एअर डिफेन्सच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी सीमादेखील ओलांडली होती. रडार वॉर्निंग रिसीव्हर्सवर बीपचा आवाज ऐकू येताच किंवा रेडिओवर इशारा ऐकू येताच ही विमानं पुन्हा भारतीय सीमेकडे वळत असत."
"उंदीर आणि मांजराचा हा खेळ जवळपास दोन महिने चालला. जॅग्वार लढाऊ विमानांच्या याप्रकारच्या अनेक मोहिमांचं नेतृत्व फ्लाईट लेफ्टनंट आर के भदोरिया यांनी केलं होतं. नंतर ते भारतीय वायुदलाचे प्रमुख झाले. त्या काळी ते 'छोटू' या नावानं प्रसिद्ध होते."
"अशाप्रकारच्या मोहिमांमध्ये सहभागी होणारे ते सर्वात तरुण अधिकारी होते. पाकिस्तानला संशय वाटत होता की भारत त्यांच्यावर हल्ला करणार आहे."

फोटो स्रोत, Harper Collins
कांती वाजपेयी यांनी 'ब्रासटॅक्स अँड बियॉन्ड' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलं आहे, "1983-84 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन उप-लष्करप्रमुख जनरल के एम आरिफ आणि भारताचे लष्करप्रमुख जनरल वैद्य यांच्यात संगमनत झालं होता की भारत किंवा पाकिस्तान जर सीमेजवळ कोणताही मोठा लष्करी सराव करणार असतील तर ते एकमेकांना याची माहिती देतील."
"जनरल सुंदरजी यांना या संगनमताबद्दल कोणतीही माहिती नव्हती. यादरम्यान दोन्ही देशांच्या मिलिटरी ऑपरेशनच्या संचालकांमध्ये नेहमी सुरू राहणारी हॉट लाईन बंद झाली होती. दोन्ही बाजूनं अनेक प्रश्न उपस्थित केले जाते होते. या प्रश्नांचं निराकारण करणारं कोणीही नव्हतं."
प्रोबल दासगुप्ता यांनी लिहिलं आहे, "भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्र्यांना नेण्यासाठी विमान पाठवलं होतं. त्यावेळेस पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झिया यांना वाटलं होतं की पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. कारण त्यावेळेस भारताचे सैनिक पाकिस्तानच्या सीमेवर आधीपासूनच तैनात होते."
पाकिस्ताननंदेखील सीमेवर पाठवले सैनिक
पाकिस्ताननं देखील याला प्रत्युत्तर देत त्यांच्या सैनिकांना भारतातील पंजाबच्या सीमेच्या दिशेनं पाठवलं. काही दिवसांतच दोन्ही बाजूला युद्धाची तयारी केली जात असल्याचं दिसू लागलं.
शुजा नवाज यांनी 'क्रॉस्ड सोर्ड्स, पाकिस्तान इट्स आर्मी अँड द वॉर विदिन' हे पुस्तक लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात त्यांनी लिहिलं आहे, "रावळपिंडीत असणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयात असा विचार केला जात होता की ब्रासटॅक्सद्वारे भारत, पाकिस्तानच्या उत्तरेला बहावलपूर आणि दक्षिणेला खैरपूर या शहरांना वेगळं पाडण्याची योजना तयार करतो आहे."
"भारत पाकिस्तानातील सिंध प्रांतात शिरून पाकिस्तानची दोन भागात विभागणी करण्याची आणि कहूटामधील त्यांच्या अणुभट्टीला नष्ट करण्यावर त्यांचा भर आहे अशी भीती देखील त्यांना वाटत होती."
सरावासाठी बनवण्यात आल्या रेड आणि ब्ल्यू टीम
या लष्करी सरावासाठी लष्करी प्रशिक्षणासाठीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रॉड्रिग्स आणि त्यांच्या टीमला अंपायर करण्यात आलं होतं.
प्रोबल दासगुप्ता यांनी लिहिलं आहे, "रेड आणि ब्ल्यू नावाच्या दोन फौजा म्हणजे टीम बनवण्यात आल्या होत्या. रेड टीम पाकिस्तानी सैन्याच्या भूमिकेत होती. महूच्या आर्मी कॉलेज ऑफ कॉम्बॅटचे कमांडंट लेफ्टनंट जनरल व्ही एन शर्मा यांना त्याचं कमांडर करण्यात आलं होतं."
"रेड आर्मीनं अण्वस्त्रांच्या पर्यायाचा वापर करण्याची परवानगी मागितली होती. मात्र अंपायरनं ती नाकारली होती. या सरावात भारताचे एकूण 4 लाख सैनिक, अनेक विमानं आणि जहाज सहभागी झाले होते."

फोटो स्रोत, Getty Images
भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या 1971 च्या युद्धानंतर 15 वर्षांनी पहिल्यांदाच दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांच्या इतके जवळ आले होते. संपूर्ण जगभरात तणाव आणि भीतीचं वातावरण होतं.
पाश्चात्य विश्लेषकांना वाटत होतं की भारताच्या या पावलाला प्रत्युत्तर देण्यासाठी सुंदरजी पाकिस्तानला चिथावणी देत आहेत. जेणेकेरून पाकिस्ताननं प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमुळे भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याचं निमित्त मिळेल.
रेल्वे आणि रस्ते विभागाची भूमिका
सुंदरजी यांनी ब्रासटॅक्सची योजना तयार केली, तेव्हा या लष्करी सरावात रेल्वे आणि रस्त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळे या सेवा जवळपास ठप्प होतील अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती. कारण सैनिकांना त्यांच्या इप्सित स्थळी पोहोचवण्यासाठी या सेवांचं जाळं डायवर्ट करावं लागणार होतं.
कांति वाजपेयी यांनी लिहिलं आहे, "रेल्वे मंत्री माधवराव सिंधिया आणि रस्ते वाहतूक मंत्री जगदीश टायटलर यांनी या मुद्द्यावरून विरोध केला होता की लष्करी साहित्य आणि सैनिक पोहोचवण्यासाठी त्यांच्या मंत्रालयाला मोठा महसूली तोटा सहन करावा लागेल."
"त्यांचा विरोध लक्षात घेऊन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सैनिकांच्या जमवाजमवीचं प्रमाण थोडं कमी केलं होतं. मात्र ब्रासटॅक्सच्या लष्करी आणि राजकीय उद्दिष्टांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही."

फोटो स्रोत, Getty Images
या लष्करी सरावावर लक्ष ठेवण्यासाठी जनरल सुंदरजी, संरक्षण राज्यमंत्री अरुण सिंह यांच्यासह बीकानेरजवळ सरदारशहरमध्ये अनेक आठवडे राहिले होते. लेफ्टनंट जनरल फिलिप कम्पोज त्यावेळेस तिथे मेजरच्या पदावर तैनात होते.
कम्पोज सांगतात, "एक दिवस सुंदरजी एका भूमिगत ऑपरेशन रूममध्ये न कळवताच आले. मी जवळपास 30 मिनिटं लष्करप्रमुखांना ऑपरेशनबद्दल माहिती दिली. अचानक त्यांनी त्यांचं डोक हलवलं आणि ते बाहेर उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी खोलीतून बाहेर पडले."
"मी केलेलं ब्रीफिंग लष्करप्रमुखांना आवडलं की नाही, हे माझ्या लक्षात आलं नाही. ते जेव्हा हेलिकॉप्टरमध्ये चढत होते, त्यावेळेस त्यांनी मेजर जनरल हरवंत सिंग यांना विचारलं की मी तुझ्या मेजरला ब्रीफिंगसाठी शाबासकी दिली का?"

फोटो स्रोत, Getty Images
"त्यावर हरवंत सिंग यांनी उत्तर दिलं, 'नाही सर', सुंदरजी म्हणाले, 'मी त्या तरुण अधिकाऱ्याची पाठ थोपटल्याशिवाय जाणं योग्य ठरणार नाही.' ऑपरेशन रूममध्ये मी आणि माझे सहकारी ब्रीफिंगबद्दल बोलत होतो."
"मी माझ्या सहकाऱ्यांना विचारत होतो की, 'माझी ब्रीफिंग चांगली झाली का?' त्याचवेळेस मागून आवाज आला, 'अगदी व्यवस्थित.' माझ्या मागचा दरवाजा उघडला आणि सर्वांनी जनरल सुंदरजी यांना पाहिलं. ते हेलिकॉप्टरमधून मुद्दाम ऑपरेशन रूममध्ये आले होते आणि त्यांनी आम्हाला सर्वांना 'शाब्बास' म्हटलं."
जनरल सुंदरजी आणि जनरल हून यांच्यातील मतभेद
त्यावेळेस पश्चिम विभागाचे (वेस्टर्न कमांड) प्रमुख आणि ऑपरेशन ब्रासटॅक्सचा प्रमुख भाग राहिलेले लेफ्टनंट जनरल पी एन हून यांना वाटतं की ब्रासटॅक्सचा उद्देश पाकिस्तानच्या विरोधात युद्ध करण्याचा होता.
सुंदरजी यांचे टीकाकार राहिलेल्या हून यांनी 'अनमास्किंग सीक्रेट्स ऑफ टर्ब्युलन्स' हे पुस्तक लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात हून यांनी लिहिलं आहे, "देशातील वाहतूक व्यवस्थेला ज्याप्रकारे गतिमान करण्यात आलं होतं, तसं फक्त युद्धाच्या तयारीच्या वेळेसच होतं. मी जेव्हा सुंदरजी यांना विचारलं की पंतप्रधान आणि भारत सरकारला लष्करी सरावाचे तपशील आणि प्रगतीबद्दल माहिती देण्यात आली आहे का?"
"त्यावर त्यांनी थोडंसं रागावून नाराजीनं उत्तर दिलं होतं, सरकार किंवा पंतप्रधानांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे की नाही, याबद्दल तुम्ही मला विचारावं, हे पश्चिम कंमांडचे कमांडर म्हणून तुमचं काम नाही. ते माझं काम आहे. यासंदर्भात जे आवश्यक होतं, ते करण्यात आलं आहे."
पंतप्रधान राजीव गांधींना विश्वासात घेण्यात आलं नाही
हून यांनी त्यांच्या पुस्तकात दावा केला आहे की या लष्करी सरावाचं रूपांतर युद्धासारख्या स्थितीत झालं असल्याची माहिती पंतप्रधानांना नव्हती, हे त्यांना माहीत झालं होतं.
हून यांनी लिहिलं आहे, "मी 15 जानेवारीला सैन्य दिवसाच्या परेडमध्ये दिल्लीत उपस्थित होतो. त्यावेळेस राजीव गांधी यांनी माझ्याजवळ येऊन विचारलं, पश्चिम कमांडचं काम कसं सुरू आहे? त्यावर मी उत्तर दिलं होतं, सर्वकाही योजनेनुसार सुरू आहे आणि सैनिक 'बॅटल लोकेशन'च्या दिशेनं पुढे जात आहेत."
"त्यावर राजीव गांधींनी मला विचारलं, 'बॅटल लोकेशन'चा काय अर्थ आहे? आपण युद्धासाठी कसं काय जाऊ शकतो? मला वाटतं की कुठेतरी काहीतरी गडबड झाली होती. पंतप्रधानांना या लष्करी सरावाबद्दल पूर्ण माहिती नव्हती."

फोटो स्रोत, Getty Images
"मी जेव्हा वाळवंटात पोहोचलो, तेव्हा मला काळजीत असलेल्या डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन, लेफ्टनंट जनरल रवी महाजन यांचा फोन आला. ते मला म्हणाले की सुंदरजी, दिल्लीत मला लगेचच भेटू इच्छितात."
"मी जेव्हा दिल्लीत गेलो, तेव्हा सुंदरजी मला म्हणाले की सरावाची दिशा पूर्वेकडून पश्चिमेऐवजी उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेनं करण्यात यावी. त्यानंतर सैनिकांना बीकानेरला परत बोलावण्यात आलं होतं."
कांति वाजपेयी लिहितात, "ऑपरेशन ब्रासटॅक्सला प्रत्युत्तर म्हणून जेव्हा पाकिस्ताननं त्यांचा लष्करी सराव सुरूच ठेवला, तेव्हा लष्कर प्रमुख आणि संरक्षण राज्य मंत्र्यांनी संयुक्तपणे ठरवलं की राजीव गांधींना याची माहिती देण्यात येऊ नये."
"त्यामागचं कारण होतं की राजीव गांधी अंदमानला सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते. जर पंतप्रधानांना याबद्दल माहिती देण्यात आली असती, तर ते त्यांच्या सुट्ट्या मध्येच सोडून दिल्लीत परतले असते आणि विनाकारण परिस्थिती आणखी बिघडली असती. पंतप्रधानांना याबद्दल न सांगणं कदाचित चुकीचा निर्णय होता."
अरुण सिंह यांना मोजावी लागली किंमत
त्यावळेस राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात असलेले नटवर सिंह यांनी 'वन लाईफ इज नॉट इनफ' हे आत्मचरित्र लिहिलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलं आहे, "एकदा एका बैठकीत पंतप्रधान, मी, परराष्ट्र मंत्री नारायण दत्त तिवारी, एम एल फोतेदार आणि लेफ्टनंट जनरल हजारी उपस्थित होते. बैठकीनंतर राजीव गांधींनी तिवारी आणि मला थांबण्याचा इशारा केला."
"मग तिवारींकडे वळत राजीव गांधी म्हणाले, 'मी आपल्या संरक्षण राज्यमंत्र्यांचं काय करू?' परराष्ट्र मंत्र्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि गप्प राहिले."

फोटो स्रोत, Getty Images
"मग राजीव गांधी माझ्याकडे वळले. मी म्हणालो, तुम्ही मंत्र्यांना काढून टाकलं पाहिजे. त्यावर राजीव गांधींचं उत्तर होतं, 'अरुण सिंह मित्र आहेत.' त्यावर मी थोड्या कठोरपणे म्हणालो, 'सर, तुम्ही दून स्कूलच्या ओल्ड बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष नाही. तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात. पंतप्रधानांचा कोणीही मित्र नसतो'."
"काही दिवसांनी अरुण सिंह यांची अर्थ मंत्रालयात बदली करण्यात आली. थोड्या दिवसांनी राजीव गांधींनी त्यांचा फक्त मंत्रीपदाचा राजीनामाच घेतला नाही तर त्याचबरोबर त्यांना राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास देखील सांगितलं."

फोटो स्रोत, Bharatrakshak.com
दोन्ही देश सीमेवरील सैनिक मागे घेण्यास झाले तयार
दुसऱ्या बाजूला, पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भारताचे उच्चायुक्त एस के सिंह यांच्या घरातील फोन वाजला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना परराष्ट्र राज्यमंत्री जैन नूरानी यांना भेटण्यासाठी बोलावलं होतं.
या बैठकीत नूरानी यांनी एस के सिंह यांना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झिया यांचा संदेश दिला. तो म्हणजे, जर पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन करण्यात आलं, तर त्यांच्यात भारताचं नुकसान करण्याची क्षमता आहे.
मायकल क्रिपॉन आणि नेट कॉन यांनी 'क्रायसिस इन साऊथ एशिया' हे पुस्तक लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात त्यांनी लिहिलं आहे, "पाकिस्ताननं भारतीय सीमेवरील त्यांच्या सैनिकांची तैनात वाढवली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुंदरजी यांनी आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय सैनिकांना बचावात्मक पावित्र्यात तैनात केलं होतं. इतकंच काय, भारतानं राखीव सैनिकदेखील सीमेवर बोलावले होते."
"भारताच्या या पावलामुळे परिस्थिती आणखी बिघडली. दोन्ही देशांचे सैनिक जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या सीमेवर जवळपास आमने-सामने तैनात झाले होते."
"पंतप्रधान कार्यालयानं सुंदरजी यांना पत्रकार परिषद घेऊन भारताच्या या पावलामागचं कारण जागतिक प्रसारमाध्यमांना सांगण्याचे निर्देश दिले. संरक्षण राज्य मंत्री अरुण सिंह आणि जनरल सुंदरजी यांनी 18 जानेवारी 1987 ला संयुक्त पत्रकार परिषद घेत सांगितलं की भारत सीमेवरून आपलं सैन्य मागे घेण्यास तयार आहे, मात्र पाकिस्ताननंदेखील तसंच केलं पाहिजे."
जनरल झिया यांचा भारत दौरा
त्यानंतर लगेचच भारत आणि पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशनमधील हॉटलाईन पुन्हा सुरू करण्यात आली. ऑपरेशन ब्रासटॅक्सदरम्यान 45 दिवस या हॉटलाईनचा वापर करण्यात आला नव्हता.
कांती वाजपेयी यांनी लिहिलं आहे, "संवादातील या तफावतीमुळे भारत पाकिस्तानवर हल्ला करू इच्छितो या अंदाजांना बळकटी मिळाली. संपूर्ण घटनाक्रमाचं वास्तववादी मूल्यांकन केल्यानंतर असं म्हणता येईल की, भारतानं जाणूनबुजून यासंदर्भात स्पष्टता राखली नाही. तसंच आपल्या शक्तीचं प्रदर्शन करून पाकिस्तानला नेहमी अनिश्चितता आणि अस्वस्थतेच्या स्थितीत ठेवलं."

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानच्या वायुदलाचं एक विमान, 21 फेब्रुवारी 1987 ला दिल्लीत उतरलं. त्यामध्ये होते, पाकिस्तानचे जनरल झिया. ते जयपूरमध्ये होत असलेला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आले होते. त्यांनी राजीव गांधींना शांततेचा प्रस्ताव दिला आणि राजीव गांधींनी त्याचा स्वीकार केला.
प्रसारमाध्यमांनी याला क्रिकेट डिप्लोमसी असं म्हटलं. ऑपरेशन ब्रासटॅक्सची सुरुवात नोव्हेंबर 1986 मध्ये झाली आणि त्याचा शेवट मार्च 1987 मध्ये झाला.
लष्करी विश्लेषकांना वाटतं की ऑपरेशन ब्रासटॅक्सनं भारताची लष्करी क्षमता इतक्या प्रभावीपणे दाखवून दिली की त्यामुळे पाकिस्तानला त्यांच्या अणुकार्यक्रमाला गती देण्यास भाग पाडलं.
त्यावेळेस भारताच्या लष्करात 11 लाख सैनिक होते. भारतानं संरक्षणासाठी अर्थसंकल्पात जवळपास 8 अब्ज डॉलर्सची तरतूद केली होती. हे प्रमाण भारताच्या एकूण अर्थसंकल्पाच्या 20 टक्के इतकं होतं. या लष्करी सरावाचे संमिश्र परिणाम झाले.
या लष्करी सरावानं एका मर्यादेपर्यंत पाकिस्तानला अस्वस्थ केलं. मात्र त्याचबरोबर याच कारणामुळे चीनला देखील तिबेटमधील त्यांची लष्करी क्षमता वाढवण्यास भाग पाडलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











