इराण- इस्रायल आणि अमेरिका संघर्षात इराणच्या महिलांची स्थिती काय झालीय? पाहा फोटो

फोटो स्रोत, Majid Saeedi/Getty Images
इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा तिथे राहणाऱ्या नागरिकांवर मोठा परिणाम होतो आहे.
अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर पहिला हल्ला केला, ज्यामध्ये राजधानी तेहरान आणि देशभरातील त्यांच्या क्षेपणास्त्र पायाभूत सुविधा, लष्करी स्थळे आणि नेत्यांना लक्ष्य केले गेले.
या पहिल्या हल्ल्याला आता दोन आठवडे उलटून गेले असले तरी हा संघर्ष अजूनही सुरूच आहे.
1989 पासून इराणचे नेतृत्व करणारे इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे यामध्ये मारले गेले. इस्रायलच्या लष्कराने सांगितलं होतं की, शक्तिशाली इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मधील डझनभर वरिष्ठ नेते देखील मारले गेले आहेत.
इराणने देखील इस्रायल आणि आखातातील अमेरिकेशी संबंधित देशांवर हल्ले सुरू ठेवून प्रत्युत्तर दिलं आहे, हे हल्ले नागरी वस्त्या आणि ऊर्जा सुविधांसह इतर ठिकाणांवर देखील करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Photo by Foad Ashtari/SOPA Images/LightRocket via Getty Images
खामेनी यांच्या मृत्यूनंतर, 8 मार्च रोजी त्यांचा मुलगा मोज्तबा खामेनी यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
कोणत्याही संघर्षात त्या त्या देशांमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागते. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धात महिलांची काय परिस्थिती आहे हे आपण या फोटोंमधून जाणून घेणार आहोत.

फोटो स्रोत, ATTA KENARE / AFP via Getty Images
अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे. इराणने वारंवार असं म्हटलं आहे की त्यांचा अणुकार्यक्रम शांततापूर्ण आहे.
अलिकडच्या काळात अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर देखील हल्ले केले आहेत.

फोटो स्रोत, ATTA KENARE / AFP via Getty Images
9 मार्च रोजी, अमेरिकेतल्या इराणी मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या गटाने (HRANA) इराणमध्ये 1,761 लोक मारले गेल्याची माहिती दिली आहे.
ज्यामध्ये 189 लष्करी कर्मचारी आणि 1,245 नागरिकांचा समावेश आहे, मृतांमध्ये किमान 194 लहान मुलांचा समावेश असल्याचं या गटाने म्हटलं आहे.
याआधी 6 मार्च रोजी, संयुक्त राष्ट्रांमधील इराणच्या राजदूतांनी सांगितलं होतं की, 1,300 हून अधिक लोक या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत.

फोटो स्रोत, ATTA KENARE / AFP via Getty Images
इराणने आरोप केला होता की दक्षिण इराणमधील आयआरजीसी तळाजवळील मुलींच्या शाळेवर अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारी रोजी हल्ला केला.
ज्यामध्ये 160 हून अधिक लोक मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता.

फोटो स्रोत, Kaveh Kazemi/Getty Images
इराणने लावलेल्या आरोपांची आम्ही चौकशी करणार असल्याचं अमेरिकेन म्हटलं आहे. तर इस्रायलने 'आम्हाला या हल्ल्याची कल्पनाच नाही' असं म्हटलं आहे.
या हल्ल्यानंतर इराणमध्ये इंटरनेट पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आलं आहे. तसेच इराणचं हवाई क्षेत्र देखील बंद करण्यात आलं आहे. कनेक्टिव्हिटी जवळजवळ पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आली आहे आणि त्याचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, Morteza Nikoubazl/NurPhoto via Getty Images
इराणच्या सागरी सीमेबाहेर, श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील हिंद महासागरात अमेरिकेच्या पाणबुडीने एक इराणी युद्धनौका बुडवली. त्यामध्ये किमान 87 जणांचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Morteza Nikoubazl/NurPhoto via Getty Images
इराणने दुबईतील हॉटेल्सवर हल्ला केल्याचा आरोप आहे. इतर काही नागरी वस्त्या आणि जहाजांवर देखील हल्ल्याचा आरोप इराणवर लावण्यात आला आहे.
अमेरिकेची लष्करी तळं असणाऱ्या कतार, बहरीन, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि कुवेत आणि अमेरिकेचे सहयोगी असलेल्या ओमान आणि सौदी अरेबियामध्येही हल्ले झाले आहेत.
सायप्रस आणि लेबनॉनमध्येही संघर्ष सुरु झाला आहे आणि सगळ्याच बाजुंनी मोठं नुकसान व जीवितहानी होत आहे.

फोटो स्रोत, Joseph EID / AFP via Getty Images
अमेरिका आणि त्यांच्या अरब मित्र राष्ट्रांनी इराणच्या हल्ल्यांचा निषेध करत एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, "नागरिकांना आणि युद्धात सहभागी नसलेल्या देशांना लक्ष्य करणे हे इराणचं अत्यंत बेजबाबदार आणि अस्थिरता निर्माण करणारं वर्तन आहे".

फोटो स्रोत, AFP via Getty Images
या युद्धामुळे विविध देश अडचणीत आले आहेत. जगभरातील ऊर्जा आणि वाहतूक यामुळे विस्कळीत झाली आहे आणि संघर्षग्रस्त देशांमध्ये देखील अस्थिरता पसरली आहे.

फोटो स्रोत, Majid Saeedi/Getty Images
मध्य पूर्वेतील अस्थिरतेचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ लागला आहे.
इराणने आखातातील जहाजांवर हल्ला केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी प्रभावीपणे बंद करावी लागली. जगभरातील सुमारे 20 टक्के नैसर्गिक तेल आणि वायूचा पुरवठा याचा मार्गाने होतो.
तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि राहणीमानाच्या खर्चावर होणाऱ्या परिणामांबद्दल इशारे देण्यात आले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











